शातिर दुनिया vs आम आदमी!

Submitted by ऋन्मेऽऽष on 16 May, 2026 - 20:28

राघव चड्डा!

मी माझ्या आयुष्यात हे नाव कधीच विसरणार नाही.

हे नाव माझ्या कानावर आले ते काही महिन्यांपूर्वीच. कारण मी राजकारणात फार रस घेणारा माणूस नाही. आजकालच्या राजकारणात तर बिलकुल नाही. सगळेच चोर आहेत आणि सगळीच नकारात्मकता भरली आहे असे वाटते. राजकीय घडामोडी आणि बातम्यांपासून दूर राहिलो तर आपले आयुष्य आनंदी राहील असा माझा समज आहे.

नाही म्हणायला परिणीती चोप्रा या अभिनेत्रीने एका राजकीय नेत्यासोबत लग्न केले हे मागे कानावर आलेले. पण तेव्हाही तो कोण हे बघायला गेलो नव्हतो. कारण फिल्मी तारकांच्या वैयक्तिक आयुष्यात आणि पेज थ्री गॉसिपमध्येही फार रस नाही.

पण निवडणुका जवळ आल्या की यंदा कोणाला मत द्यायचे याचा शोध घ्यायला सुरुवात करतो. कारण माझे मत कुठल्या एका ठराविक पक्षाला वाहिलेले नाही. फार विचार न करता जी निशाणी ठरली आहे तिच्यावरच वर्षानुवर्षे शिक्का मारा असे करायचे नसते. घरचे ज्या पक्षाला मत द्यायचे त्या पक्षाला मी माझे पहिले मत दिले होते. पण त्यानंतर मात्र आतापर्यंत वेगवेगळ्या तब्बल ७ पक्षांना मत दिले आहे. ज्यात एकदा एका अपक्ष नगरसेवक उमेदवाराला सुद्धा त्याच्या चांगल्या कामाची माहिती घेऊन मत दिले होते. तर एकदा आप पक्ष नवीनच असताना त्यांचा उमेदवार काही महाराष्ट्रात जिंकणार नाही आणि माझे मत वायाच जाणार याची कल्पना असूनही मत दिले होते. इतकेच नाही तर माझे नोटा सुद्धा दाबून झाले आहे जे वरच्या ७ पक्षात मोजले नाहीये.

थोडक्यात मला राजकारण या विषयातली समज असो किंवा नसो, पण माझी निष्ठा मी कधी कुठल्या एका पक्षाला अर्पण केली नसल्याने नेहमी माझ्याच्याने शहराचा, राज्याचा, देशाचा विचार आपसूकच पहिला केला जातो.
(एका ठराविक पक्षाला निष्ठा वाहिलेल्यांना देशाची पडली नसते असे म्हणायचे नाहीये. फक्त त्यांना आपलाच पक्ष देशाचे जास्त भले करेल असे कायम वाटत असते इतकेच)

असो, तर हे सगळे सांगायचा मुद्दा हा, की हल्ली फेसबुक किंवा इंस्टाग्राम रीलचा जमाना आहे. त्यावर जे कोणी देशाबद्दल आणि लोकांच्या समस्यांबद्दल पोटतिडकीने बोलताना दिसते त्याला माझ्याकडून चटकन फॉलो केले जाते. मग तो कोणत्याही पक्षाचा का असेना. हा राघव चड्डा देखील मला तिथेच भेटला.

म्हटले तर त्याने मांडलेल्या समस्या छोट्या होत्या पण दैनंदिन जीवनाशी निगडीत असायच्या. मोबाईल रिचार्ज पासून, शाळा-कॉलेज आणि शिक्षणसंस्था, अन्नभेसळ, मेडिकल इन्शुरन्स, हॉस्पिटल आणि आरोग्य संस्था, GST आणि इन्कम टॅक्स, बँकिंग क्षेत्र अश्या विविध क्षेत्रातील समस्यांवर तो संसदेत आवाज उठवायचा. तिथे उपस्थित नेत्यांच्या शिक्षण पात्रतेवर सुद्धा प्रश्नचिन्ह उपस्थित करायचा.

