
31 डिसेंबर 1999चा दिन आता संपत आलेला होता. घड्याळात रात्रीचे पावणे बारा झाले होते. एरवी यावेळेस झोपी गेलेले बहुसंख्य जग आज चक्क टक्कपणे जागे होते. घड्याळाचे काटे पुढे सरकू लागले . . . 23:50, 23:55, 23:59 . . . आणि त्यानंतरचा ऐतिहासिक क्षण होता 1 जानेवारी 2000 अर्थात एका नव्या सहस्त्रकाचा प्रारंभ ! जगाच्या पाठीवर आपापल्या स्थानिक वेळेनुसार हा क्षण सर्वत्र तितक्याच उत्साहात साजरा केला गेला.
या सहस्त्रकाचे स्वागत करतानाच जगभर संगणकाच्या प्रांतात मात्र एक भीती सतावत होती ती म्हणजे Y2K किंवा Millennium Bug. त्यासंबंधी असंख्य वावड्या उठलेल्या होत्या आणि काहींच्या मते नवीन सहस्त्रक सुरू होतानाच संगणकावर आधारित अनेक उद्योगांत मोठा गडबडगुंडा होऊन अब्जावधींचे आर्थिक नुकसान होईल. परंतु संबंधित यंत्रणांनी आधीच पुरेशी काळजी घेतल्याने वास्तवात विशेष दखल घ्यावे असे फारसे काही बिघडले नाही. अशा तऱ्हेने एका नव्या जोमात नवे सहस्त्रक चालू झाले.
दरवर्षीप्रमाणे जानेवारीच्या पहिल्या पंधरवड्यात नव्या वर्षाच्या शुभेच्छांसह विविध दिनदर्शिका आणि डायऱ्यांची लयलूट चालू झाली. माझ्या व्यावसायिक कामासाठीची डायरी मी आदल्या दिवशीच तयार करून ठेवली होती. मग भेट मिळालेल्या डायऱ्यांपैकी बऱ्याचशा वाटून टाकल्या आणि त्यातून उरलेली एकच डायरी मात्र घरी पडून राहिली. बघता बघता एक दोन महिने सरले. माझ्या टेबलावरील कोपऱ्यात ती रिकामी डायरी मात्र वनवासात असल्यासारखी पडूनच होती. तिचं नक्की काय करावे हे सुचत नव्हते. एकेकाळी मला दैनंदिनी लिहायची सवय होती आणि काही वर्षे सलग लिहून मी आठ-दहा वह्या भरवल्या होत्या. रोज काहीतरी वहीत लिहायचंच या हट्टाने आपण लिहीत बसलो की मग काहीही आलतूफालतू गोष्टींची देखील नोंद करत बसतो. वर्षामागून वर्षे सरतात आणि मग साचलेल्या अशा वह्या एखाद्या दिवशी माळ्यावर धूळ खाण्यासाठी रवाना केल्या जातात. गेल्या शतकाच्या शेवटच्या दशकातच कधीतरी या प्रकाराचा जाम कंटाळा आला. ‘आपल्या सर्वसामान्य आयुष्यात रोज नोंद करण्यासारखे खरंच काही असते का?’ असा प्रश्न स्वतःला विचारला. त्यातूनच हुक्की आल्यागत हा दैनंदिनी प्रकार बंद करून टाकला होता.
पण आता माझ्या पुढयात ती कोरी करकरीत आकर्षक बांधणीची डायरी शांतपणे पडलेली होती. ‘काय करावं बरं तिचं’ अशा विचारात असताना डोक्यात एकदम वेगळी कल्पना चमकली,
“आपल्या लेखनाच्या शिस्तबद्ध नोंदीसाठी ही डायरी वापरली तर . .?”
हां, हे अगदी योग्य वाटले.
त्या काळी माझे सार्वजनिक लेखन छापील माध्यमातून प्रकाशित झालेले होते आणि त्याची कात्रणे विस्कळीत स्वरूपात ड्रॉवरमध्ये पडून होती. त्याचबरोबर काही मोजक्या कविताही केलेल्या होत्या परंतु त्या (त्यांच्या किरकोळ दर्जामुळे) अप्रकाशित होत्या. मग एका झटक्यासारखी नवीन डायरी उचलली आणि त्यात प्रथम त्या कविता लिहून काढल्या. नंतर मग ती सर्व छापील कात्रणे कालानुक्रमे डायरीत सेलोटेपने चिकटवून ठेवली. प्रत्येक कात्रणाखाली लेखाचा प्रकाशन दिनांक, त्यावर आलेल्या प्रतिसादांचा गोषवारा आणि अन्य काही तात्कालिक नोंदी पण करून ठेवल्या. अशा प्रकारे डायरीचे उद्घाटन तर झाले, आता पुढे काय ?
