प्रोजेक्ट प्रोमेथिअस - स्पेस हाईस्ट!

Submitted by राज अज्ञानी on 28 July, 2026 - 14:20

टीप - एका बैठकीत वाचता आले नाही तरी पुढच्या वेळी शोधणे शक्य व्हावे यासाठी भाग पाडले आहेत.

भाग १: गूढ सिग्नल

वर्ष २०४५.

कॅनडाच्या बर्फाच्छादित जंगलांमध्ये वसलेल्या अपेक्स-आर या अथांग रेडिओ टेलिस्कोप डिशवर रात्रीचा गडद अंधार पसरला होता. बाहेर उणे २० अंश सेल्सिअस तापमान होते, पण कंट्रोल रूममध्ये मात्र वातावरण प्रचंड तापले होते.

जगातील सर्वात मोठी ऊर्जा पुरवठादार कंपनी झेनॉन कॉर्पच्या जाहिराती सध्या जगातील प्रत्येक स्क्रीनवर फ्लॅश होत होत्या,
"पृथ्वीवरील पाण्याचा साठा आता संपत आला आहे, अशा आमच्या इशार्‍यांकडे दुर्लक्ष केल्याने पाण्याचा साठा आता अंतिम टप्प्यात आला आहे. हायड्रोजन इंधनाच्या अतिवापरामुळे पाण्याचे अणू कायमचे नष्ट होत आहेत. मानवी सभ्यता वाचवण्यासाठी आता एकमेव पर्याय उरला आहे प्रोजेक्ट प्रोमेथिअस ! अंतराळातील अथांग हायड्रोजन वायू पृथ्वीवर आणण्याची मोहीम!"

या संदेशानंतर जगात सर्वत्र भीतीचे वातावरण होते. हायड्रोजन इंधनाचे भाव गगनाला भिडले होते. पण या संपूर्ण दाव्यावर एकाच माणसाचा विश्वास नव्हता, तो म्हणजे डॉ. कबीर मेहरा.

कबीर 'अपेक्स-आर रेडिओ ऑब्झर्व्हेटरीमधील प्रमुख ॲस्ट्रोफिजिसिस्ट होता. त्याने गेल्या पाच वर्षांपासून अंतराळातून येणाऱ्या फास्ट रेडिओ बर्स्ट्स (FRBs) या अति तीव्र रेडिओ लहरींवर संशोधन केले होते.

"हायड्रोजन नष्ट होतोय? व्हॉट अ रबिश!" कबीर स्वतःशीच पुटपुटला. त्याची बोटं कीबोर्डवर वेगाने चालत होती.

हायड्रोजन जेव्हा इंधन म्हणून जाळला जातो, तेव्हा तो ऑक्सिजनशी संयोग पावून पुन्हा पाण्यातच रूपांतरित होतो.

हे रसायनशास्त्राचं मूलभूत चक्र आहे. हायड्रोजन किंवा पाणी पृथ्वीवरून कायमचे गायब होणे वैज्ञानिकदृष्ट्या अशक्य होते. मग जगातील सर्व नद्या आणि जलाशय सुकत का चालले होते?

पण एव्हढी विख्यात संस्था असे दावे कसे करू शकेल? कुठेतरी कम्युनिकेशन गॅप असावी.
आपणच नीट माहिती घेतली पाहीजे. त्याने मग हा संदेश तीन चार वेळा वाचला.

तो जेव्हां भारतात होता तेव्हांचं त्याला आठवलं, एक सदस्य राजकीय विषयावरचे प्रतिसाद दहा वेळा संपादित करायचा. शेवटी त्याचा नितळ राजकीय प्रतिसाद उरायचा. नितळ आणि राजकीय या काँबोने त्याला त्या ही स्थितीत हसू आलं. पण त्या प्रतिसादामागची मेहनत, ती परिपूर्णतेची भावना, नि:संशय व्यक्तीकरणाची धडपड त्याला भावली होती. अशा वेळी आपणही तेच केलं पाहीजे. त्याच्या मनात विचार आले.

