पुन्हा एकदा..!

Submitted by रूपाली विशे - पाटील on 13 June, 2026 - 12:27

पुन्हा एकदा..!

अनवट घटनांनी भरलेल्या आपल्या आयुष्यात हे कधी ना कधी घडू शकते याची तिला पूर्ण कल्पनाच नाही तर खात्री होती. जे घडलं ते अतिशय दुर्दैवी होतं. प्रचंड दुःख दाटलेलं तिच्या मनात .. पुन्हा एकदा रक्ताचं माणूस गमावलं होतं तिने...मात्र याक्षणी तिच्या दोन्ही डोळ्यांतले अश्रू पूर्णतः आटलेले ... तसंही लहानपणापासूनच त्यांना ओहोटी लागलेली होती. डोक्यात अनेक प्रश्न होते मात्र त्या प्रश्नांच्या उत्तरांचा पाठपुरावा करावा असं तिला वाटत नव्हतं. तिच्या भावना बोथट झालेल्या तिच्याही नकळत.. !

तिला वाटलं, पप्पांनी आपल्याशी बोलायला हवं होतं.. असं दुर्दैवीरित्या स्वतःला संपवण्याआधी निदान एकदा तरी..!त्यांनी अश्या प्रकारे आयुष्याची अखेर करावी ह्याचा सल जन्मभर छळेल आता आपल्याला..!

पप्पांनी एकदाही आपला विचार केला नसेल का स्वतःला संपवण्याआधी..? एकदाही आपला चेहरा आला नसेल त्यांच्या डोळ्यांसमोर...? मनुष्याच्या मनातल्या सगळ्या भावना एका क्षणात ठप्प कश्या काय होऊ शकतात..? त्या निसरड्या क्षणी एकदाही स्वतःला सावरण्याची बुद्धी जागी होऊ नये..?

डोक्यात अविरत फिरणारे विचारचक्र तिला थांबवता येत नव्हते. तसा त्यांनी आयुष्यभर कधीच कुणाचा विचार केला नाही.. आपल्या आयुष्यात आलेल्या स्त्रियांचा , त्यांच्या भावनांचा तर कधीच नाही. पायदळीच तुडवल्या त्यांच्या सगळ्या भावना अगदी त्यांच्यासकट.! ..अपराधी भावनेतून त्याचीच शिक्षा तर त्यांनी स्वतःला दिली नसेल..??

गरगर फिरवणारे विचार तिने झटकण्याचा प्रयत्न केला.

नानूकाकांचा निरोप मिळताच तिने निघण्याची तयारी केली. ती घरी पोचली तेव्हा घर माणसांच्या गर्दीने फुललेलं. ती घरात शिरताच गर्दीने तिला वाट करून दिली. तिला पाहून लोकांची आपसांत कुजबूज वाढली. पप्पाचं पार्थिव हॉलमध्ये मध्यभागी ठेवलेले होते. नानूकाका त्यांच्या डोक्याजवळ बसलेले. तिला पाहताच त्यांनी हंबरडा फोडला. ती पप्पांच्या पायाजवळ बसली. एकटक ती त्यांचा निर्जीव चेहरा निरखत होती. तिने गर्दीवर नजर फिरवली. पमी आत्या कुठेही तिच्या नजरेस पडली नाही. तिने तसं नानूकाकांना विचारलं देखील मात्र त्यांचा मख्ख चेहरा पाहून ती जे काही समजायचं ते समजून गेली.

" तुमचा कुणावर संशय..?" पोलिसांनी घराची झडती घेऊन झाल्यावर तिला विचारलं.

" नाही कुणावरही नाही..!" तिने उत्तर दिले.

" कुणावर संशय असेल आणि काही शंका असेल तर तुम्ही पोलिस स्टेशनला येऊन भेटा.. केसचा पुढचा तपास करता येईल आम्हांला !"

तिने मान हलवली.

पप्पांच्या कपाटातून मिळालेली नैराश्यावरील औषधे , त्या संबंधित फाइल आणि ज्या मानसरोग तज्ञाकडे त्यांचे नियमित औषधोपचार सुरू होते त्यांच्या जबानीवरून ' तीव्र नैराश्य आणि त्यातून केलेली आत्महत्या' असा शेरा देत पोलिसांनी फाइल बंद केली.

ज्या घरात बालपण गेलं, ते घर आज पप्पा गेल्यावर तिला अनोळखी वाटलं. घरातली रक्ताची माणसं कायमची सोडून गेली की त्या घराशी असलेला मायेचा ओलावा देखील त्यांच्यासोबत नाहिसा होत असावा का..?