मुळात पहिल्यांदा कोणीतरी असा नेता मी बघत होतो जो जातीपातीचे राजकारण, धार्मिक ध्रुवीकरण, ढोंगी सेक्युलरगिरी, आपल्या विरोधी पक्षांवर चिखलफेक करा, असले राजकारण न करता केवळ जनहिताचे मुद्दे मांडत होता. त्यात त्याच्या नावासमोर यंगेस्ट मेंबर ऑफ पार्लमेंटचा टॅग आणि उच्चशिक्षणाच्या पदव्या होत्या. माझ्यासारख्या सर्वसामान्य माणसाला इंप्रेस व्हायला हे पुरेसे होते.

त्याचे व्हिडिओ मी बघू लागलो. त्याखालचे कॉमेंट वाचू लागलो. लोकं त्यात भावी पंतप्रधान शोधत होते. संसदेत त्याच्यासारख्या सुशिक्षित आणि युवा नेत्यांची किती गरज आहे असाच सर्वांचा सूर होता. मी त्याचे व्हिडिओ माझ्या मित्रांच्या व्हाट्सअप ग्रुप वर शेअर करू लागलो. तिथे जी राजकीय मंडळी आपापसात वाद घालायची ती प्रामुख्याने सेना-भाजप-काँग्रेस-राष्ट्रवादी या चार पक्षांची होती. त्यामुळे त्यातले कोणीही या आम आदमी पार्टीच्या नेत्याबद्दल आस्था बाळगून नव्हते. त्यामुळे त्याची आणि त्याचे रील शेअर करणाऱ्या माझी अशी दोघांची खिल्लीच उडवली जायची. पण तुमच्या मोठमोठ्या भ्रष्ट नेत्यांपेक्षा हा छोटा पण प्रामाणिक नेता कधीही चांगलाच असा स्टँड घेऊन मी नेहमी त्यांना भिडत राहायचो.

आणि मग तो दिवस उजाडला!

जेव्हा आम आदमी पार्टीने राघव चड्डाला संसदेत बोलायला मनाई केली. हा माझ्यासाठी एक मोठा धक्का होता. कारण आम आदमी पार्टी मला आधीपासून इतर भ्रष्ट पार्ट्यापेक्षा वेगळी वाटत आली होती.
(हे पडताळण्यासाठी माझा हा धागा बघू शकता.
द पॉवर ऑफ `आम' मतदार
https://www.maayboli.com/node/52648 )

तसेच नुकतेच त्यांच्याबद्दलचा आदर आणखी वाढला होता. कारण जिथे एकीकडे भाजपने ईडी सीबीआय मागे लावताच देशभरातले सारे भ्रष्ट नेते त्यांना शरण जात आपले गुन्हे माफ करून घेत होते तिथे आम आदमी पार्टीचे मुख्यमंत्री श्री अरविंद केजरीवालसह सारे प्रमुख नेते भाजप समोर न झुकता त्यांना भिडले होते आणि खोट्या आरोपाखाली जेलमध्ये जाऊन आले होते. त्यातून नुकतेच निर्दोष सुटले होते.

अश्या पार्टीने आपल्याच एका प्रामाणिक नेत्याची अशी गळेचेपी करावी हे काही पटत नव्हते. काही लॉजिक लागत नव्हते. काहीतरी समजून घेण्यात चुकत होते.

माझ्या व्हॉट्सॲप ग्रूपवरील सर्वच राजकीय पक्षांचे समर्थक मित्र माझ्यावर तुटून पडले. मला चिडवू लागले. रोस्ट करू लागले. राघव चड्डाची लोकप्रियता वाढली म्हणून आम आदमी पार्टीनेच त्याचा पत्ता कसा कट केला बघ म्हणून माझी खिल्ली उडवू लागले.

त्याचवेळी या प्रकरणावर अजून काही रील माझ्या बघण्यात आल्या. त्यात अशी थिअरी मांडली होती की राघव चड्डा हा भाजप पुरस्कृत उमेदवारच होता. त्याची कारणमीमांसा साधारण अशी केली होती -

१) म्हणून तो कधीच मोठमोठ्या समस्यांवर भाजपला कोंडीत पकडायचा नाही किंवा भाजपवर जहरी टीका करायचा नाही.

