शरीर बलवान झाले, जखम तशीच राहिली

Submitted by तुष्कीनागपुरी on 4 July, 2026 - 15:21

तुम्ही कधी अनेक ओळखीच्या आणि अनोळखी लोकांच्या समोर, तुमच्याच वयाच्या व्यक्तीकडून, सणकून थोबाडीत झापड खाल्ली आहे का? आणि खाल्ली असेल तर मग तुम्ही काय केले होते?
मी तेव्हा सतरा-अठरा वर्षांचा असेन. रेशीमबागेत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे तृतीय वर्ष प्रशिक्षण शिबिर असावे. मी त्या शिबिरात महिनाभरासाठी वैद्यकीय विभागाचा निवासी प्रबंधक म्हणून गेलेलो होतो. माझ्यासारखेच अनेक शाखांमधून अनेक स्वयंसेवक वेगवेगळ्या विभागांचे प्रबंधक म्हणून तिथे आलेले होते. माझ्या तेव्हाच्या आठवणी धूसर आहेत त्यामुळे काही तपशील चुकू शकतात; पण कुणी थोबाडीत मारली होती आणि का, ते मी विसरलेलो नाही.

एका संध्याकाळी, कदाचित जेवणाच्या वेळी प्रबंधकांच्या गटाला वाढण्याचे काम असताना, आमच्यात काहीतरी थट्टा-मस्करी सुरू होती. तो माझ्या ओळखीचा नव्हता. वेगळ्या कोणत्या शाखेतला असावा आणि आमचे कधीच बोलणे झालेले नव्हते. त्याचे आडनाव चाबुकस्वार असल्याचे मला माहीत होते आणि अनेक जण, म्हणजे किमान पंधरा-वीस स्वयंसेवक, त्याला त्या आडनावाच्या अनुषंगाने घोडेस्वार असे काहीसे वेगळे संबोधून चिडवायचे आणि मग हसायचे. ते चिडवणे वाईट शब्द वापरून नव्हते; फक्त चाबुकस्वारच्या ऐवजी घोडेस्वार आले असे काहीतरी चिडवून खुदूखुदू हसणे असे काहीसे होते. ते मी त्या दिवशी प्रथमच ऐकले आणि मी पण सगळ्यांसोबत हसत होतो.

अचानक माझ्यासमोर एक स्वयंसेवक आला आणि त्याने मला जोरात गालावर सर्व शक्ती एकवटून थोबाडीत ठेवून दिली. मला खूप जोरात लागले होते. माझ्या कानालादेखील मार लागला होता आणि डोके सणकून हलले होते. एका सतरा-अठरा वर्षांच्या, शरीराने बळकट आणि व्यायाम करून बलवान झालेल्या तरुणाचा ठरवून केलेला वार जसा लागावा तसाच आणि तितक्याच तीव्रतेने तो वार होता. ज्याला चिडवले जात होते तोच हा युवक होता हे ओघाने मला कळलेलेच होते. ते वय असे होते की इतका जोरात लागलेला मारदेखील जोरात लागला आहे हे दाखवायचे नाही, इतका अहंकार माझ्यात होता. त्यामुळे मी रडलो नाही. मी त्याच्याकडे प्रश्नार्थक मुद्रेने फक्त पाहत राहिलो.

त्यानंतर तो काहीतरी बोलला आणि निघून गेला. ते मला तितकेसे आठवत नाही, कारण माझ्या डोक्यात झिणझिण्या येत होत्या आणि काही ऐकण्याच्या मनस्थितीत मी नसेनच. त्याच्या बोलण्याचा सारांश असा असावा की त्याने एकदा नाही सांगितले असताना कुणी चिडवले, तर काय होते हे आता लोकांना माहीत झाले आहे. यापुढे असे होणार नाही याची खबरदारी ज्याची त्याने घ्यायची आहे.

मी त्यावेळी सर्वात कमी ताकदीचा आणि शिडशिडीत मुलगा होतो. तिथे असलेल्या दहापेक्षा अधिक युवकांना न निवडता त्याने मला थोबाडीत लगावली होती. आज मागे वळून पाहताना मला वाटते की मी त्याला प्रत्युत्तर देऊ शकणार नाही याची त्याला जाणीव असावी.

