गेले चारपाच दिवस महिला आरक्षण विधेयकाची चर्चा यत्र तत्र सर्वत्र सुरू आहे. अगदी ज्यांना राजकारणात काही रस नाही किंवा आम्हांला यातलं काही कळत नाही, असं म्हणणारेही याबद्दल बोलताना दिसताहेत.
पायरीपायरीने जाऊ.
महिलांसाठी लोकसभा व विधानसभांत आरक्षण
१९९२ च्या ७३ घटनादुरुस्ती कायद्याने स्थानिक स्वराज्य संस्थांना घटनात्मक रूप मिळाले व स्थानिक स्वराज्य संस्थांत महिलांसाठी १/३ जागा राखीव झाल्या. काही राज्यांनी पुढे या जागा ५०% केल्या.
१. सप्टेंबर २०२३ मध्ये घटनेत दुरुस्ती करणारे १२८ वे विधेयक संसदेत संमत झाले. त्याही आधी लोकसभा आणि विधानसभांत महिलांसाठी आरक्षण आणायचे प्रयत्न झाले होते. त्याबद्दलची माहिती इथे वाचता येईल.
हे विधेयक संसदेच्या दोन्ही सभागृहांनी मंजूर केले. लोकसभेत ४५४ विरुद्ध २ मतांनी हे विधेयक संमत झाले. AIMIM च्या दोन खासदारांनी ओबीसी आणि मुस्लिम महिलांसाठी sub quota नसल्याने विरोध केला. काँग्रेस संसदीय पक्षाच्या नेत्या सोनिया गांधी यांनीही इतर मागासवर्ग प्रवर्गासाठी या आरक्षणात वेगळा quota असावा , त्यासाठी जातनिहाय जनगणना करावी , महिला आरक्षणाचा संबंध मतदारसंघांच्या परिसीमनासाठी delimitation जोडू नये आणि हा कायदा लगेच लागू करावा अशा मागण्या चर्चेदरम्यान केल्या होत्या. पण या मुद्द्यांवरून विधेयकाला विरोध केला नाही. राज्यसभेत विधेयक एकमताने संमत झाले.
हा झाला १०६ वा घटनादुरुस्ती कायदा.
२००८ च्या विधेयकात प्रत्येक राज्यातील लोकसभेच्या जागांपैकी १/३ जागा महिलांसाठी राखीव असणार होत्या. २०२३ च्या विधेयकात प्रत्येक राज्यातील हे शब्द वगळले. तसंच २००८ च्या विधेयकात महिलांसाठी राखीव जागा प्रत्येक सार्वत्रिक निवडणुकीनंतर बदलणार होत्या. २०२३ च्या कायद्यानुसार या जागा प्रत्येक परिसीमनानंतर बदलतील. म्हणजे प्रत्येक मनपा निवडणुकांआधी कोणते मतदारसंघ कोणत्या प्रवर्गासाठी राखीव असतील हे सोडत ( लॉटरी ) काढून ठरवले जाते, तसे लोकसभा व विधानसभांच्या बाबत होणार नाही. गृहमंत्री अमित शहा यांनी चर्चेदरम्यान सांगितले की परिसीमन आयोग जनतेशी चर्चा करून कोणत्या जागा महिलांसाठी राखीव ठेवायच्या ते ठरवेल.
ओबीसी quota ची मागणी फेटाळताना ते म्हणाले की सर्व पक्षांत भाजप ओबीसींना सर्वाधिक प्रतिनिधित्व देतो आणि स्वतः पंतप्रधान मोदी हे ओबीसी प्रवर्गातले आहेत.
हा कायदा कधी अंमलात येईल याची तारीख केंद्र सरकार गॅझेटमध्ये प्रसिद्ध करेल असे तेव्हा म्हटले होते. तसंच त्याबद्दल कायद्यात काय म्हटलं आहे पाहू - हा कायदा प्रसिद्ध झाल्यानंतर झालेल्या पहिल्या जनगणनेनंतर झालेल्या परिसीमनानंतर हा कायदा अंमलात येईल.
म्हणजे २०२३ मध्ये हा कायदा संमत करून घेतला, पण त्याची अंमलबजावणी कधी करायची ती तारीख ठरवली नाही . जनगणना , त्यावर आधारित मतदारंघांचे परिसीमन करताना महिलांना लोकसभेत व राज्यांच्या विधानसभांत १/३ आरक्षण मिळेल असे कायदा स्पष्टपणे म्हणतो.
Notwithstanding anything in the foregoing provision of this Part or Part VIII, the provisions of the Constitution relating to the reservation of seats for women in the House of the People, the Legislative Assembly of a State and the Legislative Assembly of the National Capital Territory of Delhi shall come into effect after an exercise of delimitation is undertaken for this purpose after the relevant figures for the first census taken after commencement of the Constitution (One Hundred and Sixth Amendment) Act, 2023 have been published and shall cease to have effect on the expiration of a period of fifteen years from such commencement.
पण आताच्या नव्या घटना दुरुस्ती विधेयकावर चर्चा सुरू असतानाच २०२३ चा हा कायदा १६ एप्रिलपासून लागू झाल्याची घोषणा करण्यात आली. द हिंदूच्या बातमीत गॅझेटचा स्क्रीनशॉट आहे.
आणि त्याची लिंकही दिली आहे. ती लिंक मात्र आता चालत नाही.
केंद्र शासनाच्या गॅझेट साठीच्या संकेत स्थळावरही ही सूचना मला दिसली नाही.
आता आपण या महिन्यात म्हणजे एप्रिल २०२६ मध्ये येऊया. सध्या पाच राज्यांत विधानसभेच्या निवडणुका सुरू आहेत. पैकी आसाम , केरळ आणि पुद्दुचेरीमध्ये ९ एप्रिल रोजी मतदान झाले. तमिळनाडूत २३ एप्रिल रोजी तर प. बंगालमध्ये २३ आणि २९ रोजी मतदान होणार आहे. अशातच मोदीशहांच्या आले मना आणि त्यांनी घटनादुरुस्ती विधेयक संमत करून घेण्यासाठी संसदेचे विशेष अधिवेशन १६ एप्रिल पासून बोलावले.
यात महत्त्वाचा मुद्दा अर्थातच लोकसभा व विधानसभांत महिलांना १/३ आरक्षण हा होता.