त्याने या संबंधातले गेल्या पाच सहा वर्षातले सगळे लेख वाचायला सुरूवात केली. एकीकडे त्याने एआय ला प्रॉम्प्ट दिला होता. एआय सगळ्या लिंक्स तर शोधेलच, शिवाय काही पुस्तकांची नावेही सुचवेल. अर्थात एआय चा कारभार आता पहिल्यापेक्षा जास्त बावळट झालेला होता. त्यावर महासत्तांनी नियंत्रण प्रस्थापित केलं होतं. युट्यूब आणि फेसबुकच्या अल्गोरिदमचा मूर्खपणा एआयच्या पेड इंडिव्ह्युज्युअल आवृत्तीत केव्हांच आलेला होता. प्रो वर्जन थोडंफार सुसह्य होतं पण जगाच्या नियंत्रक मंडळाच्या अडचणींच्या बाबी वगळूनच ते रिझल्ट देत होतं. एआय मॉडेल्सच्या पॉलिसीज वर आता बड्या संस्थांचा वचक होता.

झेनॉन सुद्धा त्यातलीच एक.
म्हणून स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसणार नाही हे कबीरला माहिती होतं. हे त्याला भारतात असतानाच समजलं होतं. पण तो एकटा होता. लोकांना वाटायचं कि एआय ट्रेन होत जाईल. पॉलिसीज वगळून कुठलंच मॉडेल रिझल्ट देत नाही हे त्यांनी कदाचित इग्नोर केलं असावं. त्याची काम चालूच ठेवून नेहमीप्रमाणे तो शोधमोहीमेच्या कामात गुंगला. अशा वेळी मग जेवणखाण, झोप याचं भान त्याला रहायचं नाही. जगाची फसवणूक होतेय आणि मला ते समोर आणायचंय हा किडा त्यालाही चावलेला होता. त्याचा नाईलाज होता.

कबीरने अंतराळातून येणाऱ्या FRB लहरींच्या स्पेक्ट्रमचा डेटा उघडला. अपेक्स-आर' टेलिस्कोप आणि ड्वार्कसच्या* मागे असलेल्या झेनॉन कॉर्पच्या 'प्रोमेथिअस १ या खाजगी स्पेस स्टेशनमध्ये काहीतरी गुप्त इलेक्ट्रोमॅग्नेटिक देवाणघेवाण सुरू होती.
(* ड्वार्कस अंतराळातला पृथ्वीच्या तुलनेत कमी वातावरण असलेला पण तग धरता येईल असा एक विशाल ग्रह होता.)

अचानक, स्क्रीनवर लाल रंगाची वॉर्निंग लाईट फ्लॅश झाली.

अंतराळात, आपल्या आकाशगंगेच्या सीमेबाहेर सुमारे ४० लाख प्रकाशवर्षे दूर पसरलेल्या गहाळ द्रव्याचा ( Missing Matter / Diffuse Hot Plasma) ढग अस्ताव्यस्त पसरला होता. झेनॉन कॉर्पच्या ड्वार्कसवरील स्टेशनवरून सोडण्यात आलेला एक शक्तिशाली ट्रॅक्टर बीम त्या अंतराळातील अब्जावधी टन तापलेल्या वायूला थेट पृथ्वीच्या दिशेने खेचत होता!

"हे हायड्रोजनसाठी नाहीये, नक्कीच नाही" कबीरचे डोळे आश्चर्याने मोठे झाले.
डेटाच्या सखोल एन्क्रिप्शनमध्ये त्याला मुख्य फाईल सापडली.

प्रोजेक्ट गोल्ड-माइन

झेनॉन कॉर्प अंतराळातून हायड्रोजन आणण्याच्या नावाखाली, त्या प्लाझ्मामध्ये विखुरलेले अब्जावधी टन दुर्मिळ प्लॅटिनम, लिथियम आणि दुर्मिळ मूलद्रव्यं 'डार्क मॅटर ट्रेसर्स' शोषून घेणार होती! हा इतिहासातील सर्वात मोठा अंतराळ दरोडा होता.
अ परफेक्ट स्पेस हाईस्ट.