तिथे जमलेले सगळे या कृत्यामुळे अचानक गप्प झाले होते. थोडा वेळ शांतता पसरली. मग सगळे गपगुमान पांगले आणि मी पण परत आपल्या झोपण्याच्या जागेवर आलो असेन. त्या घटनेबद्दल त्या शिबिरात नंतर कुणीच बोलले नाही. मला कुणी त्यावेळीदेखील काही विचारलेले स्मरणात नाही आणि नंतरही संपूर्ण शिबिरात या विषयावर कधी चर्चा कुणी काढली नाही. मी तर ती चर्चा काढणे शक्यच नव्हते, कारण तो माझ्या जाहीर अपमानाचा क्षण पुन्हा बोलण्यात काढणे म्हणजे जखम उकरण्यासारखेच होते.

मी त्याला ओळखत नव्हतो. त्याची थट्टा करण्यात माझा पुढाकार नव्हता. काही मुले काही बोलून हसत होती, त्यात त्या वेळेस मी पोचलो असताना मी पण त्या हसण्यात सामील होतो, इतकाच माझा गुन्हा होता. मला थोबाडीत लगावून त्याने जो पुरुषार्थ गाजवला होता, त्यात त्याचा उद्देश असा सफल झाला होता की त्याला चिडवल्यावर काय होते याचे उदाहरण त्याला ठेवता आले. मी तेव्हा अगदीच काडीपैलवान असल्याने मी उलटून काहीही करू शकणार नाही याची त्याला जाणीव असणारच. मला ओळखत नसतानाही त्याने मला हे उदाहरण ठेवण्यासाठी निवडले, असे मला आज वाटते.

त्या घटनेवर मी आज पस्तीस वर्षांनीदेखील लिहितो, याचाच अर्थ माझ्या आयुष्यात ती जखम कोरलेली आहे. त्या व्यक्तीला, त्या झापडीला, त्या जखमेला मी विसरू शकलेलो नाही, मिटवू शकलेलो नाही, हे मला समजते आहे.

माझी चूक होती का? असेलही कदाचित. पण माझ्यापेक्षा तिथे असलेल्या किमान दहा आणखी युवकांची चूक माझ्याहून जास्त असेल. मला जी शिक्षा मिळाली ती त्या चुकीसाठी रास्त होती का? त्या शिक्षा देणाऱ्यासाठी असेलही कदाचित; पण माझ्या मनात तो अन्याय होता. त्या वेळी त्या घटनेत त्याला मला थोबाडीत लगावता आले कारण तो तेव्हा ते करू शकत होता आणि त्याच्या परिणामात त्याला काही होणार नाही याची त्याला खात्री होती. कोणतीही पूर्वसूचना न देता मला मिळालेली ही झापड माझ्यासाठी सर्वथा अन्यायकारक होती.

त्या वेळेस माझ्या बाजूने कुणीच बोलले नव्हते. याचा अर्थ तिथे जमलेल्या गटाने आपली चूक झाली हे मान्य केले होते आणि गपगुमान तिथून पांगले होते. तिथे मला कळले होते की इथे आपली काळजी करणारे कुणी नाही, आपल्यासाठी बोलणारे कुणी नाही. मी माझ्या बरोबर आलेल्या इतर माझ्या शाखेतल्या कुणाला ही घटना सांगितली होती का, तेही मला आता आठवत नाही. मी जितक्या लवकर त्या वेळेला ती घटना विसरून काहीच झालेले नाही असे भासवू शकेन, तितके केले असेल.

पण अशा घटना आपण विसरून काहीच झालेले नव्हते असे खरेच ठरवू शकतो का? तेव्हा त्या शिबिरात ते मला जमले असे वाटले असेलही. पण ही घटना माझ्या आयुष्यावर कोरलेल्या जखमांमधली एक प्रमुख घटना होऊन राहणार आहे याची मला तेव्हा कल्पनादेखील नसेल.