तिला याक्षणी आई तीव्रतेने आठवली.. खूप काळाने..! तिला वाटलं, आज जर ती ह्या घरात असती तर दोघींनी एकमेकींच्या गळ्यात गळे घालून किती अश्रू गाळले असते... एकमेकींचं दुःख वाटून घेतलं असतं.

ती आईच्या खोलीत आली. क्षणभर तिला खिडकीजवळ आई उभी असल्याचा भास झाला. भासच होता तो.. अगदी क्षणभर..!

तिला आठवलं, ह्याच खिडकीत उभी राहून आई रडत असे. तिच्याजवळ आईच्या खूप आठवणी नव्हत्या. आयुष्यातली उणीपुरी नऊ वर्षे आईचा सहवास लाभला तिला.. उरलेल्या आठवणी देखील हळूहळू विरत चाललेल्या. आईचा चेहरा तिच्या डोळ्यासमोर आला. देव्हाऱ्यात ठेवलेल्या महालक्ष्मीसारखा भासायचा तो चेहरा तिला.. सणावाराला आई अगदी देवीसारखी सजायची.

तिला आठवलं, आधी आई छान हसायची, भरभरून बोलायची मात्र जेव्हा निस्सी आंटी पप्पांसोबत घरी येऊ लागली तेव्हा मात्र आई आतल्या आत कुढू लागली. हळूहळू तिचं गोड हसणं, कोसळणाऱ्या धबधब्यासारखं बोलणं खीळ लागल्यागत थांबत गेलं. चेहरा निस्तेज होत गेला. तिचं देखणं रूप कुरूपतेकडे झुकू लागलं. पप्पांनी तिला टाकलं होतं. टाकलेपणाच्या वेदना विलक्षण असतात. जखमा दिसत नाहीत मात्र घाव खोलवर गेलेले असतात.

निस्सी आंटी पप्पांच्या ऑफिसमध्ये काम करायची. तिला निस्सी आंटी खूप आवडायची. गुडघ्यापर्यंत स्कर्ट आणि फ्रॉक घालून येणारी निस्सी आंटी तिला बाहुलीसारखी वाटायची. गोरी -गोमटी असलेली निस्सी आंटी तिच्याशी छान बोलायची. चॉकलेट द्यायची. मोठेपणी आपण निस्सी आंटीसारखेच कपडे घालायचे आणि फॅशन करायची असं तिने मनात ठरवलं होतं. मात्र तिचं निस्सी आंटीसोबतचं बोलणं आईला जराही आवडायचं नाही. एकदा आरश्यात पाहून ती निस्सी आंटीसारखे कपडे घालून तिच्यासारखंच चालण्याची नक्कल करत होती .. त्यावेळी नेमकं तिच्या आईचं तिच्याकडे लक्ष गेलं अन् मग तिची आई जे तिला मारत सुटली ते थांबायचं नावच घेईना.

" काय नखरे चाललेत तनू तुझे..? त्या ख्रिस्ताविणीकडून शिकलीस ना हे सगळं..? बापाने तर मनाचीही लाज सोडलीयं.. तूही तशीच वाग .. जगू देणार नाहीत तुम्ही मला सुखाने.. वात आणायला डोक्याला नुसता..!" आई खूप संतापली होती.

निस्सी आंटी पप्पांसोबत घरी आली की आई खोलीबाहेर येत नसे. दोन्ही हातांची घडी घालून पलंगावर बसून राहायची. कधी स्वतःचंचं कपाळ बडवत बसे. निस्सी आंटी निघून गेली की, मग खिडकीजवळ उभी राहून तिला हात चोळून शिव्या-शाप देत असे. पप्पा आईकडे लक्षच देत नसत. ती खूप भांडायची अधून-मधून पप्पांशी मात्र ते शांत राहायचे.

एकदा मात्र पप्पांनी आईला खूप मारलं होतं. ती शाळेतून घरी आली होती आणि आई खूप रडत होती त्यादिवशी...!

" मला नाहीच राहायचं ह्या घरात... त्या राक्षसासोबत तर बिलकुल राहायचं नाही.. त्या ख्रिस्ताविणीने विष कालवलं माझ्या संसारात.. तळपट होईल तिचं..!" असं काहीतरी रडत म्हणत होती. आईला रडताना पाहून तिलाही रडू कोसळलं होतं.

