फक्त प्रौढांसाठी असलेले - Adult content मुलांनी बघायची इच्छा व्यक्त केल्यास तुम्ही काय करता?

Submitted by ऋन्मेऽऽष on 30 June, 2026 - 13:45

फक्त प्रौढांसाठी असलेले - Adult content मुलांनी बघायची इच्छा व्यक्त केल्यास तुम्ही काय करता?

मुले एका ठराविक वयाची झाली की पालकांसाठी हा प्रश्न सर्वात मोठा ठरतो. कारण मोबाईल आणि सोशल मिडिया या माध्यमांमुळे आता परिस्थिती बदलली आहे. १२-१५ वर्षाच्या शालेय मुलांकडे सुद्धा हल्ली सर्रास मोबाईल असतात आणि त्यात त्यांचे सोशल मिडिया अकाउंट उघडलेले असते. त्यांच्याकडे ओटीटी चॅनलचे ऍक्सेस असतात. भले आपण आपल्या मुलांबाबत काही कडक नियम बनवले तरी त्यांच्या फ्रेंडसर्कलमध्ये त्यांच्यासाठी सर्व प्रकारचे १८+ कंटेंट उपलब्ध असण्याची शक्यता राहतेच. अश्यावेळी जेव्हा आपली मुले समोरून काही बघायची इच्छा व्यक्त करतात तेव्हा त्यांना स्पष्ट नकार देणे इतके सोपे या प्रश्नाचे उत्तर नाहीये/नसावे असे मला वाटते.

बालसंगोपनात सर्वसाधारणपणे दोन टोके असतात जी आपण टाळायला बघतो.
एक म्हणजे मुलांना कडक शिस्तीत आणि बंधनात वाढवणे ज्यात पुढे जाऊन ते एकतर बंडखोर होण्याची भिती राहते किंवा त्यांच्यात आत्मविश्वासाचा अभाव निर्माण होऊ शकतो.
दुसरे म्हणजे त्यांना अतिस्वातंत्र्य देणे, किंबहुना दिलेल्या स्वातंत्र्याची एक पालक म्हणून जबाबदारी न घेता त्यांना हवे ते करू देणे, त्यांना वेळ कमी आणि पैसा जास्त देणे, यात एकूणच मुले बिघडण्याची, हाताबाहेर जाण्याची शक्यता असते.

म्हणून या शीर्षकात विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर देखील याच दोन टोकांच्या अध्येमध्ये कुठेतरी असावे.

प्रत्येकाने आपल्याला गवसलेले उत्तर इथे लिहावे अशी अपेक्षा.
मी माझे प्रतिसादात लिहीत राहीनच. पण सध्या विषय नेमका काय आहे हे मांडायला थोडक्यात(?) लिहितो.

मागच्या वर्षी इंडियाज गॉट लेटेंट चला निषेध नोंदवूया म्हणून मी मायबोलीवर धागा काढलेला. अश्लीलता विनोदाच्या मार्गाने मुख्य प्रवाहात शिरू पाहतेय आणि हे कंटेंट युट्युब तसेच इन्स्टा-फेसबुकमध्ये शॉर्ट रीळ स्वरूपात मुलांना सहज बघायला उपलब्ध आहे ही मला चिंता होती. त्यानंतर ते मूळ कंटेट youtube वरून उडवले गेले. तेव्हा घडलेल्या घडामोडी हा या धाग्याचा विषय नाही.

आता त्याचा पुढचा सीजन आला आहे आणि त्याचा पहिलाच एपिसोड नेटफ्लिक्सवर प्रकाशित झाला आहे. त्याची "ग्रेटेस्ट कमबॅक" जाहिरात अश्या स्वरुपात केली गेली आहे की लहान मुलांमध्ये सुद्धा त्याची क्रेझ निर्माण झाली आहे. मला हे नुकतेच समजले जेव्हा घरी नेटफ्लिक्स सर्फ करताना माझ्या १२ वर्षांच्या लेकीने म्हटले - ब्रो मला हे बघायचे आहे.