निवडणुकांच्या काळात आदर्श आचार संहिता नावाचा काही तरी प्रकार लागू असतो. त्यातले एक कलम
Party in Power
The party in power whether at the Centre or in the State or States concerned, shall ensure that no cause is given for any complaint that it has used its official position for the purposes of its election campaign and in particular –
(a) announce any financial grants in any form or promises thereof; or
(b) (except civil servants) lay foundation stones etc. of projects or schemes of any kind; or
(c) make any promise of construction of roads, provision of drinking water facilities etc.; or
(d) make any ad-hoc appointments in Government, Public Undertakings etc. which may have the effect of influencing the voters in favor of the party in power.
या कलमाचा शब्दशः अर्थ न घेता, त्यामागचा हेतू पाहिला आचारसंहिता लागू असताना महिला आरक्षणासंबंधीचे विधेयक आणण्याबद्दल प्रश्नचिन्ह लागू शकले. त्याबद्दल पुढे येईलच.
तर आता ताज्या म्हणजे १३१ व्या घटनादुरुस्ती विधेयकाबद्दल सत्ताधारी पक्ष व प्रसारमाध्यमे नारी शक्ती वंदन असे काही सांगत असली तरी विधेयकाचं नाव १३१ वे घटना दुरुस्ती विधेयक असे आहे.
१६ एप्रिल रोजी लोकसभेत तीन विधेयके मांडली गेली.
१. १३१ वे घटनादुरुस्ती विधेयक - महिला आरक्षण + जागा वाढवणे
२ केंद्रशासित प्रदेश कायद्यात दुरुस्ती विधेयक
३ परिसीमन विधेयक
.
लोकसभेच्या कामकाजाच्या नियम ६६ नुसार जेव्हा एखादे विधेयक दुसर्या विधेयकावर अवलंबून असते, तेव्हा प्रथम दुसरे विधेयक संमत झाल्यावरच पहिले = अवलंबून असलेले विधेयक मांडले जावे.
सरकारने हा नियम या तीन विधेयकांसाठी स्थगित केला आणि तिन्ही विधेयकांवरील चर्चा आणि त्यांची संमती एकत्र केली.
परिसीमन
परिसीमनाचा इतिहास थोडक्यात पाहू. घटनेतील ८२ व्या कलमानुसार प्रत्येक जनगणनेनंतर लोकसभेच्या जागा लोकसंख्येच्या प्रमाणात वाढवल्या जातील. त्यानुसार १९५१ , १९६१ आणि १९७१ च्या जनगणनेनुसार लोकसभेच्या जागा अनुक्रमे ४८९ , ५२२ आणि ५४५ इतक्या झाल्या. १९७६ च्या ४२ व्या घटनादुरुस्तीनुसार २००० नंतर होणार्या पहिल्या जनगणनेचे आकडे येईपर्यंत लोकसभेच्या जागा पुन्हा वाढवायची गरज नाही, असा बदल केला गेला.
२००२ च्या ८४ व्या घटना दुरुस्ती कायद्याने खासदारांची संख्या वाढवणे पुन्हा पुढे ढकलले गेले व २०२६ च्या नंतरच्या पहिल्या जनगणनेवर परिसीमन आधारित असेल असे ठरले. त्यामुळे प्रत्येक राज्याच्या खासदारांची संख्या कायम राहिली. मात्र राज्यांतील लोकसभा तसेच विधानसभांच्या मतदारसंघांच्या सीमा व राखीव जागांची संख्या १९९१ च्या जनगणनेवर आधारित असतील असे ठरले.
२००२ च्या घटनादुरुस्ती कायद्यामागील उद्देश आणि कारणांतील एक लक्षणीय मुद्दा
There have been consistent demands, both for and against undertaking the exercise of fresh delimitation. Keeping in view the progress of family planning programmes in different parts of the country, the Government, as part of the National Population Policy strategy, recently decided to extend the current freeze on undertaking fresh delimitation up to the year 2026 as a motivational measure to enable the State Governments to pursue the agenda for population stabilisation.
२००३ च्या ८७ व्या घटनादुरुस्तीने १९९१ च्या जनगणने ऐवजी २००१ ची जनगणना असा बदल झाला.
या बदलांना अंतिम रूप मिळायला २००८ साल आले.
म्हणजे सध्या लोकसभा खासदारांची व विधानसभा आमदारांची संख्या १९७१ च्या जनगणनेवर आधारित आहे. पण आरक्षित जागांची संख्या व मतदारसंघांच्या सीमा या २००१ च्या जनगणनेवर आधारित आहेत.
यानंतरही आसाम, जम्मू काश्मीर या राज्यांतील मतदारसंघांच्या सीमा पुनर्निधारित केल्या गेल्या.
आता १३१ व्या घटनादुरुस्ती विधेयकाने घटनेत काय दुरुस्त्या सुचवल्यात ते पाहू.
१. २०२३ च्या कायद्यात तो कायदा झाल्यानंतरच्या पहिल्या जनगणनेनुसार परिसीमन होईल व त्यानंतर महिलांना प्रतिनिधीगृहांत आरक्षण दिले जाईल असे म्हटले होते. ; त्या ऐवजी संसद ठरवेल त्या (प्रसिद्ध झालेल्या ) जनगणनेनुसार भरलेली लोकसंख्या असा बदल केला. (याचा अर्थ २०११ ची जनगणना ).
२.लोकसभा सदस्यांची संख्या ८५० होईल व त्यातील कमाल ३५ सदस्य केंद्रशासित प्रदेशांतून निवडलेले असतील.
३. कलम ८२ नुसार प्रत्येक जनगणनेनंतर प्रतिनिधीगृहातील जागांची संख्या बदलली जाईल यातले 'प्रत्येक जनगणनेनंतर " हे वगळावे. तसेच हे काम परिसीमन आयोग करेल . आधीच्या बदलांनंतर २०२६ नंतर केल्या गेलेल्या पहिल्या जनगणनेचे आकडे हाती येईतो - हे कलम वगळावे.
विधानसभांच्या बाबतही असेच बदल व्हावेत.
४. महिलांसाठीचे आरक्षण किमान १५ वर्षे राहील व त्यानंतर संसद त्याचा पुनर्विचार करेल.
५. ३३४ अ -४ महिलांसाठी आरक्षित जागा प्रत्येक परिसीमनानंतर रोटेशन पद्धतीने बदलतील - या कलमातील प्रत्येक परिसीमनानंतर हे वगळावे.
