मी हे जे काही लिहित आहे ते खरंतर अत्यंत गंभीरपणे लिहित आहे, पण ते कुणाला विनोदी वाटु शकते म्हणुन इथेच पोस्टते.
टी.व्ही. वरच्या काही जाहीराती इतक्या स्सॉल्लीड विनोदी असतात की कधी विनोदी कार्यक्रम बघायचा मूड आला तर आम्ही जाहीराती बघतो आणि त्यावर चर्चा करुन फुक्कट धम्माल करतो. तापदायक मालिका बघण्यापेक्षा हे आवडतं आम्हाला. त्यातुन आम्हाला एक पुणेरी आनंदही मिळतो. उदाहरणादाखल ह्या काही जाहीराती.
लक्सः ही बया वरच्या मजल्यावर बाथरूमची दारं-खिडक्या उघडी ठेऊन अंघोळ करत असते. आणि रस्त्यावर लोक तिरपे बिरपे होउन पडत असतात. हा साबण आम्ही घरी विकत आणला. तो मी माझ्या मुलीच्या अंगाला लावत असताना ती बिचारी म्हणाली, 'आई, चेक कर. रस्त्यावर माणसं पडतायत का बघ.....' बरं, हिची बाथरूमही केवढी! बाथरूम आहे की बाथ हॉल? हिच्या ह्या उघड्या बाथ हॉलसमोर कुणीच कसं रहात नाही. आमच्या इथे तर खिडकी जरासुद्धा उघडायची सोय नाही. खिडकीतुन काय काय प्रकार आत शिरतील सांगता येत नाही. प्राणी, कॅमेरे, वास अगदी स्सगळं स्सगळं. अंघोळ झाल्यावर ती बाहेर पडते. ड्रेसच्या पट्टीला हाताने हळुहळु हसतमुख सुचक नजरेने वर सरकवते. असं पाह्यल्यावर कोण बिचारा कोसळणार नाही राव? कैच्या कै. ह्याच्याच नव्या जाहीरातीत तिची पट्टी खाली सारखी सारखी पडते. कोन नाय बघनार राव? अजुन काय पडतंय का म्हुन.
पीअर्सः एक गुणाची पोर मिम्मी कि मम्मी असं काहीतरी ओरडत घराच्या ह्या टोकापासुन त्या टोकापर्यंत सकाळी सकाळी हातातल्या बिच्चार्या बाहुलीला लोळवत ओढत घेऊन जाते. बघा हं, म्हणजे आईची रूम आणि पोरीची रूम घराच्या अशा २ टोकांना आहे का? वाटेत आज्जी, वडील असं कोण कोण तिला प्रेमानं जवळ घेऊ पहातात तर ती उद्धटपणाने त्यांना दूर ढकलुन ह्या सर्व 'अशुभ' व्यक्तींकडे पहायला लागू नये म्हणुन आपले डोळे झाकुन घेते! मग पडद्याआडुन 'मिम्मी' येते. माझी पोरगी अशी बोंबलत आली असती ना तर येक कानाखाली लावली असती. कान पकडुन विचारलं असतं, काये गं , काय कमी पडलंय तुला?
पण ही मिम्मी हसर्या चेहर्यानं समोर येते. खर्या जीवनातला हाच फरक आहे. तिथं माझ्यासारखी ओरडणारी खरी आई थोडीच दाखवता येते? ती गुणाची पोर म्हणते, 'आज्य माझी एक्झॅम आहे आणि तुझा चेहला माझ्यासाठी लकी आहे. जिला एक्झॅम म्हणता येतं तिला चेहरा म्हणता येणार नाही! अशा ढ मुलीला अभ्यास न करता काय आईचं लक्की तोंड पास कलनाले पलिक्षेत? बरं म्हणजे हा 'उत्कृष्ठ' साबण घरात काय फक्त आईच वापरते काय? मग घरातले बाकीचे कुठला वापरतात? ओके? की ज्यामुळे त्यांचा चेहला लकि नशतो. ह्यांच्याच घरात एकवाक्यता नाही - एकमत नाही तर, आम्ही का ह्यांचं ऐकुन हा साबण घ्यायचा? शांगा बलं??
