तीनशे सत्तर ची बिर्याणी आणि ठाण्यातले ज्येष्ठ ......
मला अतिशय अस्वस्थ वाटले . हे दोन प्रसंग वरकरणी वेगळे वाटतात पण त्यांच्यात एक समान धागा आहे. एक अश्या संस्कृतीचे उघडेनागडे दर्शन जिथे हिंसा आता अंगवळणीच पडलेली नाही तर ती आनंद घ्यायचे अधिकृत साधन ,मनोरंजनाचा गाभा आणि वैताग दाखवायचा हक्क -अश्या राणिवेला पोहोचली आहे. तो स्टँडप शो असो , त्यातला तो बिर्याणी वसुल करणार मुलगा असो , ती पेशंटस च्या अव्ययवांबद्दल निर्लज्ज पणे बोलणारी मुलगी असो की दात विचकत हसणारा समूह आणि पैसे बक्षीस देऊन यांना डोक्यावर घेणारा तो मराठी आडनावाचा मुलगा असो .. ही आपणच लावलेल्या विषवृक्षाची फळे आहेत. विनोद हा या पातळीला आज अचानक पोहोचला का ?.. हिहीही करून हसण्यासाठी काहीही आणि कितीही पणाला लावायला लागले तरी चालेल .. ज्याची लाज वाटायला पाहिजे त्याचा प्रीमियम मिळवा !!.. गिल्ट तर कधी नव्हतीच पण आता उलट शाबासकी देखील मिळवा !!
हे दोन वेगवेगळे प्रसंग वरकरणी स्वतंत्र वाटतात; पण मला असे वाटते की त्यांच्यामध्ये एक अतिशय खोल आणि अस्वस्थ करणारा समान धागा आहे. तो म्हणजे अशा हिंसेल प्रीमियम देणाऱ्या संस्कृतिची घट्ट स्थापना —विशेषतः अशा लोकांविरुद्धची हिंसा, जे प्रतिकार करण्याची शक्यता कमी असते. किंवा नसतेच..
दुसरा प्रसंग ठाण्यातील आहे. एका वयोवृद्ध नागरिकाने एका टॅक्सीचालकाच्या सार्वजनिक ठिकाणी केलेल्या अस्वच्छ वर्तनाबद्दल आक्षेप घेतला. तो बहुधा रस्त्यावर पाणी टाकून चूळ भरत होता किंवा सार्वजनिक स्वच्छतेला बाधा आणणारे वर्तन करत होता. केवळ एका ज्येष्ठ नागरिकाने त्याला याबद्दल सूचना केल्यामुळे तो टॅक्सीचालक एवढा संतापला की त्याने त्या वृद्ध व्यक्तीला सर्वांसमोर निर्दयपणे मारहाण केली. त्या वृद्ध व्यक्तीला अक्षरशः रक्तबंबाळ करण्यात आले.
बघा ....तिन्हि उदाहरणात हिंसा त्यांच्यावर केलेली आहे जे प्रतिकार करू शकणार नाहीत हे हिंसकाला माहिती आहे. पहिल्या प्रकरणात एक स्त्री, जी नाही म्हणण्याचा अधिकार मागते पण आरडाओरड करू शकणार नाहीये ; दुसऱ्या उदाहरणात अशी व्यक्ती, जी सन्मान रक्षणासाठी सर्व अर्थाने परावलंबी आहे ; आणि तिसऱ्या उदाहरणात एक वयोवृद्ध नागरिक, ज्याची शारीरिक प्रतिकारशक्ती मर्यादित आहे हे आवेगाच्या सुरुवाती पासून ते शेवटपर्यंत... मारहाण करणाऱ्याला नीटच समजलेले आहे..
