
प्राजक्ता सारा बोंगाळे, यांचा बीएमएम २०२६ अधिवेशनात 'स्त्रीत्वाचा सन्मान' उपक्रमांर्गत विशेष सन्मान केला जाणार आहे,
त्यासंदर्भात त्यांच्याशी साधलेला संवाद
त्यांची थोडक्यात ओळख
प्राजक्ता (सारा) बोंगाळे या दापोलीच्या कन्येने जिद्द, शिस्त आणि चिकाटीच्या जोरावर एक प्रेरणादायी प्रवास घडवला आहे. Clinical Research Professional म्हणून कार्यरत असतानाच त्यांनी अमेरिकन सैन्यदलाचे (U.S. Army) कठोर प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण करून सध्या यु.एस. आर्मी मेडिकल डिपार्टमेंटमध्ये सेवा बजावत आहेत. उत्कृष्ट नेमबाजीसाठी Marksmanship Medal आणि प्रशिक्षणातील सर्वोच्च शैक्षणिक गुणवत्तेचा सन्मान मिळवणाऱ्या प्राजक्ता या USA Mrs. Midwest Universe किताबाच्या मानकरीही आहेत. विज्ञान, सौंदर्य स्पर्धा आणि सैन्य अशा तिन्ही क्षेत्रांत उल्लेखनीय यश संपादन करत त्यांनी अनेक महिलांसाठी प्रेरणादायी आदर्श निर्माण केला असून, अमेरिकन सैन्यात सेवा देणाऱ्या महाराष्ट्रातील मराठी महिला म्हणून त्यांनी महाराष्ट्राचा जागतिक स्तरावर गौरव वाढवला आहे.
दापोलीसारख्या छोट्या गावातून सुरू झालेला तुमचा प्रवास आज अमेरिकन सैन्यापर्यंत पोहोचला आहे. या प्रवासाची सुरुवात कशी झाली?
धरतीवरील स्वर्ग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोकणातील दापोली हे माझे मूळगाव. एका बाजूला सह्याद्रीच्या डोंगररांगा, दुसऱ्या बाजूला अथांग अरबी समुद्र आणि लाल मातीने नटलेला सदाहरित प्रदेश माझ्या व्यक्तिमत्त्वाच्या जडणघडणीत खूप मोठा वाटा उचलणारा आहे. याचबरोबर माझ्या आई-वडिलांनी दिलेले संस्कार, प्रामाणिकपणा, शिस्त, मेहनतीची सवय आणि कोणतेही काम मनापासून करण्याची शिकवण यांनी माझ्या व्यक्तिमत्त्वाला योग्य दिशा दिली आणि आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर मला योग्य मार्ग दाखवला. या लाल मातीत वाढताना जिद्द, साधेपणा, कष्ट करण्याची तयारी, संकटांना धैर्याने सामोरे जाण्याची वृत्ती आणि कितीही वेळा पडलो तरी पुन्हा उभे राहण्याची ताकद नकळत माझ्यात रुजली. माझ्या आई-वडिलांनी मला नेहमी मोठी स्वप्ने पाहायला, स्वतःवर विश्वास ठेवायला आणि कोणत्याही परिस्थितीत प्रामाणिकपणा व चिकाटी सोडू नये, हे शिकवले. आज मागे वळून पाहताना मला वाटते की सैनिक होण्यासाठी आवश्यक असलेला मानसिक कणखरपणा मला या लाल मातीतून मिळाला, तर त्या कणखरपणाला योग्य दिशा देण्याचे काम माझ्या आई-वडिलांच्या संस्कारांनी केले. या भूमीने लोकमान्य टिळक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महर्षी धोंडो केशव कर्वे, डॉ.पां. वा. काणे, रॅंगलर परांजपे यांसारखी अनेक नररत्ने देशाला दिली. त्यांच्या कार्यातून देशसेवा, शिक्षण, प्रामाणिकपणा आणि राष्ट्रनिष्ठेची प्रेरणा मला मिळाली. त्या प्रेरणेमुळेच मोठी स्वप्ने पाहण्याचे धाडस आणि ती पूर्ण करण्यासाठी चिकाटीने प्रयत्न करण्याची वृत्ती माझ्यात निर्माण झाली.
दापोलीपासून अमेरिकन सैन्यापर्यंतचा माझा प्रवास हा एका दिवसात घडलेला नाही; तो माझ्या कोकणच्या लाल मातीतून मिळालेल्या जिद्दीचा, माझ्या आई-वडिलांनी दिलेल्या संस्कारांचा, कुटुंबाच्या भक्कम पाठिंब्याचा आणि अनेक वर्षांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांचा परिणाम आहे.
