उंच कड्यावरून पडणे : घात .. अपघात की आत्मघात .. न्यायवैद्यक कसे सांगू शकते ?!
न्यायालयात गुन्हा सिद्ध व्हायचा असेल तर कोणत्याही व्यक्ति केंद्रित- मौखिक पुराव्यापेक्षा , तटस्थ - वैज्ञानिक पुरावा जास्तीत जास्त दाखवता आला पाहिजे .. हे तत्व आता कुठल्याही न्यायव्यवस्थे साठी तितकेच खरे आहे जितके आपल्या भारताच्या न्याय व्यवस्थे साठी .नुकत्याच घडलेल्या केतन आगरवाल प्रकरणात तर आता हाच मुद्दा अतिशय कळीचा ठरणार आहे .. पण उंचा वरून पडून झालेल्या मृत्यूचे स्वरूप निश्चित करणे हे न्यायवैद्यकशास्त्रातील सर्वांत गुंतागुंतीच्या आव्हानांपैकी एक मानले जाते. एखादी व्यक्ती अपघाताने घसरून पडली, आत्महत्येच्या उद्देशाने स्वतः उडी मारली की तिला कोणीतरी ढकलून दिले, यांपैकी नेमके काय घडले हे निश्चित करणे अत्यंत कठीण असते. असे असले तरी , जगभरातल्या केसेस ची माहिती बघितली तर काही अतिशय मनोज्ञ अनुमाने हे शास्त्र काढू शकत असते हे कळते . त्यातलीच काही येथे मांडत आहे .. केस सबज्युडिस होत असल्यामुळे - थेट केतन केस वर भाष्य टाळायचा प्रयत्न करणार आहे .. ( याला कुणी शहामृगी पळवाट वैगेरे म्हणणार असेल तर जरूर म्हणा .. पण मला हे पथ्य पाळणे जरुरीचे वाटते .. कुणी कायपण समजोत !)
न्यायवैद्यक तज्ज्ञ मृत्यूचे कारण कागदोपत्री सहसा - तीव्र बोथट आघातामुळे झालेल्या जखमा (blunt force trauma) -असल्याचे सांगू शकतात; मात्र उंचावरून पडताना होणाऱ्या धडकेमुळे शरीरावर ज्या उर्जेने आघात होतो त्यातून निर्माण झालेल्या भीषण जखमा अनेकदा पडण्यामागील मूळ कारण स्पष्ट न सांगू शकण्या एवढ्या वैविध्य पूर्ण आणि तीव्र स्वरूपाच्या असतात. म्हणूनच आजच्या आधुनिक न्यायवैद्यक तपासात केवळ शवविच्छेदनावर अवलंबून न राहता, किंवा नुसत्या शारीरिक जखमांचे वर्णन न पाहता भौतिकशास्त्र, जैवयांत्रिकी (Biomechanics), संगणकीय मानवी प्रतिकृती (Humanoid Simulation) आणि व्यक्तीच्या शरीरावरील जखमांचे विश्लेषण या सर्वांचा एकत्रित वापर करून विविध शक्यता तपासल्या जातात.
एखादी व्यक्ती कड्यावरून खाली पडू लागल्यानंतर तिच्या शरीराचा पुढचा प्रवास हा हवेत फेकलेल्या दगड किंवा चेंडूप्रमाणे भौतिकशास्त्राच्या ठराविक नियमांनुसार होतो.("Projectile" हा तांत्रिक शब्द..) —शरीर किती अंतरावर जाऊन पडेल हे मुख्यतः तीन गोष्टींवर अवलंबून असते—१ .पडायला सुरुवात होताना शरीराला पुढच्या दिशेने किती वेग होता. २. शरीर कड्यावरून कोणत्या कोनात किंवा कोणत्या दिशेने खाली गेले. ३. व्यक्ती किती उंचीवरून पडली.