अता ह्या जाहीरातीत प्रॉडक्ट कोणते आहे ते मला निटसे आठवत नाही. बघा म्हणजे किती चुकीची जाहीरात. एक गोड पिल्लु आईसोबत दवाखान्यात आलंय. ते कुठल्याही अंगानं आजारी होतं असं वाटत नाही. मग दोघेही धडधाकट असताना हे काय दवाखान्याचं इंटेरीअर बघायला आलेत का डॉक्टरांची ख्याली खुशाली घ्यायला? अखेर हसत हसत व्हिजीटर बाई, त्यांचा मुलगा बाहेर निघतात आणि त्यांना बाहेर पर्यंत सोडायला डॉक्टर येतात. तुमचे डॉक्टर येतात का हो तुम्हाला असे बाहेर पर्यंत सोडायला? अगदी कितीही घरेच असले तरी?? बाई आणि डॉक्टर गप्पात्-हसण्यात गुंग असताना बाळ आपल्या हातांनी पाणी घेतं. डॉक्टरांपेक्षा बाईच जास्त आरडाओरडा करतात. आपल्या डॉक्टरांसमोर आपण कसे शहाण्या बाळासारखे वागतो. तिथे काय बोलायची टाप असते का? ते सोडाच बर्याचदा डॉक्टर काय बोलले तेच मला नंतर नीट आठवत नाही. (गझनी फेम आजार) म्हणुन मग, 'जे काही असेल, ते सगळं लिहुन द्या' असं मी म्हणते.
एकात तर प्युअर ईट आय थिंकः सेल्समन बिच्चारा जीव तोडुन सांगत असतो, तेही पिवळा धम्मक रेनकोट घालुन. तर हा ग्राहक चक्क त्याला आपल्या चुळेने अंघोळ घालतो. ह्यावरुन तो सेल्समन किती निकड असलेला असणार ते समजते. आपण नाय बा अशा चुळा सहन करणार. लाथ मारुन सोडीन नोकरी, पण चुळ नाय.
दस का लक्सः ऐश्वर्या राय एक चिंटुकली पर्स घेऊन एकटीच शॉपींग मॉल मध्ये फिरत असते. दहादा लोक्स 'दहा-दहा' असं हाताची दहाही बोटं नाचवत तिच्यासमोर येतात. ही ऐश्वर्या शोल्डरलेस ड्रेसला (लेस लावलेला शोल्डर नव्हे, शोल्डर लेस म्हणजे शोल्डर नसलेला) नाडीच्या पट्ट्या लावून फिरतेय. लोक काय सोडतील तिला! १०-१० करण्यापेक्षा 'ऐश्वर्या ऐश्वर्या' म्हणत तिला गराडा घालतील की! तुमच्यासमोर अशी ती आली तर तुम्ही काय कराल? आ? आ??
संतुरः ही एक जेलसी क्रिएट करणारी जाहीरात आहे. कारण अशा जाहीराती बघुन माझ्यासारख्यांना हेवा -मत्सर ह्यानी ग्रासलं जाऊ शकतं. 'हाय, यंग लेडी.' असं म्हणत काही लोक चेहर्याचा जमेल तितका मोठा चम्बु करुन विचारतात. तिनं उत्तर देण्यापुर्वी तिची एक ६-७ वर्षाची पोर येते, 'मम्मी....' म्हणते. त्यावर पुन्हा तोच चंबु. पुन्हा प्रश्न. 'मम्मी??....' ह्या लोकांनी चंबुची दहावेळा प्रॅक्टीस केली असणार. इतका एक्सारखा सगळ्यांचा चंबु? ह्या मम्मीची मुलगी एवढी, म्हणजे हिचं लग्न ७-८ वर्षापुर्वी झालं असणार... मग हिचं वय.... काय टोटलच लागत नाहीये. बहुतेक ह्या मम्मीचं लग्न वयाच्या १८व्या वर्षी कायद्याला धरुन झालं असणार!