२) म्हणून इतर आप नेत्यांप्रमाणे त्याच्या मागे कधी ईडी सीबीआय लागली नाही.

३) म्हणून त्याने कधी अरविंद केजरीवाल आणि इतर जेलमध्ये गेलेल्या आप नेत्यांच्या बाजूने कधी संसदेत आवाज उठवला नाही आणि इतर गोष्टींवर बोलण्यातच धन्यता मानली.

४) म्हणून आप नेते अडचणीत असताना तो मस्त परदेशात जाऊन लपला होता.

५) म्हणून त्याला भाजपतर्फे कुठली आडकाठी व्हायची नाही आणि कुठलाही गोंधळ न होता संसदेत बोलायला मुबलक वेळ दिला जायचा आणि त्याच्या काही छोट्यामोठ्या मागण्या सरकारतर्फे मान्य सुद्धा झाल्या.

६) म्हणून त्याच्या रील आपल्याला वारंवार नजरेस पडायच्या. त्यावर प्रतिक्रिया देणारे लोक त्याला थेट पंतप्रधानपदाचा उमेदवार म्हणत असून सुद्धा त्याचे व्हिडिओ वायरल व्हायचे. भाजपने त्यांचा प्रसार रोखला नाही.

अजूनही कैक आणि सविस्तर मुद्दे होते. पण अशा व्हिडिओंचे कसे असते, ज्याने बनवले असतील त्याचीच बाजू नेहमी योग्य वाटते. म्हणून मी घाईत कुठलाही निष्कर्ष न काढता, काही दिवस मला चिडवणाऱ्यांना कुठलेही उत्तर न देता, वेट अँड वॉच अशी भूमिका घेतली.

आणि मग पुन्हा ती बातमी कानावर धडकली!

जी कुठेतरी आतून मनाने स्वीकारलीच असल्याने फार धक्का बसला नाही.

राघव चड्डाने आपल्यासारखे अजून काही आप नेते गोळा करून रीतसर भाजपमध्ये प्रवेश केला होता.

भाजप आणि मोदींविरोधात आधी जे काही थोडेफार टीकेचे व्हिडिओ होते ज्यात त्याने त्यांना गुंडापार्टी म्हटले होते ते पद्धतशीरपणे उडवण्यात आले होते.
या सगळ्या प्रकरणात मी पुन्हा एकदा आमच्या ग्रूपवर बावळट ठरलो होतो.

पण तो ज्या भाजपमध्ये गेला त्याचे आमच्या ग्रुपवरचे समर्थक जे इतके दिवस त्याला 'फ्रॉड माणूस' म्हणत शिव्या घालत होते त्यांना मात्र या एकूणच प्रकरणात आपण जिंकल्याचा आनंद कसा झाला हे मात्र माझ्यासाठी अनाकलनीय होते.

असो, पण तरीही मी हरलो आणि तुम्ही जिंकलात असे म्हणून, तसेच राजकारणात मी कच्चा लिंबूच आहे हे प्रांजळपणे मान्य करून मी तो विषय संपवला. पण मला हा धडा देणाऱ्या राघव चड्डाचे नाव मात्र मी आयुष्यात कधी विसरणार नाही Happy

== == == == == == == ==

तुमचे कोणाचे या शातिर दुनियेत असे गरीब गाय, गधा, पोपट, उल्लू मोमेंट असतील तर वाचायला आवडतील Happy

धन्यवाद,
ऋन्मेष

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

उशीरा माहीत झाला कारण तेव्हा माहीत व्हावा म्हणून आपल्या फीडमध्ये सतत आणला गेला. असे वाटते आपले सारे तात्कालिक विचार कंट्रोल केले जातात. म्हणून पडूच नये आता या सगळ्यात. पण आपण ज्या समाजात देशात राहतो त्याबद्दल काळजी न करता जगायचे तरी कसे..

राजकारणातलं काही क्ळत नाही. नावं तर अजिबात माहिती नाहीत.
त्यामुळं पहिल्या सतरा ओळीनंतर मग कॉण्ट्राडिक्ट करतो.