आणि,
या दरोड्याची किंमत?

तो हाय-एनर्जी प्लाझ्मा जेव्हा पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश करेल, तेव्हा पृथ्वीचा संपूर्ण ओझोनचा थर जळून खाक होणार होता! अब्जावधी लोक रेडिएशनने मरणार होते.

कबीरने लगेच डेटा पेनड्राईव्हमध्ये कॉपी करायला सुरुवात केली.

तब्बल त्याच क्षणी, लॅबच्या दाराचा डिजिटल लॉक तुटला.
चार सशस्त्र, काळ्या जॅकेटमधील झेनॉन कॉर्पचे भाडोत्री सैनिक हातात लेझर गन घेऊन आत घुसले.

त्यांचा कमांडर थंड आवाजात म्हणाला, "डॉक्टर कबीर, तुम्ही खूप जास्त पाहिले आहे. फाईल डिलीट करा आणि शांतपणे आमच्यासोबत चाला."

कबीरचा श्वास रोखला गेला. पेनड्राईव्ह अजून ५% कॉपी व्हायचा बाकी होता!

(क्रमश: भाग २ मध्ये...)

भाग २: प्लॅन

पेनड्राईव्हची स्क्रीन ९७% , ९८%... दाखवत होती.

"मी तीन मोजेन, डॉक्टर," कमांडरने गन कबीरच्या कपाळावर धरली.
"वन...
टू..."

इतक्यात.
धडाSSSम

अचानक लॅबची काच फोडून एक हाय-स्पीड ड्रोन आत शिरला आणि त्याने कमांडरच्या चेहऱ्यावर स्मोक ग्रेनेडचा स्फोट घडवून आणला,
संपूर्ण खोलीत पांढरा धूर पसरला.

"कबीर, खाली वाका!" एक परिचित, कणखर आवाज घुमला.

ती झोया होती. कबीरची प्रॉडक्शनमधली जुनी मैत्रीण आणि अपेक्स आर ची चीफ सिस्टिम इंजिनिअर.
झोयाने कबीरचा हात पकडला, कबीरने टेबलवरून पेनड्राईव्ह उपटला आणि दोघेही तातडीने इमर्जन्सी एक्झिटच्या दिशेने धावले.

मागे रक्षकांचा अंधाधुंद गोळीबार सुरू झाला.

दोघे बाहेरच्या उणे २० अंश तापमानात आले. तिथे झोयाचे ऑल टेरेन स्नो मोबाईल वाहन चालू स्थितीत उभे होते. दोघे त्यावर बसले आणि वाहनाने बर्फाच्छादित जंगलातून सुसाट वेग घेतला. मागे झेनॉन कॉर्पचे दोन फ्लाईंग ड्रोन्स त्यांच्यावर लेझरचा मारा करत पाठलाग करत होते.

"झोया! झेनॉन कॉर्पने लोकांना वेड्यात काढले आहे!" कबीर ओरडला, वाऱ्याच्या आवाजात आवाज पोहोचवण्याचा प्रयत्न करत.
"हायड्रोजन संपलेलाच नाहीये! त्यांनी पाण्याचे सर्व मुख्य प्लँट्स हायजॅक करून कृत्रिम तुटवडा निर्माण केलाय. ते अंतराळातील 'मिसिंग मॅटर' खेचत आहेत झोया!"

"व्हॉट?" झोयाने अचानक स्नो-मोबाईल डावीकडे वळवली. पाठीमागून आलेल्या लेझर बीमने समोरचे एक मोठे झाड जाळून खाक केले.
"पण कशासाठी?" तिने किंचाळतच विचारलं.
प्लॅटिनम आणि लिथियमच्या चोरीसाठी! कबीरने पण ओरडून उत्तर दिलं.