क्लोज्-अपः 'पास आओ.. पास आओ....... पास आओ ना.....ऊऊऊ उ' हा. असंच आहे ते. असे पार्श्वगीत चालु असताना एक नवयौवना साबणाचे फुगे-बुडबुडे जत्रेंत सोडत असते. ह्याच उद्देशाने जत्रेत आली का काय ही. सोड बुडबुडा-गाठ मुलगा. तर त्यातला एक बुडबुडा एका उच्चासनावर बसलेल्या माकडाच्या अगदी जवळुन सरकतो. माकड हात लांब करुन चांन्स घ्यायचा प्रयत्न करते पण बुडबुडा त्याच्या हाती लागतच नाइ काइ. माकडांना फ्रेश ब्रेथची गरज नाही असे वाटत असणार ह्यांना. आता ते माकडालाच विचारले पाहिजेल, पण त्या मुलीला माकड नको असेल म्हणुन तो आज्ञाधारक बुडबुडा आपली मार्गक्रमणा करीत राह्यला. आणि मग तो निर्णायक क्षण. एवढ्या गर्दीतुन वाट काढीत तो बुडबुडा त्या भाऊगर्दीतल्या त्या एकमेव देखण्या तरुणाच्या तोंडावर फुटतो. कुणी फोडला बरं, म्हणुन तो प्रेमाने पहातो तर ती तरुणी त्याच्या समोर पाय क्रॉस करुन उभी. अशी अॅक्शन लहानपणी आम्ही ' बाई, मला घाईची लागलीय. मी जाऊ....' च्या वेळी करत असु. कुठल्या लिक्वीडने असे दिर्घकाळ आणि लांबवर टिकणारे बुडबुडे तयार करता येतात ते मला कुणी कळवेल का प्लीज. अहो, माझ्या मुलीनं हट्टच धरलाय. तिलाही असेच बुडबुडे बनवायचेत.
ह्या जाहीरातींवरुन एक जाहीरात आठवली, एक माणुस आपल्या बाथरूममध्ये दात घासत असतो. त्याच्या दातात कळ येते, अचानक दार उघडुन एक दाताडी तरुणी माईक, कॅमेरामन्स, फोटोग्राफर्स वगैरे बराच् मोठा जामानिमा घेऊन आत येते. रागावुन विचारते, 'तुमच्या पेस्टमध्ये मीठ आहे काय?' आता बोला! नशिब, तो बिचारा कपडे बिपडे घालुन बिलुन असतो. नाहीतर त्याचं दात घासणं असं जागतीक लेव्हलच्या ऑलीम्पिकच्या उदघाटनासारखं प्रक्षेपीत झालं तर? आणि पेस्टमध्ये मिठ घालण्यापेक्षा आम्ही मिठच पेस्ट म्हणुन वापरु. निदान तिथे तरी आमची हुकुमत असावी. देवा रे, ती जाहीरात मी जेव्हा प्रथम पाहिली तेव्हापासुन भितीनं मी दात घासताना किंवा अंघोळ करताना, अगदी 'ते' करताना सुद्धा कपडे घालुन किंवा सावरुनच बसते. न जाणो, आपल्याही दारातुन कुणी अचानक आलं तर. निदान कडी तरी घट्ट लावल्याची खात्री पुनःपुन्हा करुन घेते. आणखी एक सुरक्षिततेचा उपाय म्हणुन मोठ्याने 'मी आत आहे' अशी घोषणा करुनच आत जाते. अजुन एक भिती म्हणजे अचानक बिल्डींग कोसळली किंवा भुकंप झाला किंवा एखादं विमान आमच्या बिल्डींगमध्ये घुसलं तर! काहीही होउ शकतं हल्ली. तुम्ही पण विचार करा ह्याच्यावर.
