बीएमएम२०२६ स्नेहसंमेलनाची महती

Submitted by Ashwini Kshirsagar on 5 August, 2026 - 05:01

बीएमएम२०२६ अधिवेशनाची महती

अमेरिकेतील बीएमएम अधिवेशन म्हणजेच अमेरिकेतील मराठी मंडळींचे स्नेहसंमेलन याबद्दल भारतात असताना अनेक वेळा ऐकले होते आणि त्याबद्दल मनात खूप उत्सुकताही होती.

दोन वर्षांपूर्वी सॅन होजे येथे झालेल्या अधिवेशनाला उपस्थित राहण्याचा योग आला आणि हे भव्य अधिवेशनाला प्रत्यक्ष अनुभवण्याची संधी मिळाली. अतिशय सुंदर पद्धतीने या मोठ्या संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. करमणुकीच्या अनेक कार्यक्रमांची मेजवानी, मराठी खाद्यपदार्थांची रेलचेल, आप्तेष्टांच्या आणि मित्रमैत्रिणींच्या भेटीगाठींचा आनंद या सगळ्यामुळे हा अनुभव खरोखरच अविस्मरणीय ठरला. यावर्षी सुद्धा सिएटल येथे होणाऱ्या बीएमएम२०२६ अधिवेशनालाही उपस्थित राहण्याची उत्सुकता आहे.

काहींना वाटते, भारतात आपण इतके कार्यक्रम पाहतो, मराठी पदार्थ खातो, मग इथे येऊन एवढा खर्च का करावा? भारतीय रुपयांच्या तुलनेत पाहिले तर तीन दिवसांचे तिकीट महाग वाटू शकते आणि ते सर्वांना सहज परवडेल असे नाही. तरीसुद्धा अमेरिकेत राहणाऱ्या प्रत्येक मराठी माणसाने एक वेगळा अनुभव म्हणून, आपल्या मराठी संस्कृतीशी जोडले जाण्यासाठी आणि हजारो मराठी बांधवांसोबत हा उत्सव साजरा करण्यासाठी आयुष्यातून एकदा तरी या अधिवेशनाला यावे असे मला वाटते.

आपल्या घरात एखादे लग्नकार्य असले किंवा सोसायटीत एखादे गॅदरिंग असले तरी किती धावपळ, नियोजन आणि मेहनत घ्यावी लागते, हे आपण जाणतो. मग इथे तर संपूर्ण अमेरिकेतील सुमारे ६० मराठी मंडळे एकत्र येऊन बीएमएम२०२६ सारखा भव्य कार्यक्रम आयोजित करत आहेत.

ही मंडळे कुठे कुठे आहेत? एवढी मोठी अमेरिका, हजारो मैलांचे अंतर, वेगवेगळ्या वेळा, प्रत्येकाची पाच दिवसांची नोकरी आणि वैयक्तिक जबाबदाऱ्या, अनेक स्वयंसेवकांनी एकमेकांना प्रत्यक्ष पाहिलेलेही नसते. तरीही फोन, व्हिडिओ मीटिंग्स आणि सततच्या समन्वयातून सर्व कार्यक्रमांचे नियोजन करणे ही सोपी गोष्ट नाही. आणि हा कार्यक्रम एका दिवसाचा नाही, तर तब्बल चार दिवसांचा आहे हजारो लोकांसाठी! अमेरिकेतील कडक नियम, वेगळी कार्यपद्धती, अवाढव्य खर्च आणि अनेक आव्हाने सांभाळत हे सर्व केवळ स्वयंसेवकाच्या भावनेतून करणे, हे खरोखरच मोठे शिवधनुष्य आहे.

गेल्या दोन वर्षांपासून शेकडो स्वयंसेवक आपापल्या नोकऱ्या, व्यवसाय आणि कौटुंबिक जबाबदाऱ्या सांभाळत झपाटल्यासारखे काम करत आहेत. तेव्हा कुठे बीएमएम२०२६ सारखा भव्य सोहळा साकार होतो.