या मागे केवळ संताप किंवा स्यूडो विनोदबुद्धी नाही आहे ; त्यामागे अधिकाराची भावना, वर्चस्व गाजवण्याची मानसिकता आणि दुर्बल व्यक्तींना कमी लेखण्याची वृत्ती उघड उघड दिसते आहे .. चिंताजनक बाब म्हणजे अशा वर्तनाला सार्वत्रिक सामाजिक मान्यता, हशा, टाळ्या किंवा डिजिटल प्रसिद्धी मिळते आहे .. किंवा हाच नवीन प्रघात आहे ह्यावर हळूहळू शिक्का मोर्तब होते आहे .. कामावरून काढून टाकणे काय किंवा पोलिस केस करणे काय हा सगळा वर वरचा मुलामा आहे..
आणि एक मजेची गोष्ट म्हणजे.. त्या टॅक्सीचालकाने स्वतःच्या हिंसक वर्तनाचे समर्थन करताना त्या वृद्ध व्यक्तीवर ‘बाहेरचा माणूस’ असल्याचा आरोप केला. पण त्यानंतरच्या राजकीय घडामोडींमध्ये चित्र पूर्णपणे उलटे झाले. आता त्याच टॅक्सीचालकावर महाराष्ट्राबाहेरील असल्याचा आरोप होत आहे आणि त्याच्या विरोधात प्रादेशिक ओळखीच्या आधारावर प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत. परिणामी चर्चेचा केंद्रबिंदू “एका वृद्ध व्यक्तीवर झालेली अमानुष मारहाण” हा न राहता “आतले आणि बाहेरचे” अशा ओळखींच्या राजकारणाकडे वळला आहे. किती सोपे करून ठेवले आहे आपण एखाद्याचा द्वेष करणे !! त्याला बाहेरचा म्हणले की झाले .. पुनः पुनः वाटते की ही आपणच लावलेल्या विषवृक्षाची फळे आहेत .....
कायदा हिंसेनंतर कारवाई करू शकतो; गुन्हा घडल्यानंतर शिक्षा देऊ शकतो. पण एखाद्या समाजात अशी मानसिकता का निर्माण होते की ₹३७० खर्च केल्याने एखाद्या स्त्रीच्या शरीरावर हक्क निर्माण होतो, मृतदेह हा विनोदाचा विषय बनतो, किंवा सार्वजनिक स्वच्छतेबद्दल सूचना करणाऱ्या ज्येष्ठ नागरिकाला दगडाने मारणे योग्य वाटते—हा प्रश्न केवळ कायद्याने सुटत नाही.हिंसा केवळ मुठीने किंवा दगडाने होत नाही;ती आधी मनात होते.. मग जनात होते.. मग.. मग ती हळूच जगण्याची व्यवस्था होते .. या व्यवस्थेला मग कुठलाच मार्ग आव्हान देऊ शकत नाही .. कायदा तर नाहीच नाही ..आता खूप राजकीय कवित्व होईल.. कायदा बदला .. नवी नियमावली करा असा फार्स पण गाजेल .. पण मी रोज कायदा शिकवते .. मला तो कुठे तोकडा पडतो हे नीट च माहिती आहे .. सगळी आग रामेश्वरी आणि बंब सोमेश्वरी आहे! म्हणून म्हटले न .. मला अतिशय अस्वस्थ वाटले.. खूप खूप आजारी झाल्यासारखे !!! आणि तुम्हाला ..?
तीनशे सत्तर ची बिर्याणी आणि ठाण्यातले ज्येष्ठ ......
Submitted by णेम्सेक on 11 June, 2026 - 09:21
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
उगीच अस्वस्थ होऊ नका हो.
उगीच अस्वस्थ होऊ नका हो. पहिले स्टँड अप कॉमेडी प्रकरण ज्यांनी सिरियसली घ्यायला हवे त्यांनी घेतलेय, तो पैसे वसुल करू ईच्छिणारा आता जॉबलेस झालाय.
त्या लेडी डॉक्टरचे उद्गार निश्चितच अशोभनिय आहेत. आपण कुठे काय बोलतोय याचे भान तिला राहिले नाही. बाकी ती जे बोलली ते तिच्याआधी इतर प्रायवेटली बोलले असणार म्हणुन तीही बोलली, तिची जागा चुकली.