तिच्या तोंडून हे ऐकताच मला मनातल्या मनात हसायला आले की अरे ए, तुझा बाप या कार्यक्रमाबद्दल मायबोलीवर निषेधाचा धागा काढून बसला आहे आणि तू इथे तेच बघायचे म्हणत आहेस. उद्या तुला हे दाखवले तर मायबोलीकरांना कुठल्या तोंडाने सामोरे जाऊ Happy

जोक्स द अपार्ट, तुम्ही दोन्ही विषय मिक्स करू नका. जे कन्टेन्ट मुलांच्या योग्य नाही ते सहजपणे त्यांच्या हाती पडू नये हा तेथील मुद्दा होता. पण त्यापैकी जे त्यांच्या नजरेस पडते आणि त्यानंतर ते बघायची इच्छा मुले व्यक्त करतात किंवा आपल्यापश्चात बघायची शक्यता राहते, त्या प्रसंगाला कसे सामोरे जावे हा येथील मुद्दा आहे.

तर या शो चा दुसरा सीजन कसा आहे याची मला तेव्हा कल्पना नव्हती. म्हणून मी सावधपणे तिला म्हणालो, की ते अ‍ॅडल्ट कंटेंट आहे. त्यावर ती म्हणाली, की तिच्या फ्रेंडसनी पाहिले आहे. दोघातिघांची नावे घेतली. अश्यावेळी स्पष्ट नकार देणे म्हणजे तिचे तिच्या मनात बंडखोरी निर्माण करणे. जरी तिच्या टॅब/मोबाईलमध्ये किंवा घरी टीव्हीवर तिने तो शो बघू नये याची आम्ही काळजी घेतली तरी तो बाहेर बघण्याची शक्यता राहणारच. आणि असे घरच्यांनी परवानगी न देता तो शो बघणे म्हणजे काहीतरी थ्रिल असल्यासारखे तिला वाटणार. मला ते थ्रिल-किल करायचे होते. म्हणून मी जराही आढेवेढे न घेता ओके बघूया म्हटले. पण त्याआधी स्वतः बघायचे ठरवले. नेटफ्लिक्स वर आले आहे तर सीजन-१ तुलनेत सौम्य व्हर्जन असेल अशी अपेक्षा देखील होती.

दुसरी गोष्ट म्हणजे पुन्हा ती स्वतःहून बघायचे म्हणत आली तरच तिला सोबत दाखवायचे. अन्यथा विसरली तर चांगलेच आहे. बरेचदा पटकन हो म्हटल्याने सुद्धा मुलांची उत्सुकता काही अंशी मरते. तेच आढेवेढे घेत परवानगी दिली असती तर तिनेही आवर्जून लक्षात ठेवले असते.

आठवडा उलटून गेला. अजून तरी ती बघायचे म्हणून परत आली नाहीये. बाहेर कुठे तिने बघितले का नाही याची कल्पना नाही. बघितले तर न लपवता हे घरी सांगण्याची शक्यता आहे. कारण मी आधीच परवानगी दिली होती. परवानगी देण्याचा हा देखील एक फायदा की मुले तेच बाहेर बघितल्यावर लपवत नाहीत. आणि जर तिने नसेल बघितले आणि आलीच उद्या बघूया म्हणत तर एव्हाना मी स्वतः बघून तयार आहे.

आता कुठले कंटेंट कुठल्या वयाच्या मुलांसाठी योग्य किंवा नाही याबाबत बरीच मतभिन्नता असू शकते. पण ज्याबाबत आपण साशंक असतो त्या गोष्टी आपण मुद्दाम मुलांना आवर्जून दाखवत नाही किंवा त्यांच्या नजरेस सहज पडणार नाही याची काळजी घेतोच. पण बाहेरच्या जगात त्यांना समजल्यावर आणि त्यांची उत्सुकता चाळवून त्यांनी बघायची इच्छा व्यक्त केली तर पुढे काय हा खरा कळीचा मुद्दा आहे.

वर उल्लेखलेल्या कंटेंटमध्ये शिवीगाळ आहे आणि त्यासाठी मी तयार आहे. आमच्या इथे गार्डनमध्ये मुले खेळताना कित्येकांच्या तोंडून शिव्या ऐकू येतात. पण आपण किती कुठले बॅडवर्ड वापरायचे हे मी आमच्याकडे क्लिअर केले आहे. कुठले बॅड वर्ड सौम्य आणि कुठले अगदीच वाह्यात असतात या प्रकारे त्यांना समजावले आहे. माझे स्वतःचे बालपण चाळीत गेले आहे. त्यामुळे मला लहान वयात मुलांच्या तोंडी शिव्या असण्याचे कौतुक नाही. एक फेज असते ज्यातून मुले न बिघडता बाहेर पडतात याचीही कल्पना आहे. त्यामुळे एखादी गोष्ट (जसे की या उदाहरणात शिव्या देणे) ही आसपासच्या आपण राहतो त्या समाजात नॉर्मल असते. आणि त्या समाजाचा भाग म्हणून थोड्याफार तुम्हीही द्याल. पण तरीही ते चुकीचेच असते हे मुलांना समजावे याकडे कल असतो.