वेगवेगळ्या शाखेतले स्वयंसेवक असल्याने शिबिर संपल्यावर सगळे आपापल्या विभागात जातात. त्यामुळे त्या चाबुकस्वार आडनावाच्या स्वयंसेवकाशी माझा आतापर्यंतच्या आयुष्यात पुन्हा कधी संपर्क आला नाही. तसा संपर्क जर आता आला तर मी त्याच्याशी कसा वागेन याची मला खात्री देता येत नाही. कदाचित मी काही बोलणारही नाही. कदाचित मी शांतपणे त्याला ते स्मरण करून देईन. पण एवढे नक्की की त्या क्षणाचा काटा अजूनही मनात कुठेतरी आहे.

तसे माझ्या आतापर्यंतच्या वागण्याकडे मी पाहिले, तर मी कदाचित त्या व्यक्तीशी इतरांशी वागतो त्याहीपेक्षा अधिक चांगला वागून त्याला लाजिरवाणे व्हावे असे काही करून प्रतिशोध घेईन असेही वाटते. तो युवक वाईट नव्हताच आणि नसेलही. पण ज्या वेळेस तुम्ही तुमच्याहून कमी शक्तिशाली आणि दुर्बल घटकाला फक्त तुमच्या शक्तीच्या जोरावर, आणि तुम्हाला त्या वेळेस कुणी काही म्हणणारे किंवा जाब विचारणारे नाही या एका सबबीवर, थोबाडीत लावू शकता, दाबू शकता, त्याला तुमचा चांगुलपणा नक्कीच म्हणता येणार नाही. मी तरी त्याला चांगले वागणे म्हणणार नाही. त्याला मी संधीसाधूपणा म्हणेन. तेव्हा त्याने मी चिडवणे सुरू केले आहे का, याचा विचारदेखील केला नव्हता. मी त्याच्या ओळखीचा नव्हतो हे त्याला माहीत नसावे असेही म्हणता येणार नाही. पण अंदाज लावून, काही लोक चिडवून हसत आहेत त्यातल्या सर्वात किडूक व्यक्तीला निवडून थोबाडीत लावणे हे त्याला सहज जमले होते.

या घटनेचा परिणाम माझ्यावर असा झाला की मी शिबिरातून आल्यानंतर शंकर नगरच्या फ्रेंड्स कॉलनीतली फिटनेस इंडिया नावाची जिम शोधून काढली आणि पुढची तीन वर्षे पॉवरलिफ्टिंग शिकण्यात आणि तयारी करण्यात घालवली. त्यानंतर मला कधी कुणी थोबाडीत काय, कशाही प्रकारे हात लावू शकलेले नाही.

पण आज वाटते, त्या एका झापडीने मला शरीराने मजबूत व्हायला भाग पाडले; पण त्याहून मोठा धडा दुसरा होता. एखाद्याची थट्टा करणे चुकीचेच, पण चुकीला उत्तर म्हणून दुर्बल व्यक्तीवर हात उगारणे हा न्याय नव्हे. आणि तितकेच महत्त्वाचे म्हणजे अन्याय घडताना गप्प उभे राहणे हेही त्या अन्यायाचा भाग असते.

त्या दिवशी मला झापड एका व्यक्तीने मारली होती; पण ती जखम गटाच्या शांततेने अधिक खोल केली.

Group content visibility: 
Use group defaults

छान !!
( एक शक्यता - मी नुकताच एका कार्यालयात नोकरीवर रुजू झालो होतो. एक मोठा ग्रुप एका टेबलावर एकत्र जेवण करत असे म्हणून मीही तिथेच बसत असे. जेवताना खेळ, राजकारण इ. मस्त गप्पा चालत. पण दोन सहकारी मात्र यात अजिबात सहभागी न होता कोपऱ्यात एका छोट्या टेबलावर आपले डबे घेऊन जेवत असत. एकदा , न राहवून मी त्यांना
त्या मोठ्या टेबलावर येण्याची विनंती केली तर त्यातला एक जण ताडकन उभा राहुन , हात उगारत मला म्हणाला, " जातोस, का देवू कानाखाली ? " मी अवाक होऊन, चेहरा पाडून बघतच राहिलो ! नंतर एका सज्जन सहकाऱ्याने मला समजावलं, ' त्या मोठ्या ग्रुप मधील एक कंपू या दोघांची सतत खूप कुत्सित मस्करी करायचे म्हणून वैतागून ते वेगळे बसू लागले. तू जरी प्रेमाने विचारलंस तरीही त्या कंपूनेच तुला पढवून पाठवलंय असं त्यांना वाटणं व त्यांना राग असह्य होणं स्वाभाविक आहे. दोष तुझा नाही, You were just the last straw on camel's back ! '
कदाचित, , आपल्याही बाबतीत दुर्बल म्हणून नव्हे, तर तुम्ही तो त्याच्या सहनशक्तीच्या सीमेवर असताना नेमके हंसलात म्हणून त्याच्याकडून थोबाडीत मारण्याचा अतिरेक घडला असावा . )