असल्या स्टँड अप कार्यक्रमांना जो क्राऊड येतो तो चेकाळलेला असतो. वयाच्या या टप्प्यावर काही शब्द/शब्दसमुह कानावर पडले की गुदगुल्या होऊन यांना खदाखदा हसायला येते. आपल्या आयुष्यात ती फेज येऊन गेलीय, तेव्हा परिस्थिती वेगळी होती, तेव्हाही आई बाबा ओरडायचे, उगीच कशाला हसताय म्हणुन…
त्यामुळे जाउदे. प्रत्येक पिढीची गरज वेगळी आहे. आज तिथे हसणारे अजुन दहा वर्षांनी आपण काय येड्यासारखे हसत होतो म्हणुन हसतील
तिसरी घटना गंभीर आहे. तो ड्रायवर युपी/बिहारचा असेल तर मी समजु शकते. ते लोक तिथे टिकु शकत नाहीत आणि इथे
आले तरी मिजास/माज जात नाही.
सहा महिन्यांनी तो कॉमेडीवाला
सहा महिन्यांनी तो कॉमेडीवाला स्टिल अलाइव्ह म्हणून नवा शो घेऊन येईल आणि लोक नवा क्रांतिकारक सापडल्याच्या थाटात त्याला डोक्यावर घेतील.
सध्या एकच प्रश्न आहे.
सध्या एकच प्रश्न आहे.
सुनील पाल या कॉमेडियनला कपिल शर्माने बोलावून समय रैना (माहीत नव्हता) आणि रणवीर कुणीतरी यांच्यासोबत रोस्ट केलं. म्हणजे यांनी आधीच खिचडी शिजवली होती. सुनील पालला शो मधे एक आयटेम सादर करायचाय असं सांगितलं होतं. प्रत्यक्षात त्याला रोस्ट केलं गेलं.
काय प्रकरण आहे म्हणून शोधावं म्हटलं तर आपोआप पालच्या मुलाखती दिसू लागल्या.
तिथं तो कॉमेडीच्या स्तरावर बोलत होता सततचं क्रॉसड्रेसिंग, अश्लील भाषा आणि एकमेकांचा अपमान करणे याबदल तो बोलत होता.
तो ज्या वातावरणात वावरलेला आहे तशीच त्याची भाषा आहे. कुणालाही राग येईल असेच ते इंटर्व्ह्यूज आहेत. पण विचार केला तर त्याने कसे का होईना, अनेकांच्या मनातलंच सांगितलं.
अनेक इंग्लीश मधे कॉमेडी करणारे कॉमेडियन्स आलेत. त्यांच्या शो मधे मला हसू येत नाही. पण त्यांचा टार्गेट ऑडीयन्स आहे. बाकी श्लील अश्लील च्या भानगडीत पडायचं नाही. बरेच पॅरामीटर्स लागू होतात.
शेखर सुमनचा शो चालू झाला. चार एपिसोडस झालेत. एक पहायचा प्रयत्न केला. शेखर म्हातारा झाला आहे. पण त्याची तीक्ष्ण विनोदबुद्धी शाबूत आहे. डिसेंट आहे शो. फक्त पूर्वी लालूप्रसाद यादव यांची टिंगल करायचा तशी आता (संधी असताना) कुणाची करतोय का हे बघायचं.
<<< परिणामी चर्चेचा
<<< परिणामी चर्चेचा केंद्रबिंदू “एका वृद्ध व्यक्तीवर झालेली अमानुष मारहाण” हा न राहता “आतले आणि बाहेरचे” अशा ओळखींच्या राजकारणाकडे वळला आहे. >>>
—— सहमत, हे महत्वाचे आहे पण सोईने दुर्लक्षित होते.
मग फोना फोनी ( शिंदे फोनवर आयुक्तांशी बोलतांना), पण मूळ मुद्दा बाजूला.
किती मारहाण? वयाचाही विचार नाही ?