पण या शिवीगाळपेक्षा आजकालच्या अश्या शो मध्ये रोस्टिंग (खेचाखेची) हा जो एक प्रकार बोकाळला आहे ज्यात समोरच्याला हिणवायला गलिच्छ भाषा वापरली जाते ते मला जास्त धोकादायक वाटते. कारण आमच्याकडे मी पाहिले आहे की सोसायटीतील मुले ग्रूप पाडून हा प्रकार खेळ म्हणून खेळतात.
त्यामुळे आपल्याला एक पालक म्हणून यामध्ये दोन प्रकारची काळजी घ्यायची आहे. एक म्हणजे चिडवाचिडवीच्या या हिणकस वर्जनवर आपल्या मुलांनी स्वतः घसरू नये. दुसरे म्हणजे त्यांच्या स्वतःवर कुठे हे झेलायची वेळ आली तर ते सक्षम असावेत. ती वेळ प्रत्यक्ष आयुष्यात किंवा सोशल मिडिया अशी कुठेही येऊ शकते.

इतर प्रकारच्या अ‍ॅडल्ट कंटेंटची उदाहरणे द्यायची झाल्यास प्रौढांसाठीही वाह्यात असलेला ॲनिमल किंवा हिंसाचार असलेला पुष्पा आमच्याकडे लेकीनेच हे फालतू आहेत म्हणून फुली मारल्याने प्रश्न मिटला. तेच धुरंदर बघायचा आहे म्हणाली, तसे तिथेही मी लागलीच ओके म्हणून, लांबीने मोठा आहे तर एखाद्या विकेंडलाच एकत्र बघूया असा प्लान बनवला. पण धुरंदर पार्ट टू रिवेंज आला तरी आमचा तो विकेंड अजून आला नाही. बहुधा तिची ती उत्सुकता मेली असावी.

छीछोरे म्हणून एक चित्रपट होता. त्याचा आशयविषय चांगला होता. आजच्या स्पर्धेच्या युगात येणारे एखादे अपयश मनाला लाऊन घेऊ नये हे मुलांना हलक्याफुलक्या पद्धतीने समजवायला आवर्जून दाखवावा असा होता. पण तिच्या वयाला नव्हता. हॉस्टेललाईफमधील काही सीन स्पेशली संवाद लहान मुलांसाठी योग्य नव्हते. तो सुद्धा लेकीने बघायची इच्छा व्यक्त केलेली तेव्हा सोबत दाखवला होता. गंमत म्हणजे ज्या संवादांची भीती वाटत होती ते तिला त्या वयात समजलेच नाहीत. पण चित्रपटाचा आशय मात्र समजला. ज्याचे उदाहरण तिला आम्ही आजही देत असतो.

एखादा शैतान सारखा चित्रपट जो लहान मुलांच्या मनात भीतीसोबत अंधश्रद्धा सुद्धा भरू शकतो, तो देखील मला त्यांच्यासाठी योग्य वाटत नाही. पण हॉरर हा लेकीचा आवडता जॉनर असल्याने तिने तो बघायची इच्छा व्यक्त केली. तो देखील सोबत दाखवला होता. त्यातील अंधश्रद्धांवर तिचा विश्वास बसत नाही आणि एकूणच तो चित्रपट तिला हास्यास्पद वाटला हे बघून मलाच हायसे वाटले. तिथे जर तिला बघण्यापासून अडवले असते तर कदाचित तिने तेच वेगळ्या दृष्टिकोनातून बघायची शक्यता होती. किंवा सोबत बघताना तिचा काही चुकीच्या गोष्टींवर चटकन विश्वास बसत आहे असे लक्षात आले असते तर तेव्हाच ते क्लिअर करता आले असते. थोडक्यात याप्रकारचे कुठलेही कंटेट सोबत बघणे हा प्रकार मला KYC - Know Your Child सारखा वाटतो.

