येतात

Submitted by Sharmila Ranade on 5 August, 2026 - 03:45

घराच्या खिडक्यांत कबुतरं येतात.
दारात कुरियर्स..
दुध येतं मग, न्यूजपेपर्स.
हवा थोडी, ऊन येतं, ते ही आपणहून येतं. बाई येते. बील येतं.
लॉन्ड्री येते लोंबत लोंबत.
चपला येतात, चपला जातात. टीव्हीमधून भुतं येतात.
आठवणी; येस्स. आवाज पण.
ताप येतो, तलफ येते
झोप आली तर जाग येते.
विचार येतात सारखेच
पत्र आणि मित्रं रेअरली मात्र.
घरात धुळ,भिंतीवर ओल, कपाटात वाळवी. नाकात दम, पोटात गोळे,
पायाला मुंग्या, डोक्याला भुंगे.
उंदीर, पाली, माशा, मुंगळे
सगळी सगळी येतात तरी घर नाही भरत.
जात नाही फारसं कोणीच यातलं..
गेलाच तर एखादा माणूस….
मग इतकं सग्ळं येऊन सुद्धा घर, घर नाही उरत.
गेलेली माणसं घर असं उध्वस्त् करतात जेव्हां
कवितेच्या काड्यांनी घर बांधावसं वाटतं तेव्हां.

Group content visibility: 
Use group defaults