लहानपणापासूनच सैन्यदलाबद्दल आकर्षण आणि देशसेवेची भावना होती. ही प्रेरणा कुठून मिळाली?
मी माध्यमिक शाळेत असताना आमच्या शाळेत एन.सी.सी.चे प्रशिक्षण होते. त्या काळापासूनच लष्करी अधिकाऱ्यांबद्दल माझ्या मनात विशेष आकर्षण आणि आदर होता. एन.सी.सी.चा गणवेश परिधान करून शिस्तबद्ध पद्धतीने परेड करताना मनात एक वेगळीच ऊर्जा निर्माण व्हायची. मात्र केवळ गणवेषाचे आकर्षण नव्हते; त्या मागील शिस्त, कठोर प्रशिक्षण, नेतृत्वगुण, संघभावना आणि देशसेवेची भावना मला अधिक भावली. एन.सी.सी.मधील प्रशिक्षणामुळे सैन्य जीवनातील कठोर शारीरिक आणि मानसिक प्रशिक्षणाबद्दल माझ्या मनात विशेष ओढ निर्माण झाली आणि एक दिवस स्वतः सैनिक बनायचे हे स्वप्न अधिक दृढ झाले. मी शालेय जीवनात खेळाडू (Athlete) देखील होते. त्यामुळे शिस्त, नियमित सराव, शारीरिक तंदुरुस्ती, सहनशक्ती आणि स्पर्धात्मक वृत्ती हे गुण लहानपणापासूनच माझ्यामध्ये विकसित झाले. पुढे अमेरिकन सैन्याच्या कठोर प्रशिक्षणादरम्यान याच गुणांचा मला मोठा फायदा झाला.
कॅन्सर संशोधनासारख्या महत्त्वाच्या क्षेत्रात काम करत असताना सैन्यात जाण्याचा निर्णय घेणे हा मोठा बदल होता. हा निर्णय कसा घेतला?
सैन्यात भरती होण्याचे स्वप्न मी लहानपणापासून पाहत होते. ते पूर्ण करण्यासाठी जिद्दीने आणि चिकाटीने प्रयत्न करण्याचे मी ठरवले होते. मात्र महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना झालेल्या अपघातामुळे काही काळासाठी हे स्वप्न बाजूला ठेवावे लागले. विवाहानंतर अमेरिकेत स्थायिक झाल्यावर मी Clinical Research Professional म्हणून कॅन्सर संशोधन क्षेत्रात कार्यरत होते. त्याचबरोबर मॉडेलिंग आणि सौंदर्य स्पर्धांमध्येही सक्रिय सहभाग घेतला आणि अनेक स्पर्धांमध्ये यश मिळाले. Mrs. Midwest Universe USA हा किताब मिळणे हा माझ्या आयुष्यातील अत्यंत अभिमानाचा क्षण होता. परंतु या सर्व यशानंतरही माझ्या मनात एकच स्वप्न कायम जिवंत होते सैन्यात दाखल होऊन देशसेवा करण्याचे.
जेव्हा अमेरिकन सैन्यात भरती होण्याची संधी मिळाली, तेव्हा मला वाटले की माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा क्षण समोर उभा आहे. हा निर्णय घेण्यापूर्वी मी माझे पती श्री. समीर बोंगाळे, माझे वडील डॉ. चंद्रमोहन भांबुरे, माझे सासरे श्री. निवृत्ती बोंगाळे आणि सासूबाई सौ. सुनंदा बोंगाळे यांच्याशी चर्चा केली. सर्वांनी माझ्या निर्णयाचा आदर केला आणि माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले. माझ्या वडिलांनी मला एक गोष्ट सांगितली, जी आजही माझ्यासाठी प्रेरणादायी आहे “हा प्रवास कठीण आहे; पण तुझी जिद्द, मेहनत, प्रामाणिकपणा आणि दुर्दम्य इच्छाशक्ती तुला नक्की यश मिळवून देईल.” त्यांच्या त्या शब्दांनी माझा आत्मविश्वास अधिकच बळकट झाला. त्यानंतर मी सर्व आवश्यक निकष पूर्ण करून अमेरिकन सैन्यात भरती झाले आणि माझ्या लहानपणापासून जपलेल्या स्वप्नाच्या दिशेने पहिले पाऊल टाकले.
