एक प्रसंग नजरेसमोर आणून बघा :
समजा, आपण कथाप्रेमी आहोत आणि कथांना वाहिलेले एखादे साप्ताहिक वाचतोय. त्या दिवशीच्या अंकात एका लोकप्रिय लेखकाची उत्कृष्ट शीर्षकाची कथा आलेली आहे. आपण ती वाचायला सुरुवात करतो अन् पहिल्या परिच्छेदापासूनच त्यात गुंगून जातो. कथा पुढे सरकते. आपण आता त्यात चांगलेच गुरफटतो. लेखकाची शैली भन्नाट आणि उत्कंठावर्धक आहे. गोष्ट पुढे सरकताना ती अधिकाधिक उत्कंठेची होत जाते व अगदी श्वास रोखायला लावते. ती दीर्घकथा आहे आणि एका क्षणाला त्यातल्या नायकापुढे एक मोठा धोका उभा ठाकला आहे… आपण अगदी डोळे ताणून कथा वाचतोय आणि एकदम आपल्याला असं दिसतं की . .. . . कथा अर्धवट सोडलेली आहे आणि खाली कंसात ‘क्रमशः’ लिहिलेले आहे !
म्हणजेच, पुढची गोष्ट समजण्यासाठी आपल्याला पुढच्या अंकाची वाट बघावीच लागणार तर. काय वाटतं अशा वेळी? सांगायची गरज नाही. कुठल्याही दर्दी वाचकाची अशा वेळेस जाम चिडचिड होते. परंतु त्याचबरोबर या अपूर्णतेमुळे निर्माण झालेली आनंद व औत्सुक्याची भावना देखील पराकोटीला पोचलेली असते.
असा अनुभव एखाद्या संस्थळावरील कथालेखनात देखील येत असतो. लेखक एखादी दीर्घकथा चालू करतो आणि आधी कुठलीही कल्पना दिलेली नसताना ती कथा उत्कंठेच्या परमबिंदूवर तोडतो आणि क्रमशः असे लिहून मोकळा होतो. अशा वेळेस आपल्याला काय दिसते ? . . . जरा वेळातच कथेवर जे काही प्रतिसाद येतात त्यात अनेकांनी,
“पुढचा भाग लवकर टाका हो !”
अशी कळकळीची विनंती केलेली असते. बरोबर ना ?
एखादी कथा एका दमात सांगून टाकण्याऐवजी ती मधेच अर्धवट सोडून दिली जाण्याच्या प्रकारावर आधारित दोन साहित्यकृतींमध्ये आज डोकवावे आणि त्यात वाचकांनाही सहभागी करून घ्यावे असे म्हणतो.
तर आपली पहिली साहित्यकृती ही प्राचीन असून सुरुवातीस ती मौखिक स्वरूपातच सांगितलेली होती. तिचा नक्की कालखंड सांगता येणे अवघड असले तरी त्यासंबंधीचे काही धागेदोरे नवव्या शतकात सापडल्याचे दिसते. मुळात या कथा - खरंतर गोष्टी - अरबी भाषेतल्या. कालांतराने 18 व्या शतकाच्या पूर्वार्धापासून या कथा इंग्लिशसह अन्य युरोपीय भाषांत प्रकाशित झाल्या.
कशाबद्दल सांगतोय ते येतंय का लक्षात ? आले असणारच !
या कथांचे मूळ अरबी नाव Alf Laylah wa-Laylah हे असून इंग्लिशमध्ये त्याला ‘द अरेबियन नाईट्स’ (1000 आणि एक रात्री) असे म्हणतात.
दुसरी साहित्यकृती अर्थात कथा अगदी चालू शतकातली असून एका प्रसिद्ध लेखकाची आहे. पण तिच्याकडे आपण नंतर येऊ.
आधी अरेबियन नाईट्सच्या संकल्पनेचा गोषवारा पाहू. त्यातल्या सुरस आणि चमत्कारिक कथा आपण लहानपणी वाचलेल्या किंवा ऐकलेल्या असतातच. तरीसुद्धा आता एक उजळणी किंवा स्मरणरंजन म्हणून त्या प्रसिद्ध साहित्य संकल्पनेची एक धावती ओळख करून देतो.