(शेवटची जाहीरात माझ्याच 'माझी प्रेमकथा' ह्या लेखातुन साभार चोरलेली आहे. केवळ नवीन वाचकांना त्याचा लाभ घेता यावा म्हणु ही पुनःप्रकाशनाची योजना केली आहे. धन्यवाद)
अजुन बर्याच जाहीरातींवर वैचारीक मंथन केले आहे. टायपायचा कंटाळा आला म्हणुन थांबले. पुढच्या वेळी पकवेन. जमल्यास. 
जाहीराती
Submitted by पल्ली on 24 June, 2009 - 05:16
गुलमोहर:
शेअर करा
जिंदगी
जिंदगी को हलका फुलका करनेके लिये
सारी स्माईलीज आजमाईये, जीवन का सही आनंद उठाईये!!!..
पल्ली, पटकन दुसरा भाग ही टाईप करून टाक
पल्ली.
पल्ली. अनुमोदन.
सर्वात बेक्कार ती हमामची. काय अकला गहाण ठेवतात राव.
पल्ली..
पल्ली.. अगदी बारीक निरिक्षण!:)
कृपया आवरत घेऊ नकोस... दुसरा भाग येऊ दे लवकर!!
पल्ली सही
पल्ली सही आहे...
>>>बरं म्हणजे हा 'उत्कृष्ठ' साबण घरात काय फक्त आईच वापरते काय? मग घरातले बाकीचे कुठला वापरतात? ओके? की ज्यामुळे त्यांचा चेहला लकि नशतो.
आता ओके ची अॅड पण आठवली "ओके, ओके हा टाटा का ओके, ... कपडे ज्यादा धोने वाला ओके ज्यादा शक्तीवाला... ओके, ओके हा टाटा का ओके, टाटा का ओके धुलाई का साबुन टींग टींग टींग ढींग 
सही
----------------------------------------
मै जिंदगी का साथ निभाता चला गया ...
लिहिते
लिहिते लिहिते, तुमचा एवढा आग्रहच आहे तर! नाय तर नव्हते लिहिणार
मला वाटलं दक्षि मावशी सारखं सगळे मला मुर्खात काढणार...
दक्षे ए ए ए ए..... (स्लो मोशनमध्ये दक्षीच्या दिशेने प्रेमाने धावणारी पल्ली)
झक्कास
झक्कास
--------------------------------------------
ना संपणारे अखंड स्वप्न असावे,
न बोलता एकू येतील असे शब्द असावेत,
ग्रीष्मात पाउस पडतील असे ढग असावेत,
ना मागता सोबत देतील असे मित्र असावेत.
पल्ली
व्वा
व्वा मस्त
सुधीर
टायपायचा
टायपायचा कंटाळा नको करु ना. मस्तच लिहिल आहेस.
>>> अशी
>>> अशी अॅक्शन लहानपणी आम्ही ' बाई, मला घाईची लागलीय. मी जाऊ....' च्या वेळी करत असु.
धम्माल आली!
~~~
मन उधाण वार्याचे, गूज पावसाचे,
का होते बेभान कसे गहिवरते...
आभारी.
आभारी.
खुपच
पल्लवी, मार
पल्लवी,
मार्मिक लिखाण. वर्णनशैलीही खूप आवडली.
मुकुंद कर्णिक
ती एका
ती एका जाहिरातीत करीना म्हणते ना पोषण, नमी और सुरक्षा! ती तिच्या व सैफ च्या मुलान्ची नावे वाटतात.
शेवटी ती म्हणते खूबसूर्ती बसमें ... तेन्वा नेहमी माझ्या डोक्यात येते " और हम ऑटो में! आगाउ कुठली (करीना... बरं) स्वतः फॉरीन ब्रॅंड शिवाय काही वापरत नसेल आणी आपल्याला भुलवीते.
