चिंब झाले पानोपान

Submitted by द्वैत on 31 July, 2026 - 11:15

चिंब झाले पानोपान, मन तरी भिजले का?
थकलेले दोन डोळे मिटताच निजले का?

ओल्या वाऱ्यासवे आला, ओल्या मातीचा सुगंध
आणि धपापता श्वास जपू पाहे अनुबंध

झाल्या हिरव्या पोपटी साऱ्या वळणाच्या वाटा
भेगाळल्या तळव्यांना तरी टोचतो ना काटा?

सारे सारे साचलेले जाई जळात वाहून
तरी भासे काहीतरी गेले तळाशी राहून

रुजू पहाती नव्याने आता पावसाच्या खुणा
अशावेळी नभाकडे नको पाहू पुन्हा पुन्हा

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्तच

वा!!

चिंब झाले पानोपान, मन तरी भिजले का?
थकलेले दोन डोळे मिटताच निजले का?

सारे सारे साचलेले जाई जळात वाहून
तरी भासे काहीतरी गेले तळाशी राहून

खूप सुंदर कविता... अतीशय आवडली