आनंद यात्रा
म्हणणारे बापुडे म्हणोत, “एक धागा सुखाचा, शंभर धागे दु:खाचे” पण या सत्तराहून अधिक वर्षांच्या प्रवासात मला असे अनेक सुंदर आणि आनंददायक धागे मिळालेत की या प्रवासास आनंद यात्रा म्हणायला हरकत नाही. आणि हो! काही दु:खद धागे देखील कालांतराने विव्हल पण चिरंतन सुखावणार्या आठवणीत बदलतात. म्हणूनच सुसान केन ही “बिटर स्वीट" या बेस्ट सेलर पुस्तकाची लेखिका आपल्याला “व्हाय वुई लाइक सॅड सॉन्ग्ज” याबद्दल सांगते. ती म्हणते "दुःखी संगीत आपल्याला आठवण करून देते की आपण आपल्या दुःखात एकटे नाही आहोत. ते कलाकार आणि इतर श्रोत्यांशी एकतेची आणि जोडलेपणाची खोल भावना निर्माण करते, ज्यामुळे वैयक्तिक दुःखाचे रूपांतर एका सामायिक मानवी अनुभवात आणि चिरंतन सुखद आठवणींत होते."
जीवनावर सदोदित प्रेम करणारे, सदा नव्या वाटा शोधणारे माझे एक ज्येष्ठ काका म्हणायचे, “ माणसाला कंटाळा येतोच कसा?” आयुष्यात इतक्या व्यक्ती, इतक्या, प्रकृती, निसर्गाच्या अगणित छटा, आभाळाचे इतके निळे आणि वृक्ष वनराईंचे इतके हिरवे रंग, रागांचे इतके प्रकार, गाण्याच्या इतक्या मुरक्या अन लकेरी, परंपरा, प्रकार, जणू आपल्यासाठीच गात असलेले जगभरातील इतके दिग्गज गायक, साहित्याचे इतके अपार वैविध्य, नृत्याचे इतके लालित्य आपल्याभोवती पिंगा घालत असताना यातून अलिप्त राहून केवळ डिजिटल पडद्यासमोर कालापव्यय करून मग व्यथित अन दु:खी असण्यात काय अर्थ आहे!!
आणि काही अंशी याची सुखद प्रचिती आणि वर्षानुवर्षे सुखद अनुभव आल्यामुळे आम्हा उभयतांच्या जीवनाचे वस्त्र मात्र अगणित सुखाच्या धाग्यांनी विणले आहे, त्या अज्ञात शक्तीने विणलेल्या त्या वस्त्राची ऊब नेहमीच आश्वासक वाटली आहे.
तर अशाच एका सुंदर आनंद पर्वातील ती एक संध्याकाळ होती. घटना बहुतेक २४ एक वर्षांपूर्वीची असेल.
माझी मुलगी अनुजा- ’अनु’ तेव्हा शाळेच्या शेवटच्या वर्षात होती. तिच्या शाळेचे मला खूप कौतुक होते. मुलांच्या सूप्त गुणांचे अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात कसे कौतुक करायचे, त्यांच्या मनात कलागुणांची ओढ कशी निर्माण करायची याचा त्यांनी ध्यास घेतला होता. त्यांच्या विविध आवडींचे सृजनात कसे परिवर्तन करायचे हे त्यांनी आत्मसात केले होते.
नॉयडा-दिल्लीतील ऑक्टोबरची एक आल्हाददायक सायंकाळ. उत्तर भारतातील असह्य उकाड्याचे परिवर्तन आता गोड थंडीत झाले होते. हवा आता माणसात येऊ लागली होती आणि एकदा ती माणसात आली की माणसे सुध्दा माणसात येऊ लागतात. उष्म्याने कावलेल्या जीवांना आता साहित्य, संगीत, नृत्यादि विरंगुळ्यांचा शोध लागतो. नाटक, कविसंमेलने, गाण्याच्या बैठका आणि त्याचबरोबर कलेचे इतर कार्यक्रम वारंवार सादर होऊ लागतात. या कार्यक्रमांना नववसनधारी नवयुवक व नवयुवती तसेच न-युवकयुवती देखील उत्साहाने भाग घेतात आणि मग नवनवलनयनोत्सव सुरू होतो, शिणलेले नेत्र जरा ताजेतवाने होतात. थोडक्यात काय तर शरदातील आनंदयात्रेस प्रारंभ होतो. या कार्यक्रमांना प्रदेश, देश, प्रथा किंवा भाषांचे बंधन नसते.