त्याचवेळी मुले सुद्धा बरेचदा KYP - Know Your Parents म्हणत आपल्या वागण्याचा अंदाज घेत असतात. आपण त्यांना उगाच एखाद्या गोष्टीपासून अडवणार नाही हा विश्वास त्यांनाही कुठेतरी येणे गरजेचे असते. उदाहरणार्थ, Masturbation या विषयावर असलेला "ओह माय गॉड-२" हा सुद्धा लहान मुलांनी बघायचा चित्रपट नाही पण तरीही ट्रेंडींग आहे, चांगला आहे, हे समजल्यावर लेकीने नेहमीसारखे मी बघू शकते का अशी विचारणा केली होती. तेव्हा तिला म्हटले होते की बघायला हरकत नाही, पण ज्यावर आधारीत आहे ते तुला या वयात समजणारच नाही तर बघायचा फायदा काय? थोडी मोठी झालीस की एकत्रच बघूया. मुलांपेक्षाही पालकांनीही बघावा असा आहे. तिला ते माझे म्हणने शून्य आर्ग्युमेन्ट होत पटले होते.

मी काही बाल मानस तज्ञ नाही जे एकूणच या पिढीच्या मुलांबद्दल भाष्य करावे. किंवा केस पांढरे झालेत ईतके अनुभव माझ्या गाठीशी नाहीत. मी माझी मुले कशी आहेत ते ओळखतो, त्यांचे फ्रेंड सर्कल कसे आहे ते बघतो. त्यातही मुलगा-मुलगी भेद न करता कोणाला कश्याची समज कमी-जास्त आहे त्यानुसार निर्णय घेतो. जे पर्रफेक्ट असतील हे शक्यच नाही. कोणाचेच नसतात. तरी येथील सर्वांच्या अनुभवविश्वाचा आणि ज्ञानाचा फायदा एकमेकांना झाला तर चांगलेच.

तळटीप - मुलांबाबतचे सारे निर्णय आईवडिल दोघांनी मिळून घ्यायचे असतात. वरील बहुतांश उदाहरणात 'आम्ही' ऐवजी 'मी मी' वाचायला मिळेल याचे कारण ईतकेच आहे की आमच्याकडे हे ठराविक डिपार्टमेंट माझ्याकडे सोपवले गेले आहे Happy

धन्यवाद,
प्रतिसादांच्या प्रतीक्षेत!

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आपल्याला मुलांना यापासून दोन प्रकारे दूर ठेवायचे आहे. एक म्हणजे चिडवाचिडवीच्या या हिणकस वर्जनवर त्यांनी स्वतः घसरू नयेच. दुसरे म्हणजे स्वतःला कुठे हे झेलायची वेळ आली तर स्वतः सक्षम असावे. ती वेळ प्रत्यक्ष आयुष्यात किंवा सोशल मिडिया अशी कुठेही येऊ शकते. >> "आपल्याला मुलांना यापासून दोन प्रकारे दूर ठेवायचे आहे. " हे बदल - "ह्यामागे दोन पैलू आहेत."

आमच्याकडे गेल्या वर्षी हिंसक कार्टून्स (Anime) पाहण्यासाठी एका बंडखोर मुलाने (वय वर्षे ८) अथक एक वर्ष निकराचा लढा दिला. पण आम्ही शेवटी घरातून टीव्ही गायब करून या प्रकरणाचा सोक्षमोक्ष लावला.

आता माझ्या मोबाईलवर किंवा माझ्या लॅपटॉपवर माझ्यासमोर थोडे युट्यूब स्क्रोल करणे किंवा सरळ त्याच्या वयाला साजेसा कोणताही डिझ्नी मुव्ही बघणे (हे केलं तर मी हे पूर्ण १००% enjoy करू देते) हे चालू आहे आणि त्यात सगळ्या involved पार्टीज खुश आहेत. डिझ्नीचे काही मुव्ही १२+ पण आहेत पण मी 'दगडापेक्षा वीट मऊ' या न्यायाने तिथे थोडी डोळेझाक करते. Demon Slayer, Death Note, Attack on Titans वगैरे अतीरक्तरंजित Anime पेक्षा मोठ्यांचे डिस्नी मुव्हीज केव्हाही चांगले.

टीप : हे बंड वगैरे वर लिहिले आहे ते करताना अजिबात एक फटकाही न देता समजावणे, ओरडणे, distract करणे याच प्रकाराचा वापर करत होतो. युट्यूब ला पासवर्ड वगैरे टाकून झाले पण पठ्ठ्याने ते सगळे क्रॅक केले.

