पावसाची खूण

Submitted by आर्त on 13 July, 2026 - 06:47

पाऊस येईल खिडकीशी
बेसावध असेल क्षण,
चेहऱ्यावरती हात ठेऊन
करून देईल आठवण.

आठवेल तुला तो दिवस
जुलैचा महिना होता,
अठरा वर्षांचा आषाढ
नेहमीचाच जुना होता.

जुन्या आभाळाखाली
नशिबाने नवं काही मांडलेलं,
चहूदिशांनी बरसून पावसाने
जवळ आपल्याला आणलेलं.

त्या गजबजलेल्या दिवशी
अख्खं शहर स्तब्ध झालेलं,
गडगडणाऱ्या नभाखाली
तरुण मन निशब्द झालेलं.

किती वर्षे तो पाऊस
आपल्या दोघांसाठी पडला,
शेवटचं भेटलो त्या दिवशी
आपल्या सोबत होता रडला.

तितक्यात... येईल मुल तुझं
शोधत आपुल्या आईस,
चटकन पुसाशिल पाऊस,
कळू कुणाला देणार नाहीस.

पण कळेल मला नक्की,
आनंद होईल, होईन बेचैन,
कारण मी ही उभा कुठेतरी
पुसत असेन पावसाची खूण.

०९.०७.२०२६

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

वाह!!! फार सुंदर.
१८ वर्षं किती जादूचं असतं आणि त्यातही पाऊस!! खतरनाक.