ठाण्यातील मारहाणीचे प्रकरण
ठाण्यातील मारहाणीचे प्रकरण वगळता, हे सर्व भिन्न वयोगटाचे वापरकर्ते एकच स्पेस (इंटरनेट ) एकाचवेळी वापरू शकत आहेत, आणि इतरांच्या प्रतिक्रियाही पाहू शकत आहेत म्हणून घडते आहे, उदाहरणादाखल इंटरनेट पूर्व काळातील अश्या कोणत्याही काळाची कल्पना करा आणि असा विचार करा की घरोघरी, वेश्यागृहांत चालणाऱ्या प्रणयक्रीडा आबालवृद्धांना एकाच वेळी पाहायला उपलब्ध आहेत. कॉलेजच्या कट्ट्यांवर, नाक्यांवर, सहलींमध्ये अश्लील टवाळकी करणाऱ्या तरुणांच्या घोळक्यात कोणीही वृद्ध बिनदिक्कत उभाराहून त्यांची शब्दसुमने ऐकू शकत आहे. जिथे तत्वज्ञानाची चर्चा चालली आहे अशा ठिकाणी नुकतीच मिसरूड फुटलेली पोरे घुसून आपलं मत व्यक्त करत आहेत....त्यावेळी ज्या भावभावनांचे तरंग कोणत्याही ब्लॅक शीप च्या मनात उमटले असते, तीच अवस्था इंटरनेटने आपली आज करून ठेवलीय,...याला Context collapse असा शब्द आहे आणि याचा आपल्याला दिवस रात्र, पूर्ण जगातला ऍक्सेस आहे (पूर्वी वरचेवर कानावर पडणाऱ्या अशा गोष्टी फक्त आपल्या विभागातल्या, फार फार तर शहरातील असायच्या )....उरला प्रश्न याची तीव्रता वाढली आहे का,? किंवा त्या संबंधात आपल्या भावना बोथट झाल्या आहेत का? तर, कोणत्याही गोष्टी चे एक्सपोजर वाढणार तर Numbness येणारच, ही सर्वसाधारण मान्यता आहे.
बऱ्याच वाह्यात गोष्टी देखील
बऱ्याच वाह्यात गोष्टी देखील आधुनिकतेच्या नावाखाली न्यू नॉर्मल होत आहेत ही गंभीर बाब आहे खरी.
मी फार आधीपासूनच अश्या सो कॉल्ड अश्लील विनोदी कार्यक्रमांच्या विरोधात होतो.
AIB धागा पाहता २०१५ सालीच अशी लाट येणार याचा अंदाज आला होता.
कारण तेव्हा जाणवले होते की या गोष्टीला चित्रपटांसारखे सेन्सॉर बोर्ड नाही. प्रत्येक वयोगटाला हे मोबाईलवर बघायला उपलब्ध आहे. जर चालते म्हणून चालवून घेतले तर हे अजून कुठल्या थराला जाईल याची कल्पना नाही. आता तेच होत आहे.
आणि आता आपला लेख वाचून मनात विचार आला की पुढे जाऊन याचा फटका समाजातील दुर्बल घटकांना किंवा स्त्रियांना बसेल का??
काही जुने धागे. या निमित्ताने शोधले. सेव्ह करून ठेवतो.
AIB - बॉलीवूडी अश्लीलतेची नीचतम पातळी.
https://www.maayboli.com/node/52596
AIB ची किड - पुन्हा एकदा - आवरा आता यांना
https://www.maayboli.com/node/58866
AIB पोल
https://www.maayboli.com/node/52621
India's got latent - चला निषेध नोंदवूया.
https://www.maayboli.com/node/86266
समय रैना STILL ALIVE
https://www.maayboli.com/node/88121
क्रिकेटच्या मैदानावर
क्रिकेटच्या मैदानावर सुद्धा अशा वाह्यात गोष्टी होत असतात.
म्हातारी मेल्याचे दुःख नाही
म्हातारी मेल्याचे दुःख नाही पण काळ सोकावतो. असे झालेय सगळीकडे.
कायद्याची भिती नाही.
नैतिकतेचा पत्ता नाही.