घटनास्थळी मृतदेह सापडलेले ठिकाण आणि कड्यापासून त्याचे आडवे अंतर मोजून त्या व्यक्तीला पडण्यासाठी किती किमान प्रारंभिक वेग आवश्यक होता, याची गणना करता येते.हा वेग अनेकदा मृत्यूमागील कारणांविषयी महत्त्वाचे संकेत देतो. कसे ?? १ .. अपघाती घसरणे किंवा अडखळणे: अशा वेळी शरीराला फारसा आडवा वेग मिळत नाही. तो साधारण ० ते १.५ मीटर प्रति सेकंद इतका असतो..२. मागून दिलेला धक्का किंवा ढकलणे (Homicidal Push): अचानक ढकलल्यामुळे शरीर पुढे झुकते आणि फिरू लागते. या प्रकारात प्रारंभिक वेग साधारण १ ते १.५ मीटर प्रति सेकंद असतो. ढकलणाऱ्या व्यक्तीलाही कड्यावर तोल सांभाळावा लागत असल्याने यापेक्षा जास्त वेग देणे कठीण असते..३. जोरात फेकणे (Homicidal Throw): एखाद्याला अक्षरशः उचलून किंवा जोरात फेकण्यासाठी प्रचंड शारीरिक ताकद किंवा एकापेक्षा अधिक व्यक्तींची मदत लागते. अशा वेळी प्रारंभिक वेग २.७ ते ४.८ मीटर प्रति सेकंद असू शकतो.४. स्वेच्छेने उडी मारणे (Suicide): व्यक्ती स्वतःच्या स्नायूंच्या बळावर उडी मारते. स्थिर अवस्थेतून मारलेल्या उडीचा वेग साधारण २.५ ते ३ मीटर प्रति सेकंद, तर धावत येऊन मारलेल्या उडीचा वेग ९.१५ मीटर प्रति सेकंद इतकाही असू शकतो.
आता यालाच जोडून फॉरेन्सिक्स जखमांचे विश्लेषण करते. शरीरावरील जखमांवरून काय समजू शकते?-
शरीरावर झालेल्या जखमा पाहून व्यक्ती कशी पडली असावी, याचे महत्त्वाचे संकेत मिळू शकतात.
१. अपघाताने पडणे:अचानक तोल गेल्यावर माणूस स्वतःला सावरण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे पडताना तो सहजपणे हात पुढे करतो.अशा वेळी सामान्यतः—
डोक्याला गंभीर दुखापत होते.
हातांना, विशेषतः मनगटांना फ्रॅक्चर होऊ शकते. कारण पडण्याचा धक्का कमी करण्यासाठी व्यक्ती हातांचा आधार घेण्याचा प्रयत्न करते.
२. आत्महत्येसाठी उडी मारणे
स्वतःहून उडी मारणारी व्यक्ती अनेकदा शेवटपर्यंत शरीर सरळ ठेवण्याचा प्रयत्न करते. त्यामुळे ती बहुतेक वेळा पायांवर आदळते.अशा वेळी—
दोन्ही टाचांची हाडे मोडतात.
पायांतील लांब हाडे तुटू शकतात.
पडण्याचा जोर पाठीच्या कण्यावर गेल्याने कण्यालाही फ्रॅक्चर होऊ शकते.
३. ढकलून दिल्यामुळे पडणे
अचानक जोराचा धक्का मिळाल्याने शरीराचा तोल जातो आणि ते हवेत फिरू लागते. जर एखाद्याला रेलिंग किंवा कठड्यावरून ढकलले असेल, तर डोके आणि मान या भागांवर अनेक दिशांनी गंभीर दुखापती होण्याची शक्यता अपघाताच्या तुलनेत जास्त असते. फ्री फॉल असेल तरीही जिवंत व्यक्ती पडताना क्षणार्धात हात-पाय हलवते, शरीर वळवते किंवा तोल सावरण्याचा प्रयत्न करते. या ज्याला आपण रिफ्लेक्स क्रिया -प्रतिक्रियां म्हणतो त्या मुळे प्रत्यक्ष पडण्याचा मार्ग आणि जखमांचे स्वरूप बदलू शकते. या फ्री फॉल तपासातील एक महत्त्वाची अडचण म्हणजे शरीर जमिनीवर आदळल्यानंतर ते लगेच स्थिर राहत नाही. अनेकदा ते उडते, घसरते किंवा लोळत पुढे जाते. त्यामुळे शरीरावर वेगवेगळ्या ठिकाणी जखमा होऊ शकतात.यामुळे काही वेळा त्या जखमा पाहून पडण्यापूर्वी मारहाण झाली होती, असा चुकीचा समज होऊ शकतो. म्हणूनच केवळ जखमा पाहून निष्कर्ष फसवा निघू शकतो . वैज्ञानिक पुरावा अधिक घटनास्थळावरील इतर पुराव्यांसह- बाकी परिस्थिति जन्य पुराव्याचाही साकल्याने विचार करावा लागतो.