विधेयक आणण्यामागील कारणे आणि उद्देश -
प्रतिनिधीगृहातील जागांची संख्या १९७१ च्या जनगणनेवर आधारित आहे , तर मतदारसंघांच्या सीमा आणि आरक्षण २००१ च्या जनगणनेवर आधारित आहे. त्यानंतर देशाचे लोकसंख्याशास्त्रीय स्वरूप राज्यांतर्गत व आंतरराज्य स्थलांतर, वाढते शहरीकरण व काही भागांतील असंतुलित लोकसंख्या वाढ यांमुळे प्रतिनिधीगृहातील जागा आणि लोकसंख्या यांत असमानत निर्माण झाली आहे. यानं तरची जनगणना व परिसीमन यांना लक्षणीय काळ लागणार असल्याने महिलांच्या ( अजा व अ ज महिलांच्याही) लोकशाही प्रक्रियेतील सहभागाला विलंब होईल . म्हणून परिसीमन व महिला आरक्षण या दोन्ही गोष्टी सध्या उपलब्ध असलेल्या जनगणनेच्या आकडेवारीवर ठरवाव्यात यासाठी हे विधेयक मांडले आहे. महिलांचा निर्णयप्र क्रियेत सहभाग वाढल्याने २०४७ पर्यत विकसित भारताचे उद्दिष्ट साधण्यात मदत होईल.
यात परिसीमन आयोगाची नेमणू़क , त्यात कोण असेल, त्यांचे काम कसे चालेले इत्यादिबद्दल सविस्तर नियमावली आहे.
(हे विधेयक मी फक्त नजरेखालून घातलंय. प्रत्येक ओळ वाचलेली नाही )
आता १३१ वे घटनादुरुस्ती विधेयक संमत झाले असते तर काय बदल झाले असते
१. सध्या प्रत्येक जनगणनेनंतर परिसीमन व्हावे अशी तरतूद आहे. आता संसद = केंद्र सरकार ठरवेल तेव्हा परिसीमन झाले असते.
२. प्रतिनिधीगृहातील राज्यांचा वाटा १९७१ ऐवजी २०११ च्या जनगणनेनुसार ठरेल. एकूण सदस्यसंख्या तीच आहे असे धरले तर
उत्तर प्रदेश (८० च्या ८९) बिहार ( ४० च्या ४६ ) राजस्थान (२५ च्या ३०) महाराष्ट्र (४८ च्या ५०) मध्य प्रदेश (२९ च्या ३२) गुजरात (२६ च्या २७) प. बंगाल ( ४२ च्या ४१) तमिळनाडू (३९ च्या ३२) कर्नाटक (२८ च्या २७) केरळ (२० च्या १५) अशा जागा बदलल्या असत्या.
थोडक्यात ज्याला हिंदीपट्टा किंवा गायपट्टा म्हणतात त्या राज्यांचं तसंच महाराष्ट्र व गुजरात यांचं लोकसभेतलं तुलनात्मक बळ वाढलं असतं. इतर सर्व राज्यांचं कमी झालं असतं.
३. घटनादुरुस्तीविधेयकाने लोकसभे च्या सदस्याची संख्या ५५० वरून ८५० इतक्या वाढल्या असत्या प्रत्येक राज्याला मिळणार्या जागांची संख्याही त्या प्रमाणात वाढली असती. राज्यसभेच्या सदस्यांची संख्या मात्र २५० एवढीच राहील.
४. केंद्रीय मंत्रीमंडळात मंत्र्यांची संख्या १२२ इतकी वाढवता येईल.
महिला आरक्षण आणि परिसीमन यांचा थोडक्यात इतिहास आणि २०२३ ची घटनादुरुस्ती व आताची नाकारलेली दोन्ही विधेयके यांचा थोडक्यात आढावा घेतला आहे. याभोवतीचं राजकारण आणि या विधेयकाच्या अनुषंगाने पडलेले काही प्रश्न हे पुढे येतील. ते प्रतिसादांतच लिहेन.
राज अज्ञानी यांनी चर्चा सुरू केलीच आहे. ती पुढे चालवता येईल.
काम चालू रस्ता बंद पाटीमुळे
काम चालू रस्ता बंद पाटीमुळे इतर धाग्यांवरही खासदार कनिमोझी / मौळी यांचे भाषण दिले नाही. प्रतिक्षेत.
दोन्ही विधेयके पास झाली असती
दोन्ही विधेयके पास झाली असती तर कोणाचे काय बिघडले असते?
विरोधक म्हणताहेत त्यातून पूर्ण हवा निघून गेली आहे, उत्तर दक्षिण रेशो सेम राहत असेल तर परिसीमन आत्ताच करून घ्यायला हवे होते. निव्वळ विरोधासाठी विरोध म्हणून जेवढे पदरात पडते आहे तेही सोडायचे हा चुत्यप्पा झाला.
मला पुरोगामी म्हणवणाऱ्या या विरोधक लोकांचा जबरदस्त संशय येतो की त्यांना जरा तरी अक्कल असेल असे वाटले होते.
>> आमदार खासदारांची संख्या गोठवण्याचा उद्देश लोकसंख्या नियंत्रणाला प्रोत्साहन देणे हा आहे. <<
या सारखा दुसरा हास्यास्पद मुद्दा वाचण्यात आला नाही.
मोदी सरकारकडे पूर्ण बहुमत असताना हा निर्णय घ्यायला पाहिजे होता मात्र आता इतका उशीर झाला आहे की पुढची निवडणूक सोडाच त्याही पुढच्या निवडणुकीत तेवढेच खासदार राहणार आहेत
वाचतोय. बरीच नविन माहिती कळली
वाचतोय. बरीच नविन माहिती कळतेय. ही सगळी माहिती एकत्र उपलब्ध करताय हे चांगले आहे.
नवीन लोकसभेत १००० सदस्यांच्या
नवीन लोकसभेत १००० सदस्यांच्या बसण्याची व्यवस्था केली तेव्हांपासूनच संसदेतल्या जागा वाढण्याबद्दल चर्चा चालू झाली.
एम के स्टॅलीन यांनी सर्वप्रथम उघडपणे यावर भाष्य केले होते. तेव्हां भाजपने २०२१ ची जनगणना कोविडमुळे झाली नाही. कोविड हटल्यानंतर ती होईल असे सांगितले. यानंतर या पक्षाच्या काही मुखंडांनी जनगणनेची गरज काय असे प्रश्न विचारले होते. टिव्ही वर अँकर भाजपच्या वतीने हा प्रश्न विचारत होते. म्हणजे सरकार जनगणना करण्याच्या मूड मधे नाही असे मेसेजेस जात होते.