माणुसकीची जाणीव नाही.
https://www.instagram.com
https://www.instagram.com/reel/DZYw_aIIgFk/?igsh=anlxdGRuaTc3c3Qx
कुठल्यातरी संघटनेच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी त्याला शोधून फटकावले आणि पोलिसांच्या ताब्यात दिले. परप्रांतीय अँगल सुद्धा आला. बाकी मी विचार करतोय आमच्या जुन्या मुंबईत असे काही घडले असते तर त्याला तिथेच पडली असती. मूळ व्हिडिओ पाहिला. फार वाईट वाटले त्या ज्येष्ठ नागरिकांबद्दल. असे कोणीही कायदा हातात घेऊ नये आणि आपली पोळी भाजू नये, हे कितीही योग्य असले तरी त्या माणसाला मार पडताना बघितले तेव्हा मनाला जरा बरे वाटले हे ही तितकेच खरे..
शेखर सुमन चा शो कुठे बघु शकतो
शेखर सुमन चा शो कुठे बघु शकतो?
युट्यूबवर त्याच्या ऑफिशियल
युट्यूबवर त्याच्या ऑफिशियल चॅनलवर.
शेखर सुमन शो. सही आहे एकदम!!!
शेखर सुमन शो. सही आहे एकदम!!!
खूप आवडला.
"अश्लील"हा शब्द आला की मला
"अश्लील"हा शब्द आला की मला एकीकडे तमाशा तर दुसरीकडे र.धों. कर्वे आठवतात
त्या सो कॉल्ड कॉमेडी शोबद्दल
त्या सो कॉल्ड कॉमेडी शोबद्दल. हे असं मुलं मुलं आणि मुली मुली आपापसात बोलत अस / असतात. विशेषतः पौगंडावस्थेत. त्याबद्दल कुतूहल, थ्रिल इ.
पण या शोजमुळे पंचविशीतले युवक युवतीही असं बोलू इच्छितात. त्याहून जे कोप र्यात बोललं जायचं ते चव्हाट्यावर येतं. वर लोक ते इंट रनेटवर टाकून जागतिक चव्हाट्यावर आणतात. आणि असं बोलून आणि जाहीर करून आपण मोठा पराक्रम केला असं त्यांना वाटतं. , हे समजण्याच्या पलीकडचं आहे. ( माझ्या वर्तुळाची आणि आकलनाची मर्यादा ). लोक चिडले म्हणून मग ते डिलीट बिलीट करतात. पण आपण काही चुकीचं केलंय असं त्यांना वाटत असतं, असं अजिबात दिसत नाही.
मारहाण करणं हेही सर्रास होऊ लागलंय. यातही मारहाणच काय, तर मॉब लिंचिंग करणारे सुद्धा स्वतःच ते शूट करून व्हायरल करतात.
खरेच गुन्ह्यांचे प्रमाण अचानक
खरेच गुन्ह्यांचे प्रमाण अचानक वाढले आहे की सोशल मीडियामुळे ते प्रत्येकापर्यंत आता फक्त पोहोचू लागले आहे, असेही वाटले.
त्यातच इंटरनेटमुळे कौटुंबिक संस्कारप्रणाली नामशेष होऊ लागली आहे. शिवाय, कायद्याची अंमलबजावणी होणे दुरापास्त आहे हे मनामनात रुजत आहे. विविध पातळ्यांवरील निराशा, अपयश, उद्वेग, आक्रमकता अश्या काही घटकांचे प्रमाण या प्रचंड लोकसंख्येत टिकून राहण्याच्या भयावह स्पर्धेमुळे वाढले आहे. हे झाले त्या ज्येष्ठ काकांना झालेल्या मारहाणीबाबत!
सेजल पवारला भान ठेवता आले नाही, डॉक्टर असूनही! बिर्याणी देऊन मुली पटवण्याचा प्रयत्न करणे हे पुन्हा कौटुंबिक संस्कार, मेंदूवर सतत आदळणारे जालीय गलिच्छ विचारप्रवाह, मुलींनाही विशेष भान न राहणे आणि मुलांना सगळेच सहज उपलब्ध असल्यासारखे वाटणे अश्या घटकांशी निगडित आहे.