पल्ली,
पल्ली, खरंच मस्त लिहीलं आहेस गं...खुप मजा आली वाचुन
*******************
सुमेधा पुनकर
*******************
पोषण, नमी
पोषण, नमी और सुरक्षा! ती तिच्या व सैफ च्या मुलान्ची नावे वाटतात.>>>>
सहीये हे पल्ली
-------------------------
God knows! (I hope..)
एक जाहिरात
एक जाहिरात आहे ज्या मध्ये एक तरुणी एका तरुणाच्या घरासमोर येउन गाडी खराब झाली म्हणुन एक रात्र आसरा मिळेल काय असं सांगते तो म्हणतो कि तो म्हणतो " माझ्या घरी एकच रुम आहे तरी ती निर्लज्ज तरुणी चालेल म्हणते" आता शंका अशी येते की गाडी खरोखरच बंद पडली की पाडली त्या कार्टीनं? (ए. के. हंगल चा आवाजाची दिनवाणी नक्कल)
आता हा बेटा साध्या दोन प्रश्नांची उत्तरे दयायला दोन वेळा दार लावुन एवढा विचार करतो, तर रात्रभर विचार करुन करुन मोठा विचरवंत महापुरुष नक्की होईल.
पल्ले महान
पल्ले महान आहेस
************
To get something you never had, you have to do something you never did.
भरपुर छान
भरपुर छान लिहिलय.
झक्कास
झक्कास लिहिलंय... सर्व जाहिराती ह्या खास आपल्या करमणुकीसाठी तयार केल्या आहेत, उत्पादनांच्या प्रसारासाठी नव्हे हे नक्की! आणि ज्या जाहिराती पाहून आपल्या हूड कार्ट्यांनी त्यांची नक्कल करु नये असे वाटते त्यांच्या बरोबरचा 'धोकादायक' संदेश किती चिमण्याशा अक्षरांमध्ये असतो हे ही पाहिलंय!
माझी आई सर्व धुलाई पावडरी, साबणांच्या जाहिराती पाहून कायम म्हणते, "हिला आपल्या घरी येऊन कपडे धुवायला लावलं पाहिजे म्हणजे कळेल!" चॉकलेटची ती डोक्याच्या चिंधड्या (शब्दशः व जाहिरातीतही) उडविणारी जाहिरात पाहिलीत? अगदीच सुमार!
लेख छान झालाय.... आता पुढील हप्त्याच्या प्रतीक्षेत!
-- अरुंधती कुलकर्णी.
<<<<< अशी
<<<<< अशी अॅक्शन लहानपणी आम्ही ' बाई, मला घाईची लागलीय. मी जाऊ....' च्या वेळी करत असु....
सही पल्ले...! कठीण आहेस बाई! ! अग त्या 'अॅक्स' की काय ..त्या पर्फ्युमने बनणारा तो चॉकलेटचा माणुस आणि त्याच्याकडे लोलुपतेने पहाण्या-या त्या अर्धवस्त्रातील ललना ....यांच्यावर टाक काहीतरी..! सगळे पर्फ्युम्स बायकांना आकर्षित करण्यासाठीच अस्तात काय? ( स्वत:च्या अंगाला येणारा घाण वास लपवण्यासाठी अशी थीम का नाही वापरत हे जाहिरातवाले?)
मी वाचलेली एक बातमी ( तशी जुनी आहे)
: कुठल्याशा एका छोट्या गावात, एका वाण्याच्या २ भाच्यांनी त्याच्या दुकानातल्या 'प्रॉमिस' च्या टुथपेस्ट सगळ्या ओतुन चपट्या करुन ठेवल्या..... का? तर म्हणे 'त्यातुन लवंग बाहेर येते हे तपासण्यासाठी! हा जाहिरातींचा परिणाम!!!
<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<
ही बघा माझ्या लेकाची अष्टभुजा...
http://www.maayboli.com/node/7762#comment-249911
दे धम्माल
दे धम्माल ... छानच.
Pages