त्यानंतर दोन दिवसांनी आई घर सोडून गेली. कुठे गेली, कधी गेली कुणालाच माहित नाही. तिला न भेटताच गेली. आधी ती खूप रागावली आईवर , तिला न सांगता गेली म्हणून पण बरेच दिवस आई परतली नाही मग मात्र तिला रडू कोसळू लागलं. आईची वाट बघून - बघून ती थकून गेली.

एके दिवशी पोलिस घरी आले. ते बाबांशी , नानूकाकांशी काहीतरी बोलले. तिलाही काही प्रश्न विचारले. पण ती काहीच म्हणाली नाही. तिची जीभ जणू टाळ्याला चिटकली होती.

" बेबी घाबरते" असं म्हणत नानूकाका तिला त्यांच्या खोलीत घेऊन गेले. त्यांचं घर बंगल्याच्या पाठी होतं. त्यांच्या घरात साईबाबाची तस्वीर होती. भितींला टेकवून महालक्ष्मीचा फोटो होता. फोटोजवळ समई तेवत होती. समईतली ज्योत शांतपणे जळत होती. महालक्ष्मीचा फोटो पाहून तिला आईची आठवण आली. तिला जरावेळ शांत वाटलं. तिला आपली आई आजूबाजूला असल्याचा क्षणभर भास झाला. आईच्या आठवणींनी ती रडू लागताच नानूकाकांनी तिला प्रेमाने थोपटलं.

नानूकाका शिर्डीला नेहमी जात. जेव्हा ते घरी नसायचे तेव्हा पमी आत्याला पप्पा घरी बोलावत. ती यायला नाखूश असायची. तिला आवडायचं नाहीच. मात्र भाचीवरच्या मायेखातर ती यायची.

" अशी कशी बेपत्ता झाली तुझी बायको..? आकाशाने ओढलं का जमिनीने गिळलं तिला..?? तूच मारलं असणार तिला.. नाहीतरी बायका खाणारे राक्षस तुम्ही..!" पमी आत्या आल्या - आल्या पप्पांशी भांडू लागली होती.

" वेडी आहेस का तू..? काहीही बरगळतेस..!" पप्पा शांत आवाजात तिची समजूत काढत होते. तरीही पमी आत्याचा राग शांत होत नव्हता.

पमी आत्या निघून गेली आणि निस्सी आंटी बंगल्यात कायमची राहायला आली. शाळेत तिला यावरून सगळे चिडवत.

तिची बालमैत्रिण सपना एकदा तिच्या कानात कुजबुजत म्हणाली , " तुझे पप्पा किनई आता ख्रिश्चन होणार. त्या निस्सी आंटीने बाटवलं तुमचं घर आणि तुझ्या पप्पांना... तुझ्या आईला ना तिने आणि तुझ्या पप्पांनीच मारलं.. !" हे ऐकून तिला खूप रडू कोसळले.

" तुला कुणी सांगितलं..?" तिने रडत विचारलं.

" सगळेच असं म्हणतात आणि किनई निस्सी आंटी खूप श्रीमंत आहे म्हणून तुझे पप्पा तिच्याशी लग्नही करणार आहेत..!" सपनाने अजून तिच्या माहितीत भर घातली.

निस्सी आंटी तिला मनापासून आवडायची.. आईसारखं तिच्यावर खूप प्रेम जरी करत नसली तरीही तिचा ती राग किंवा तिरस्कार देखील नाही करायची. मात्र कानावर पडणाऱ्या गोष्टींमुळे आता तिच्या मनात निस्सी आंटी आणि पप्पांबद्दल अढी बसू लागली. तिला दोघांचाही तिरस्कार वाटू लागला.

पुढे पाचवीनंतर पप्पांनी तिला हॉस्टेलमध्ये ठेवलं. तिलाही बरंच वाटलं. आई ज्या घरात नव्हती तिथे तिला राहावंसं वाटत नव्हतं. तीन- चार वर्षाचा काळ निघून गेला. पप्पांनी निस्सी आंटीशी लग्न केलं होतं. जेव्हा सुट्टीत ती घरी यायची तेव्हा दोघांशीही कामापुरतेच बोलायची. स्वतः भोवती तिने कोष विणला होता. त्या कोषातच ती रमू लागली.

दहावीच्या परिक्षेनंतर ती सुट्टीत घरी आली तर तिला पुन्हा एकदा धक्का बसला. निस्सी आंटी कुणालाही काहीही न सांगता घरातून बेपत्ता झालेली .. अगदी तिच्या आईसारखीच..! ' तळपट होईल तिचं' आईचे शब्द तिच्या कानात वाजले.