एखाद्या संघटनेने घेतलेली action चांगली असली तरी ती काहीशी बेकायदेशीर 'ठरते' व ती action प्रत्येक ठिकाणी घेतली जाईल याची काहीच शाश्वती नसते. तसेही, ती action ही काही त्या गुन्ह्याला मिळू शकणारी अचूक शिक्षाही नसते.
जबाबदार नागरिक तयार करण्यात देश कमी पडला आहे. बेंचमार्क जपानसारखे देश आहेत.
तमाशा आणि र धो कर्वे याचा
तमाशा आणि र धो कर्वे याचा इथल्या कॉन्टेस्ट मधे काय संबंध? वैज्ञानिक माहिती आणि अश्लीलता हे वेगळे आहेत हे समजण्याइतकं प्रगल्भ पब्लिक इथे आहे असा माझा समज आहे. वडाची साल पिंपळाला लावायची आणि टोकलं कि ट्रोल म्हणायचं अशा भणंगांकडे आता लक्ष देणार नाही.
अभिव्यक्ती स्वातंत्र्य असले तरी ते बेजबाबदार नसतं. प्रत्येक काळात काही शिष्टता, संकेत, अलिखित नियम असता. काही वेळा कायदे असतात.
वर्णभेद, शारीरिक व्यंग, आर्थिक सामाजिक मागासलेपणा, दुय्यम लिंगावरचे असभ्य विनोद करू नयेत असे संकेत आहेत. यात काही पळवाटा नक्कीच आहेत. जसे कि बायकोवरचे विनोद. पण ते किमान डिसेंट असल्याने स्त्रिया चालवून घेतात. जर विरोध झाला तर त्या विरोधाला चूक ठरवणार का? असे विनोद स्त्रीवर्गाच्या टॉलरन्स मुळे चालतात याचा अर्थ ते जस्टिफाईड आहेत असे नाही.
पुढच्या पिढीवर मतं लादू नयेत हे ठीक. पण पुढच्या पिढीने अनुभवाचा फायदा करून घेऊ नये असे नाही. गेल्या पंधरा वर्षांत सोशल मीडियात झालेल्या चर्चा नको त्या वयात मुलांनी वाचल्या आहेत. त्याचा परिणाम म्हणून आधीच्या पिढीच्या कल्पना टाकाऊ आहेत असा एक विचार नव्या पिढीत दिसतो. संदर्भ सोडून अशा चर्चा उपलब्ध होणे हे संकटच आहे.
कुणी समाजशास्त्रज्ञ यावर लेख लिहील किंवा डिजिटल मीडीयात आपले म्हणणे मांडले त्या वेळी या विषयावर सांगोपांग चर्चा होईल.
370 ची बिर्याणी आणि डॉ. सेजल चे वक्तव्य याबाबतीत दुसरी बाजू येणे आवश्यक आहे. ती सुप्रिया जोशी यांनी मांडली आहे. यातला कोणताही इसम ऐकिवात नाही. त्यामुळे नेमके चाललेय काय आणि आपण आपला वेळ क्लिकबेट वर दवडतोय का असा प्रश्न पडतो. मुद्दाम हाडूक चघळायला देणं आता इतकं वाढले आहे कि उद्या कुणी धोक्याचा इशारा दिला तरी त्यात काही चाल आहे का अशी शंका येते.
अती तेथे..
सुप्रिया जोशी यांच्या पोस्टची लिंक
https://www.facebook.com/share/p/1EkYzo71Xh/
ते बिर्याणी प्रकरण व्हायरल
ते बिर्याणी प्रकरण व्हायरल झाल्यानंतर त्याने आमच्या घराण्यात तर बायकांना मारहाण करायचे, असं अभिमानाने सांगितलं होतं.