संगणकीय मानवी प्रतिकृती (Humanoid Simulation) हा आणखीन एक आधुनिक प्रकार आहे. MADYMO आणि LS-DYNA यांसारखी प्रगत संगणकीय सॉफ्टवेअर वापरली जातात.आणि साधारण त्याच वजनाची, उंचीची ,शारीरिक लवंचिकतेची मानवी प्रतिकृति बनवली जाते . आणि कड्यावरून पडण्याच्या घटनेचे री कन्सट्रकशन केले जाते . पण ते सुद्धा शंभर टक्के वास्तववादी असू शकत नाही .. शेवटी - पडणारी व्यक्ति जिवंत ,विचार करणारा, श्वास घेणारा, धडपडणारा, आकांताने प्रयत्न करणारा माणूस होती हे विसरता येत नाही . "सली या (टॉम हँक्स अभिनित)चित्रपटात विमानाच्या अपघाताची संगणकीय पुनर्रचना करण्यात आली होती. सुरुवातीला संगणकाने वैमानिकाला विमानतळावर परत जाता आले असते, असे दाखवले. पण त्यात माणसाला निर्णय घेण्यासाठी लागणारा वेळ गृहीत धरलेला नव्हता. तो समाविष्ट केल्यानंतर संगणकीय निष्कर्ष बदलला. त्यामुळे कोणत्याही संगणकीय पुनर्निर्मितीत मानवी प्रतिक्रिया विचारात घेणे किती आवश्यक आहे, हे या चित्रपटामध्ये अतिशय सुरेख दाखवलेले आहे .
अशा प्रकारचे वैज्ञानिक Reconstruction न्यायालयात पुरावा म्हणून ग्राह्य धरले जाण्यासाठी साधारण पणे या चार प्रश्नांची उत्तरे तयार ठेवावी लागतात
१ · या पद्धतीची प्रत्यक्ष वैज्ञानिक चाचणी झाली आहे का?
म्हणजे ही पद्धत केवळ एखाद्याची कल्पना किंवा मत नाही ना? तिच्यावर प्रयोग करून ती खरोखर काम करते का, हे तपासले गेले आहे का?
२ इतर तज्ज्ञांनीही या संशोधनाची तपासणी केली आहे का? (Peer Review)
म्हणजेच, हे संशोधन प्रकाशित होण्यापूर्वी त्याच क्षेत्रातील इतर स्वतंत्र वैज्ञानिक किंवा तज्ज्ञांनी ते वाचून त्यातील निष्कर्ष, पद्धत आणि गणित योग्य आहे का, याची पडताळणी केली आहे का?
3. या पद्धतीत चूक होण्याची शक्यता किती आहे, हे माहीत आहे का? (Error Rate)
कोणतीही वैज्ञानिक पद्धत शंभर टक्के अचूक नसते. त्यामुळे तिच्यात किती टक्के चुका होऊ शकतात किंवा ती किती वेळा चुकीचा निष्कर्ष देऊ शकते, याची माहिती उपलब्ध आहे का?
४ . ही पद्धत त्या क्षेत्रातील बहुतेक वैज्ञानिकांनी मान्य केली आहे का?
म्हणजेच, जगभरातील न्यायवैद्यक किंवा संबंधित क्षेत्रातील बहुसंख्य तज्ज्ञ ही पद्धत विश्वासार्ह मानतात का आणि ती नियमितपणे वापरतात का?
सर्व प्रश्नांची समाधानकारक उत्तरे मिळाल्यासच न्यायालय त्या वैज्ञानिक पुराव्यावर विश्वास ठेवते.कठोर क्रॉस examination मधून या वैज्ञानिक Reconstruction ला सुद्धा सुटका नसते. थोडक्यात - उंचावरून पडलेल्या व्यक्तीला ढकलून देण्यात आले होते, हे केवळ शरीरावरील एखाद्या विशिष्ट जखमेवरून सिद्ध करता येत नाही.यासाठी पडण्याच्या क्रियेचे विश्लेषण, संगणकीय रीकन्सट्रकशन , न्यायवैद्यकीय जखमांचे परीक्षण आणि परिस्थितीजन्य पुरावे यांचा एकत्रित विचार करावा लागतो.