असे प्रकार घडतात. पण आयोजकांनी अहिंसेचं महत्व समजावून सांगायला हवं होतं.

त्याने शारीरिक हिंसा केली, पण टोळक्याने कुणालातरी एकटे पाडून मानसिक हिंसा केली, याचंही भान कुणातरी वरिष्ठाने दिलं असतं तर पुढे जी सूडाची भावना मनात घर करून राहिली ती नष्ट झाली असती. खूप चांगले वागून लाजिरवाणे वाटायला लावणे हा सूड आहे, सर्वांशीच खूप चांगले वागणे हा शिरस्ता असता तर ती नैसर्गिक गोष्ट झाली असती.

आपल्या नेहमीच्या वर्तुळातलं आडनाव नाही, याची टिंगल त्या व्यक्तीला अस्वस्थ करू शकते याची जाणिव कुणालाच झाली नाही ही चूक आहे हे पुढे कधीतरी लक्षाfunction at() { [native code] }अ यायला हवे होते. गाडगीळ हे हिंसक आडनाव आहे अशी मल्लिनाथी नेहमीच्या वर्तुळात होऊ शकते. पण तीच अन्य ठिकाणी झाली तर त्या व्यक्तीला लहान वयात ते सहज वाटेल का?

अर्थात आयोजकांचे अहिंसेबद्दल काय विचार आहेत हा त्यांचा विषय आहे.

@टवणेसर, @जेन्सवांड, @शर्मिला - आवड कळविलीत त्याबद्दल अनेक धन्यवाद.
.
@भाऊनमसकर, त्या व्यक्तीशी नंतर संपर्क आला नाही त्यामुळे देखील नक्की काय घडले याचा उलगडा झाला नाही, पण असे कितीतरी व्रण आपल्या आयुष्यात राहून जातात ज्यांचा उलगडा झालेला नसतो पण trauma उरलेला असतो. आता मागे वळून पाहता psycoanalysis करता येईलच त्या घटनेचा.
.
@राजअज्ञानी, तुम्ही न लिहिलेले देखील टिपले आहे between the lines. माझी भीती तीच आहे की आपण ठरवूनही अलिप्त राहू शकू का? प्रतिशोधाची भावना मनात येऊ शकते आणि तसे करायची इच्छा नाही हे देखील खरे तरीही स्वतःचाच भरवसा अश्या वेळी देता येत नाही म्हणून त्या व्यक्तीशी आता पुन्हा सामना होऊ नये असे देखील वाटते. हे लिहूनच मी त्या घटनेतून जरा मोकळा व्हायचा प्रयत्न करत असेन कदाचित.

से माझ्या आतापर्यंतच्या वागण्याकडे मी पाहिले, तर मी कदाचित त्या व्यक्तीशी इतरांशी वागतो त्याहीपेक्षा अधिक चांगला वागून त्याला लाजिरवाणे व्हावे असे काही करून प्रतिशोध घेईन असेही वाटते. >>> हे तुमच्या लेखातले वाक्य आहे.

लेबर वस्तीत लहानपण आणि भावकीच्या भांडणात पौगंड + तारुण्य गेल्यामुळे जग मारायला धावणार तयार असायलाच हवे हे तत्व खूप लवकर शिकलो मी.

शारीरिक बळ नसले तर निसर्गाने मांडलेले दगड गोटे उचलावे, पण कार्यभाग साधावा, सेफ राहावे ही नैसर्गिक प्रेरणा गुरुस्थानी मानून वागत राहिलो

आहे रे आणि नाही रे मध्ये "तू कधीच सुरक्षित नाही रे" हे तत्व लवकर मुरले एकंदरीत अंगात !