तेव्हा ही पारंपरिक पुरुषी, पुरुषप्रधान मानसिकताच आहे, जिथे स्त्री ही उपभोग्य वस्तू आणि दासी आहे. अशा कार्यक्रमांमुळे , सोशल मीडियामुळे ती चव्हाट्यावर आली इतकंच.
अभिजीत अय्यर मित्रा नावाचा एक इसम आहे. तो टीव्ही वरच्या पॅनल डिस्कशन्समध्ये पाहुणा म्हणून असतो. ए एन आय चा लाडका आहे.
त्याने न्युज लाँड्री नावाच्या न्युज पोर्टलच्या महिला पत्रकारांबद्दल वेश्या या शब्दाला समानार्थी शब्द , गुप्तरोगांची नावं वापरून ट्वीट केलं.
त्याच्यावर अजूनही कायदेशीर कारवाई होऊ शकत नाही.
मुळात हे समजून घ्यायला हवे की
मुळात हे समजून घ्यायला हवे की या शोज चे टार्गेट ऑडियन्स हे एका ठराविक वयोगटाच्या तरुण तरुणी आहेत, आताच्या जगात त्या पूर्वीच्या कोपऱ्यांची आणि नाक्यांची जागा सोशल मीडियाने घेतली आहे.आयोजकांच्या मनात टार्गेट ऑडियन्स व्यतिरिक्त इतरांनीही ते पाहून अधिकधिएक सनसनी पसरावी आणि जास्तीत जास्त रेव्हेन्यू जनरेट व्हावा अशी इच्छा असण्याचे नाकारण्यात काहीच अर्थ नाही आहे (कदाचित असे सनसनी पसरवणारे व्हिडीओज च्या क्लिप्स सोमीवर जास्तीत जास्त सर्क्युलेट करण्यामागे त्यांचाच हात असू शकतो कारण या सर्वात फायद्यात रहाणारे स्टेक होल्डर आयोजक हेच ठरतात). कदाचित तिथे बोलणारे युवक युवती हे कोपऱ्यावर, कट्ट्यावर अथवा मित्रांच्या कोंडाळ्यात brag करावे तसे ह्या गोष्टी बोलून जात असतील. त्यांच्या गावी आपण हा पराक्रम संपूर्ण जगासमोर सांगतोय या situational awareness चा विसर पडलेला असावा असंच प्रत्येक प्रकरणात वाटत.
मारहाण करणं हेही सर्रास होऊ लागलंय. यातही मारहाणच काय, तर मॉब लिंचिंग करणारे सुद्धा स्वतःच ते शूट करून व्हायरल करतात. >>> या मागे दहशत पसरावी हाच मुख्य उद्देश दिसतो.
https://www.facebook.com
https://www.facebook.com/share/r/1EdhDoawTV/
आणखी एक गुन्हे-संदर्भातील घटना
फाविदडि सहमत.
फाविदडि सहमत.
>>
>>
अभिजीत अय्यर मित्रा नावाचा एक इसम आहे. तो टीव्ही वरच्या पॅनल डिस्कशन्समध्ये पाहुणा म्हणून असतो. ए एन आय चा लाडका आहे.
त्याने न्युज लाँड्री नावाच्या न्युज पोर्टलच्या महिला पत्रकारांबद्दल वेश्या या शब्दाला समानार्थी शब्द , गुप्तरोगांची नावं वापरून ट्वीट केलं.
त्याच्यावर अजूनही कायदेशीर कारवाई होऊ शकत नाही.
<<
पूर्ण खोटे विधान .
कायदेशीर कारवाई खटले सर्व काही सुरु आहे. ए आय एम विरुद्ध अब्रुनुकसानीचा खटला दाखल केला आहे.
एक आहे की आपणास आवडेल असा निकाल दिल्ली हाय कोर्टाने दिलेला नाही. त्यामुळे कायदेशीर कारवाई होतच नाही वगैरे आकांडतांडव केले जात असावे.
https://www.deccanherald.com/india/delhi/delhi-court-stays-fir-order-aga...
