अधल्या मधल्या नोंदी-२
तिचा वेग..
तिने गाडी मुख्य रस्त्यावर घेतली,
तेव्हा रस्त्यावर नेहमीचीच वर्दळ होती....
तिचा वेग मर्यादितच होता.
नेहमी मर्यादित वेगानेच तर चालवायची ती गाडी....
वाहन चालवतांना, सगळी काळजी ती नेहमी घेतच होती...
तिचा वेग मर्यादित च होता, आपण सुरक्षित रहावं, आणी दुसऱ्यांनाही इजा होऊ नये म्हणून....
तिच्या मागून येणारे लोकं, त्यांचा वेग वाढवत..
कसेही.. कुठूनही.. पुढे जात होते..
कधी उजवीकडून... तर कधी डावीकडून..
नियमांचं पालन करण्याची, कुणालाच गरज वाटत नव्हती.
तिचा वेग मात्र मर्यादितच होता, स्वतःला आणि इतरांनाही इजा होऊ नये म्हणून..
समोरच्या वाहनाचा वेग कमी असेल..,
तर ती शांतपणे, त्या वाहनाच्या मागे जात होती, एकदाही हॉर्न नं वाजवता....
आजुबाजूने येणाऱ्या गाड्यांचे हॉर्न, कर्कश्य वाजतच होते.
हल्ली लोक, ब्रेक पेक्षा कर्कश हॉर्न वरच भर देतात तसेच....
तिचा हॉर्न मात्र शांतच होता, स्वतःला आणि इतरांनाही त्रास होऊ नये म्हणून..
प्रत्येकाला पुढे जायचं होतं.. जणू, त्यांच्याचसाठी जग थांबलं होतं..
लहान-मोठे.. वयस्क .. प्रत्येकाला घाई होती, पुढे जाण्याची..
ती मात्र शांतच होती.. तिला कसलीच घाई नव्हती..
कुणाचं आयुष्य तिच्या छोट्या क्षणांमुळे खोळंबून राहणार नव्हतं..
तिचा वेग मर्यादितच होता, स्वतःला आणि इतरांनाही इजा होऊ नये म्हणून..
मध्ये बरीच वळणं आली....
चौक लागत होते.. डावीकडे.. उजवीकडे..,
मागे वळायला.. वर्तुळ असलेले..
ती त्या वर्तुळा भोवती जाताना, मागून .. बाजूने.. येणाऱ्यांनही पुढे जाऊ देत होती..
तिला कसलाच धोका पत्करायचा नव्हता ..स्वत:करता.. दुसऱ्यांकरता..
तिचा वेग मर्यादितच होता, स्वतःला आणि इतरांनाही इजा होऊ नये म्हणून..
वाहन हाकतांना, कधी ती दचकत होती..कधी भेदरत होती..
पुढून.. मागून.. , डावीकडून.., उजवीकडून.. येणाऱ्यांमुळे..
तरीही ती शांत होती.., तिची पकड.. स्थिर होती..
सगळ्यांना ती पुढे जाऊ देत होती..
ती काळजी घेत होती.. करत होती.. तिची.. आणी इतरांचीही..
तिचा वेग मर्यादितच होता.. स्वतःला आणि इतरांनाही इजा होऊ नये म्हणून..
उजवीकडून येणारा डावीकडे जात होता, तिला वळसा घालून ..
डावीकडला उजवीकडे वळत होता, उन्मत्तपणे.. तिच्या पुढूनच..
प्रत्येक जण स्पर्धेत असल्यासारखा ....
त्यांना जोपासायचा होता त्यांचा अहंकार..
सिद्ध करायचं होतं पुरुषपण.. अन बाईपणही..
तिला फक्त मुक्कामी पोहोचायच होतं सुखरूप..
प्रवासाचा आनंद घेत..
तिचा वेग मर्यादितच होता.. स्वतःला आणि इतरांनाही इजा होऊ नये म्हणून..
कधीतरी ती पडत होती.. धडपडत होती..
सगळ्या प्रवासात..., ती जरा जखमी झालीच..
जखमा शरीरापेक्षा, मनावर जास्त उमटल्या..
चूक तिची नव्हती..., तरी अपघातात मात्र तीच सापडली होती..
डोळ्यात पाणी आलं.. तरी ही.. ,ते पुसत..
उठल्यावर तिचा वेग मर्यादितच होता.. आणखीन कुणाला इजा होऊ होऊ नये म्हणून..
ती पुढच्यांना.. मागच्यांना.. पुढे जाऊ देत होती..
तिला कसलीच घाई नव्हती..
कधी ना कधी ती मुक्कामी पोचणारच, ह्याची खात्री वाटत होती तिला..
तिला कुणावर कुरघोडी करायची नव्हती..
तिची कुणाशीही चढाओढ नव्हती.. स्पर्धा नव्हती..
हॉर्न चा आवाजाने कुणाला दचकवायचं नव्हतं..
शांती भंग करायची नव्हती.... लोकांची..
तिचा वेग मर्यादितच होता, कुणाला इजा होऊ नये म्हणून..
ती तिच्या जखमा ती सांभाळत होती..
लागलेल्या मुक्या माराने ठसठसत होती..
ती सिग्नल ला थांबत होती.. ट्रॅफिक चे नियम पळत होती..
तरीही दुखावल्या जात होती..
तरीही तिचा वेग नेहमीच मर्यादितच होता.., कुणाला इजा होऊ नये म्हणून..
पण सरते शेवटी.. प्रवास संपण्याआधीच..