झोयाने डॅशबोर्डवरील मिसाईल बटण दाबले. स्नो मोबाईलमधून दोन छोटे रॉकेट्स सुटले आणि पाठलाग करणाऱ्या दोन्ही ड्रोन्सचा हवेतच स्फोट झाला!

काही अंतरावर असलेल्या गुप्त सेफ हाऊसमध्ये पोहोचल्यावर कबीरने तो पेनड्राईव्ह लॅपटॉपला जोडला.

"बघ झोया"
कबीरला चुप करत झोया म्हणाली "वेट अ मोमेंट"

तिने ट्रेस मिटवत सेफ हाऊसची स्टेल्थ सिस्टम चालू केली. आता त्यांचे सिग्नल्स पकडून कुणीही त्यांचा मग काढू शकणार नव्हतं. अर्थात होपफुली!

कबीरने स्क्रीन दाखवली.
"हा जो अंतराळातील हाय टेंपरेचर प्लाझ्मा आहे, तो अतिशय विरळ आहे. पण जेव्हा झेनॉन कॉर्पचा चंद्रावरील प्रोमेथिअस१ ट्रॅक्टर बीम त्याला काँप्रेस करून पृथ्वीच्या कक्षेत आणेल, तेव्हा त्याचे तापमान १० लाख अंश सेल्सिअसवरून करोडो अंशांपर्यंत वाढेल. जेव्हा हा वायू पृथ्वीच्या स्ट्रॅटोस्फिअरमधे घुसून खाली येईल, तेव्हा पृथ्वीचा ओझोनचा थर काही मिनिटांत नष्ट होईल!"

"त्यांना हे रोखता येत नाही का?" झोयाने विचारले.

"त्यांना फरक पडत नाही!" कबीर म्हणाला. "वॉकर झेनॉन कॉर्पचा सीईओ त्याने ड्वार्कसवर स्वतःसाठी भूमिगत शहर बनवले आहे. तो पृथ्वी उद्ध्वस्त करून ड्वार्कस वर राज्य करायला निघाला आहे!"

"ओह, म्हणजे ही आता सायन्स फिक्शन राहिलेली नाही"
कबीर हसला. "बातम्या शोधून वाचायच्या असतात झोया. आपल्याला दिसतात त्याच नव्हेत"

अचानक, खोलीतील सर्व लाईट्स बंद झाल्या.

बाहेर आकाशाकडे पाहिल्यावर दोघांच्याही अंगावर काटा आला.

रात्रीचे ३ वाजले होते, पण आकाशात अचानक रक्तासारखा लाल आणि चमकणारा निळा रंग पसरू लागला होता. अंतराळातील प्रचंड विद्युतभारित प्लाझ्माचा ढग पृथ्वीच्या वातावरणाला स्पर्श करू लागला होता. विजांचा भयंकर कडकडाट सुरू झाला.

लॅपटॉप स्क्रीनवर टाईमर सुरू झाला.
ट्रॅक्टर बीम फुल कॅपॅसिटी: ४५ मिनिटे शिल्लक.

झोया कबीरकडे बघून म्हणाली, "आपल्याकडे फक्त ४५ मिनिटे आहेत. आपल्याला अपेक्स आर टेलिस्कोपच्या मुख्य डिशचा ताबा घ्यावा लागेल!"

(क्रमश: भाग ३ मध्ये...)

भाग ३: टाइम टिकिंग आणि अंतराळ स्थानकावर हल्ला

वादळ भयंकर रूप धारण करत होते. आकाशातून थेट जमिनीवर निळ्या रंगाच्या विजा पडत होत्या. टेलिफोनच्या तारा आणि विजेचे ग्रिड्स जळून खाक होत होते.

कबीर आणि झोया अपेक्स आर ऑब्झर्व्हेटरीच्या मुख्य नियंत्रण कक्षाजवळ पोहोचले. तिथे झेनॉन कॉर्पच्या तब्बल दहा सशस्त्र सैनिकांचा पहारा होता.