या धाग्याच्या विषयातल्या
या धाग्याच्या विषयातल्या तिन्हीही घटना या उडत उडत माहिती आहेत, त्यामुळं आधी समांतर घटनांबद्दल लिहीले.
आताही प्रणित मोरेचा चॅनल पाहिलेला नाही. जर सुमार असेल तर फीड मधे नकोच. चांगला असेल तर केहांही पाहू शकतो.
त्याबद्दल जी माहिती मिळतेय ती खरी असेल तर तो मोरे आहे म्हणून कुणीही त्याची बाजू घेऊ नये. हल्ली पुरोगामी किंवा रॅशनल असणं म्हणजे जी गोष्ट आपण अंमलात आणू शकत नाही त्याबद्दल तात्विक गप्पा ठोकणे. बोलायला काय लागतं?
मी तुझ्याशी सहमत नसलो तरीही शेवटच्या श्वासापर्यंत तुझ्या बोलण्याच्या स्वातंत्र्यासाठी लढेन,,, हे वाक्य १२ वर्षांपूर्वी अनेक जणांनी बोलून झालंय, प्रत्यक्षात यातलं कुणीही तसं वागत नाही. या भूमिका असतात. त्या वेळी एक बाजू काळी आणि एक बाजू शुभ्र दाखवण्यासाठी जे जे उदात्त ते ते बोलून दाखवायचं होतं. आणि आता ते पाठ केलेले अर्धवट रॅशनॅलिस्टस कुठेही या तात्विक गप्पा चिकटवत असतात. कधी कधी त्यांचा अविर्भाव असा असतो कि बघा मला हे माहीत आहे. त्या क्षणी त्या व्यक्तीच्या शरीरातून हजार व्होल्टसचा करंट वाहत असून तो साक्षात एलईडी सूर्य असतो.
अश्लील विनोदाची पाठराखण करणं म्हणजे पुरोगामित्व दाखवण्याची सुसंधी म्हणुन काही असे अर्धवट त्या कुंडात उड्या घेतातच.
एकाने एकदा मी मुलांना मोबाईल मागितला तर देतो असे म्हटलं होतं. काही वर्षांनी त्याच व्यक्तीने मी मुलांना बारावीपर्यंत मोबाईल दिलेला नाही असे दुसरीकडे म्हटले. तिथे आठवण करून दिल्यानंतर "म्हणजे मी त्यांना मोबाईलचा वापर कसा करायचा याचे शिक्षण दिले आहे असं मला म्हणायचं होतं" अशी सारवासारव केली.
बोले तैसा चाले..हे फक्त तळीरामाबातच शक्य आहे.
नैतिकता define करता येईल का
मोठा प्रतिसाद लिहिला होता पण नंतर विचार केला मरू दे यार, की फरक पेंदा ?
असे काही केले की आपण एकदम बॅटमॅन मधील ब्रुस वेन श्रेणीत पडल्याचे सुख प्राप्त होते आणि मी बॉसच्या शिव्या खायला परत तयार होतो.
प्रणित मोरे आणि सेजल पवार ने
प्रणित मोरे आणि सेजल पवार ने माफी मागितल्याचा व्हिडिओ बघितला.
मराठी आहेत असे वाटलेच नाहीत दोघे. जेन झी ची या बाबतीत चांगली प्रगती आहे.
त्याची बाजू घेण्याचा प्रश्न
त्याची बाजू घेण्याचा प्रश्न नाही.
त्याच्यावर पोलिस केस दाखल करणे आणि पोलिसांनी करून घेणे साफ चुक आहे.
स्वतःचे पैसे खर्च करून असले
स्वतःचे पैसे खर्च करून असले तथाकथित कॉमेडी शो बघायला जाणे आणि त्याच्या बदल्यात असलेली नोकरी जाणे, डॉक्टरकीचा लायसन्स रद्द होणे वगैरे "बक्षिसे" मिळत असतील तर ह्या तोंडाच्या जागी मोरी असणार्या मोर्याची लोकप्रियता आभाळाला भिडेल ह्यात शंकाच नाही!