आरंभशूरतेमुळे पुढे बरेच महिने आळसाने कल्पनाशक्तीवर मात केली आणि डायरी पुन्हा एकदा वनवासात जाऊन बसली. तेव्हा वर्षाकाठी माझे फारतर दोन-तीन लेख कुठेतरी छापून यायचे आणि मग फक्त लेखाचे कात्रण ठेवण्यापुरतीच तिची आठवण व्हायची. मग मनाशीच म्हणायचो, ठीक आहे, आपण जरी तिचा फक्त एवढाच उपयोग केला तरी 365 पानांची ती आपल्याला आयुष्यभर सहज पुरून जाईल ! पण मानवी मनाची एक गंमत असते. त्यात होणारे विचारांचे चढउतार इतके असतात की विचारायला नको. त्यानुसार मनाचा एक कप्पा अजूनही अस्वस्थ होता. डायरी हातात घेतली की तिचा बहुतांश कोरा असलेलाच भाग मनाला सतावे आणि एका मानसिक रितेपणाची जाणीव होई. त्या कोऱ्या पानांचे काय करावे अशा गहन विचारात असताना एके दिवशी डोसक्यात दुसरी ठिणगी पडली.
आपल्या आयुष्यात कामधंदा आणि संसाराखेरीज सांस्कृतिक जीवनाचा देखील मोठा आणि महत्त्वाचा वाटा असतो. त्यामध्ये वाचन, लेखन, संगीतश्रवण, नाटक-चित्रपट पाहणे, समारंभ, मेळावे, कट्टे . . . असं बरंच काही. तेव्हा रोजनिशी लिखाण जरी आपण पूर्वीच बंद केले असले तरी आता या नव्या डायरीत अशा सांस्कृतिक गोष्टींच्या निवडक नोंदी करायला काय हरकत आहे, असा विचार मनात घर करून राहिला. एक-दोन दिवसातच त्या विचाराने चांगली पकड व गती घेतली आणि मग निर्णय पक्का झाला. तोपर्यंत माझा संगणकाशी परिचय लांबून पाहण्यापुरताच होता. तेव्हा भारतातले अनेक जण छोट्या-मोठ्या गोष्टी येताजाता हाताने सहज लिहीत असत.
तेव्हा मनोरंजनाचे मुख्य साधन होते ते म्हणजे वाचनालयातून आणलेली छापील पुस्तके. एखादं पुस्तक कितीही आवडलं तरी ते लवकरच परत करावे लागे. मग त्याची कायमस्वरूपी आठवण आपल्याजवळ कशी ठेवावी, या विचारातूनच डायरीचा एक नवा विभाग उघडला गेला तो म्हणजे वाचलेल्या पुस्तकाचा सारांश लिहिणे. काही काही मजकूर असा असतो की तो एकदा वाचून तुमचे पोट भरणार नसतेच. त्याचे पुनर्वाचन येताजाता अनेकदा करावे असे राहून वाटते आणि त्यातूनच तो अनुभूतीच्या पातळीवर जातो. मग अशा निवडक मजकुरांना त्यांच्या निर्मात्यासह डायरीत महत्त्वाचे स्थान मिळाले.
या प्रकारे एक दोन वर्षे छान गेली. डायरीची पाने हळूहळू का होईना पण भरू लागली आणि मग हुरूप वाढला. आता डायरीला अजून एक पैलू पाडावासे वाटू लागले. त्यासाठी फार विचार करायची गरज नव्हती. मनोरंजनाचा अजून एक महत्त्वाचा कप्पा म्हणजे आपण पाहिलेले नाटक व चित्रपट. मग आवडत्या पुस्तकांच्या बरोबरीनेच या दोन कलांचे देखील रसग्रहण रूपात डायरीत पदार्पण झाले. या प्रकारचे लघुलेखन करताना एक मात्र जाणवले की सारांशलेखन ही देखील एक कलाच आहे. या निमित्ताने आपला तिचाही सराव होतोय याचा आनंद वाटला. पुढची दोन-तीन वर्षे डायरीलेखन हे आवडता मजकूर, पुस्तके, नाटके व चित्रपट या आघाड्यांवर चालू राहिले. लेखनाच्या प्रत्येक प्रकारासाठी अंदाजे काही पाने सोडून मग पुढचा विभाग लिहीत होतो. या टप्प्यावर एक जाणवले की आता आपल्या डायरीला अनुक्रमणिकेची गरज आहे. मग डायरीच्या प्रत्येक पानावर अनुक्रमांक घातले आणि सुरुवातीच्या पानावर छानशी विभागवार अनुक्रमणिका तयार झाली. एक गोष्ट आता स्पष्ट झाली होती. सन 2000 सालासाठी छापलेली ही तारीखवार डायरी आता फक्त त्या वर्षाची राहिलेली नसून ती आपली आयुष्यभराची जीवनसाथी होत आहे.