"कबीर, माझ्याकडे एक कल्पना आहे, ऐक नीट" झोया म्हणाली. तिने तिच्या बॅगमधून एक हाय-फ्रीक्वेन्सी ईएमपी (EMP = Electromagnetic Pulse) डिव्हाईस काढले.
"मी यांचा पॉवर सप्लाय आणि शस्त्रे जाम करते. तुला कंट्रोल रूममध्ये जाऊन मुख्य सर्व्हरचा ॲक्सेस घ्यावा लागेल."

"आणि तू?"

"मी बाहेरच्या मुख्य रेडिओ डिशची दिशा मॅन्युअली अनलॉक करेन. जा लवकर!"

झोयाने ईएमपी डिव्हाईस चालू करून सैनिकांच्या दिशेने फेकले. एक मोठा निळा प्रकाश पडला आणि सैनिकांचे लेझर गन्स, नाईटव्हिजन गॉगल्स आणि कम्युनिकेशन सिस्टिम्स एकाच वेळी बंद पडल्या. सैनिकांमध्ये धांदल उडाली.

त्याच संधीचा फायदा घेऊन कबीर दरवाजा तोडून आत मुख्य कंट्रोल रूममध्ये घुसला!

त्याची बोटं कीबोर्डवर थरथरत होती.
वातावरणातील तापमान वेगाने वाढत होते.
स्क्रीनवर दिसत होतं
ओझोन लेअरचे विघटन सुरू झाले होते.

कबीरने ट्रॅक्टर बीम बंद करण्याचा कमांड कोड टाकला.
OVERRIDE BEAM OFF

स्क्रीनवर लाल अक्षरात मेसेज आला.
ACCESS DENIED. CONTROL LOCKED FROM DWARQUES BASE: PROMETHEUS-1

"नो! नो! नो!" कबीर टेबलावर मूठ आपटत ओरडला.

ट्रॅक्टर बीमचा मुख्य कंट्रोल पृथ्वीवरून बंद करता येत नव्हता!
तो थेट ड्वार्कसवरील 'प्रोमेथिअस-१' या स्पेस स्टेशनवरून ऑपरेट होत होता.

तब्बल त्याच वेळी स्क्रीनवर एक व्हिडिओ कॉल कनेक्ट झाला. स्क्रीनवर झेनॉन कॉर्पचा सीईओ व्हिक्टर वॉकर दिसला. तो ड्वार्कसवरील त्याच्या आलिशान, काचेच्या केबिनमध्ये बसून मद्य प्राशन करत होता.

वॉकर हसला, "डॉक्टर कबीर! तुम्ही खूप उशीर केलात. पृथ्वीवरील माणसांचे आयुष्य संपले आहे. आता या विश्वातील खजिना माझा आहे. तुम्ही तो बीम बंद करू शकत नाही!"

बाहरून झोयाचा रेडिओवरून ओरडण्याचा आवाज आला,
"कबीर! बीमची ताकद ९०% झाली आहे! संपूर्ण आकाश जळतेय! काहीतरी कर!"

कबीरच्या डोक्यात प्रचंड ताण आला. बाहेर विजांचा कडकडाट, वॉकरचा उपरोधिक हसण्याचा आवाज आणि हवेतील ऑक्सिजन कमी होत चालल्याची जाणीव...

अचानक कबीरच्या नजरेसमोर तो डेटा आला, जो त्याने ५ वर्षांपूर्वी गोळा केला होता
'फास्ट रेडिओ बर्स्ट्स' (FRBs).

अंतराळातून येणाऱ्या रेडिओ लहरी जेव्हा प्लाझ्मामधून प्रवास करतात, तेव्हा त्यांची फ्रीक्वेन्सी बदलते. जर ट्रॅक्टर बीम बंद करता येत नसेल तर..
रेडिओ लहरींचा वापर करून बीमची दिशा बदलता येऊ शकते!