तिने पप्पांना निस्सी आंटीबद्दल काहीही विचारले नाही. प्रश्न होते डोक्यात मात्र तिला त्यांचा पाठपुरावा करण्याची अजिबात इच्छा नव्हती.

नानूकाका नसताना पुन्हा एकदा पमी आत्या घरी आली. म्हणजे पप्पांनीच तिला बोलावून घेतले होते.

" ऐक तनू, तुझ्या आईला मारली तसंच ख्रिस्ताविणीला पण तुझ्या बापानेच मारली असणार ..!" एखाद्या रहस्याचा भेद करावा तशी पमी आत्या तिच्या कानाजवळ पुटपुटत म्हणाली.

ती हतबद्ध होऊन ऐकत राहिली. अरबी भाषेतल्या सुरस आणि चमत्कारिक गोष्टी आत्या आपल्याला ऐकवत आहे असं समजून ती ऐकू लागली.

" तुझी आई गावातलीच .. सोन्यासारखी पोर पण मूर्ख निघाली.. ह्याच्या नादाला लागली आणि फसली जाळ्यात.. तरी मी तिला म्हटलंही दूर रहा ह्याच्यापासून , एकदा का मन भरलं ना तुझ्यापासून की फेकून देईल बघ तुला तो त्याच्या वाटेतून..तेचं खरं झालं.. राख-रांगोळी झाली तिच्या जन्माची..त्या ख्रिस्ताविणीची पण तीच गत झाली असणार.. तिला देखील यानेच मारलं असणार..नस् न् नस् ओळखून आहे मी आपल्या घरातल्या हिस्त्र प्राण्यांची.. !"

" काहीही काय सांगतेस आत्या तू.. माझे पप्पा असं काही नाही करणार..!" तिला आत्याचं बोलणं किळसवाणं वाटलं.

" मग खोटं बोलत्येयं का मी..? आमचा बाप पण तसाचं .. त्याचं घाणेरडं रक्त तुझ्या बापाच्या नसातून धावतेयं.. मी गेल्ये माझ्या आईच्या वळणावर.. सालस होती बिचारी...मला कळतंय माझं भलंबुरं .. ! " उसासत आत्या सांगू लागली.

" माझ्या आईला मारली माझ्या बापाने.. नायकिणीसाठी..! टाकली उचलून शेतातल्या विहिरीत .. मी पाहिलं, तुझ्या बापानं पाहिलं .. नको नको म्हणत होती बिचारी.. पण त्या राक्षसाला दया ना माया.. गावाला सांगत सुटला पाय निसटून पडली म्हणे विहिरीत.. आई मेली न कोठ्यावरची नायकिण आणून ठेवली काही दिवस घरात .. तिला पण घालवली काही दिवसांनी नकोशी झाल्यावर ...!" पमी आत्याला हुंदके आवरेनात.

" तू पोलिसांना का खरं सांगितलं नाहीस.?"

" काय सांगू बाई, तुझ्या बापाने हात आडवा धरला माझ्या डोळ्यावर . काही पाहिलचं नाही म्हणे... लहान होते गं , घाबरले जीवाला... बायका खाणारे राक्षस आहेत हे घरातले पुरुष.. इतरांचं मन एका बाईने भरेल पण ह्यांची भूकच पाशवी.. पशूच्या जातीचे कुठले ... दुसऱ्यांच्या पोरी खायच्या आणि घरातल्या पोरी निर्जीव शिळा बनवून ठेवायच्या. .. कुठं फेडतील हि पापं..?!"

" तुझे वडील कुठे आहेत सध्या..?"

" मसणात..!" पमी आत्या एकदम उसळून म्हणाली.

" असेल उकीरडे हुंगत इथे - तिथे.. देवाच्या भजनी लागलायं असं ऐकलं होतं.. करून - करून भागलं न म्हणे देवपूजेला लागलं, पापं धुवत फिरत असेल दुनियाभर...मरू दे ती पीडा जिथे असेल तिथे.. नाव नको आता त्याचं.. .!"

पमी आत्या गेली मात्र तिच्या डोक्याला कायमचा भुंगा लावूनच .. निस्सी आंटी पुन्हा परतलीच नाही. पोलिस तपास झाला पण पुढे तिचं काय झालं हे काही कळलंच नाही.