असे नैमित्तिक डायरी लेखन धीम्या गतीने चालू होते आणि अशात 2005 हे वर्ष उजाडले. तेव्हा आयुष्यात संगणकाने बऱ्यापैकी प्रवेश केलेला होता. त्याच्यावरील दैनंदिन व्यावसायिक काम करता करता एके दिवशी ध्यानीमनी नसताना आपल्या मायबोलीचा शोध लागला. त्यातून व्यक्तिगत आयुष्यात एक छोटीशी क्रांतीच झाली असं म्हणायला आता हरकत नाही. हस्तलेखन आणि छापील प्रकाशनाच्या जोडीने आता आयुष्यात तिसरे पर्व सुरू झाले होते ते म्हणजे ऑनलाइन लेखन. ‘जुन्या’ मायबोलीवर हितगुज करता करता तिथल्या अनेक विभागांचा शोध लागला आणि त्यात देखील छानपैकी रमलो. मग काय, माझ्या डायरीतल्या आवडत्या नोंदींना ऑनलाइन देखील घुसवू लागलो. नव्या इ-लेखन युगाशी आता सांधा जुळवून घेणे क्रमप्राप्तच होते.
मग ११ वर्षे याच पद्धतीने गेली काही नोंदी डायरीत, काही थेट ऑनलाईन आणि काही काहींची नोंद दोन्हीकडे. 2016 पासून स्वतंत्र लेखन थेट ऑनलाईनच करू लागलो. बघता बघता त्यात गती आली आणि लेखनवेग वाढला. ऑनलाइन लेखनाची अनुक्रमणिका इथे आपोआपच तयार होत असते. पण तरी देखील कुठलीच डिजिटल गोष्ट ही आपली - किंबहुना आपल्या मालकीची - आहे असे कधी वाटतच नाही. या उलट हाताने लिहिलेली माझी डायरी आहे ही फक्त माझीच आहे ही भावना अगदी प्रबळ असते. त्या भावनेतूनच आता डायरीत अजून एक विभाग उघडला गेला आणि तो म्हणजे आपल्या ऑनलाईन लेखांच्या फक्त शीर्षकांची वर्षानुसार नोंद. आपण आतापर्यंत काय काय लिहिले आहे याची याचा आढावा अधूनमधून घेतलेला बरा असतो. ते न्याहाळण्यासाठी उठसूट ऑनलाईन जाण्यापेक्षा छानपैकी आपली डायरी उघडून चाळत बसणे हे खूपच सोयीचे आणि समाधानाचे वाटते. वेगवेगळ्या काळात केलेल्या नोंदी भिन्न पेनांनी केलेल्या असतात - कधी पेन तर कधी बॉलपेन; कधी काळी शाई तर कधी निळी व क्वचित लाल सुद्धा. वयानुरूप आपले अक्षर देखील बदलत (खराब होत) असते. काही काळाने डायरी चाळताना त्यातली ही चित्रविचित्र विविधता फार मजेशीर वाटते.
अनेक वर्षे ललितगद्य, आरोग्य आणि थोडंफार सामाजिक स्वरूपाचे वाचन-लेखन करता करता अजून एका दालनात येऊन पोहोचलो ते म्हणजे भाषाविषयक वाचन-लेखन. दोन भाषांशी माझी सलगी - मराठी आणि इंग्लिश. मराठीवरील प्रेम गाढ आहे हे निःसंशय पण त्याचबरोबर इंग्लिशची सोबत देखील हवीशी वाटते. या दोन्ही भाषांमधली शब्दकोडी सोडवता सोडवता अनेक शब्दांवर आणि वाक्प्रचारांवर जिवापाड प्रेम बसले. मग काय, त्यातल्या काहींच्या निवडक नोंदी आता डायरीत करणे हे ओघानेच आले. डायरीच्या काही पानांवर हक्क सांगायला अजून एक विभाग तयार झाला. नोंदींमध्ये वाढ होऊ लागली. दरम्यान तो कात्रणे चिकटवण्याचा प्रकारही बंद झाला.
