आईचा डबा

Posted
1 month ago
शेवटचा प्रतिसाद
1 month ago

आईचा डबा

शाळा भरण्याची घंटा वाजली. मुलं भरभरा वर्गात शिरली. सर्वा बरोबर विन्या सुद्धा वर्गात शिरला. नेहेमीच्या बाकावर बसला. मास्तर वर्गात आले पहिला तास सुरु झाला. विन्या विचार करत होता. हा पहिला गणित तास मग दुसरा मराठी तिसरा समाज शास्त्र.मग मधली सुट्टी. विन्याच्या डोक्यात तास पत्रक घोळत होतं. मधली सुट्टी मधली सुट्टी मधली सुट्टी. त्याच्या मनात विचार आला ही मधली सुट्टी नाहीच झाली तर किती बरं होईल. नकोच ती. एकदम सगळे तास होऊन शाळा सुटली तर किती मस्त होईल. त्याच लक्ष शिकवण्या कडे नव्हतं. दुसरा तास झाला मग तिसरा. सुट्टी ची घंटा झाली. मुलांचा कोंडाळा झाला. विन्या बाकावर डोकं ठेवून शांत पडला. मुलं डबा खात होती. आनंद आणि महेश ने विन्याला विचारलं सुद्धा विन्या आज डबा खात नाहीस का. विन्या म्हणाला नाही रे आज भूकच नाही. इतक्यात मंदार आला. मंदार ला सगळे घाबरत. एक तर तो दांडगट होताच शिवाय त्यातून वर्गाचा मॉनिटर. त्यानं विन्याला विचारलं. विन्या डबा काढ. विन्या दचकून गेला. मंदार दणकट होता आणि त्यामुळे वर्गाचा मॉनिटर सुद्धा आणि त्यात सुद्धा मास्तरांचा आदेश होता. जो डबा आणणार नाही. त्याने घरी जायचं आणि पालकांची चिट्ठी आणायची. उपाशी पोटात शिक्षण डोक्यात शिरत नाही. त्यामुळे त्यांचा तसा नियम होता. मंदार पुन्हा ओरडला. विन्या घाबरून दप्तर लपवू लागला. थोड्यावेळ मंदार आणि विन्याची हिस्साखेची झाली. पण शेवटी विन्याची ताकद कमी पडली. मंदारने दप्तर ताब्यात घेतलं आणि दप्तरा मधून डबा काढला आणि उघडला. डबा रिकामा होता. सगळे जण आश्चर्य कारक रीतीने बघू लागले. मंदार ने दरडावल आता तुझं मास्तरांना नाव सांगतो. विन्या च्या डोळ्यातून पाणी आलं. शेवटी ज्याची भीती होती तेच झालं. विन्या गप्प बसून राहिला.चवथा तास सुरु झाला. मंदारने मास्तरांकडे विन्याची तक्रार केली. मास्तरांनी विन्याला बोलावलं. मास्तर विचारते झाले. विनायक तू डबा आणला नाहीस हे खरं आहे. विन्याच्या डोळ्यातून पुन्हा पाणी आलं. त्याने बटणाशी चाळा सुरु केला. मी मी एवढंचं तो बोलू शकला. तू डबा का आणला नाहीस. मास्तर मला घरी जायचं नाही मला शिकायचं आहे. मास्तर हडबडले. त्यांना विन्याची दया आली. पण नियम त्यांनीच केला होता. इतक्यात त्यांच्या डोक्यात प्रकाश पडला. न्यायदानच काम अन्याय न होताचं झालं पाहिजे. ते म्हणाले. मुलांनो आपल्या नियमानुसार शाळेत जो डबा आणणार नाही त्याने घरी जायचं हा ठराव आहे. आजही त्यात बदल नाही. विन्याने नियमानुसार डबा आणलेला आहे त्यानुसार त्याने नियमाचं पालन केलं आहे. त्याने नियम न मोडल्या मूळे त्याला घरी पाठवंण्याचा प्रश्न उद्धभवत नाही. विन्या जा जागेवर जाऊन बस. सर्व मुलांनी पुस्तक काढा. विन्याचा कानावर विश्वास बसेना. त्याला नवल वाटलं. इतक्या क्षणाच दडपण उतरलं. इतक्या वेळात पहिल्यांदा तो हसला. मास्तरांना सुद्धा योग्य न्याय केल्याचा आनंद झाला. विन्याच अभ्यासात लक्ष लागलं. शाळा सुटल्यावर तो घरी गेला. दुसऱ्या दिवशी पुन्हा शाळा भरली. तिसऱ्या तास संपण्याच्या आधी शिवगण शिपाई आला. विन्या आई तुझा डबा देऊन गेली आहे. विन्यान डबा घेतला. डब्यात छान भाकरी चटणी होती. त्यानं इतर मुला बरोबर डबा खाल्ला. त्याचा डबा इतरांनी सुद्धा चाखला. सगळ्यांना आवडला. महेश म्हणाला सुद्धा. तुझी आई छान जेवण करते रे. विन्याची कॉलर टाईट झाली. त्या दिवसा पासून रोज शिवगण शिपाई डबा घेऊन येतं असे. कधी खिचडी कधी पोळी असा छान डबा असे. मंदार ला सुद्धा डबा खूप आवडे. विन्याच्या निमितत्ताने का होईना मुलं डबे वाटून खाऊ लागली. मातरांना सुद्धा आनंद झाला. त्यांनी केलेला न्याय अगदी योग्य होता. तूझ्या आईला कसं जमत रे इतकं छान डबा करायला. विन्याच्या बाकावर बाजूला बसलेला सुशील विचारत होता. सांगू की नाही असा विचार त्याचा मनात आला. अरे सुशील फक्त तुला सांगतो. शपथ आहे तुला. मला कीनाई आईच नाही. इतक्यात चौथा तास सुरु झाला मास्तर वर्गात आले. मुलांनो पुस्तक काढा. सुशील चमकून एक वेळ मास्तरा कडे आणि एक वेळ विन्याकडे बघत राहिला. त्या दिवशी त्याला विन्याच्या डब्यात खूप खूप आईच प्रेम भरून राहिल्या सारखं वाटलं

केदार अंनत साखरदांडे

विषय: 
प्रकार: 

छान मस्त आहे कथा. आवडली. अजून येऊ द्या.
संवाद अवतरनात लिहिले आणि परिच्छेद पाडले तर वाचायला अजून मजा येईल. सध्या निबंधासारखे वाटते आहे.

मस्त!
मला आचर्य अत्रे ह्यांची "आईचे बिल" ही कथा आठवली. अगदी त्या धाटणीची आहे.
नाही मला शेवट काय होणार ह्याची अजिबात कल्पना आली नव्हती. इटुकली पिटुकली गोष्ट खूप काही सांगून गेली.

धन्यवाद

माझी ही कथा 'तुजी यत्ता कंची? " या पुस्तकातील आहे

या पुस्तकाला नुकताच अखिल भारतीय मराठी प्रकाशक मंडळ उत्कृष्ट ग्रंथानिर्मिती बाल साहित्य उत्तेजनार्थ पुरस्कार मिळाला