न्याय वैद्यक शास्त्र हे "ढकलले गेले" हे थेट सिद्ध करू शकत नाही; परंतु एखाद्या व्यक्तीचा मृत्यू साध्या अपघाती घसरण्यामुळे झाला असावा, ही शक्यता वैज्ञानिकदृष्ट्या अत्यंत अशक्य आहे, हे मात्र गणिती आणि वस्तुनिष्ठ पद्धतीने दाखवून देऊ शकते. फॉरेन्सिक सायन्सचं खरं सामर्थ्य इथेच आहे. ते अनेकदा "नेमकं काय घडलं?" याचं उत्तर देत नाही; पण "काय घडलं असण्याची शक्यता नाही" हे मात्र एकामागोमाग एक निर्विवादपणे बाद करत जातं. आणि जेव्हा अशक्य शक्यता बाजूला पडत जातात, तेव्हा उरलेलं सत्य न्यायालयासमोर अधिक स्पष्ट होत जातं.
म्हणूनच आजच्या काळात न्यायालयात केवळ एखाद्याने "मी पाहिलं"किंवा मीच केले किंवा मी केले नाही असं म्हणणं पुरेसं राहत नाही. घटनास्थळ बोलतं, जखमा बोलतात, शरीराचा पडण्याचा मार्ग बोलतो, मोबाईलमधला डेटा बोलतो, आणि विज्ञानही बोलतं. प्रश्न एवढाच असतो—आपण त्या प्रत्येक पुराव्याचं म्हणणं शांतपणे ऐकायला तयार आहोत का?केतन अगरवाल प्रकरण न्याय प्रविष्ट होईल , साक्षी पुरावे झडतील , प्रकरणाचा अंतिम निकाल न्यायालय देईल. तोपर्यंत कोणताही ठाम निष्कर्ष काढणं योग्य नाही. पण या निमित्ताने एक गोष्ट नक्की लक्षात येते—कड्यावरून पडलेलं शरीर अनेकदा मुके, बिचारे असतं; पण त्यामागचं विज्ञान अजिबात तस नसतं. त्याची भाषा समजून घेता आली, तर तेही बरंच काही बोलू शकतं ..
ज्या वेळेस स्थानिक पोलीसांचे
ज्या वेळेस स्थानिक पोलीसांचे साटे लोटे आहेत किंवा आरोपीचे लागेबांधे फार वरपर्यंत आहेत असे वाटते त्यावेळेस राजकारणी सी बी आय कडून तपास करा हि मागणी करतात>>>>>>
ही मागणी फिर्यादी करत असणार ना?? राजकारणी कशाला करतील?? त्या लोकांमुळेच तर पोलिस साटेलोटे करतात.
राजकारणी कशाला करतील??
राजकारणी कशाला करतील??
विरोधी पक्षाचे राजकारणी करतात.
गृह खाते आणि पोलीस -सत्ताधारी पक्षाच्या अखत्यारीत येतात
अच्छा…. विरोधकांचे लक्षातच
अच्छा…. विरोधकांचे लक्षातच आले नाही
'सदसदविवेकबुद्धीच्या
'सदसदविवेकबुद्धीच्या न्यायालयात ' मात्र सर्वच निकष वेगळे असतात !
>> हा फार अवांतर विषय आहे. पण रहावलं नाही म्हणून लिहिते. खुपदा या 'सदसदविवेकबुद्धीच्या न्यायालयात' तुमची जडणघडण तुम्हाला चकवू शकते. अशी कितीतरी उदाहरणे आहेत जिथे ज्या व्यक्तीवर अन्याय केला जातो आहे किंवा जिला manipulate केले जात आहे तिला simultaneously तूच चूक/ नालायक आहेस म्हणून तुझ्यासोबत असे घडते आहे किंवा तुझ्यासोबत नाईलाजाने असे वागावे लागत आहे पटवून देत राहिले जाते (हा प्रकार नवीन सुनांच्या बाबतीत / नावडत्या अपत्याच्या बाबतीत / नावडत्या एम्प्लॉयीच्या बाबतीत खुपदा केला जातो). जर त्या व्यक्तींवर पद्धतशीरपणे / वर्षानुवर्षे / झुंडीने / वेगवेगळ्या पद्धतीने याच विचारांचा मारा केला तर त्या व्यक्तीच्या deep sub concious मध्ये अर्थात सुप्त अंतर्मनात सुद्धा आपल्याच खोट आहे म्हणून आपल्या बाबतीत सगळे वाईट घडते आहे हे पक्के बसू शकते. आणि याचेे पर्यवसन त्या व्यक्तीलाच कॅन्सर किंवा तत्सम क्रॉनिक रोग होऊन प्रत्यक्षात त्याचेच / तिचेच आयुष्य खडतर झालेले दिसते. याऊलट ज्यांनी हा छळ केला अशा व्यक्ती टुणटुणीत आणि मजेत आयुष्य जगताना दिसतात. याचे मुख्य कारण म्हणजे आपण जे वागलो त्यात काहीही चुकले नाही ही ठाम समजूत.