विज्ञान क्षेत्रातील शिक्षण, Clinical Research Professional म्हणून करिअर, मॉडेलिंग आणि आता U.S. Army इतक्या वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये वाटचाल केली. हे कसे शक्य झाले?
मला लहानपणापासून जीवशास्त्र विषयाची विशेष आवड होती. त्यामुळे मी Endocrinology या विषयात पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. पदव्युत्तर शिक्षणानंतर Clinical research मध्ये शिक्षण घेतले. लग्नापूर्वी मी K.E.M. Hospital येथे Diabetes research तसेच पुढे NARI म्हणजेच National AIDS Research Institute येथे काम केले. विवाहानंतर अमेरिकेत स्थायिक झाल्यावर Clinical Research Professional म्हणून कॅन्सर संशोधन क्षेत्रात काम करण्याची संधी मिळाली. भारतात असतानाच मॉडेलिंग आणि सौंदर्य स्पर्धांमध्ये सहभागी होत असे. पुढे अमेरिकेतही त्या क्षेत्रात काम करत राहिले आणि त्यामध्येही यश मिळाले. ही सर्व क्षेत्रे वेगवेगळी असली तरी त्यामागील मूलभूत मूल्ये समान आहेत शिस्त, समर्पण, सातत्य, कठोर परिश्रम आणि उत्कृष्टतेचा ध्यास.
Clinical Research मध्ये अचूकता, जबाबदारी आणि बारकाई आवश्यक असते. मॉडेलिंगमध्ये आत्मविश्वास, व्यक्तिमत्त्व आणि सातत्य महत्त्वाचे असते. सैन्यात शिस्त, नेतृत्व, मानसिक कणखरपणा आणि संघभावना आवश्यक असते. या प्रत्येक क्षेत्राने मला वेगवेगळ्या प्रकारे घडवले आणि अधिक सक्षम बनवले. माझी एक सवय आहे, कोणतेही काम हाती घेतले की त्यामध्ये मी स्वतःला पूर्णपणे झोकून देते आणि शंभर टक्क्यांपेक्षा अधिक देण्याचा प्रयत्न करते. माझ्या मते कोणतेही क्षेत्र निवडा, पण प्रामाणिकपणे, समर्पणाने आणि उत्कृष्टतेचा ध्यास घेऊन काम केले, तर यश नक्की मिळते.
लग्नानंतर अमेरिकेत स्थायिक झाल्यावर कुटुंब, करिअर आणि स्वतःची स्वप्ने यांचा समतोल कसा साधला?
कुटुंब, करिअर आणि स्वतःची स्वप्ने यांचा समतोल साधणे हे कोणत्याही स्त्रीसाठी सोपे नसते. त्यासाठी स्वतःची इच्छाशक्ती जितकी महत्त्वाची असते, तितकाच जोडीदाराचा विश्वास आणि पाठिंबाही महत्त्वाचा असतो. या बाबतीत मी स्वतःला खूप भाग्यवान समजते, कारण माझे पती श्री. समीर बोंगाळे यांनी माझ्या प्रत्येक स्वप्नावर माझ्याइतकाच विश्वास ठेवला. सैन्यात भरती होण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या सक्षम राहणे आवश्यक होते. योग्य आहार, नियमित व्यायाम, धावणे, मानसिक तयारी, अभ्यास आणि वेळेचे नियोजन यावर आम्ही दोघांनीही विशेष भर दिला. समीर यांनी प्रत्येक टप्प्यावर मला प्रोत्साहन दिले, योग्य मार्गदर्शन केले आणि माझा आत्मविश्वास कायम ठेवला.
माझी मुलगी समायरा आणि मुलगा स्वराज हे दोघेही अतिशय समंजस आहेत. प्रशिक्षणाच्या काळात त्यांनीही परिस्थिती समजून घेतली आणि माझ्या स्वप्नासाठी त्याग केला. त्यांच्या समजूतदारपणामुळे आणि समीर यांनी घरातील सर्व जबाबदाऱ्या अत्यंत प्रेमाने आणि समर्थपणे सांभाळल्यामुळे मी निर्धास्तपणे माझ्या ध्येयावर लक्ष केंद्रित करू शकले.