तिने तिचं वाहन कडेला घेतलं..
रस्त्यातून ती बाजूला झाली..
ह्या रहदारीचा भाग नाही बनू शकत आपण..
म्हणून मग मर्यादित वेगही शून्यावर आणला तिने..
तिच्या जखमा तशाच होत्या..
पण तिच्यामुळे कुणाला जखमा झाल्या नव्हत्या.. कुणी दुखावलं गेलं नव्हतं..
तिने प्रवास थांबवला होता अकाली..
ती थकली होती....
तिचा वेग शून्यावर आला होता..,
इजा फक्त तिच्याच शरीर मनाला झाली होती....
तिची... रस्त्यावरची.. आणि कामाच्या ठिकाणची..
तीच असणं... योगायोग नव्हता..
कारण ती.., तिच होती.. सगळीकडे...
तिच्या जगण्यातला भाग होता..
तिने खूप जपलं...., स्वता:ला.., दुसऱ्यांना इजा होऊ नये म्हणून.....
व्यवस्थेत राहूनही व्यवस्था नाही बदलता येत एकट्याला..
सगळीकडे तिचा वेग मर्यादितच होता..
कधीतरी मुक्कामी पोचणारच..., असं तिला वाटत होतं..
तिथेही वेग मर्यादितच होता कुणी दुखावलं जाऊ नये म्हणून..
आणि एक दिवस त्या प्रवासातूनही ती बाहेर पडली..
तिने प्रवास थांबवला..
तिचा वेग पूर्ण थांबला इथेही..
प्रवाहाबाहेर पडली ती..
मनाची जखम तशीच होती..
बोचणारी.. दचकावणारी.. चोहोबाजूंनी अंगावर येणारी..
गर्दीची वृत्ती तशीच होती.., वळसा घालून.. नाही तर धक्का देऊन पुढे जाणारी..
रस्त्यावरच्या रहादरीसारखी..
*************************
ह्म्म्म्म!! असेही कोणी असू
ह्म्म्म्म!! असेही कोणी असू शकेल असे वाटत नाही. जगताना, आपण गेंड्याच्या कातडीचे बनतोच नव्हे जग बनवतेच. विच इज प्रेटी गुड!
* मनाची जखम तशीच होती..
* मनाची जखम तशीच होती..
>>>> खरंय ..
धन्यवाद सामो, कुमार सर.
धन्यवाद सामो, कुमार सर.
असेही कोणी असू शकेल असे वाटत नाही.>> असतात गं सामो. फार लांब नाही आपल्या आसपासच. कदाचीत मी किंवा तू सुद्धा.
'लेट देम' हे मेल रॉबिन्सचे
'लेट देम' हे मेल रॉबिन्सचे लाइफ चेन्जिंग पुस्तक वाच. यु ट्युबवर ऐक. संपूर्ण पुस्तक आहे. निदान पुस्तकाची समरी ऐक. फार सुंदर पुस्तक अहे. फार उपयोगी पुस्तक आहे. आय नीडेड टु लिस्न, टु दॅट थिअरी.
छान लिहिले आहे.
छान लिहिले आहे.
मलाही असेच जगायला आवडते त्यामुळे काही भाग रिलेट झाला असे वाटले. काही भाग म्हटले कारण जखमा स्वतःला होऊ द्यायच्या नाहीत याची काळजी घेणे गरजेचे आहेच आणि ते जमायलाही हवेच. अन्यथा असे जगायला आवडणार नाही.
अर्थात प्रत्येकाकडे मनाप्रमाणे जगण्याची चॉईस नसते
स्त्रियांकडे त्याहून कमी..
हळवं, खोल आणि विचार करायला
हळवं, खोल आणि विचार करायला लावणारं लेखन.
जगण्याकरता फक्त सावधपणा नाही, तर स्वतःसाठी ठामपणे उभं राहणंही गरजेचं असतं.
कारण आपण फक्त इतरांना इजा होऊ नये म्हणून जगत राहिलो, तर स्वतःच्या जखमांकडेच दुर्लक्ष होतं.
जखमा स्वतःला होऊ द्यायच्या
जखमा स्वतःला होऊ द्यायच्या नाहीत याची काळजी घेणे गरजेचे आहेच आणि ते जमायलाही हवेच. >> जमायला हवे हे महत्वाचे.
जगण्याकरता फक्त सावधपणा नाही, तर स्वतःसाठी ठामपणे उभं राहणंही गरजेचं असतं.
कारण आपण फक्त इतरांना इजा होऊ नये म्हणून जगत राहिलो, तर स्वतःच्या जखमांकडेच दुर्लक्ष होतं.>> दक्षिणा, माझ्या पिढीतल्या बहुतांशी ममव बायकांना स्वतः करता जगणं म्हणजे काय हे माहितच नव्हतं.
मला आत्ताच्या पिढीतल्या मुली आवडतात. मोकळेपणी जगतात त्या. त्यांना स्वतः ला काय हवं नको ते माहित असतं. आणि ते त्या मिळवतात पण, वेळप्रसंगी स्पष्टपणे बोलून. (हे शिक्षित घरातल्या मुलींबद्दल आहे. )
बाकी भोवतालचं वातावरण, गरिबी ह्यामुळे अडकलेल्या बायका मुली अजूनही आहेतच).
शर्मिला मी तुझ्या पिढीतली
शर्मिला मी तुझ्या पिढीतली व्यक्ती आहे. माझे अनुभव या लेखापेक्षा वेगळे आहेत.