मी सरळ मुलांना सांगतो की ते लहान मुलांसाठी नाही.
त्यात फार bad words/violence/wrong behaviour/concepts आहेत.

तुम्ही मोठे झालात की पहा.

आमच्या घरात बॅड वर्ड्स मधे फक्त बावळट, बिंडोक, वेडपट हे बोलायला परवानगी आहे. बाकी काही चुकून जरी बोलले गेले तरी ओरडा बसतो.

कल्पना नाही. अशी वेळ आली नाही. मुलांना रेटिंग्ज समजतात. त्यामुळे वयापरत्वे जे त्यांच्या वयापेक्षा जास्त रेटिंगचं आहे ते बघण्याविषयी त्यांनी कधी विचारलं नाही. जर कधी असा प्रश्न आलाच (रेटिंग माहीत नाही) तर ते तुमच्या वयाला साजेसं (एज अ‍ॅप्रोप्रिएट) नाही इतक्यावर भागलंय.

कुणाशी तरी बोलायचे आहे या सदरात हा धागा असेल तर काय करावे याचे मार्गदर्शन मागितलेले असते.

इथे माझ्या कडे असा प्रॉब्लेम आहे. अशा परिस्थितीत तुम्ही काय केले असते / करता असा प्रश्न आहे. सल्ला नको, तुमचे सांगा असा पवित्रा आहे.

आधीच्या धाग्यावर मुलांना काय बघू द्यावे, बंधने असावीत का असा धागा हवा होता असे काही जणांना वाटले होते. तिथे विषयांतर झाले असते.इथेही होईल. सबब पास.
एक निरीक्षण.

<<< घरातून टीव्ही गायब करून
>>>

@ पियू, तुम्ही टीव्हीच काढून टाकला का घरातून?
आमच्याकडे मला पर्सनली मुलांना टॅब मोबाईलवर बघू देण्याऐवजी टीव्हीवर बघू देणे जास्त सोयीस्कर वाटते. याचे दोन फायदे होतात.
एक म्हणजे मोठ्या स्क्रीनवर डोळ्यांना त्रास कमी.
दुसरे म्हणजे टीव्हीवर काय बघतात याचा आपल्याला त्यांच्या शेजारी न बसताही अंदाज राहतो.

असो,
धाग्याच्या विषयावर मला असे वाटते की मुलांचे शाळा आणि सोसायटीतील फ्रेंड सर्कल केवढे आहे, किती ओपन आहे, ते काय बघतात, त्यांच्यात काय चर्चा चालते हा एक महत्वाचा मुद्दा आहे.

उदाहरणार्थ, आमच्या केसमध्ये सध्याच्या सोसायटीत समवीयन पन्नासेक मुले आहेत आणि सोसायटीचे कल्चर असे आहे की दिवसरात्र सर्व मुले खाली गार्डनमध्येच पडीक असतात. याचा एक फायदा म्हणजे स्क्रीन टाईम आपसूक कमी होतो ते सोडा. पण त्याचवेळी छोट्या वयोगटाच्या मुलांना मोठ्या वयोगटाच्या मुलांकडून ज्ञान मिळायची प्रोसेससुद्धा चालू राहते.

आम्ही याआधी चार वर्षे ज्या सोसायटीमध्ये राहिलो तिथे शेजारच्या घरात काय चालू आहे हे सुद्धा फार कोणी डोकवायला जायचे नाही. चारपाच जणांचे ठराविक ग्रूप ठरवून खेळताना दिसायचे. त्यामुळे तिथल्या मुलांचे भावविश्व मर्यादीत होते.

दोन्ही केसमधील फरक आम्हाला याबाबतीत सुद्धा जाणवला.