यानंतर पुन्हा एकदा स्टॅलीन यांनी या प्रश्नाला तोंड फोडले. मग दक्षिणेच्या अन्य राज्यांनी त्यांच्या सूरात सूर मिळवला. तमिळनाडू, केरळ या राज्यांचा जन्मदर घटला आहे. कारण भारताने जन्मदर घटवण्याचा कार्यक्रम आखला होता. दक्षिणेची राज्ये आणि महाराष्ट्रातही हा कार्यक्रम राबवला गेला. त्यामुळे या राज्यांची लोकसंख्या मर्यादीत प्रमाणात वाढली.
सर्वात मोठा फटका तमिळनाडू राज्याला बसणार आहे. कारण या राज्याची लोकसंख्या १९७० नंतर १५% वाढली.
उत्तर प्रदेशात ती १२५% इतकी वाढली. बिहार, राजस्थान आणि अन्य काही गायपट्ट्यातली राज्ये आगे मागेच आहेत. म्हणजेच लोकसंख्येच्या आधारावर जग नवीन मतदारसंघ निर्माण झाले तर उत्तर प्रदेशाला १५ जागा जास्त मिळून ९५ जागा होतील. तर तमिळनाडूच्या ११ जागा घटतील. केरलच्या जागा घटतील. बिहार, हरयाणाच्या वाढतील. कर्नाटकला बहुधा फायदा होत आहे. आंध्रात जागा घटतील.
म्हणजे दक्षिणेच्या जागा घटल्याने त्यांचे संसदेतले प्रतिनिधित्व घटणार आहे. तर बीमारू राज्यांच्या जागा वाढल्याने या राज्यात जिंकलेल्या पक्षाला दक्षिणेला विचारात घ्यायची गरज राहणार नाही. शिवाय ८५० खासदारांमधे यांची संख्या कमी झाल्याने संसदेत बोलायचा वेळही घटणार आहे. कोणत्याही विधेयकासाठी दक्षिणेला विचारण्याची आवश्यकता राहणार नाही.
ज्या विधेयकांमधे राज्यांचे मत महत्वाचे असते त्यात दक्षिणेला काहीही महत्व राहणार नाही.
ही सर्व सर्कस महिला विधेयकात का केली? आधीचे बिल असे नव्हते. मग हे सगळे नाटक का केले?
बिल पण पास झाले नाही पाहीजे आणि गळाही काढता आला पाहीजे हा डाव होता का?
कनिमौळी यांनी ही लाईन त्यांच्या घणाघाती भाषणात भेदकपणे मांडली. दक्षिणेचे खासदार इंग्रजीत भाषण करत असल्याने त्या भाषणाची चर्चा झाली नाही.
राज अज्ञानी, विधेयक काय आणि
राज अज्ञानी, विधेयक काय आणि तुम्ही काय बोलताय?
विधेयकाने सगळ्या राज्यांच्या जागा दीडपट होणार होत्या. एका राज्याला कमी एकाला जास्त नाहीत. आणि लोकसंख्येच्या प्रमाणात देखील नाहीत. मग काय प्रॉब्लम आहे? दक्षिणेला काही महत्व राहणार नाही वगैरे याला काहीही अर्थ नाही.
अशीच दिशाभूल करून हे चांगले
अशीच दिशाभूल करून हे चांगले विधेयक घालवले विरोधकांनी. तामिळनाडू सारख्या राज्यांना ज्यांची लोकसंख्या घटली आहे त्यांना उलट सरसकट ५० टक्के जागा वाढवून मिळणार होत्या म्हणजे त्यांचे जास्त चांगले भले झाले असते.
प्रचंड दिशाभूल करून काहीतरी फियर माँगरिंग करून उगाच काहीतरी आकडे फेकून या साध्या सिंपल विधेयकाला हाणून पाडले.
आता पुन्हा जर स्टँडर्ड डिलिमिटेशन (म्हणजे लोकसंख्ये नुसार, २०२७ नंतर) केले तर दक्षिणेचेच जास्त नुकसान आहे. अगदी बेसिक लॉजिक आहे हे.
स्वतःच्या पहिल्या
कुणी सत्तरीच्या वयाचा _जय मगदू_ नावाचा कट्टर हिंदू संघ सेवक सातत्याने शिव्या का देतोय आणि त्याला अभय का असे लिहीले तर ते विषयाला धरून होईल का?
या विधेयकामधे २ क्ष, १.५ क्ष
या विधेयकामधे २ क्ष, १.५ क्ष असा फॉर्म्युला आणून काहीही फायदा नाही. ज्या राज्यांनी लोकसंख्या नियंत्रण केले त्यांना यात शिक्षा मिळते.
म्हणजे जर तमिळनाडूने लोकसंख्या नियंत्रण केले नसते तर त्यांची लोकसंख्या १५% ऐवजी उत्तर प्रदेशप्रमाणेच १२५% एव्हढी वाढली असती. उत्तर प्रदेशला सुरूवातीपासून लोकसंख्येचा फायदा होत आला आहे. पहिल्या वेळी जे झालं ते झालं. पण एकदा भारत सरकार अस्तित्वात आले. त्यांनी लोकसंख्या नियंत्रणाचा पुरस्कार केला. त्याला काही राज्यांनी प्रतिसाद दिला. त्याच वेळी जर भविष्यात जागा लोकसंख्येच्या आधारावर वाढणार आहेत हे माहीत असते तर असे झाले नसते.
मुस्लिमांच्या लोकसंख्या वाढीच्या दराचे भय दाखवणार्यांना जन्मदराचा मुद्दा कळू नये?
म्हणजे ज्या राज्यांनी लोकसंख्या नियंत्रण केले नाही त्यांची लोकसंख्या जर २०० वरून ४०० झाली असेल आणि तमिळनाडूची लोकसंख्या १०० वरून ११५ झाली असेल तर २ पट जरी जागा वाढल्या तरी तमिळनाडूच्या जागा २३० होतील तर उत्तर प्रदेशच्या ८०० होतील.
अन्याय दूर करायचा असेल तर तमिळनाडूची लोकसंख्या सुद्धा १२५% वाढली असे गृहीत धरून २२५ लोकसंख्येच्या दुप्पट म्हणजे ४५० झाल्या तर लोकसंख्या नियंत्रण केल्याची त्यांना शिक्षा होणार नाही. वरच्या उदाहरणात ८०० जागा जर उत्तर प्रदेशच्या झाल्या तर तमिळनाडूचे संसदेतले अस्तित्व अल्पमतात येईल.
म्हणजेच उत्तर प्रदेशात जर १ लाख लोकसंख्येमागे एक खासदार असेल तर तमिळनाडू मधे तो गणिताने १.२५ - ०.१५ (जनमताच्या दराचा फरक) हा बेस धरून त्यातून जो फॅक्टर मिळेल तेव्हढी मतदारसंख्या कमी यायला हवी.