जिथे लाथ शक्य तिथे ती, जिथे चावणे तिथे ते, जिथे दगड तिथे ते अन् जिथे डिंगणीला पाय लावून पळणे तिथे ते.

रडत कधी बसलो नाही किंवा रडत घरी आलो नाही, कारण आलो तर घरी अजून तुडवणी होईल हे पण माहिती होते.

मी तेव्हा अगदीच काडीपैलवान असल्याने मी उलटून काहीही करू शकणार नाही याची त्याला जाणीव असणारच.

आपल्याला थोबाडीत लगावणारा मुलगा धूर्त होता असे म्हणावे लागेल.

कारण बाकी सगळ्यांना धडा शिकवायचा होता पण एखाद्या बलदंड मुलाला थोबाडीत लगावली असती तर त्याने नक्कीच प्रत्युत्तर केले असते. कारण एवढा शक्तिमान असून तू मार खाल्लास हे लोकांकडून ऐकणे त्याला जास्त कठीण गेले असते. आणि बलदंड मुलाने त्याला अजून मारले असते तर लोकांनी त्याची अधिकच टर उडवली असती.

याउलट तुम्ही त्याला प्रत्युत्तर करू शकणार नाही आपण आपल्याला चिडवणाऱ्या लोकांना धडा शिकवण्यासाठी तो कोणत्याही टोकाला जाऊ शकतो हे त्याने बाकी सर्वाना सिद्ध करून दाखवले होते.
आता आपली चूक असताना आपण अशा मुलाच्या नादी लागलो तर आपल्याला त्याचे परिणाम भोगावे लागतील या भीतीने इतर मुलानी आपोआप चिडवणे बंद झाले.

नेहमी असेच असते. एक तर थेट गुंडाला भिडायचे किंवा त्यांच्या गटातील सर्वात कमकुवत माणसावर जोरदार हल्ला करायचा ज्याने गुंड सुद्धा चार वेळेस विचार करतो. याला brinkmanship म्हणतात.

त्याचे दोन परिणाम झाले एक चांगला परिणाम म्हणजे तुम्ही स्वतःची शारीरिक स्थिती सुधारली. दुसरा वाईट परिणाम म्हणजे त्याने आपल्या मानसिक स्थिती वर झालेला आघात तुम्ही कुरवाळत बसलात.

खरा तर हा चांगला परिणाम झाल्यावर तुम्ही हा हल्ला कुरवाळत बसला नसता तर ते जास्त चांगले झाले असते. बऱ्याच वेळेस दुर्बल माणूस जेंव्हा परिस्थितीचा प्रतिकार करता येत नाही तेंव्हा आपण असे केले असते तसे केले असते असे विचार करून मनाचे समाधान करायचा प्रयत्न करत असतो. पण त्यातून मनाचे समाधान होत नाही. उलट जे झाले ते उत्तम झाले त्यातून मी धडा शिकलो आणि आयुष्यात पुढे गेलो असा विचार केलात तर उत्तम.

प्रत्येक जखमेचा व्रण होतोच असे नाही पण जखम कुरवाळत बसलात तर मात्र काट्याचा नायटा होतो.