माझी भाचरं जेव्हा चौदा-पंधरा वर्षांची होती तेव्हा 'फ्रेंड्स' सारख्या अमेरिकन सीरियल्स बघायची हे मला माहिती आहे. त्यांच्या आईबाबांना या सीरियल्स काय आहेत हे नीटसं माहिती नव्हतं. मला हा प्रकार अजिबात पटलेला नव्हता पण कुणी विचारलेलं नसताना इतरांना सल्ले देण्याचा स्वभाव नसल्याने मी काही बोलले नव्हते. पण तेव्हाच लक्षात आलं की उद्या हा प्रश्न आपल्या घरातही येणार आहे.
यावर मी केलेला उपाय म्हणजे आपल्या दृष्टीने 'चांगला', सकस कंटेंट, मुलांबरोबर बसून बघणे. सुरुवातीला त्यात मुलांनी बघू नये असा एकही सीन असणार नाही याची काळजी घेतली. हळूहळू चांगला कंटेंट, पण एखादा सीन फॉरवर्ड करण्यासारखा असा बघायला लागलो. अजूनही त्याच स्टेजला आहोत. Happy यात हिंदी, इंग्रजी सिनेमे, इंग्रजी मालिका ( एकच, 'बोन्स' नावाची) आहेत.
मुद्दा असा की आपण मुलांची चांगली अभिरुची विकसित करू शकलो तर इतर फालतू गोष्टी डोळ्यासमोर आल्या तरी मुलंच ते रस घेऊन बघणार नाहीत असा माझा कयास आहे.
याचा परिणाम म्हणा किंवा अजून काही, पण गेल्या महिन्यात मुलाने आम्हाला आग्रह करून एक इंग्रजी चित्रपट दाखवला. Dead poets society. अतिशय उत्तम चित्रपट आहे. त्याने तो सुट्टीत आपापला बघितला टीव्हीवर आणि आवडला म्हणून आमच्याबरोबर परत बघितला. असा सिनेमा त्याला मनापासून आवडला याचा मला फार आनंद झाला.
'बोन्स' मध्येही असे अनेक एपिसोड्स आहेत जे त्याने आत्ता बघणं बरोबर नाही. हे मी त्याला स्पष्ट सांगते आणि तो ते ऐकतो.

दोन पोरांसोबत बघण्याचा स्कोप नाही असे कंटेंट टीव्ही वर लावत नाही. पोरांसाठी वेगळी यूट्यूब किड्स अकाउंट तयार केली आहेत. मुळात दोन पोरगे असणे म्हणजे ते टीव्ही पाहत शांत बसलेत हे दुर्मिळ सुख आहे, दुर्दैवाने अवलादी बापावर गेल्यामुळे थोरला बारक्याला "तू माझ्या डोक्यावर बल्ब फोड मला काहीच होणार नाही" इत्यादी जॅकी चॅन धंदे करताना हस्तक्षेप करून पुढील कायदा सुव्यवस्था व न्यायवैद्यक कज्जे खटले आवरण्यात आमच्या सुबक ठेंगणीचा दिवस जातो.

एका घरात नुसते भाऊ भाऊ अन् बाप सोबत फक्त एक गरीब माऊली ही रेसिपी आहे जगाला आग लागण्याची. असो. पोरांना काय बोला, त्यांना चोक स्लॅमची मस्ती बेडचा आखाडा करून दमटायला मीच शिकवले आहे.

उरला प्रश्न adult कंटेंटचा तर पोरांत थोरला आजकाल मोटारसायकल vlog इत्यादी पाहतो, स्नो स्टॉर्म हॉट टेन्ट कॅम्पिंग इत्यादी पाहतो, बारका सध्या टॉम अँड जेरी वर आहे. धुरंधर Netflix वर आला तेव्हा रात्री पोरे झोपल्यावर विकांती बघितला आम्ही दोघांनी.

सहसा रोज पाहण्यालायक सिरीज असतील तर पोरे झोपल्यावर मोबाईल वर हेडफोन लावून बघतो आम्ही. घरी स्ट्रिक्टली साडेनऊला लाइट्स ऑफ असण्याचा दंडक जनतेच्या अंगळवणी पडल्यामुळे रोज ४०-५० मिनिटांचा किंवा तासाचा एक एपिसोड बघता येतो, बिंज वॉचिंग बॅन केलेले आहे अंडर एनी कंडीशन.

वरची कमेंट वाचून तुम्हाला आणि तुमच्या सुबक ठेंगणीला दोन्ही लेकांसह भेटण्याची इच्छा निर्माण झाली आहे Happy

अर्थात मी त्यावेळी आमच्या घरच्या क्रांतिकारकाला सोबत आणण्याचा चान्स सोडणार नाही. Lol

वावे, फ्रेंड्स बद्दल हे माहीत नव्हते. ती कधीच पाहिली नाहीये.
पण गेल्यावर्षी मुलगी एक कोरियन की इंग्लिश स्कूल ड्रामा बघताना दिसली ज्यात स्कूल स्टुडंट्स मध्येच गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड रिलेशनस दाखवले होते.
नॉर्मल बॉलीवूड चित्रपटात हीरो हीरोइन लव्हस्टोरी असतात. पण त्यांना रिलेट होणाऱ्या स्कूललाईफ लव्हस्टोरी असतील तर त्या जास्त घातक राहतात. आणि यात सोबत बघून चूक की बरोबर सांगण्याचा पर्याय बाद असतो. त्यामुळे तेव्हा हस्तक्षेप करताच तिने काही आढेवेढे न घेता ते बघायचे थांबवले होते. कारण बरेच गोष्टी तिला करण्यापासून रोखत नाही याने एक विश्वास कमावला जातोच.