ती पुढच्या आयुष्यात रमत गेली. पप्पांच्या आयुष्यात अजून एक स्त्री आली होती असं तिच्या कानावर आलं होतं. पमी आत्याचं बोलणं तिला आठवायचं ... तिच्या मनात खूप प्रश्न असायचे जे तिला पप्पांना विचारावेसे वाटायचे पण त्याचा पाठपुरावा करावा असं तिला मनापासून वाटायचं नाही.

ऋतू पालटत होते. आजकाल पप्पांची वेगळीच तक्रार सुरु झाली होती. अधून - मधून त्यांना तिची आई , निस्सी आंटी दिसते म्हणे घरात वावरताना असं पप्पा तिला म्हणू लागले.

तिला जाणवलं, त्यांचं नैराश्य.. त्यांचं एकटेपण..!

तिने पप्पांसाठी मानसरोग तज्ञाची मदत घेतली. ती, नानूकाका काळजी घ्यायला होतेच तरीही दिवसेंदिवस पप्पा तीव्र नैराश्याच्या खाईत जाऊ लागले.. आणि ज्याची भीती तिला वाटत होती ते शेवटी घडलेच. आई- वडील दोघेही नसलेले घर तिला अंगणातला जुनाट पिंपळवृक्ष उन्मळून पडल्यावर अंगण जसं ओसाड वाटू लागतं तसं वाटू लागलं.

नानूकाकांना न सांगता तिने पप्पांच्या जाण्याबद्दल पमी आत्याला कळवलं.

" मी पमी आत्याला कळवलंय , येईल ती दोन दिवसांत..!" तिने नानू काकांना म्हटलं. त्यावर त्यांनी काहीही प्रतिक्रिया दिली नाही.

" हे मालकांनी दिलंय तुमच्यासाठी..!" तिच्या हातात दोन बंद लिफाफे
नानूकाकांनी टेकवले.

तिने नानूकाकांना आज निरखून पाहिलं. तिच्या पप्पांच्या जाण्याने ते खूप दुःखी, खचलेले दिसले.

पमी आत्या तिच्या यायच्या एक दिवस आधीच घरी पोचली.

" कर्माचं फळ .. दुसरं काय म्हणू..?" असं म्हणत डोक्याला हात लावत पप्पांच्या फोटोसमोर बसली.

नानूकाकांच्या खोलीतून देवाची आरती म्हटल्याचे आवाज कानावर येत होते. पमी आत्या आवाजाचा कानोसा घेऊ लागली.

" कोण गं देवाची आरती म्हणतंय..?"

" नानूकाका.. नावाला नोकर पण घरातलेचं आहेत..!"

" अस्सं..!" पमी आत्या विचारात पडल्यासारखी वाटली.

तिने टेबलवरचा एक लिफाफा उघडला. त्यात पप्पांचे मृत्युपत्र आणि सगळ्या मालमत्तेचे कागद होते. पप्पांनी सगळी मालमत्ता तिच्या नावे केली होती. काही लाख रुपये नानूकाकांसाठी आणि पमी आत्यासाठी ठेवले होते.

तिने दुसरा लिफाफा उघडला. त्यात तिच्यासाठी पत्र होते पप्पांनी लिहिलेले. ते पत्र थरथरत्या हाताने तिने वाचायला घेतले. पत्र वाचण्यासाठी तिने मानसिक बळ एकवटण्याचा प्रयत्न केला.

प्रिय तनू,

खूप आशिर्वाद,

तू हे पत्र वाचताना थरथरशील हे मी जाणून आहे. तुझ्या मनात दुःख, राग, द्वेष, तिरस्कार, हतबलता ह्या साऱ्या भावना दाटतील हे देखील मला ठाऊक आहे.. तरीही हे पत्र लिहिण्याची हिंमत मी करतो आहे.. तू मला ह्या जन्मात माफ करू नयेच...!

मी माझ्या आयुष्यात आलेल्या सर्व स्त्रियांचा गुन्हेगार आहे हे आधीच कबूल करतो. सर्वात जास्त तुझाच गुन्हेगार आहे हे मला मान्य आहे. तुला निरागस बालपण देऊ शकलो नाही त्याबद्दल तुझी माफी मागण्याची माझी लायकी नाही.