म्हणजे तमिळनाडूत ४०००० लोकसंख्येमागे एक खासदार तर उत्तर प्रदेशात १ लाख लोकसंख्येमागे एक खासदार असा फॉर्म्युला पाहीजे. मी गणित केलेले नाही. हा अंदाजे आकडा आहे.
असा फॉर्म्युला न्यायपूर्ण होईल. या स्थितीत दीडपट किंवा दुप्पट काहीही केले तरी अन्याय होणार नाही.
वर दिलेले अंदाजे आकडे घेऊन
वर दिलेले अंदाजे आकडे घेऊन विपर्यास होऊ नये म्हणून नीट मांडणी करतो.
काल्पनिक लोकसंख्या (adjusted population) वर आधारित जागा वाटप.
हा विचार नवीन नाही, पण भारतात अधिकृतपणे कधी स्वीकारला गेला नाही. (विचारणा झाली तर संदर्भ देता येतील).
फॉर्म्युला कसा असू शकतो?
एक सरळ पद्धत अशी असू शकते. १९७१ साली सगळ्या राज्यांचा जन्मदर साधारण सारखाच होता. तेव्हापासून प्रत्येक राज्याची लोकसंख्या प्रत्यक्षात किती वाढली आणि जर सगळ्यांनी एकच राष्ट्रीय लक्ष्य दर राखला असता तर किती वाढली असती, हे काढायचे. जे राज्य लक्ष्यापेक्षा कमी वाढले, त्याला फरक भरून देणारा गुणांक लावायचा.
जे राज्य लक्ष्यापेक्षा जास्त वाढले, त्याचा फायदा मर्यादित ठेवायचा.
उदाहरण द्यायचे तर, राष्ट्रीय लक्ष्य जन्मदर २.१ (TFR) धरला तर तामिळनाडूने तो केव्हाच गाठला आणि ओलांडला. इथे ओलांडला याचा अर्थ जन्मदर त्यापेक्षाही खाली आला असा घ्यावा. म्हणजे खालच्या दिशेने ओलांडला.
त्यामुळे त्यांची adjusted लोकसंख्या प्रत्यक्ष लोकसंख्येपेक्षा जास्त धरली जाईल. उत्तर प्रदेशने तो दर अजून गाठलेला नाही, त्यामुळे त्यांची adjusted लोकसंख्या प्रत्यक्षापेक्षा कमी धरली जाईल. जागा वाटप या adjusted लोकसंख्येवर व्हायला हवे.
हा फॉर्म्युला न्यायाच्या दृष्टीने बरोबर का आहे? किंवा बरोबर आहे का?
कारण जागा वाटप हे राज्याच्या लोकसंख्या व्यवस्थापनाच्या क्षमतेला पारितोषिक किंवा शिक्षा देत नाही. ते केवळ एका काल्पनिक पण न्याय्य आधाररेषेवर सगळ्यांना समान पातळीवर आणते.
व्यवहारात अडचणी काय येतील?
राष्ट्रीय लक्ष्य दर कोणता धरायचा यावर वाद होईल. १९७१ची आधाररेषा का, १९५१ का नाही असे प्रश्न येतील. उत्तरेकडची राज्ये हा फॉर्म्युला कधीच मान्य करणार नाहीत कारण त्यांचे नुकसान होते. आणि हे करायला घटनादुरुस्ती लागेल कारण सध्याची घटना थेट लोकसंख्येचा आधार सांगते.
इथे सुचवलेली दिशा तत्त्वतः बरोबर आहे आणि केरळ, तामिळनाडूसारख्या राज्यांचे अर्थशास्त्रज्ञ आणि राजकारणी हाच मुद्दा वेगवेगळ्या प्रकारे मांडत आले आहेत. फक्त राजकीय इच्छाशक्ती नाही. हा विचार आय ए एस चे ट्रेनिंग देणार्या संस्थांनी मांडलेला आहे. जयराम रमेश यांनी याच शब्दात नाही तरी साधारण हीच दिशा मांडलेली आहे.
याशिवाय अमेरिकन सिनेटच्या धतीवर सूचना आल्या आहेत. पण या सर्व सूचना अधिकृत स्वरूपात कधीच स्विकारल्या गेलेल्या नाहीत. सरकारची इच्छाशक्ती असेल तर हा न्यायाचा फॉर्म्युला विधेयकात येईल.
अजून न्यायपूर्ण भूमिका हवी असेल तर जो TFR निश्चित केला होता तोच बेस धरायला पाहीजे. काहीं राज्यांनी त्यापेक्षाही कमी जन्मदर ठेवला म्हणून त्यांचा विचार वेगळा नको. बेस २.१ हाच धरावा. यापेक्षा कमी किंवा जास्त नको. २.१ पेक्षा कमी म्हणजे उदाहरणार्थ तमिळनाडू १.५% म्हणून त्यांना १.५% वरून अॅडजस्ट करण्या ऐवजी २.१% वरूनच केले पाहीजे.
अजून एक मुद्दा.
अजून एक मुद्दा.
१९९० च्या दशकात भाजपचा आग्रह होता लहान राज्यांची निर्मिती.
या मागे त्यांचा डाव होता कि उत्तर प्रदेश आणि बिहार मधून भाजप आणि काँग्रेसचं उच्चाटन झालेलं आहे. त्यामुळे या राज्यांची देशातली निर्णायक भूमिका क्षीण करणे. लहान राज्ये झाल्यास एकत्रित रित्या त्यांना एक भूमिका घेणे शक्य होत नाही. आता मात्र त्यांना मोठ्या राज्यांची लोकसंख्या खटकत नाही. कारण आता तिथे भाजपची पाळंमुळं घट्ट झाली आहेत असे त्यांना वाटते. या पाच ते सहा राज्यात बहुमत मिळाले तर दक्षिणेकडे शून्य जागा मिळाल्या तरीही हवं ते धोरण रेटून नेता येईल.
हा डावपेच महिला आरक्षणाला जोडला आहे. म्हणजे विधेयक पराभूत झालेच तर महिला आऱक्षणाचा प्रस्ताव आम्ही आणला होता पण विरोधकांनी हाणून पाडला असे गळे काढून आता होऊ घातलेल्या पाच राज्यातल्या निवडणुकांवर प्रभाव टाकायचा आणि २०२९ मधे याचा फायदा घ्यायचा प्रयत्न करायचा. या विधेयकाचे टायमिंग बघता एव्हढी घाई का केली हा कनिमौळी यांचा प्रश्न महत्वाचा आहे.