८ ऑक्टोबरला अनुच्या शाळेत पाश्चात्य संगीत सादरीकरणाची स्पर्धा होती. मला कोणतेही संगीत आवडते. पाश्चात्य संगीतातील कॉन्चर्टॊ, कॉयर, कंट्री, पॉप, ब्लुज, असे अनेक प्रकार मला आवडतात. कुणी कोणत्या नावाचा प्रकार गायलाय यापेक्षा ते किती छान गायलंय अन हृदयाला भिडतय आणि वर्षानुवर्षं कानात रुंजी आलतंय हे मला उमजतं.. मग मुली गाताना माझी उत्स्फूर्त दाद ऐकून माझी ’टांग खेचतात” ( इतकाच धडपडून पाडणारा वाक्प्रचार मराठीत असल्यास तज्ञांनी मला कळवावे!) मायकल जॅक्सन, एल्टन जॉन, क्लिफ रिचर्ड्स इ. मंडळी त्या काळच्या टोनी ब्लेयर किंवा बिल क्लिंटन यांच्या देशाचे नागरिक आहेत एवढीच त्यांची व्यक्तीगत माहिती मला असते. पुढे त्यांच्या स्वरावरून त्यांना ओळखणे हे मला मॉडर्न आर्ट पाहून हा छायावाद आहे हे म्हणणे आणि मग ते एम एफ हुसेनचे आहे हे ओळखणे या इतकेच अगम्य आहे.
असो.
संध्याकाळी ६.१५ वाजता फॅक्टरीतून धावपळ करत, धापा टाकत कसाबसा अनुच्या शाळेत पोहोचलो. प्रसन्न वदनाने, निरागस स्मिताने आणि दुर्दम्य उत्साहाने किशोर वयीन मुलामुलींनी आम्हा उभयतांचे स्वागत केले. हिच्या हातात त्यांच्याइतक्याच टवटवीत गुलाबाचे सुंदर फूल भेट केले. नुकतीच मिसरूड फुटलेली तरुण मंडळी त्या वयात जे करणे अगदी सहजसुलभ असते ते सर्वकाही आजूबाजूस असलेल्या फुलांचे ताटवे पहात चोरटे कटाक्ष टाकत छाप पाडण्याचे प्रयत्न करत होती. पण वाखाणण्याजोगी होते मर्यादापालन आणि शिस्त. बरोबरच आखीव काटेकोरपणा.
एका रुबाबदार किशोरवयीन तरुणवजा मुलाने आम्हाला आदर आणि आदबीने आम्हाला स्थानापन्न केले. पुढच्या ओळीत अनुच्या शाळेच्या प्रधानाचार्या बसल्या होत्या. त्यांच्या संपूर्ण व्यक्तीमत्त्वास विसंगत शब्द असेल तर तो होता प्रधानाचार्या. अत्यंत उत्तम अभिरुचीची धारण केलेली फुलाफुलांची नायलॉनची साडी, स्लीवलेस ब्लाऊझ, डोळ्यावर बिना फ्रेमच्या सोनेरी काड्यांचा चष्मा, गळ्यात शुभ्र हैदराबादी मोत्यांची एकच रुबाबदार माळ, हलकीशी लिप्स्टिक. एकंदरीत गेट अप आणि बेअरिंग छाप पाडणारे. आमच्या कालातील ऋषीतुल्य मुख्याध्यापिका बाईंच्या साजेशा पेहरावाच्या तुलनेत हा रुबाब वेगळाच होता. परंतु गत २ वर्षांच्या माझ्या संपर्कामुळे त्या देखील तितक्याच विद्वान आहेत याची मला प्रचिती आली होती. लुक्स आर समटाइम डिसेप्टिव्ह. त्या शिक्षण क्षेत्रास पूर्णत: समर्पित असल्याची त्यांची ख्याती होती. शिक्षण क्षेत्रात मुलांच्या कलागुणांना जोपासण्यासाठी, त्यांच्या सर्वांगिण विकासासाठी जे काही शाळेत करायला माहिजे ते सर्व त्यांच्या नेतृत्वाखाली प्रत्यक्षात घडत होते. व त्या मुळे समरव्हिल या शाळेचे नाव आघाडीवर होते. त्यांच्या नेतृत्वाखाली त्या मुलांना भावी जीवनाचा सामना करण्यास आणि त्यातून आनंदाचे क्षण वेचत यशस्वी होण्यासाठी मुलांना पाश्चात्य व भारतीय संगीत, नाटक, विज्ञानाचे प्रकल्प, प्रमुख मुख्यपत्रांच्या संपादकांशी हितगुज अशा अनेक उपक्रमात भाग घेण्यास उद्युक्त करत. किंबहुना जवळ जवळ प्रत्येक विद्यार्थी व विद्यार्थिनी अशा कोणत्यातरी उपक्रमात सहभागी असत.