मला आयुष्यात स्थिर विचार कधीच करता आला नाही. हातचं सोडून पळत्याच्या पाठी लागण्यात माझं आयुष्य संपलं. मृगजळापाठी लागून माझ्या हातून पापचं घडली. गंगेत पापं धुवून माणसं पवित्र होऊ पाहतात मात्र माझ्यासाठी तूच माझी गंगा आहेस .. माझ्या पापांचे धडे मी तुझ्यासमोर वाचणार आहे. ते ऐकण्याची हिंमत माझ्या बाळास मिळो हिच देवाला विनंती. इतकी वर्ष जे पाप मी मनात दडवून ठेवलंय ते मी तुला सांगणार आहे.

तनू, तुझ्या आईला मी मारलं, निस्सीला देखील मीचं मारलं. मी पाप केलं आणि त्याचं प्राय:श्चित देखील मी घेणार आहे.

स्वतःची काळजी घे.. पमी आत्याला सांभाळ..!!

कायम तुझा अपराधी असलेला
तुझा पिता

पत्र वाचता - वाचता तिला रडू कोसळले. तिला वाटलं , तिला आता चक्कर येईल. ती काही क्षण नुसती बसून राहिली. तिला पत्रातली अक्षरे दिसेनाशी झाली. पमी आत्या जे तिला सांगायची ते कधी सत्यात उतरेल असं तिला खरंच वाटलं नव्हतं. तिने थरथरत्या हाताने पत्राची घडी घातली.

पप्पांनी गुन्हा तर कबूल केला होता मात्र गुन्हा कसा केला, कुठे केला .. आई आणि निस्सी आंटीच्या मृत शरीराचं काय झालं त्याबदद्ल कुठलाही उल्लेख नव्हता. ते गुपित शोधायला हवं होतं.. ते जरुरीचं होतं. आता तिला पडलेल्या प्रश्नांचा पाठपुरावा ती निश्चितच करणार होती. उत्तरे शोधणार होती.

तिने ठरवलं, उद्या सकाळी नानूकाकांना भेटायचं. पप्पांच्या जीवनात दीर्घकाळ- अगदी आपल्या जन्मापासून आलेले तेच एकटे.. त्यांच्याशी याबाबतीत बोलावं.. त्यांना विचारावं..!

ती सकाळीच घरापाठच्या नानूकाकांच्या खोलीवर आली. दार ओढलेले होते. तिच्या मागोमाग पमी आत्या देखील आली. खोलीत कुणीही नव्हते. तिने नानूकाकांना आवाज दिला मात्र काहीही प्रतिसाद मिळाला नाही.

खोलीतल्या महालक्ष्मीच्या फोटोची नुकतीच पूजा झालेली दिसत होती. फोटोसमोर नेहमीसारखी सतरंजी अंथरलेली होती. खोलीतलं वातावरण शांत होतं. महालक्ष्मीचा फोटो पाहून तिला आई आठवली. क्षणभर आई तिथे उभी आहे असा तिला भास झाला. अगदी क्षणभर ..!

एक बाजूला नानूकाकांच्या चिपळ्या, टाळ ठेवलेल्या होत्या. साईबाबांची तस्वीर मात्र तिथून गायब होती. नानूकाकांची पिशवी जागेवर दिसत नव्हती जी ते नेहमी बाहेर जाताना घेऊन जायचे.

" हा महालक्ष्मीचा फोटो इथे कसा..? हा गावच्या घरातल्या देव्हाऱ्यात होता ..तिथून नाहिसा झालेला बऱ्याच वर्षापूर्वी.. आईने आणला होता तिच्या माहेरातून, .. इथे कुणी आणला..? " पमी आत्याने 'आ' वासला.

" ह्या चिपळ्या, टाळ सगळंच घरचं..!" तिला धक्क्यावर धक्के बसू लागले.

दोघींची नजर अचानक एकमेकींकडे वळली. दोघींनाही एकाच वेळी काहीतरी उमगलं. कसली तरी ओळख पटली.

" न्याय मिळायला हवा आत्या, दोघींनाही न्याय मिळायला हवा..!"
ती बडबडू लागली.

" पोलिसांना बोलावं तनू... आत्ताच्या आत्ता...बायका खाणाऱ्या राक्षसाला सोडू नको.. लवकर फोन कर..!" पमी आत्या ओरडून म्हणाली.

तनूचं डोकं चक्रावलं. तिने स्वतःला सावरलं.

" हॅलो, पोलिस स्टेशन..!" तिने फोन लावला.