माझ्या मते, यशस्वी स्त्रीच्या मागे तिच्या स्वप्नांवर विश्वास ठेवणारे आणि तिच्या ध्येयाचा आदर करणारे कुटुंब उभे असेल, तर ती कोणतेही ध्येय गाठू शकते. माझ्या यशामध्ये माझ्या संपूर्ण कुटुंबाचा तितकाच वाटा आहे.
U.S. Army चे प्रशिक्षण शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या अत्यंत आव्हानात्मक असते. त्या काळातील सर्वात मोठे आव्हान कोणते होते?
यु.एस. आर्मीमधील प्रशिक्षण हे शारीरिक, मानसिक आणि भावनिक अशा तिन्ही स्तरांवर अत्यंत खडतर असते. प्रत्येक दिवस हा स्वतःची क्षमता सिद्ध करण्याचा असतो. प्रशिक्षणामध्ये नेमबाजी (Marksmanship), रॅपलिंग (Rappelling), Tactical Combat Casualty Care, Obstacle Course, विविध Combat Trainings, तसेच पाठीवर सुमारे ३५ पाउंड वजनाची बॅग घेऊन अनेक मैल चालणे, कठीण हवामानात प्रशिक्षण घेणे, तीन दिवस जंगलामध्ये (The Forge) राहून मिशन पूर्ण करणे अशा अनेक आव्हानात्मक टप्प्यांचा समावेश असतो. यासोबतच क्लासरूममधील प्रशिक्षणासाठी सातत्याने अभ्यास करावा लागतो, कारण प्रत्येक टप्प्यावर लेखी आणि प्रात्यक्षिक परीक्षा घेतल्या जातात. त्या उत्तीर्ण झाल्यानंतरच पुढील टप्प्यात प्रवेश मिळतो. त्यामुळे प्रत्येक दिवशी स्वतःला अधिक सक्षम सिद्ध करावे लागते. मात्र माझ्यासाठी सर्वात मोठे आव्हान शारीरिक नव्हते, तर भावनिक होते. प्रशिक्षणादरम्यान अनेक आठवडे मोबाईल वापरण्याची परवानगी नसते. त्यामुळे माझ्या मुलांचा किंवा पतीचा आवाज ऐकता येत नव्हता. त्यांच्या तब्येतीची, शिक्षणाची आणि दैनंदिन आयुष्याची माहिती फक्त पत्रांमधून मिळायची.
एक आई आणि पत्नी म्हणून हा काळ माझ्यासाठी अत्यंत भावनिक होता. मुलांची खूप आठवण यायची, त्यांच्याशी बोलावे, त्यांना मिठी मारावी असे मनापासून वाटायचे. पण त्याच वेळी मला माझे ध्येयही पूर्ण करायचे होते. त्या भावनांवर नियंत्रण ठेवून प्रशिक्षणावर पूर्ण लक्ष केंद्रित करणे, हीच माझ्यासाठी खरी परीक्षा होती.
या संपूर्ण प्रवासाने मला एक महत्त्वाचा धडा दिला सैनिक होणे म्हणजे केवळ शारीरिकदृष्ट्या सक्षम असणे नव्हे, तर परिस्थिती कितीही कठीण असली तरी भावनांवर नियंत्रण ठेवत कर्तव्याला सर्वोच्च प्राधान्य देणे होय.
कुटुंबापासून दूर राहून प्रशिक्षण पूर्ण करताना तुमचा अनुभव कसा होता?
प्रशिक्षणाच्या काळात कुटुंबापासून इतका दीर्घ काळ दूर राहण्याचा अनुभव माझ्यासाठी पूर्णपणे नवीन होता. आई म्हणून मुलांची सतत आठवण यायची. त्यांचे खाणे-पिणे, शाळा, अभ्यास आणि आरोग्य याची काळजी मनात कायम असायची. मी कधीच त्यांच्यापासून इतका काळ दूर राहिले नव्हते. समीर यांनी घरातील सर्व जबाबदाऱ्या अत्यंत समर्थपणे सांभाळल्या आणि मला नेहमी निश्चिंत राहण्याचा धीर दिला. ध्येय गाठायचे असेल तर काही त्याग अपरिहार्य असतात, हे त्या काळात प्रकर्षाने जाणवले. प्रत्येक पत्रातून मला मुलांचे प्रेम, कुटुंबाचा विश्वास आणि पुढे जाण्याची नवी ऊर्जा मिळत गेली. या अनुभवामुळे मला सैनिकांबरोबरच त्यांच्या कुटुंबीयांच्या त्यागाचीही खरी जाणीव झाली. देशसेवा करणारा सैनिक जितका त्याग करतो, तितकाच त्याच्या कुटुंबालाही करावा लागतो. त्यामुळे आज सैनिक आणि त्यांच्या कुटुंबीयांविषयी माझ्या मनात अधिक आदर आहे.