वाचन, मनन आणि लेखन हे तर आता आयुष्याचे स्थायीभावच झालेले आहेत. पण यांच्या जोडीला अजून एका छंदाची अलीकडे भर पडली आहे आणि तो आहे लेखांचे अभिवाचन. याखेरीज विविध सभासंमेलने आणि कट्ट्यांना देखील श्रोता किंवा प्रेक्षक म्हणून हजेरी लावली जाते. अशा सर्व उपक्रमांच्या नोंदी देखील करणे देखील या डायरीला आवश्यक वाटते. 2000 साली हे डायरीलेखन चालू केले आणि आता त्याला उणीपुरी 26 वर्षे लोटली. त्यातल्या नोंदी अर्थातच संक्षिप्त स्वरूपाच्या आहेत. तिथे थोडक्यात लिहायचे हे अगदी पहिल्यापासूनच ठरवले होते. त्यामुळे आजच्या घडीला देखील या डायरीतील 365 पैकी 125 पाने अजूनही रिकामी आहेत. याच माफक प्रमाणात हे काम चालू ठेवल्यास ही डायरी कदाचित आयुष्यभर पण पुरेल का असेही कधी वाटते. तशी पुरली तरी आनंदच आहे आणि यदाकदाचित दुसरी करावी लागली तरीही दुःख नाही ! (खरं तर आयुष्यात दोघींना जपण्यापेक्षा एकीलाच व्यवस्थित प्रेमाने सांभाळलेले बरे, नाही का?
) लेखन आता मोठ्या प्रमाणात ऑनलाईनच होत असले तरीही डायरीतील छोट्या व नेटक्या हस्तलिखित नोंदींची असोशी अजूनही कायम आहे आणि राहील. सातत्याने ऑनलाइन वाचन आणि कामाचा जेव्हा थकवा येतो त्यावेळेस हे डायरीवाचन हा आवडता आणि आश्वासक आधार असतो आणि तोच भावी नोंदी करण्यासाठीची प्रेरणा ठरतो.
गेल्या 26 वर्षांत वर लिहील्याप्रमाणे डायरीतील एकेक विभाग वाढत गेला आणि आजच्या घडीला त्यात एकूण 11 विभाग झालेत. त्यातले 10 हे रीतसर नोंद विभाग आहेत आणि ते ठराविक लेखनशिस्तीत लिहिलेत. परंतु दहावा विभाग मात्र या सर्वांपासून फटकून राहणारा आहे. त्याला उलट्या डोक्याचा म्हटले तरी चालेल कारण त्याची सुरुवातच डायरीच्या शेवटच्या पानाकडून होते आणि मग तो अलीकडच्या पानांकडे हळूहळू सरकत जातो. कुतुहल अधिक ताणत नाही. तो विभाग म्हणजे अत्यंत बेशिस्तित केलेल्या विविध खरडी आणि आडव्या-तिडव्या रेघोट्या. तिथल्या लेखन-भेळे संबंधी यापूर्वीच स्वतंत्र लेखातून व्यक्त झालेलो आहे.

डायरीतील मजकुरासंबंधी मुद्दामहून वेगळा परिच्छेद लिहिण्याची गरज नाही कारण त्यातल्या बऱ्याचशा गोष्टी इथल्या वाचकांसाठी वेगवेगळ्या विभागांत आधी लिहिलेल्याच आहेत. जे काही लिहिलेलं आहे त्याला अर्थातच व्यक्तिगत आवडीनिवडीच्या मर्यादा आहेत. स्वतःला आवडलेल्या कलाकृतींबद्दल उत्साहाने आणि थोड्या विस्ताराने नोंदले जाते परंतु न आवडलेल्यांची मात्र एक दोन वाक्यात बोळवण करून टाकली जाते. मानवी स्वभाव, दुसरे काय ! इंटरनेटपूर्व काळात दृश्य कलाकृती बघण्याचे प्रमाण बऱ्यापैकी मर्यादित होते आणि त्यामुळेच तेव्हा आवडलेल्या कलाकृतीचे अप्रूप असे. पुढे ओटीटीच्या आगमनानंतर तर दृश्य करमणुकीचा महापूर आला आणि बघण्याचे प्रमाणही वाढले. आताशा असे काही पाहिले की त्याची एका वाक्यातली नोंद सुद्धा पुरेशी वाटू लागली आहे.