__ आणि नानूकाकांच्या खोलीत अचानक वाऱ्याचा झोत शिरला अन् महालक्ष्मीच्या फोटो समोर ठेवलेल्या दोन्ही समईतल्या ज्योती विलक्षण तेजाने अचानक प्रखर होऊन उजळू लागल्या.

समाप्त..!

धन्यवाद..

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ललिता- प्रिती, धन्यवाद..!
तुमच्या डोक्यात एखादं कथेसाठी शिर्षक असेल तर तुम्ही तसं सुचवलं तरी चालेल.. इतर वाचकांनी सुचवलं तरी आवडेल.

सामी, अस्मिता धन्यवाद...!

रूपाली, तुम्ही तुमच्या कथा नियतकालिकांना पाठवल्यात का? नसतील, तर पाठवून बघा. वृत्तपत्रांच्या साप्ताहिक पुरवण्या, मासिके कथा छापतात. तुमच्या कथा छापून येऊ शकतील असं वाटलं.

भरत, नाही पाठवल्या कधी कुठे..! मी फक्त मायबोलीवरच कथा लिहिते.. इतर संस्थळावर पण नाही लिहित.. वैयक्तिक संपर्कात फक्त दोघी बहिणी आणि एक मैत्रिण ह्यांनाच देते वाचायला .. म्हणजे वाचून त्यांनी चुका दाखवाव्या म्हणून... तुम्ही म्हणतायं तसं प्रयत्न करून पाहायला हवेत..

शीर्षक : घरामागच्या त्या खोलीत / मसणात ! / पुन्हा एकदा / कुणालाही काहीही न सांगता

ही कथा कुठल्या अंकाला पाठवलीस तर- " हॅलो, पोलिस स्टेशन..!" तिने फोन लावला.- इथेच कथा संपव. हा शेवट अधिक परिणामकारक वाटेल.
कृपया गैरसमज नसावा. सहज सांगितलं.

तनूचं आजचं वय काय आहे? वयोगट?
निस्सी आंटीसारखी चालण्याची नक्कल करते आणि तिची आई तिला रागावते, तेव्हाचे आईचे संवाद ६०-७० च्या दशकातल्या कथांमधले वाटतात.

<<वृत्तपत्रांच्या साप्ताहिक पुरवण्या, मासिके कथा छापतात. तुमच्या कथा छापून येऊ शकतील असं वाटलं.
>>

+७८६
अनुमोदन!

काटा आला अंगावर.
मानवनी समजावून सांगितले म्हणून मलाही कळला शेवट. म्हणजे सुरवातीला वाचली, आणि अशी शंका आली की नानूकाकांनी मारलंय या दोघींना, पण तेच तनूचे आजोबा आहेत हा धक्का होता.
बापरे किती गुंतागुंत असते मानवी मनात. आणि अशाप्रकारे वागणारी माणसं का असतात? त्यांना माणूस म्हणवत नाही.
रूपाली, जबरदस्त लिहीली आहे कथा, हे सांगायचं राहिलं.

>>> कथेला शीर्षक आणखी काहीतरी नेमकं आणि समर्पक हवं.

असेच बोलतो
अत्यंत ओघवत्या रहस्यकथा सदरात मोडणाऱ्या कथेला असलं पद्य नाव ???
कुछ हजम नै हुआ

काही पटकन डोक्यात आलेली शीर्षकं
-परिणती (हे मला स्वत:ला सर्वात योग्य वाटत आहे पण कदाचित शब्द जड वाटू शकेल)
-न्याय
-फिरुनी पुन्हा
-

ललिता - प्रिती, धन्यवाद, तुम्ही सुचवलेली सगळी शिर्षक छान आहेत..' पुन्हा एकदा' हे शिर्षक ठेवते कथेला..!

ही कथा कुठल्या अंकाला पाठवलीस तर- " हॅलो, पोलिस स्टेशन..!" तिने फोन लावला.- इथेच कथा संपव. हा शेवट अधिक परिणामकारक वाटेल.
कृपया गैरसमज नसावा. सहज सांगितलं.>> गैरसमज नाही होणार.. तिथेच शेवट केल्यास जास्त परिणामकारक होईल.. बरोबर आहे तुमचं मत. वाचकांना दडपवलेल्या गुन्ह्यांची कल्पना यावी म्हणून थोडा अमानवीय शेवट केला.

गुन्हे घडले तेव्हा मोबाईल फोन नव्हते.. नाहीतर त्यामुळे गुन्हा लवकर उघडकीस आला असता .. वडील वारले तेव्हा मुलगी कामानिमित्त बाहेर राहत होती म्हणजे साधारण पंचविशी ते तिशीच्या दरम्यान वय आहे. आईचे संवाद बदलून घेते.