२०२३ मधे महिला आरक्षण संमत झाले आहे. त्याची अंमलबजावणी करायची होती. ते गॅझेट मधे अद्याप प्रकाशित झालेले नाही. हे लक्षात आणून दिल्यानंतर घाईघाईत हळूच १६ एप्रिल रोजी गॅझेट प्रकाशित केले असा आरोप अन्य खासदारांनी केला आहे. त्या वेळी २०२१ ची लोकसंख्या ही बेस धरली जाईल असे सांगितले होते. ५ वर्षात जनगणना केली नाही ही कुणाची चूक? आणि आता २०११ ची लोकसंख्या का प्रमाण धरायची?
कशाचाच कशाला मेळ नाही.
सॉरी राज अज्ञानी,
सॉरी राज अज्ञानी,
मी कितीही मोदी विरोधक असलो तरी मी विद्यमान सरकारला बेनिफिट ऑफ डाउट द्यायला तयार आहे.
ते देशाला खड्यातच घालणार आहेत अशी त्यांची मूळ धारणा आहे असा विचार कायम गृहीत धरून त्यांनी आणलेल्या सुधारणांवर टीका करावी असे मला वाटत नाही. शिवाय महिला आरक्षणाचा प्रस्ताव आणला होता पण यांनी होऊ दिला नाही हा मुद्दा काही मते खेचून आणणारा नाही त्यामुळे ते गळे काढणार वगैरे लॉजिक अगदी बाळबोध वाटते. मते घेण्यासाठी त्यांनी आधीच वेगवेगळ्या क्लृप्त्या केलेल्या आहेत (लाडकी बहीण वगैरे) आरक्षण देणार होते म्हणून महिला भाजपला मते देत नाहीत, भारतीय महिला बस मधे आरक्षण असताना तिथे कुणी बसले असेल तर शेजारी मूर्खासारखी उभी राहील पण आपली हक्काची सीट घेणार नाही. (अगदी परवाचा अनुभव आहे, महिलांच्या सीटवर चार धडधाकट पुरुष बसले असताना देखील तरुण आणि म्हाताऱ्या बायका निमूटपणे उभ्या होत्या ते ही ३० ४० किमी प्रवासात)
सध्या जे पदरात पडते आहे ते पाडून घेणे म्हणून सरसकट दीडपट हा फॉर्म्युला काही वाईट नाही. सध्याच्या स्टेटस को पेक्षा तर वाईट नाहीच नाही.
यावर उत्तर देण्यात अर्थ नाही.
यावर उत्तर देण्यात अर्थ नाही.
वरच्या मजकुरात काही चुका
वरच्या मजकुरात काही चुका असल्या किंवा काही महत्त्वाचा भाग राहिला असला तर सांगावे.
१ महिला आरक्षणाचा विषय आता
१ महिला आरक्षणाचा विषय आता अचानक का निघाला ते शोधलं तर पहिली बातमी १० मार्चची दिसली. चार राज्यांतल्या विधानसभा निवडणुका १५ मार्च रोजी जाहीर झाल्या. म्हणजे हे विधेयक निवडणुकांवर डोळा ठेवून आताच आणले का?.
२. २०२३ चे विधेयक पारित करताना अमित शहा म्हणाले -the law would become a reality by 2029 as the process of decennial census and delimitation would be taken up up "immediately after the 2024 polls
मग जवळपास २ वर्षे काय केले?
३ आताच हा तातडीचा विषय का झाला? Women's Reservation Bill is the need of the hour. This is the rightful due of our Nari Shakti to contribute to policymaking and empower the nation. The Modi government is resolved to bring and implement this legislation," he said in a post on X.
"This is a change that should certainly take place for the better, without delay. I hope everyone will step forward and support this historic move," said HM Shah.
४. जनगणना २०२१ मध्ये होणे अपेक्षित होते. कोव्हिड पँडेमिक मुळे पुढे ढकलली तरी २०२२-२३ मध्ये करणे शक्य होते. २०२४ मध्ये निवडणुका होताच २०२५ मध्येही सुरू करता आली असती. पण सरकारच्या डोक्यात २०२६ नंतरच्या पहिल्या जनगणनेवर आधारित परिसीमन हे असल्याने जनगणना शेवटी २०२६ मध्येच करायचे ठरले असे दिसते.४५ . यात जातनिहाय जनगणना हा विरोधी पक्षांनी लावून धरलेला आणि सरकारने तोंडदेखला का होईना मान्य केलेला मुद्दा होता. २०२३ च्या विधेय काच्या वेळीही ओबीसी आरक्षणाचा विषय निघाला. आता ओबीसी आरक्षण द्यायचे नाही म्हणून परिसीमनाला २०११ च्या जनगणनेचा आधार घ्यायचे ठरवले का?
६. जर महिलांसाठी आरक्षण इतके महत्त्वाचे आहे तर त्याची सांगड लोकसभेच्या जागा वाढविण्याशी का घातली? ५४३ जागांमध्ये १/३ जागा महिलांसाठी आरक्षित करता आल्या असत्या. की या ५४३ जागा पुरुष खासदारांची जहागीर आहेत, असं सरकार सुचवतं आहे?
६. कोणत्या जागा महिलांसाठी राखीव हे परिसीमन आयोग ठरवेल . २०२३ च्या चर्चे दरम्यान अमित शहा वायनाड आणि हैद्राबाद या जागा स्त्रियांसाठी राखीव झाल्या तर तुम्ही सरकारला दोष द्याल असं म्हटलं आहे. आता हा परिसीमन आयोग निवडणूक आयोगाइतकाच स्वतंत्र बाण्याचा असेल हे काय सांगायला हवे?
७. २०२९ च्या निवडणुकांपूर्वी जनगणना व त्यावर आधारित परिसीमन होणार नाही, हे सरकारला आताच कळले का? २०२३ मध्ये याची कल्पना नव्हती का?
आता मोदींनी केलेले राष्ट्र
आता मोदींनी केलेले राष्ट्र के नाम संबोधन ऐकायचे आहे. त्यासाठी मनाची तयारी करतो.
वेळे अभावी इथे लिहायला जमलं
वेळे अभावी इथे लिहायला जमलं नाही.
१७ एप्रिल रोजी विधेयक पारित होण्यास लोकसभेत २/३ बहुमत न मिळाल्याने ते पडले आणि काही मिनिटांतच भाजपच्या बड्या नेत्यांनी त्याबद्दल ट्वीट केलं. महिला खासदारांनी संसदेच्या आवारात फलक घेऊन निदर्शने केली.