अरेबियन नाईट्स’ या मुळात लोककथा असून त्या अनेक शतकांमध्ये सांगितल्या गेल्यात. त्यांची मुळे अरबी, पर्शियन आणि मेसोपोटेमियातील साहित्यात सापडतात. 1001 कथा सलग मांडल्यानंतर त्यांचे प्रमुख वैशिष्ट्य लक्षात येते ते म्हणजे त्या ‘कथेच्या पोटातील कथा’ या पद्धतीने पुढे सरकतात (फ्रेम स्टोरी). मुख्य कथासूत्र अखंड पर्शियन साम्राज्याचा सम्राट शहरयार आणि त्याची दुसरी बायको शहरजादे यांच्याभोवती फिरते. शहरयारची पहिली बायको व्यभिचारी निघाल्याने तो तिची हत्या करतो. त्या कडवट दुःखात बुडाल्यामुळे त्याचा असा ठाम समज होतो की जगातल्या सगळ्याच बायका ‘अशा’ असतात. त्या पिसाटलेल्या अवस्थेत तो एक क्रूर निर्णय घेतो. दररोज रात्री तो एका नव्या कुमारीकेशी लग्न करतो, रात्रभर तिचा उपभोग घेतो आणि दुसऱ्या दिवशी सकाळीच तिची हत्या करून टाकतो, जेणेकरून कुठल्याच बाईने त्याला भविष्यात फसवता कामा नये. या कामी राजाचा वजीर त्याला मुली पुरवण्याचे काम करत असतो.
अखेरीस एक वेळ अशी येते की आता राजाला द्यायला नवी कुमारिकाच राहत नाही. मग वजिराची मुलगी असलेली शहरजादेच राजाशी लग्न करायला तयार होते. आता ती एक जबरी युक्ती करते. लग्नाच्या पहिल्याच रात्री ती राजाला एक मंत्रमुग्ध करणारी गोष्ट अगदी रंगवून सांगते. मात्र त्या गोष्टीचा शेवट न करता ती तिला अर्धवटच ठेवते. राजाला गोष्टीचा शेवट जाणून घ्यायची कमालीची उत्सुकता लागलेली असते परंतु ती सांगते की या पुढची गोष्ट उद्या रात्री. राजा त्या उत्सुकतेपोटी तिचे शिरकाण करायचे लांबवतो. पुढच्या रात्री ती पुन्हा हाच डाव खेळते आणि जीवदान मिळवते. मग तिचा हा चतुर खेळ एकूण 1001 रात्री चालू राहतो आणि शेवटची कथा ती संपूर्ण सांगते कारण तेव्हा तिचा गोष्टींचा साठा संपलेला असतो.
हे अजब ‘कथाकथन’ तीन वर्षाहून अधिक काळ चालल्याने त्या काळात या जोडप्याला तीन मुलगे होतात. शेवटची कथा सांगून झाल्यानंतर शहरजादे राजाला विनंती करते की आता मुलांकडे बघून तरी तुम्ही मला मारू नका. या समारोपाबाबत काही प्रवाद/अन्य पर्याय असले तरी अंतिमतः शहरजादे जिवंत राहून पुढे राजाबरोबर सुखाने नांदू लागते हे खरे.
या कथांची काही खास वैशिष्ट्ये आहेत. बऱ्याच कथांमधील नायक एखादे साहस करताना जीवघेण्या संकटात सापडतात आणि त्या क्षणी कथा अर्धवट थांबवली जाते. कधी कथेच्या अनुषंगाने इस्लामिक तत्त्वज्ञानावरही प्रकाश टाकला जातो तर कधी मानवी शरीरशास्त्राचेही विवेचन केले जाते. बाकी जादूटोणा, राक्षस आणि मानवी गुणधर्म असणारे प्राणी असा मालमसाला देखील त्यात भरपूर आहे. स्वर्ग-नरक तर हे प्रांत तर ओघानेच आलेच. कथांचा मजकूर प्रामुख्याने गद्य स्वरूपात असला तरी त्यात अधूनमधून पद्यरूपात किंवा कोडी घातल्यासारखे लेखन सुद्धा आहे. प्रत्येक गोष्ट भावनोत्कट आणि अत्यंत उत्कंठावर्धक होईल हे पाहिलं गेलेलं आहे. काही कथा विज्ञान काल्पनिका तर काही अतिशय अद्भुत स्वरूपाच्या आहेत. अत्यंत रंजक असे हे लोकसाहित्य शतकानुशतके लोकप्रिय ठरलेले आहे यात नवल नाही. त्यावर आधारित रेडिओ व टीव्ही कार्यक्रम आणि चित्रपट देखील बेतलेले आहेत.
