कविता मुरत ठेवायला लागते

Submitted by स्मिता श्रीपाद on 23 July, 2026 - 05:08

घेतलं पेन आणि लिहून काढलं
होत नसतं असं कधी
कविता मुरत ठेवायला लागते
कागदावर उतरवण्याच्या आधी

सुरुवातीला सुचते एकच ओळ, तीही अर्धी
डोक्यामध्ये झालेली असते शब्दांची नुसतीच गर्दी
नेमका शब्द नेमक्या वेळी सापडतच नाही कधी
कविता मुरत ठेवायला लागते
कागदावर उतरवण्याच्या आधी

सुंदर डायरी, नाजूक पेन जामानिमा सारा
छंद, वृत्त, मात्रा, अलंकार याचाच नुसता पसारा
मग शब्द लागतच नाहीत भावनांच्या नादी
कविता मुरत ठेवायला लागते
कागदावर उतरवण्याच्या आधी

हातात भाजीची पिशवी आणि रस्त्यावर ट्राफिक चा घोळ
नेमकी डोक्यामध्ये जुळायला लागते पुढची ओळ
पण त्यावेळी समोर असते किराणामालाची यादी
कविता मुरत ठेवायला लागते
कागदावर उतरवण्याच्या आधी

मिटल्या डोळ्यांपुढे कविता होते साकार
पण शब्दांमध्ये अडकून राहायला देत असते नकार
जिकडे वाट फुटेल तिकडे खळखळणारी नदी
कविता मुरत ठेवायला लागते
कागदावर उतरवण्याच्या आधी

पुन्हा पुन्हा वाचत जाव्यात आपणच लिहिलेल्या ओळी
मग साक्षात्काराचा तो एक क्षण येतो कवीच्या भाळी
एक एक शब्द सापडतो सहज जाता जाता
यमकाला यमक जुळत जातं काहीच न ठरवता
मनात जपलेल्या आठवणी अशा कागदावर उमटतात
नंतर कळतं, लोक त्यालाच कविता म्हणतात
आयुष्यातला प्रत्येक क्षण असा जगावा समरसून
कधीतरी घेतलेला अनुभव मग अलगद येतो उमलून
कोण जाणे कुठल्या क्षणाची कविता होईल कधी
कविता मुरत ठेवायला लागते
कागदावर उतरवण्याच्या आधी

-©️✍️स्मिता श्रीपाद
19 जुलै 2026

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users