<<<<<<<
आपण मुलांची चांगली अभिरुची विकसित करू शकलो तर इतर फालतू गोष्टी डोळ्यासमोर आल्या तरी मुलंच ते रस घेऊन बघणार नाहीत असा माझा कयास आहे
>>>>

कदाचित हो. पण हे तितके सोपेही नाही. कारण अभिरुची विकसित करणे ही काही चारसहा महिन्यांची प्रोसेस नाही. वयाच्या प्रत्येक टप्प्यावर मुलांची समज आणि आवड बदलते. त्या प्रत्येक आवडीला साजेसे चांगल्या अभिरुचीचे कन्टेन्ट आपल्याला त्यांना द्यावे लागेल आणि त्याचवेळी बाहेरच्या जगातून काही चुकीचे आकर्षण निर्माण होणार नाही याची काळजी सुद्धा घ्यावी लागेल. मला आमच्या केसमध्ये हा दुसरा भाग क्लिष्ट वाटतो. पहिला आम्हीही नेटाने जमवतोच. पण त्यामध्ये येणारे हे वायरस शिताफीने थोपवावे लागतात. अन्यथा उद्या मुलांना असेही वाटायला नको की आपली अभिरुची आणि आवड निवड आपले पालक कंट्रोल करत आहेत.

अभिरुची विकसित करणे ही काही चारसहा महिन्यांची प्रोसेस नाही. वयाच्या प्रत्येक टप्प्यावर मुलांची समज आणि आवड बदलते. >> अगदी! ही बरीच लांबलचक चालणारी प्रोसेस आहे.
मुलांना असेही वाटायला नको की आपली अभिरुची आणि आवड निवड आपले पालक कंट्रोल करत आहेत >> हो, सगळं आम्ही नाही कंट्रोल करत. आपण तसं करू शकत नाही आणि करूही नये. माझ्या मुलानेही मित्राच्या घरी सलमान खानचा 'टायगर जिंदा है' बघितला होता. त्याला तो आवडला नाही हा भाग वेगळा Proud
बाहेरून सवंग गोष्टी कानावर पडणार, डोळ्यासमोर येणार. त्याने लगेच काही बिघडतही नाही. त्याची आवड लागू नये असं वाटतं म्हणून आधीपासूनच दर्जेदार गोष्टींची आवड निर्माण करणे असा हा प्रयत्न आहे.

माझा मुलगा बिंज वॉच करून धडाधड सिरीज संपवतो
माझा स्पीड जास्तीतजास्त दिवसाला एखादा एपिसोड इतकाच आहे
त्यामुळे तोच सांगतो मला नको बघुस पुढे खूप व्हायोलन्स आणि adult content आहे Happy

पिकी ब्लइंडर्स, स्ट्रेनजर्स थिंजस, आणि अजून एक एलिस इन बोर्डरलँड वगैरे

मी किती हिंसाचार म्हणलं तर म्हणतो तू ज्या वॉर मुव्हीज बघतो त्यात कमी असतो का
आता वॉर मुव्हीज हा एक कल्ट आहे, त्यात फक्त हिंसाचार नसतो असे वाद विवाद होतात घरी

<<<< बाहेरून सवंग गोष्टी कानावर पडणार, डोळ्यासमोर येणार. त्याने लगेच काही बिघडतही नाही. त्याची आवड लागू नये असं वाटतं म्हणून...
>>>>

हो,
चुकीच्या गोष्टींची आवड लागू नये. त्यांचा प्रभाव पडू नये. पडतोय असे दिसल्यास आपल्याला त्याची कल्पना असावी म्हणजे वेळीच त्याला आवर घालता येईल हेच डोक्यात असल्याने एखाद्या गोष्टीची परवानगी नाकारण्याआधी सोबत बघायचा पर्याय आधी चाचपून बघतो.

बाकी मुलांसाठी काय योग्य आणि काय अयोग्य याचे प्रत्येकाचे निकष वेगळे असतील.