वाचक अथवा श्रोत्याला खेळवून ठेवणारी उत्कृष्ट कथनशैली हा या साहित्याचा आत्मा असून प्रत्येक कथेची उत्कंठेच्या टोकावरील अपूर्णता हा तिचा स्थायीभाव म्हणावा लागेल. अशा एक हजार एक गोष्टी सलग रचत जाणे ही संकल्पनाच भन्नाट आहे. असे साहित्य हा प्राचीन संस्कृतीचा लेखाजोखा असतो. जगातील बहुतेक प्रमुख भाषांमध्ये या साहित्याचे भाषांतर झालेले आहे.
या लोककथांना अठराव्या शतकापासून मिळालेली लोकप्रियता अजूनही ओसरलेली नाही. या साहित्यावरून स्फूर्ती घेऊन त्या प्रकारच्या अनेक कथा, कादंबरीका आणि मोठ्या कादंबऱ्या देखील जगातील अनेक भाषांत लिहिल्या गेल्यात. सुमारे 12 वर्षांपूर्वी प्रकाशित झालेली अशीच एक रंजक कथा माझ्या वाचनात आली. ती एका प्रतिभावंत व अतिशय लोकप्रिय लेखकाने लिहिलेली आहे. तिची मूळ भाषा वेगळी असली तरी तिचे एक सुंदर इंग्लिश भाषांतर आपल्याला वाचण्यासाठी खुले आहे. त्या आधुनिक कथेची अरेबियन नाईट्सशी सांगड घालण्यासाठीच हा लेखनाचा घाट घातलाय.
मित्रांनो,
ती चालू काळातील कथा कोणती आहे हे आपण पुढच्या भागात पाहू.
पुढची गोष्ट पुढच्या रात्री ! 
********************************************************************************************
(क्रमशः)
नेहमीप्रमाणेच सुंदर लेख.
नेहमीप्रमाणेच सुंदर लेख.
अपेक्षेप्रमाणे लेखाच्या शेवटी
अपेक्षेप्रमाणे लेखाच्या शेवटी (क्रमशः) आले.
खरं तर आनंद झाला, कारण याचा अर्थ म्हणजे तुमचा पुढील लेख वाचायला मिळेल हा स्वार्थ. तुमचे लेख छान असतात, पुभाप्र.
धन्यवाद वाचकहो !
धन्यवाद वाचकहो !
या लेखनाची संकल्पनाच अपूर्णता असल्याने मुद्दाम लेख तोडून दोन भागांमध्ये घ्यायचे ठरवले आहे.
हाहा… आजच्या काळात चालणारी
हाहा… आजच्या काळात चालणारी कुठली बरी गोष्ट म्हणुन उत्कंठा ताणलेली असतानाच क्रमशः तोंडावर आदळला.
आपले पंचतंत्रही असेच गोष्टीतुन गोष्ट आहे.
बऱ्याच कथांमधील नायक एखादे
बऱ्याच कथांमधील नायक एखादे साहस करताना जीवघेण्या संकटात सापडतात आणि त्या क्षणी कथा अर्धवट थांबवली जाते.
>> 'कट्यार काळजात घुसली' मध्ये मरण्यापुर्वी नायक सदाशिव असेच एका उंच टोकावर नेऊन त्याचे गाणे थांबवतो.
ते गाणे पूर्ण ऐकायला मिळत नाही म्हणून खाँ साहेबांचा जीव तळमळतो आणि सदाशिवचा जीव वाचतो हे आठवले.
* पंचतंत्रही असेच गोष्टीतुन >
* पंचतंत्रही असेच गोष्टीतुन >>> +१ . अतिशय सुंदर . . .
* सदाशिवचा जीव वाचतो >>>> +१ . नाटक व चित्रपट दोन्ही छान आहेत. कथेत काही बदल केले असले तरी दोघांची आपापली सौंदर्यस्थळे आहेत.
भाग २ :https://www.maayboli
भाग २ :
https://www.maayboli.com/node/88510
छान आढावा घेतलाय.
छान आढावा घेतलाय.
सिरीयल वाल्या लोकांनी हे क्रमशः अतिशय सिरियसली घेतलंय असे चित्र आहे सध्या.
अलिफ लैला सध्या बघत आहे वेळ मिळेल तसे.