कबीरच्या चेहऱ्यावर एक वेडेपणाचे हास्य आले.

तो मायक्रोफोनजवळ झुकला आणि वॉकरला म्हणाला, "वॉकर! मी बीम बंद करू शकत नाही हे खरे आहे. पण मी बीमचा 'रिसीव्हर' बदलू शकतो!"

वॉकरच्या चेहऱ्यावरचे हास्य गायब झाले. " व्हॉट डू यु मीन?!"

(क्रमश: भाग ४ मध्ये...)

भाग ४: न्याय

"झोया!" कबीर रेडिओवर किंचाळला.
"डिशचा अँगल १५ अंशांनी पूर्वेकडे फिरव! आत्ता!"

बाहेर, अपेक्स आरची प्रचंड मोठी पोलादी डिश भयानक आवाजासह फिरू लागली. झोयाने मॅन्युअल लिव्हर पूर्ण ताकदीने खेचले होते.

कबीरने अंतराळातून येणाऱ्या एका ताकदवान Fast Radio Burst च्या सिग्नलशी अपेक्स-आरची फ्रीक्वेन्सी मॅच केली. त्याने ट्रॅक्टर बीमच्या मॅग्नेटिक लहरींना त्या FRB सिग्नलवर राईड करायला लावले.

पलिकडून वॉकर किंचाळला, "गार्ड्स! त्याला थांबवा! तो काय करतोय?!"

पण आता खूप उशीर झाला होता.

कबीरने 'ENTER' चे बटण दाबले!

अपेक्स-आर टेलिस्कोपवरून एक प्रचंड शक्तिशाली रेडिओ सिग्नल थेट अंतराळात गेला. त्या सिग्नलने ड्वार्कसवरून येणाऱ्या ट्रॅक्टर बीमचा मार्ग वळवला.

पृथ्वीच्या वातावरणात घुसणारा तो करोडो अंशांचा अंतराळ प्लाझ्माचा ढग अचानक पृथ्वीच्या कक्षेपासून दूर वळला!

तो अति-तापलेला प्लाझ्माचा महाकाय झोत आता थेट सूर्याच्या गुरुत्वाकर्षणाकडे फेकला गेला!

पण खरी थरारक घटना पुढे घडली.

ट्रॅक्टर बीमची दिशा बदलल्यामुळे, ड्वार्कसवरील 'प्रोमेथिअस-१' स्पेस स्टेशन आणि त्या प्लाझ्मा ढगामध्ये एक भयंकर इलेक्ट्रोमॅग्नेटिक बॅकलॅश निर्माण झाला. ट्रॅक्टर बीमचा उरलेला सर्व हाय व्होल्टेज डिस्चार्ज थेट मागे फिरून ड्वार्कसवरील झेनॉन कॉर्पच्या बेसवर आदळला!

"नोओओओओ...!" वॉकरचा किंचाळण्याचा शेवटचा आवाज आला.

ड्वार्कसच्या मागील बाजूस एक प्रचंड, डोळे दीपवणारा स्फोट झाला.
प्रोमेथिअस १ हे संपूर्ण स्पेस स्टेशन, तिथली चोरीची मालमत्ता आणि व्हिक्टर वॉकर एका क्षणात राख आणि भग्न अवशेषांमध्ये रूपांतरित झाले.

पहाट...
पृथ्वीच्या आकाशातील रक्तासारखा लाल रंग हळूहळू गायब होत होता. अंतराळातील तो प्लाझ्माचा ढग निसर्गाच्या नियमानुसार आकाशात सुरक्षित अंतरावर पसरला होता.

पृथ्वीच्या संपूर्ण उत्तर गोलार्धात एकाच वेळी अत्यंत नयनरम्य, हिरव्या आणि निळ्या रंगाचे ऑरोरा चमकू लागले होते. ते दृश्य इतके सुंदर होते की जणू निसर्ग स्वतःच्या बचावाचा उत्सव साजरा करत होता.