यावर्षी बीएमएम२०२६ मध्ये प्रथमच “कलास्पंदन” या नावाने चित्रप्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. महाराष्ट्राशी संबंधित तीन विषयांवर आधारित चित्रकला स्पर्धा अमेरिकेतील मराठी कलाकारांसाठी घेण्यात आली होती. त्यातील निवडक ६० चित्रांचे प्रदर्शन, तसेच दोन दिग्गज कलाकारांचे प्रात्यक्षिक हे या प्रदर्शनाचे मोठे आकर्षण असणार आहे. या प्रदर्शनात माझीही तीन चित्रे सहभागी होत आहेत, ही माझ्यासाठी आनंदाची बाब आहे.

बीएमएम२०२६ मध्ये २० हून अधिक छोट्या मुलांचा महाराष्ट्रातील लोकगीतांवर आधारित “लोकधारा” हा कार्यक्रम, अनेक एकांकिका, नाटके, प्रेरणादायी भाषणे आणि कर्तृत्ववान स्त्रियांचा सत्कार असे विविध कार्यक्रम रसिकांना अनुभवायला मिळणार आहेत. यावेळी प्रथमच भारतातून ३७ कलाकार येऊन "द फोक आख्यान” हा लोकप्रिय कार्यक्रम सादर करणार आहेत. एवढ्या मोठ्या कलाकार संचासह होणारा हा कार्यक्रम बीएमएम२०२६ चे आणखी एक विशेष आकर्षण ठरणार आहे.

मागच्या वेळी मी फक्त प्रेक्षक म्हणून या अधिवेशनाचा आनंद घेतला होता. यावेळी स्वयंसेवक म्हणून नाव नोंदवल्यामुळे आणि जमेल तसा सहभाग घेतल्यामुळे या भव्य अधिवेशनामागे किती मेहनत, नियोजन आणि समर्पण लागते याची अधिक जाणीव झाली.

अमेरिकेत राहणाऱ्या आपल्या मराठी माणसांच्या आणि मुलांच्या कलागुणांना वाव मिळावा, त्यांचे कौतुक व्हावे यासाठी किती विविध कार्यक्रम, स्पर्धा आणि तज्ज्ञांचे मार्गदर्शन आयोजित केले जाते, हे पाहिल्यावर बीएमएम अधिवेशनाचे महत्त्व आणखी जाणवते. भारतातून प्रसिद्ध कलाकारांना बोलावणे एक भाग आहे; पण इथे राहणाऱ्या कलाकारांकडून नाटक, नृत्य, गाणी बसवणे, स्पर्धांचे आयोजन करणे आणि त्यासाठी वर्षभर मेहनत घेणे हेही तितकेच आव्हानात्मक आहे.

इतक्या नाना प्रकारची, नाना ठिकाणची मराठी माणसे एकत्र येतात तेही परदेशात हेच या स्नेहसंमेलनाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य आहे. व्यक्ती तितक्या प्रवृत्ती असतात. त्यामुळे कधी काही चुका, मतभेद किंवा गैरसमज होऊ शकतात. पण आपण एकमेकांना आपले समजून, शक्य तितकी मदत करत राहिलो, तर अशा मोठ्या उपक्रमांचे यश नक्कीच शक्य होते.

अशाच अनेक माणसांच्या योगदानामुळे आणि मराठी संस्कृतीबद्दलच्या प्रेमामुळे हे अधिवेशन इतकी वर्षे यशस्वीपणे सुरू आहे.

आता लवकरच सिएटलमध्ये BMM2026 सुरू होणार आहे आणि त्याचे वेध लागले आहेत. या भव्य सोहळ्यासाठी, त्यामागे अथक परिश्रम घेणाऱ्या सर्व स्वयंसेवकांसाठी आणि सहभागी होणाऱ्या प्रत्येकासाठी मनःपूर्वक शुभेच्छा!

लेखिका : चित्रा मेहेंदळे

Group content visibility: 
Public - accessible to all site users