कार्यक्रमाची सुरुवात एका युवकाने तो कार्यक्रम त्याच वर्षी ११ सप्टेंबरला आतंकी हल्ल्यात प्राण गमावलेल्या निष्पाप नागरिकांप्रतो श्रध्दांजली देऊन केली. पाश्चात्य संगीत संध्येचे नाव होते : “सिंकोपेशन- Syncopation”. भाग घेणार्यांचे चार गट होते. पाश्चात्य संगीताचा कार्यक्रम असल्याने त्यांची नावे जॉन (डेनेवर), एल्टर (जॉन), क्लिफ (रिचर्ड्स) आणि रॉजर (व्हीटेकर) या गायकांची होती. प्रत्येक गटाने वैयक्तिक सोलो, इन्स्ट्रुमेंटल आणि समूह अशा प्रकारात गायचे होते आणि ही स्पर्धा होती.
पूर्ण हॉल खचाखच भरून गेला होता. शुभ्र गणवेषात बसलेली मुले आपापल्या गटाचे मनोबल टाळ्या आणि प्रोत्साहनात्मक प्रतिसाद देत, स्वत: त्यांच्या सोबत गात अत्यंत सुरेलपणे वाढवत होती. वातावरण चैतन्यमय आणि इलेक्ट्रिक होते. त्याच बरोबर मुलांचा सराव घरी देखील आवडीने आणि लक्षपूर्वक ऐकणारे आम्ही व आमच्यासारखे पालक देखील वयाची मर्यादा न जाणवू देता, पोक्तपणाची बंधने टाकून तल्लीनतेने प्रतिसाद देत होते. जे घरी ऐकू शकले नव्हते ते टाळ्यांनी आणि क्वचित शिट्यांनी देखील उत्साहात भर घालत होते.
गाणारी मुले, कधीकधी चुकलेल्या नोट्सवर थोडीशी चावलेली जीभ, उत्तमपणे फेकलेल्या लेकेरीवर संचलन करत असलेल्या टेसी टीचरचे उत्स्फूर्त कौतुकास्पद मान डोलावून स्मित, शब्दांना त्यांच्या भावना जाणत गोंजारत गायलेल्या स्वरांचे स्वच्छंद प्रदर्शन... ॲबा, कार्पेंटर्स, फ्रॅन्क सिनाट्रा पासून बॉयझोन, सिलियन डियॉन, रॉनन कीटिंग यांच्या आणि फ्यू डॉलर्स मोअर, चॅरियट्स ऑफ फायर यासारख्या कालातीत प्रसिध्द रचना.. ओळखीची आणि ओळख नसलेली पण सुरेल सादर केलेली, उत्कृष्ट टीमवर्कमधून सादर केलेली गाणी... आनंदच आनंद होता... मुक्त उधळण... गरज होती फक्त आपले मन, विचार आणि कान उघडे ठेवायची. मुलं गाताना उजव्या पायावरून डाव्या पायावर डावीकडून उजवीकडे झुलायची. हिंदीत झुम रही थी। आम्हा सर्वांना त्यांनी सामिल करून घेतले होते. एककंठाने एक स्वराने यौवनाचा जयघोष करत होती आणि या यात्रेत त्यांनी आम्हाला नकळत सामिल करून घेतले होते. ती आपल्या स्वरात, जल्लोषात, त्यांच्या ड्रमसच्या पडघमात ती हरपून गेली होती.प्रणयाराधनाचे शब्द असलेल्या गाण्यात आपल्या वयास अनुरूप भावना त्यांच्या चेहर्यावर हळूवार दिसत होत्या. त्यांच्या तारुण्याची ती नांदी होती. चाळीशीच्या पुढच्या पालकांना त्यांनी अनुभवलेल्या वुडस्टॉक अन ॲबा चे दिवस याद येत होते. विशेषत: फ्रॅन्क सिनाट्राच्या त्यांनी “माय वे” मधील गायलेल्या ओळी वेगळ्याच विश्वात घेऊन.
माझ्यासारख्या स्वच्छंदपणे आयुष्य जगलेल्यासाठी तर ’माय वे’ खूप अर्थपूर्ण होते. मुले त्या ओळी गात होती अन माझ्यासमोर माझ्या जीवनाचा पट डोळ्यासमोरून झरझर सरकत होता.