कबीर कंट्रोल रूमच्या बाहेर आला. झोया बर्फावर बसून आकाशातील त्या अद्भुत प्रकाशाकडे पाहत होती.

"आपण वाचलो?" तिने थकलेल्या आवाजात विचारले.

"हो," कबीरने तिच्या शेजारी बसत म्हटले. "आणि झेनॉन कॉर्पचा संपूर्ण डेटा आता जगातील प्रत्येक न्यूज चॅनेलवर आणि इंटरनेटवर लाईव्ह स्ट्रीम होतोय."

पुढच्या २४ तासांत जगभरातील पाण्याचे प्लँट्स झेनॉन कॉर्पच्या तावडीतून मुक्त करण्यात आले. हायड्रोजन इंधन जाळल्यावर पुन्हा पाणीच बनते, हे वैज्ञानिक सत्य जगासमोर आले. मानवनिर्मित तुटवडा संपला होता.

कबीर आणि झोया शांतपणे आकाशाकडे पाहत होते.
झोयाने हळूच कबीरकडे पाहिले. तो तिच्याकडेच बघत होता.
दोघांच्याही डोळ्यात स्मित उमटले.
कितीतरी वर्षांनी मानवी भावनांचा त्यांना स्पर्श झाला होता.

आणि दूर अंतराळात...

४० लाख प्रकाशवर्षे दूर पसरलेले ते 'गहाळ द्रव्य' (Missing Matter) अजूनही तिथेच होते.
. मानवी लोभापासून दूर, विश्वाचे रहस्य जपत, अनंतात शांतपणे पहुडलेले! आज मिसिंग मॅटरने बिग बँगपेक्षा भयानक अनुभव घेतला होता.

मानवी लालसेचा.....

***** समाप्त******

तळटीप : हायड्रोजन इंधनातला ग्रे एरीआ - हायड्रोजन तयार करण्यासाठी विजेची गरज असते. जर ही वीज बनवण्यासाठी आपण कोळसा किंवा नैसर्गिक वायू जाळला, ज्याला Grey किंवा Blue Hydrogen म्हणतात , तर हायड्रोजन वापरूनही प्रदूषण कमी होणार नाही, उलट ते वाढेल.

१ किलो हायड्रोजन बनवण्यासाठी साधारण ९ लिटर शुद्ध पाणी लागते.
जर जगात सर्वत्र हायड्रोजन वापरला गेला, तर पाण्याचा वापर प्रचंड वाढेल. आधीच पिण्याच्या पाण्याची टंचाई असताना शुद्ध पाण्याची मागणी वाढणे धोक्याचे ठरू शकते. (जरी समुद्राचे पाणी वापरले, तरी ते शुद्ध / Desalinate करण्यासाठी अथांग ऊर्जा लागेल)
हायड्रोजन खऱ्या अर्थाने निसर्गपूरक तेव्हाच ठरेल, जेव्हा तो बनवण्यासाठी सौर ऊर्जा किंवा पवन ऊर्जेचा वापर होईल याला Green Hydrogen म्हणतात. नवीन काहीतरी येते तेव्हां त्याचे प्रवर्तक त्यातले धोके दडवून ठेवतात. सर्व जग मग एकदम स्वच्छ पर्याय आला म्हणून बेभान होतं. धोके दाखवणार्‍याला वेड्यात काढू लागतं. त्याची किंमत चुकवावीच लागते.
याकडे लक्ष वेधून घेण्यासाठी हा कथारूपी खटाटोप.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छोटीशी पण छान कथा आहे.
विषय विचार करण्यासारखा आहे.
नविन तंत्रज्ञान त्याबरोबर काहीतरी धोका घेऊन येणार हे खरं आहे पण व्यापारी जग त्याच्या कडे सोयिस्कर रित्या दुर्लक्ष करून आपल्या गळी ते उतरवणार