अजून एक मुद्दा म्हणजे सवंग गोष्टी मुलांना समजू सुद्धा नयेत याची काळजी घेतली तर पुढे बाहेरून समजल्यावर त्यांना त्याचे आकर्षण वाटेल की त्यात रसच वाटणार नाही हे आपण ठाम सांगू शकत नाही. जर त्यांच्यापासून त्या गोष्टी न लपवता त्या सवंग आहेत हे पटवले आणि ते त्यांना पटले तर पुढे जाऊन त्यांचे आकर्षण वाटायची शक्यता बरीच कमी होते.

<<< पिकी ब्लइंडर्स, स्ट्रेनजर्स थिंजस, आणि अजून एक एलिस इन बोर्डरलँड वगैरे
>>>>

स्ट्रेनजर्स थिंजस - यात हिंसाचार आहे का? आमच्याकडे माझ्या मुलीसह सोसायटीत सगळी मुले बघतात, त्यांच्यात चर्चा चालते. लहान मुलांची आणि इंग्लिश म्हणून मी कधी फार बघायला गेलो नाही. पण त्यात सुपर नॅचरल गोष्टी आहेत ज्याचे मुलांना आकर्षण असते एवढेच माहीत आहे.

चांगला विषय आहे.
आम्ही दोघेही TV नेहेमी बघत नाही, त्यामुळं कधी काही बघायचे असेल तर कामाची ची एक स्क्रीन TV सारखी वापरतो. बारक्या ना आठवड्यातून एकदा १-२ तास त्यावरच काय ते बघू देतो त्यात ही ते YouTube kids , नेटफ्लिक्स आणि लोकल भाषेतील मुलांसाठी चे कार्यक्रम बघतात. आम्ही दोघे कधीतरी काही एकत्र बघतो. मला तरी suspense वगैरे बघायचं असते तर त्याला Sci-Fi. त्यामुळे ते बहुतांशी स्वतःच्या मोबाईलवर होत. आम्ही काही रेसिपी/ ट्रॅव्हल ब्लॉग किंवा चालू घडामोडी इ .बघायच म्हटल तरी बारके आम्हाला बघू देत नाहीत. घरी तर ते इतर काहीच बघत नाही पण मित्राकडे काहीतरी मारधाड बघून आले की इत्यंभूत वर्णन करतात, पण ते अजून लहान आहेत तोवरच.
कंटेंट च्या बाबतीत त्यामुळे अजून सुपात आहोत असं वाटतंय. पण मला आठवतंय मी जेव्हा स्वतः घरी CID बघायचे तेव्हा माझी आई मला डा साळुंखे चे सीन्स आल्यावर " हे काय बघतेस , फॉरवर्ड कर "असे सांगत असे आणि मी स्वतः ही कामं केली आहेत, मला भीती वाटत नाही आणि त्या साळुंखेच सेटअप अगदीच बेगडी आहे, तो centrifuge मध्येच केमिकल ॲनालिसिस करतोय हे आईला कधीच सांगण्याच्या भानगडीत पडत नसे कारण तीच अशा गोष्टीना घाबरते . तसेच आपली मुलं पण करतील का असे वाटते.
तेव्हा वरती धागा कर्त्या ने आणि वावे ने लिहिलेl पटले. अभिरुची निर्माण करणे हा माझ्यासाठी एक मोठा कार्यक्रम आहे.
वरती जेम्स ने लिहिलेले वाचून अगदी अगदी झाले आणि सुबक ठेंगणी ची चौकात खणा नारळाने ओटी भरून सत्कार करावा असे वाटतेय.

स्ट्रेनजर्स थिंजस - यात हिंसाचार आहे का? आमच्याकडे माझ्या मुलीसह सोसायटीत सगळी मुले बघतात, >>>

बाब्बो तुफान आहे, त्यात राक्षसारखे काहीतरी असते, रक्त मासांचा चिखल आहे, हाडे मोडणे, डोळे बाहेर काढणे सर्व काही रम्य प्रकार आहे
मिलिटरी आहे, टॉर्चर आहे

माझ्या माहितीनुसार नेटफलिक्स ने आधी तशी वॉर्निंग दिली नव्हती पण नंतर लोकांनी बोंबाबोंब केल्यासकर आता त्यांनी दिली आहे म्हणे

मला व्यक्तिशः ती काय बघवली नाही, हिंसक मम्हणून माही तर मला असले सिनेमे सिरीज बोर होतात