बरेच भोळे लोक केजरीवाल यांच्या भावनिक बोलण्याला भुलून भ्रष्टाचार मुक्त भारत सारख्या आंदोलनात मानसिकदृष्ट्या सहभागी झाले होते.

मी कधीही राजकारणात उतरणार नाही कोणतीही निवडणूक लढणार नाही कोणतेही पद घेणार नाही सरकारी सुविधांचा वापर करणार नाही सारख्या सवंग लोकप्रिय भाषणाला भुलून आम ते आदमी पक्षाचे प्रतोद झाले होते.

पुढे केजरीवाल यांनी त्या चळवळीतील आपल्या सर्व साथीदारांना पद्धतशीरपणे बाजूला काढले तरी लोकांचे डोळे उघडले नव्हते.

फुकट वीज पाणी मिळवणे हा तुमचा हक्क कसा आहे हे फार साखरपेरणी करून त्यांनी लोकांना भुलवले.

केजरीवाल यांनि राघव चड्ढा सारख्या अनेक तरुण उच्च शिक्षित आकर्षक व्यक्तिमत्व असणाऱया तरुणांना भुलवून आपल्या कच्छपी लावले होते.

त्यांनी निवडणूक लढवली, मुख्यमंत्रीही झाले पुढे पंतप्रधानपदाची स्वप्नेही पाहिली सर्व सरकारी सुविधांचा लाभ घेतला. भरपूर भ्रष्टाचार केला

याचा कळस झाला तो त्यांच्या शिशमहाल बांधण्यात.

तोवर लोकांचा भ्रमनिरास झाला होता. यामुळे निवडणुकीत जोरदार पराभव पत्करावा लागला.

त्यांच्याकडून फसवले गेलेले असे भरपूर लोक भारतात आहेत.

रात ने क्या क्या ख्वाब दिखाये!

रंग भरे सौ जाल बिछाये

आँखे खुली तो सपने टूटे

रह गये गम के काले साये

चालायचंच.

सुबोध खरे, नोटेड!

कोणी खरेच देशहिताचा विचार करणारा राजकारणी नेता आहे हा विचार भाबडा झाला. त्यांच्या स्वतःच्या स्वार्थाचा विचार चुकून आपल्या हिताच्या मार्गाला येऊन मिळाला तरच तेवढ्या काळापुरता नशिबाने आपले भले होते!

देश चालवायला हुशार राजकारणी निवडावे तर ते आपली चलाखी वापरून आपल्यालाच फसवणार. आणि बावळट निवडावेत तर ते स्वतःच्या बावळपटणाने देशाचे वाटोळे करतील.

अधिक चांगलं काम करायच्या तळमळीने निवडणूक जिंकून सत्तेत यावं, ही लोकशाहीची खरी प्रेरणा; आता, केवळ सत्तेत येण्यापुरतीच चांगल्या कामांची खरी खोटी यादी व वचनं वापरणं, हाच रूढार्थ झालेला आहे ! अजूनही याला अपवाद असलेलेही कांहीं नेते आहेत पण ते प्रभावशाली होवूच शकत नाहीत !!!
*त्याबद्दल काळजी न करता जगायचे तरी कसे..* +१

खरेसाहेब सहमत.

मला आधी वाटायचे शिकलेले लोक राजकारणात उतरले तर चित्र बदलेल. केजरीवालने तो भ्रम दुर् केला. Sad

केजरीवालाला लोक तात्कालिक भुलले तरी दिल्ली व पंजाब खुप लहान आहे त्यामुळे त्याला तिथे सत्ता मिळाली. इतरत्र तितके लोक तो उभे करु शकला नाही.

या पार्श्वभुमीवर तमिलनाडुच्या विजय जोसेफचे आश्चर्य वाटते. राजकारणाची काहीच पुर्वपिठिका नसताना एका वर्षात एवढ्या मोठ्या प्रांतात त्याला सर्वत्र उमेदवार उभे करता आले व ते सगळे निवडुनही आले. सगळे फुकट मिळणार या घोषणेचा इतका फायदा होईल असे वाटत नाही. केजरीवालला एकतर सत्ता मिळवण्यासाठी भरपुर पापड लाटावे लागले आणि नंतर विज व पाणी फुकट देऊनही हरला..