एवढ्या कमी वेळात हे फलक तयार करून झाले की आधीच तयार ठेवले होते? म्हणजे हे विधेयक पडेल अशीच भाजपची अपेक्षा होती? ते पडावे या उद्देशानेच आणले होते?
पण दुसर्याच दिवशी म्हणजे १८ एप्रिल रोजी दिल्ली भाजपने विरोधी पक्ष नेता राहुल गांधी यांच्या निवासस्थानावर निषेध मोर्चा काढला.
अमेरिका आणि इस्रायलने इराणवर हल्ला केल्यानंतर जगभरात आणि देशात जागतिक अशांतता आणि इंधन टंचाईमुळे अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. लॉकडाउनच्या काळात स्थलांतरित मजूरवर्ग आपल्या मूळ राज्यात परतू पाहत होता, त्या प्रमाणात नसले तरी तसेच चित्र मार्च महिन्यात देशात होते. . गॅसच्या अभावी काही उद्योग ठप्प पडले .आता त्याबद्दलच्या बातम्या मागे पडल्या. त्याबद्दल देशाला उद्देशून काही बोलावे असे पंतप्रधानांना वाटले नाही.
पंतप्रधान
भाजप नेते नरेंद्र मोदी यांनी रात्री ८:३० ला राष्ट्र के नाम संबोधन केले.इथे पंतप्रधान न म्हणता भाजप नेते म्हटले कारण या भाषणात विरोधी पक्षांवर प्रच्छन्न टीका होती. विशेषतः निवडणुका सुरू असताना एक प्रकारचा पक्षप्रचार शासकीय यंत्रणेचा उपयोग करून केला गेला. त्याबद्दल भाजपला काहीही खर्च आला नाही.
मोदींनी भाषणात काँग्रेस, द्रमुक, तृणमूल काँग्रेस , समाजवादी पक्ष यांचा वारंवार उल्लेख केला. लोकसभेतले हे संख्याबळाने पहिले चार विरोधी पक्ष. त्याच प्रमाणे ज्या राज्यांत विधानसभा निवडणुका सुरू आहेत किंवा वर्षभरात होतील, त्या राज्यांतले प्रमुख पक्ष.
या पक्षांच्या खासदारांनी विधेयक पडल्यावर बाके बडवून महिलांचा अपमान केला.
मोदींच्या भाषणांतील काही वाक्ये -
वह नारी के स्वाभिमान पर उसके आत्म सम्मान पर चोट थी और नारी सब भूल जाती है। अपना अपमान कभी नहीं भूलती।
ह यह भूल रहे हैं कि 21वीं सदी की नारी देश की हर घटना पर नजर रख रही है। वो उनकी मंशा भांप रही है। और सच्चाई भी भलीभांति जान चुकी है।
याबाबत अनेक उदाहरणे देता येतील. पण दोनच देतो. मणिपूरमध्ये स्त्रियांची नग्न धिंड काढली गेली, त्यांच्यावर अत्याचार झाले, महिला पहिलवानांनी ब्रिजभूषण सिंग यांच्या विरोधात आंदोलन केले , तेव्हा त्यांना फरफटत नेले; याबद्दल भारतीय स्त्रियांना काहीच वाटत नाही, याची मोदींना खात्री असावी.
मोदींनी भाषणात अप्रत्यक्षपणे डिलिमिटेशनचाही उल्लेख केला.
नारी शक्ति वंदन संशोधन उत्तर दक्षिण पूरब पश्चिम सभी राज्यों की हर राज्य की शक्ति में समान वृद्धि का प्रयास था। यह संसद में सभी राज्यों की आवाज को अधिक शक्ति देने का प्रयास था। राज्य छोटा हो, राज्य बड़ा हो, राज्य की आबादी कम हो या राज्य की आबादी ज्यादा हो।
सबकी समान अनुपात में शक्ति बढ़ाने की कोशिश थी।
वर आपण पाहिलं की परिसीमन विधेयकाचा आधार २०११ ची जनगणना होती. मग प्रत्येक राज्यातील लोकसभा जागांची संख्या सारख्या प्रमाणात कशी वाढणार होती?
२०२३ मध्ये महिला आरक्षणाचं विधेयक पारित होऊन बाळ जन्माला आलं होतं. मोदी सरकारने ते लागू करायची तारीख न ठरवल्याने ते इन्क्युबेटरमध्ये होतं असं म्हणता येईल. आता २०२६ च्या एप्रिल महिन्यात ते बाळ पुन्हा गर्भात गेलं आणि त्याची म्हणे भ्रूण हत्या झाली.
मोदींनी या पक्षांवर परिवारवादी असल्याचा आणि फक्त परिवारातील स्त्रियांनाच पुढे आणण्याचा आरोप केला. महाराष्ट्र भाजप आणि महायुतीतील पंकजा मुंडे, पूनम महाजन, आदिती तटकरे, सुनेत्रा पवार , हीना गावित, रक्षा खडसे , श्रीजया चव्हाण ,सीमा हिरे इत्यादी लोकप्रतिनिधी याला नक्कीच अनुमोदन देतील. आता तृणमूल काँग्रेसच्या मुख्य ममता बॅनर्जी या एक स्त्री. त्यांच्या २९ खासदारां पैकी ११ महिला आहेत. तरी ही हा पक्ष महिला विरोधी.
परिसीमनानंतर सगळ्या राज्यांच्या जागा सारख्या प्रमाणात वाढणार असताना विरोधी पक्ष काही राज्यांना फायदा तर काहींचे नुकसान होईल असा कांगावा करत असल्याचा आरोप मोदींनी केला.
महिला आरक्षणाबद्दल बोलून कंटाळा आल्यावर त्यांनी काँग्रेसने आधार, जी एस टी, डिजिटल पेमेंट्स , जनधन इत्यादींना विरोध केला असे आरोप त्यांनी केले. गंमत म्हणजे यातल्या अनेक गोष्टी काँग्रेसनेच सुरू केल्या आहेत. जी एस टी आणि आधार यांना मोदींनी स्वतः गुजरातचे मुख्यमंत्री असताना विरोध केला.
काँग्रेसने ओबीसी आरक्षण ४० वर्षे अडवून ठेवले असंही ते म्हणाले.
या विधेयकाला भाजपने नारी शक्ती वंदन असे नाव दिले. पचास करोड की गर्लफ्रेंड, जर्सी गाय, काँग्रेस की विधवा, दीदी ओ दीदी ही सगळी मोदींनी नारी शक्तीला केलेल्या वंदनाचीच उदाहरणं आहेत.