बरेचदा वाईट लोक वाईट वागूनही त्यांच्या बाबतीत नेहेमी चांगलेच का घडते असा प्रश्न सोशल मीडियावर किंवा अन्यत्र वाचायला मिळतो. याचे साधे उत्तर कारण वाईट वागणाऱ्या लोकांच्या मनात त्यांच्या वागण्याविषयी कोणतीही शंका कुशंका नसते. याउलट खरोखर चांगली आणि शक्य तितकी विवेकाच्या मार्गावर चालणारी, आपल्याकडून शक्यतो वाईट कर्म होऊ नये असा सतत प्रयत्न करणारी व्यक्ती मात्र आपल्याच वागण्याविषयी नेहेमी साशंक असते. आपल्याशी वाईट वागणाऱ्या व्यक्तीच्या वाईट काळात मदतीला गेलो नाही तर मनात रुखरुख / बोचणी लागेल अशी असते. त्यामुळे हा जो काही अंतर्मनाचा न्याय असतो तो सतत स्वतःलाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करून केस लढवत राहतो. आणि दुसरीकडे अन्याय झालेली व्यक्तीच स्वतःच स्वतःचे वागणे स्वतःलाच जस्टिफाय करत राहते. या मानसिक गुंतागुंतीत पीडित व्यक्तीचीच फरफट होत राहते आणि तिच्या बाबतीत तिच्याच सद्सदविवेक बुद्धीचा न्याय निवडा नीट होत नाही. परिणामी शेवटी तिचेच नुकसान होते.
अपराधीपणाच्या भावनेतून पीडित व्यक्तीला बाहेर काढून तू चुकीची / चुकीचा नाहीस हे पटवण्यासाठी समुदेशक, मानसोपचार तज्ञ, खुद्द ती व्यक्ती, त्या व्यक्तीवर मनापासून प्रेम करणारे आजूबाजूचे लोक (असल्यास) यांना प्रचंड वेळ, पैसा, ऊर्जा खर्च करावी लागते. तरीही वर्षानुवर्षे झालेल्या प्रोजेक्शनचे इफेक्ट १००% जातीलच याची खात्री देता येत नाही.
इति लेखनसीमा.
तळटीप: इथे 'वरून बघणाऱ्या देवाचा न्यायनिवाडा' हा अजूनच वेगळा विषय आहे व त्याला कर्मभोग, मागील जन्म, पाप पुण्य असे फाटे फुटू शकतात आणि तो मतमतांतराचा विषय असल्याने तो भाग इथे टाळते आहे. पण मानसिक आरोग्याचे महत्त्व आणि आपल्याच विचारांमध्ये, अंतर्मनामध्ये आपल्या संपूर्ण आयुष्यावर, आरोग्यावर परिणाम करण्याचे सामर्थ्य आहे हे आता बऱ्यापैकी सिद्ध झाले आहे आणि त्याविषयी इथल्या सभासदांचे दुमत नसावे हे गृहीत धरून तेवढ्याच भागाला स्पर्श करण्याचा प्रयत्न केला आहे.
पीयू, त्या सदसद्विवेकबुद्धीचा
पीयू, त्या सदसद्विवेकबुद्धीचा न्यायालयाचा महत्वाचा पैलु छान मांडला आहेस. प्रत्येकाचा वेगवेगळा रेफरन्स असु शकतो याबाबत.
दोषी, अत्याचारी व्यक्तीही या न्यायालयात स्वतःला निर्दोष / न्याय करणारी आणि पिडीतही मानु शकते.
सद्सद्विवेकबुद्धी न्यायालयाचा फाटा इथे मलाही अस्थानी वाटला.
लेख व चर्चा आवडली.
लेख व चर्चा आवडली.
Pages