आणि म्हणूनच मी म्हणालो होतो “एक धागा सुखाचा आणि अनंत धागे देखील सुखाचे”
आता दैनंदिन जीवनातील तोच तो पणा, कंटाळा, चिंता त्या काही तासांसाठी दूर पळून गेल्या होत्या. त्या युवकयुवतींच्या आणि उत्साही शिक्षकवृंदांच्या सान्निध्यात सर्वच जण तरुण झाले होते, तरुणाईचा, चैतन्याचा सकारात्मकतेचा जयजयकार करत होते.’
आयुष्यातील साध्या घटना किती निकोप आनंदाचे आणि सुंदर अनुभवाचे आनंदनिधान बनतात याची प्रचिती अजाणता सर्वांना आली होती. इथे भाषेचे बंधन नव्हते. मुलांना कलाजगतातील सौंदर्याचा अन निरागस आनंदाचा ठेवा मुक्त करण्याच्या ध्येयाने प्रेरित त्या प्राधानाचार्या मिसेस टेसला, संगीत शिक्षिका टेस्सी मॅम, त्या मुलांच्या संस्कारक्षम वयात त्यांच्या पुढील आयुष्यात चिरंतन दरवळ देणारे एक चंदनाचे रोपटे लावतात, त्यांची आणि संवेदनशील परंतु काही काळ शिणलेल्या मनांना दिलासा देत, आनंदाची खरी व्याख्या काय आहेत याची आठवण करून देतात. मुलांतील सत्य, शिव आणि सुंदराचे सृजन करतात. या बरोबर तो शिक्षकवृंद स्वत:ची आयुष्ये देखील त्या समर्पण भावनेतून तेवढीच समृध्द करतात. त्यांच्या व्यावसायिक कारकीर्दीच्या निवृत्तीपश्चात त्या सिंहावलोकन करतील तेव्हा त्यांच्या कडे कृतज्ञतेने पाहत असलेली असंख्य सूर्यफुले, असंख्य हसरे, गाणारे चेहरे त्यांना सुखावतील. आणि एकस्वराने त्यांचा जयजयकार करतील.
आणि म्हणूनच जेआरडी टाटांनी म्हटले आहे-
“ मला भारत केवळ एक आर्थिक महासत्ता म्हणून नको आहे, तर मला भारत एक सुखी देश बनवायचा आहे. समाजाचा बौद्धिक, मानसिक आणि भावनिक विकास हा कला, संगीत आणि नाटकाशिवाय अपूर्ण आहे. त्यामुळे मानवी जीवनात आनंद निर्माण करण्यासाठी समाजात कलेला सर्वोच्च स्थान असणे गरजेचे आहे.”
प्रत्येक भारतीयाने असा समाज निर्माण करण्याचा प्रयत्न केला तर किती निरोगी देश बनेल नाही का?
-इति
वा! आणखी एक सुंदर लेख रेव्यु!
वा! आणखी एक सुंदर लेख रेव्यु! प्रस्तावना, प्रधानाचार्यांची ओळख कार्यक्रमाचे वर्णन आणि त्याची अनुभूती, समारोप आणि इतरही सगळेच फार छान आणि उत्स्फूर्तपणे लिहिले आहे. तुमच्या आतापर्यंतच्या आनंदयात्रेबद्दल अभिनंदन आणि पुढील आनंदयात्रेसाठी शुभेच्छा
फारच सुंदर लिहिले आहे.
फारच सुंदर लिहिले आहे.
सुंदर!
सुंदर!
फार सुंदर लेख! आवडला.
फार सुंदर लेख! आवडला.
पुलंचे अशा कार्यक्रमांचा आस्वाद घेणारे लेख आहेत त्यांची आठवण झाली. आधुनिकता आणि पुढच्या पिढीच्या वागण्याबद्दल एक उमदा दृष्टिकोन त्यांच्या तशा लेखांत दिसतो, तो इथेही दिसला.
फारेंड खूप मोठी प्रशंसा केलीत
फारेंड खूप मोठी प्रशंसा केलीत
सर्वांचे मनपूर्वक आभार
फार छान लिहिल आहे.
फार छान लिहिल आहे.
तुमचा सकारात्मक दृष्टिकोन आवडला.
शुभेच्छा!!!
लेख आवडला .
लेख आवडला .
झ का स ! आवडले.
झ का स !
आवडले.
किती सुंदर लिहीले आहे. माय वे
किती सुंदर लिहीले आहे. माय वे गाणे माहीत नव्हते. खूप सुंदर आहे.
सामो
सामो
या गाण्याने अनेक जीवनांना प्रेरणा दिली आहे.... लिजंडरी आहे ते
खूssssप आवडलं!
खूssssप आवडलं!
Thank you
Thank you