केजरीवाल हे केवळ दिल्ली वर डोळा ठेवून नव्हते तर देशाच्या पंतप्रधानपदी जाण्याची मनीषा बाळगून उतरलेले होते.

त्यासाठी त्यांनी फार धूर्तपणे खेळी केली होती.

आपणच सर्वात इमानदार आणि प्रामाणिक आहोत आणि बाकी सगळे राजकारणी भ्रष्ट आणि हरामखोर आहेत असा आव आणला होता.

विजय जोसेफ यांना आपली कुवत माहिती आहे.ते तामिळनाडू च्या बाहेर काही करिष्मा ठेवून नाहीत.

केजरीवाल म्हणुनच जास्त धोकादायक होते

<<<< अजूनही याला अपवाद असलेलेही कांहीं नेते आहेत पण ते प्रभावशाली होवूच शकत नाहीत !!!
>>>>

हेच खरे दुखणे आहे भाऊ!
चांगल्या नेत्यांचा आता टिकाव लागणे मुश्कील आहे.

जे भ्रष्ट आहेत तेच एकत्र येत टिकून राहतात. सत्ता मिळवतात. जे भ्रष्ट व्हायला नकार देतात ते जेल मध्ये तरी जातात नाहीतर सत्तेच्या अथवा थेट सिस्टीमच्या बाहेर फेकले जातात.

मध्यंतरी कुठल्यातरी निवडणुकीचा निकाल लागला. कोणीतरी म्हटले एक गुंडाराज खतम.. मी मनातल्या मनात म्हटले हो, आणि दुसरे गुंडाराज सुरू!

हल्ली सोशल मीडियावर देखील राजकीय पक्षांचे समर्थक एकमेकांशी भांडताना बघतो ते आपण काय चांगले काम केले हे सांगत नसतात तर आमच्या नेत्यांपेक्षा जास्त शेण तुमच्या नेत्यांनी खाल्ले आहे हे दाखवायची चढाओढ लागली असते. आणि ते बघताना सामान्य नागरिक म्हणून चिंता वाटते की आता आपल्याला यातून देशाचे कमी वाटोळे कोण करेल हे निवडायचे आहे..

>>>>>जास्त शेण तुमच्या नेत्यांनी खाल्ले आहे
हे असले वाक्प्रचार वापरत जाऊ नका हो.
पूर्वी ते डीजे का कोण तेही राजकारण धाग्यावरती फार म्हणजे अति घाणेरडे वाक्प्रचार वापरत. म्हणुनच ते (राजकारणाचे) धागे वाचायचे सोडलेले.

अच्छा, ओके.
आमच्या भागात शेण खाणे हा शब्द प्रयोग दुष्कृत्ये करणाऱ्यांसाठी माती खाणे इतका नॉर्मल आहे त्यामुळे मला त्यात काही वावगे वाटले नाही.

मी अँक्टिव्ह असलेल्या एका मित्रांच्या व्हाट्सअप ग्रूपवर कुठल्या निवडणूका आल्या गेल्या किंवा तशीच काही मोठी राजकीय घडामोड घडली की जो धुडगूस चालू होतो की इतर रस नसलेल्यानी अरे बस करा रे आता असे सांगेपर्यंत तो चालू राहतो.
पण तरी कोणाला माघार घ्यायची नसते. जणू देशासाठी भांडत आहेत असा प्रत्येकाचा आव असतो. अर्थात तिथे सगळे मित्र असल्याने कसली वैयक्तिक चिखलफेक किंवा घाणेरडी शेरेबाजी नसते.
पण व्हॉट्सॲपग्रूप वरच्या मित्रांच्या गप्पात राजकारण नकोसे वाटते.
मग शेवटी माझी सटकून मी प्रत्येकाच्या श्रद्धास्थान असलेल्या पण तसेच भ्रष्ट असलेल्या नेत्यांना नावे घेऊन कचकचीत शिव्या दिल्यावरच ते मलाही चार शिव्या घालून थांबतात. कारण माझ्या भावना दुःखवावे असे कुठले राजकीय श्रद्धास्थान नाही. म्हणून न भांडता बसतात शांत Happy
फक्त या राघव चड्डाने मात्र माझाच गेम केला Sad