एक शंका अशी की, इथे कथा प्रकाशित केली असेल तर दुसरीकडे पाठवू शकते का..? म्हणजे पूर्वप्रकाशित आहे म्हणून विचारते.

ऋन्मेष, पुन्हा आभार..!

धनुडी धन्यवाद,

बापरे किती गुंतागुंत असते मानवी मनात. आणि अशाप्रकारे वागणारी माणसं का असतात? त्यांना माणूस म्हणवत नाही.>> हो, सहमत.. आता तरी असे गुन्हे उघडकीस येतात.. पूर्वी तर किती दडवले गेले असतील विचार करवत नाही. एकेक गुन्ह्याचे प्रकार ऐकले/ वाचले की, वाटते .. पशूही असे गुन्हे करणार नाहीत. गुन्हेगारांच्या मेंदूत कोणता ' केमिकल लोच्या' होत असेल कळत नाही.

बाजीराव रणगाडे धन्यवाद... शिर्षक बदलते.

चिकू धन्यवाद, तुम्हीही छान सुचवलीत शिर्षक...! पुढे कथा लिहिल्यास हि शीर्षकं नक्की लक्षात ठेवेन..!

एक शंका अशी की, इथे कथा प्रकाशित केली असेल तर दुसरीकडे पाठवू शकते का..? म्हणजे पूर्वप्रकाशित आहे म्हणून विचारते.
>>>
त्या-त्या मासिकाच्या संपादकांवर अवलंबून असतं. पाठवतानाच आपणहून अमुक इथे पूर्वप्रकाशित आहे असं सांगितलेलं बरं.
आम्ही कधीकधी इंटरनेटवर पूर्वप्रकाशित कथा/लेख घेतो. कथेच्या खाली ती लिंक देतो.
विषय, लेखन, भाषावापर सगळं पाहून ठरवतो.

लोकसत्ता चतुरंग - शनिवार पुरवणी
https://www.loksatta.com/chaturang/yetoch-marathi-short-story-uma-mokash...

यात शेवटी कथा पाठवण्याबाबत निवेदन आहे.

ईमेल -chaturang@expressindia.com
सब्जेक्ट मध्ये लघुकथा २०२६ लिहा.

इतरत्र कुठेही प्रसिद्ध न झालेली आधुनिक लघुकथा मर्यादा १२०० ते १४०० शब्द

हे सदर यावर्षी सुरू झालंय. आणि आतापर्यंतच्या कथा कौटुंबिक, आताच्या काळातल्या आणि सकारात्मक संदेश देणार्‍या वाटल्या आहेत.

मनोरंजनातून प्रबोधन Wink

त्या- त्या मासिकाच्या संपादकांवर अवलंबून असतं. पाठवतानाच आपणहून अमुक इथे पूर्वप्रकाशित आहे असं सांगितलेलं बरं.>>> बरोबर, धन्यवाद ललिता- प्रिती..!

आम्ही कधीकधी इंटरनेटवर पूर्वप्रकाशित कथा/लेख घेतो. कथेच्या खाली ती लिंक देतो.
विषय, लेखन, भाषावापर सगळं पाहून ठरवतो>> ओके, मग जर हि कथा तुमच्या अटींमध्ये बसत असेल आणि हवी असेल तर तुम्हीही घेऊ शकता ..

भरत धन्यवाद... मी वाचते चतुरंग मधले ते सदर... दर पंधरा दिवसांनी कथा प्रकाशित होतात पुरवणीमध्ये... छान असतात.. यावर्षीच्या डिसेंबरपर्यंत सुरू राहिल बहुतेक ते सदर... मला जर सुचली एखादी कौटुंबिक कथा तर नक्की पाठवून बघते.

ओके, मग जर हि कथा तुमच्या अटींमध्ये बसत असेल आणि हवी असेल तर तुम्हीही घेऊ शकता .. >>> अनुभव अंकाचं जे स्वरूप आहे त्यात ही कथा बसत नाही.

अनुभव अंकाचं जे स्वरूप आहे त्यात ही कथा बसत नाही.>> ओके...!
तुम्ही कथालेखना संदर्भात चांगले मार्गदर्शन केलेत.. पुढील लेखनास उपयोगी पडेल मला .. पुन्हा एकदा आभार तुमचे..!

नितनवे धन्यवाद..!

Pages