या लेखाच्या वाचकाला एक प्रश्न पडू शकतो की, हे डायरीबियरी लेखन आता प्रस्तुत ठरते का? वाचकालाच काय, पण मलाही कधी असे वाटून जाते. या विशेष डायरीप्रारंभाचा काळ (सन 2000) हा माझ्यासाठी तरी संगणकपूर्व होता आणि तेव्हाही आसपासचे काही जण या प्रकारे लिहीत. ‘महत्त्वाच्या आणि काही आवडत्या गोष्टींची कुठेतरी नोंद असलेली चांगलीच’ असाही विचार त्या काळी काही बुजुर्गाकडून बिंबवला जाई. त्याचाही हा परिणाम असेल. वयानुसार स्मरणशक्तीचा आलेख हळूहळू उतरता राहतो. आयुष्याच्या त्या टप्प्यात आपण स्वहस्ते केलेल्या आपल्या भूतकाळातील अशा काही आनंददायक आठवणी आणि नोंदी आपली सुरेख सोबत करतात यात शंका नाही.
**********************************************************************************
एका डायरीचा सुंदर प्रवास.
एका डायरीचा सुंदर प्रवास.
मी उरळीकांचन येथे शिकत असताना दोन वर्ष वसतिगृहात होतो
आमच्या शाळेच्या लायब्ररीत भरपूर पुस्तके होती. आम्ही लायब्ररीतून आणलेले पुस्तक वाचल्यावर त्याची अशीच एक-दोन पानाची नोंद ठेवत असू. या वहीचे नाव होते "आपली वाचन वही".
यात लिहिलेला पुस्तकाचा परिचय आमचे थोरात सर वाचायचे. ते हस्ताक्षर, व्याकरण हे देखील पाहयचे. मला त्यासाठी मिळालेले प्रशस्तीपत्र मी बरेच दिवस जपून ठेवले होते.
मला वाटतं तुमच्या डायरीला "कलादर्पण" हे नाव अगदी योग्य आहे.
अशा डायऱ्या एखाद्या फोटो अल्बम सारख्या वाटतात आणि त्या चाळताना अल्बम मधले जुने फोटो पाहून जे फील येतं तेच इथे येतं. अरे तेव्हा मी असा दिसत होतो? अरे तेव्हा मला हे असं कसं सुचलं वगैरे?
मस्त आहे हे..
मस्त आहे हे..
नुसते आवड असून फायदा नाही. तुमचा उत्साह हौस सगळेच दांडगे आहे.
मी कुठल्याही सोशल मीडियावर अवतरण्यापूर्वी माझ्या लिखाणाची सुरुवात सुद्धा डायरीपासून झाली होती. पण ते माझ्या एका प्रेमप्रकरणाचे दैनंदिन लिखाण होते. ती डायरी फार हिट गेली होती. पण तो किस्सा पुन्हा कधीतरी...
जुने फोटो अल्बम आणि जुने डायरी लिखाण याबाबत दत्तात्रय यांनी जे म्हटले त्याला अनुमोदन !
मी माझी डायरी कविता, स्वतः
मी माझी डायरी कविता, स्वतः च्या/ आवडलेल्या, गाणी, आवडलेले कोट्स लिहिण्या करता वापरायचे. ह्या निमित्ताने आठवण झाली.
सर्वांना धन्यवाद !
सर्वांना धन्यवाद !
आपणा सर्वांच्या आठवणी व अनुभव आवडले.
* "कलादर्पण"
>>> सुंदर नाव ! अगदी . . .
सुंदर प्रवास आहे तुमच्या
सुंदर प्रवास आहे तुमच्या डायरीचा.
मी डायरी लिहिण्याचा प्रयत्न केला काही वेळा प्रयत्न केला. पण जमले नाही.
ऑफिस कामाच्या काही डायऱ्या आहेत जुन्या, त्यातील दोन तीन ठेवल्या आहेत. त्यात एक प्रवासातील खर्चाची डायरी आहे, लॅपटॉप वापरू लागण्यापूर्वीची. त्यात प्रवास खर्च जमा करण्यास केलेल्या नोंदी आहेत कुठे गेलो, कुठे उतरलो, कसा प्रवास केला, वगैरेही त्यात आहे. कधी या डायरी चाळताना मजा येते.
दसांचा प्रतिसादही छान आहे.