या निमित्ताने मला अशाच एका प्रसंगाची आठवण झाली. एका मैत्रीणी ने चारचौघात केलेल्या अपमानाची जखम गेली 35 वर्षे ताजी आहे.प्रहार शाब्दिक होते. पण बुधवार पेठ व खाज या शब्दांनी मी आजही ट्रिगर होतो
ट्रॉमा तथा भावनिक आघात
भूतकाळातील कटु स्मृतींमुळे तुमचे मन व्यथित होत असते. भूतकाळाचे ओझे फेकून द्या सांगणे सोपे असते पण क्लेशकारक आठवणी विसरु म्हटले तरी विसरता येत नाही. असे व्हिडिओ पाहिले की कळतं पण वळत नाही असे वाटत राहते. मला नेहमी वाटते की अशा गोष्टींचे काळाच्या वेगवेगळ्या टप्प्यावर विश्लेषण केले पाहिजे. काही प्रश्नांची उत्तरे तुमच्याकडे नसतात पण त्या स्मृतीशी निगडीत इतरांकडे असू शकतात. मग तुम्ही ती शोधायचा प्रयत्न करता. जी उत्तरे तुमच्याकडे नाहीत ती इतरांकडे शोधत बसणे हा एक उद्योग होउन बसतो व त्यामुळे त्या कटू आठवणी अजूनच प्रज्वलीत होतात.
कळते पण वळत नाही अनेकांच्या बाबत होते मग त्या कटु स्मृती तुमच्या सोबतच संपून जातात
https://youtu.be/rPbw-OQbG6M?si=qTz14HLpQ3vB8Ycp
मध्यंतरी नेटफ्लिक्स वर फायरब्रॅण्ड हा मराठी चित्रपट पाहिला. भूतकाळातील कटु स्मृतींमधे अडकून पडणे हा लोकांचा प्रश्न सायकियाट्रिस्ट/ सायकॉलॉजिस्ट लोकाना नवीन नाही. मध्यंतरी मी माझ्या एका संपादक मित्राकडे गेलो होतो. मी केलेल्या लिव्हिंग विल बाबत चर्चा करत होतो. तीस वर्षांपूर्वीच्या जुन्या कटू गोड आठवणीही जाग्या झाल्या. बोलता बोलता त्याला म्हटलं कि अरे......... हा माझ्या ट्रॉमाचा ( trauma) विषय आहे तिथे लॉजिक चालत नसते. त्याने थोडे हसून थोडे चमकून अर्थपूर्णपणॆ माझ्याकडे पाहिले. वर्तमान काळात जगा. भूतकाळातील घटना मागे जाउन दुरुस्त करता येत नाहीत. इतरांना माफ करायला शिका. नाहीतर तुम्ही वर्तमानकाळातील आनंदही गमावून बसाल. असे सल्ले आपण ऐकत असतो. आपल्याला ते कळत ही असते पण वळत नाही अशी परिस्थिती असते.
एखाद्या स्त्री बाबत बलात्कारासारखा प्रसंग हा केवळ कटु स्मृती म्हणुन राहत नाही तो तिच्या साठी ट्रॉमा असतो.मनुष्य विवेकी अवस्थेत असताना त्याबद्दल तो शांतपणे विचार व कृती करु शकतो. पण प्रत्यक्ष ट्रॉमा ट्रिगर करणारा प्रसंग व्यक्ति, गंध ,स्पर्श, चव दृष्य श्राव्य असे घटक प्रत्यक्ष वाटयाला आले की त्याची शांतपणॆ विवेकी विचार करण्याची क्षमता नाहीशी होते व तो गडबडून जातो. चक्क मेंदू बधीर होतो. फायरब्रॅण्ड हा मराठी चित्रपट त्यावरच आधारलेला आहे. महिलांच्या सबलीकरणावर भाष्य करणारा 'फायरब्रॅन्ड' या सिनेमामध्ये उषा जाधव, गिरीश कुलकर्णी, सचिन खेडेकर, राजेश्वरी सचदेव ही कलाकार मंडळी मुख्य भूमिकेत आहेत. आजच्या आधुनिक काळात 'नातं'आणी त्याच्याबद्दलच्या संकल्पना कशा बदलत आहेत? यावर भाष्य करण्यात आलं आहे. उषा जाधव वकिलाच्या भूमिकेत आहे. स्वतःच्या वैवाहीक आयुष्यात वैयक्तिक लढा देता देता देता इतर महिलांसाठी लढणारी कणखर स्त्री अशा दमदार भूमिकेची झलक ट्रेलरमधून येते.
राष्ट्रीय पुरस्कार विजेते अरुणा राजे यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे.

>>>>>>एका मैत्रीणी ने चारचौघात केलेल्या अपमानाची जखम
अपमान करणारे विसरुनही जातात आणि त्यांच्या जीवनात रममाण होतात. अपमान झेलणारा मात्र उगाळत बसतो. अजुन एक काही स्मॄतींकरता फक्त काउन्सिलिंग नाही तर औषधेच लागतात.
-------------------
तुष्कीनागपुरी तुमचा लेख आवडला. छान लिहीता तुम्ही. विचारप्रवण असते.