प्रशिक्षणादरम्यान उत्कृष्ट नेमबाजीसाठी मार्क्समनशिप पदक आणि शैक्षणिक कामगिरीबद्दल विशेष गौरव मिळाला. त्या क्षणाचा अनुभव कसा होता?
प्रशिक्षणादरम्यान उत्कृष्ट नेमबाजीसाठी मला Marksmanship Medal मिळाले. तसेच AIT मधील शैक्षणिक प्रशिक्षणामध्ये सर्वाधिक गुण मिळवून प्रथम क्रमांक मिळवण्याचा सन्मानही मला मिळाला. हे दोन्ही क्षण माझ्या आयुष्यातील अत्यंत अभिमानाचे आणि अविस्मरणीय ठरले.
माझ्यासाठी हे पुरस्कार केवळ वैयक्तिक यश नव्हते. त्यामागे अनेक महिन्यांची मेहनत, सातत्य, शिस्त, प्रशिक्षकांचे मार्गदर्शन आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे माझ्या कुटुंबाचा विश्वास आणि त्याग होता. Basic Combat Training मध्ये Marksmanship Medal मिळणे हे माझ्या शिस्तबद्ध सरावाचे फळ होते, तर AIT मध्ये सर्वोच्च शैक्षणिक गुण मिळवणे हे शिक्षणाबद्दलची माझी आवड, मेहनत आणि सातत्य यांचे प्रतीक होते. माझ्या मते, एक चांगला सैनिक शारीरिकदृष्ट्या सक्षम असण्याबरोबरच बौद्धिकदृष्ट्याही सक्षम असणे तितकेच आवश्यक आहे.
हे सन्मान मिळाल्यावर मला आनंद झाला, पण त्याहून अधिक आनंद माझ्या आई-वडिलांना, पतीला, मुलांना आणि संपूर्ण कुटुंबाला झाला. त्यांच्या डोळ्यांतील अभिमान पाहणे, हीच माझ्यासाठी सर्वात मोठी कमाई होती. आजही हे पुरस्कार मला दररोज आठवण करून देतात की, प्रामाणिक मेहनत, सातत्य आणि स्वतःवरचा विश्वास असेल तर कोणतेही ध्येय अशक्य नसते.
तुमच्या या प्रवासात पती समीर बोंगाळे आणि कुटुंबाचा मोठा आधार राहिला. त्यांच्या पाठिंब्याबद्दल तुम्ही काय सांगाल? आई, पत्नी आणि व्यावसायिक व्यक्ती या सर्व भूमिका सांभाळताना तुम्ही स्वतःला कसे प्रेरित ठेवले?
खरं सांगायचं झालं तर, आज मी जे काही साध्य करू शकले आहे त्यामागे माझे पती श्री. समीर बोंगाळे यांचा सर्वात मोठा वाटा आहे. त्यांनी माझ्या स्वप्नांवर माझ्याइतकाच विश्वास ठेवला आणि प्रत्येक टप्प्यावर खंबीरपणे माझ्या पाठीशी उभे राहिले. मी Basic Combat Training आणि AIT साठी घरापासून दूर असताना त्यांनी घरातील सर्व जबाबदाऱ्या अत्यंत समर्थपणे सांभाळल्या. मुलांचे शिक्षण, दैनंदिन दिनक्रम आणि माझ्या अनुपस्थितीत आवश्यक असलेली प्रत्येक गोष्ट त्यांनी अत्यंत प्रेमाने आणि संयमाने सांभाळली. त्यामुळे मी कोणतीही चिंता न करता प्रशिक्षणावर पूर्ण लक्ष केंद्रित करू शकले. माझी मुलगी समायरा आणि मुलगा स्वराज यांनीही त्यांच्या वयानुसार विलक्षण समजूतदारपणा दाखवला. त्यांनी माझ्या अनुपस्थितीला कधीही अडथळा बनू दिला नाही. माझे वडील, बहीण, सासू-सासरे, नणंदा आणि संपूर्ण कुटुंबीयांनी दिलेला मानसिक आधारही तितकाच महत्त्वाचा होता. प्रशिक्षणादरम्यान जेव्हा जेव्हा कठीण क्षण आले, तेव्हा माझ्या कुटुंबाचा विश्वास, माझ्या मुलांचे चेहरे आणि माझे ध्येय मला पुढे चालत राहण्याची प्रेरणा देत राहिले. त्यामुळे हे यश केवळ माझे नाही, तर माझ्या संपूर्ण कुटुंबाचे आहे, असे मी मनापासून मानते. आई, पत्नी, व्यावसायिक आणि सैनिक या सर्व भूमिका निभावताना वेळेचे योग्य नियोजन, शिस्त, सकारात्मक दृष्टिकोन आणि ध्येयाप्रती असलेली निष्ठा यांनी मला नेहमीच प्रेरित केले. प्रत्येक भूमिकेची जबाबदारी स्वीकारताना मी एकच गोष्ट लक्षात ठेवली स्वप्न कितीही मोठे असले तरी त्यासाठी केलेली मेहनत, त्याग आणि सातत्य कधीच वाया जात नाही.