त्यामुळेही पटकन लक्षात आले तुम्ही लिहिलेले संदर्भ.
* अलिफ लैला सध्या बघत
* अलिफ लैला सध्या बघत
>>>>> अच्छा ! छान योगायोग.
ही काय टीव्ही मालिका आहे का?
छान कल्पना...
छान कल्पना...
जबरदस्त विवेचन ! उत्तम लेखन
जबरदस्त विवेचन ! उत्तम लेखन जालीय आयुष्यात वाचायला मिळते, पण "पु.भा.प्र." वरचा हा ऊहापोह आवडला खासच.
सुरेख लेख.
सुरेख लेख.
गौरी देशपांडे यांनी अनुवादित केलेल्या अरेबियन नायट्सcha अकरावा खंड वाचला होता. एकातून दुसरी कथा छान उलगडत जाते.
सर्वांना धन्यवाद !
सर्वांना धन्यवाद !
* गौरी देशपांडे यांनी अनुवादित >>>
होय, ते खूप चांगले आहे हे ऐकून आहे आणि त्याबद्दलचा एक लेखही वाचला होता.
अल्फ लायला व लायला, एक उत्तम
अल्फ लायला व लायला, एक उत्तम नमुना आहे साहित्यिक "इस्लामिक गोल्डन एज" काळातील.
हा त्यावेळचा मामला आहे जेव्हा जिगरबाज अरबी व्यापारी उंटांचे तांडे घेऊन सिल्क रूट वर हिंडत असत, चीन मधून रेशीम घेऊन निघत सोबत कागद आणि बंदुकीची दारू बनवण्याची कला घेऊन समरकंद, बुखारा मार्गे पुढे दश्त ए कवीर, दश्त ए लूत, रूब अल खाली ची वाळवंटे पार करून फर्टाईल क्रेसेंट मधून युरोपात शिरत, तिथे आपले रेशीम आणि इतर चिनी मातीची भांडी इत्यादी विकत, ज्ञानाचे आदानप्रदान करत.
अशा सगळ्या ज्ञानाचे भंडारण उत्तम व्हावे म्हणून बगदाद मध्ये तत्कालीन खलिफा (मला वाटते कदाचित हारून अल रशीदच्या काळात) बयात अल हिकामा (Bayah Al Hikamah, The house of ideas) ही लायब्ररी स्थापन केली गेली !
साहित्य, आंतरराष्ट्रीय ज्ञान, व्यापार, अभियांत्रिकी, स्थापत्य, बीजगणित, वैद्यक, भूमिती, धर्म, तत्वज्ञान ह्यांची प्रचंड मोठी (तत्कालीन स्टँडर्ड नुसार अजस्त्र) repository होती ती !
गंमत म्हणजे त्यांनी पुस्तके सूचीबद्ध करून स्टोअर करण्याची जी पद्धत विकसित केली होती, ती तशीच्या तशी आधुनिक लायब्ररी सायन्स मध्ये इंडेक्सिंग म्हणून रुळली आणि आजही वापरली जाते (काळानुरूप संगणकीकृत झाली तरी इंडेक्सिंग पद्धत तीच)
अल्फ लायलाचा जन्म असाच एखाद्या कारवां मधे असावा कथाबीज स्वरूपात ! रात्री वाळवंटी दरोडेखोरांचे हल्ले होऊ नये म्हणून आळीपाळीने जागले म्हणून बसणाऱ्या कुठल्याश्या सुपीक डोक्याच्या दुक्कलीने मारलेल्या गोष्टीवेल्हाळ गप्पा !
ही तर अलीफ लैलाची गोष्ट.
ही तर अलीफ लैलाची गोष्ट.
लहानपणी ही मालिका बघायला टीव्हीपुढे गर्दी करायचो आम्ही.
त्यातले ते हिरवे जीन, राक्षस, सिंदबाद ची तलवार ए सुलेमानी, खुदा के नेक बंदे, अलीबाबा मर्जिना, चिमादेव लिमादेव आणि बऱ्याच गोष्टी आठवल्या.
ऋतुराजला अनुमोदन. शाळेत
ऋतुराजला अनुमोदन. शाळेत असताना टिव्हीवर पाहिले आहे. लेख आवडला.
* अल्फ लायला व लायला,
* अल्फ लायला व लायला,
>>>> रोचक माहिती ! आवडली.