सध्या यु.एस. आर्मी मेडिकल डिपार्टमेंटमध्ये सेवा देताना तुमची पुढील उद्दिष्टे काय आहेत?
सध्या मी यु.एस. आर्मी मेडिकल डिपार्टमेंटमध्ये सेवा देत असून, माझे पहिले उद्दिष्ट म्हणजे माझ्यावर सोपविण्यात आलेली प्रत्येक जबाबदारी प्रामाणिकपणे, शिस्तीने आणि उत्कृष्टतेने पार पाडणे. माझ्या सहकाऱ्यांसोबत एक सक्षम टीम सदस्य म्हणून काम करत सर्वोत्तम आरोग्यसेवा देण्याचा माझा नेहमी प्रयत्न राहील. यापुढेही सैन्यामध्ये सातत्याने नवीन कौशल्ये आत्मसात करणे, नेतृत्वगुण विकसित करणे आणि अधिक जबाबदाऱ्या स्वीकारण्यासाठी स्वतःला तयार ठेवणे हे माझे ध्येय आहे. शिकण्याची प्रक्रिया कधीच थांबू नये, असा माझा विश्वास आहे.
यासोबतच माझे Clinical Research मधील ज्ञान आणि सैन्यातील अनुभव यांचा उपयोग करून आरोग्यसेवा क्षेत्रात अधिक परिणामकारक योगदान देता आले, तर त्याचा मला विशेष आनंद होईल.
कुटुंबात सैन्याची पार्श्वभूमी नसतानाही तुम्ही हा मार्ग निवडला. इतर महिलांना तुम्ही काय संदेश द्याल?
माझ्या कुटुंबात सैन्याची कोणतीही पार्श्वभूमी नव्हती. तरीही मी हे स्वप्न पाहिले आणि ते पूर्ण करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे मला मनापासून वाटते की कोणत्याही स्वप्नासाठी पार्श्वभूमीपेक्षा तुमची जिद्द, मेहनत आणि स्वतःवरील विश्वास अधिक महत्त्वाचा असतो. मी सर्व महिलांना एवढेच सांगू इच्छिते की, स्वतःची इतरांशी तुलना करू नका. प्रत्येकाचा प्रवास वेगळा असतो. स्पर्धा दुसऱ्यांशी नसून स्वतःशी असावी. कालपेक्षा आज अधिक चांगले बनण्याचा प्रयत्न करा. उत्साह, उपक्रमशीलता आणि सकारात्मक दृष्टिकोन हे सुंदर आयुष्याचे आधारस्तंभ आहेत. जिद्द, चिकाटी, शिस्त, प्रामाणिक प्रयत्न आणि दुर्दम्य इच्छाशक्ती असेल तर कोणतेही ध्येय अशक्य राहत नाही. स्वप्ने नेहमी उघड्या डोळ्यांनी पाहा आणि ती पूर्ण करण्यासाठी डोळे मिटेपर्यंत अथक प्रयत्न करा. आयुष्यात कितीही अडचणी आल्या तरी हार मानू नका. प्रत्येक अडथळा आपल्याला काहीतरी नवीन शिकवून जातो आणि अधिक मजबूत बनवतो.
आज मी कोकणातील दापोलीसारख्या छोट्या गावातून अमेरिकन सैन्यापर्यंतचा प्रवास करू शकले, तर कोणतीही मुलगी तिच्या मनातले कोणतेही स्वप्न नक्कीच पूर्ण करू शकते, यावर माझा ठाम विश्वास आहे.
मुलाखतकार: अश्विनी क्षीरसागर