शेवटी भाजपने राज्या राज्यांत काढलेल्या मोर्चांबद्दल.
या मोर्चांत गोळा करून आलेल्या स्त्रियांना तो नक्की कशा बद्दल आहे, हेच माहीत नव्हतं. तो महागाई, विजेचे दर कमी करण्यासाठी आहे, असं कुणी म्हणाल्या. तर एकीने मोदीच महिलांना आरक्षण देऊ इच्छित नाहीत, असं सांगितलं.
मुंबईत ल्या मोर्चातील एका भाजप पदा धिकारी महिलेला पत्रकाराने प्रश्न विचारला की काँग्रेस तर म्हणतेय त्यांनीच महिलांना ग्रामपंचायती, इ. स्थानिक स्वराज्य संस्थांत आरक्षण दिले. त्यावर त्या बाईंनी - नाही नाही. काँग्रेस खोटं बोलतेय, असं म्हटलं.
आपल्या मुलाला शाळेतून आणण्यासाठी निघालेली एक महिला या मोर्चामुळे एक तास अडकून पडली आणि तिच्या उद्वेगाचा , संतापाचा स्फोट झाला हे सगळ्यां पर्यंत पोचलंच असेल. सोशल मीडियावर त्या आठवडाभर त्या क्लिप्स आणि ती महिला चर्चेचा विषय होता. एरवी सोशल मीडियावर काही घडलं की त्यावर इथे लेख पाडणार्या मंडळींना मात्र त्याबद्दल काही बोलावंसं वाटलं नाही.
भाजपने त्या महिलेच्या बाबतही नारी शक्ती वंदनाची झलक दाखवली. तिच्या पेहरावावर, भाषेवर टीका केली. कोणाचे इन्स्टा प्रोफाइल तिचे म्हणून फिरवून तिच्याबद्दल वाईट भाषा वापरली. यात मुख्यमंत्र्यांचा नातलगही सामील होता.
शेवटी सरकारच्या विरोधात आंदोलन करणार्यांना त्रास देण्यासाठी ठेवलेले गुणरत्न सदावर्ते यांच्या मुलीकरवी त्या महिलेविरोधात पोलिसांत तक्रारही नोंदवली गेली.
भाजप मुंबईचा हा मोर्चा म्हणजे महिला विधेयकाचा जो फियास्को भाजपने केला त्यावरचा शिरपेच.
बाकी राजकीय स्वार्थासाठी आपल्याला असं वापरलं जातंय, याबद्दल देशातल्या महिलांना काय वाटतंय, ते त्याच जाणोत.
धागा पूर्ण वाचला होता आधीच
धागा पूर्ण वाचला होता आधीच प्रतिसाद दिला नव्हता. या विषयावर माहिती आधी शोधुन माहिती काढली होती पण एकात एक गुंफली असल्याने पूर्ण clarity नव्हती. धागा आणि प्रतिसाद वाचून आली.
आता विधेयक आणणं पूर्ण प्रचारकी स्टंट होता, निवडणुकांचे औचित्य साधले होते, आधीच फलक तयार होते, प्रचारमंत्र्यांनी लगेच देशाला उद्देशून प्रचारी भाषण केले हे मात्र अगदीच उघड आणि सुस्पष्ट आधीपासूनच होतं.
त्यात ५०% समान जागा वाढवून देणार होते तरी बिल पाडले असाही प्रचार झाला.
बिल महिला आरक्षणासाठी नव्हतंच, ते आधीच पास झालंय, आता त्या आडून परिसीमन लादण्याचा प्रयत्न आणि ते पास होणार नाही हे माहीत असल्याने त्याचा फक्त निवडणूकीसाठी वापर केला हे ज्यांना सांगितलं (प्रत्यक्षात) त्यातील अनेकांनी 'अच्छा, ही चाणक्यनीती होती तर!' असे कौतुकाने म्हटले.
महिला आरक्षणाचं काय घेऊन बसलात राव! निवडून येणं महत्वाचं.
महिला आरक्षण राहिलं बाजुला, स्वतःला नारीशक्तीचे पाईक सिद्ध करण्याचा आटोकाट प्रयत्न झाला.
<<भाजप मुंबईचा हा मोर्चा म्हणजे महिला विधेयकाचा जो फियास्को भाजपने केला त्यावरचा शिरपेच.>>>+१
विधेयक आणताना त्यात राजकारण वगैरे होतं मान्य आहे. पण झालेला प्रकार म्हणजे मुद्याचे शस्त्र करून त्यावरून केलेल्या उत्पाताचे उत्तम उदाहरण आहे.
तमिळनाडूचे मुख्यमंत्री
तमिळनाडूचे मुख्यमंत्री स्टालिन यांनी परिसीमनाला तीव्र विरोध केला आहे. आताच केंद्र सरकार विरोधी पक्षांची असलेल्या राज्यांबाबत भेदभाव करतं. योजनांची नावं , हिंदी भाषा लादतं. त्यात परिसीमनाने दक्षिणेकडच्या राज्यांचं तुलनात्मक बळ कमी होण्याची भीती. देशाचं फेडरल स्ट्र क्चर धोक्यात आलंच आहे.
२००२ मध्ये लोकसंख्येच्या असमान वाढीच्या मुद्द्यावरून परिसीमन पुढे ढकललं , तसं ते आताही ढकललं जावं.
हा मुद्दा प्रत्येक निवडणूकीत येईल.
महिला आरक्षणाचा ट्रोजन हॉर्स पुढे दामटताना ओबीसी आरक्षणाला सोयिस्कर बगल देण्यात आली आहे.
बरं. आहे त्या ५४३ -५५० जागांमध्ये महिलांसाठी १/३ जागा आरक्षित करण्यात काय अडथळा आहे? त्या जागा पुरुषांच्या असं समजायचं का?
आणि मनपासारख्या लॉटरी पद्धतीने फिरू दे की जागा. खासदारकी ही जहागिरी असल्यासारखी असली, तरी त्यावर हे कायद्याने मोहर उमटवण्यासारखंच आहे.
या विधेय कावरील चर्चेसाठी
या विधेय कावरील चर्चेसाठी देवेंद्र फडणवीस यांनी विरोधी पक्षाच्या नेत्यांना ओपन चॅलेंज दिलं. सुप्रिया सुळे, प्रणीती शिंदे, सुषमा अंधारे यांनी ते चॅलेंज स्वीकारल्यावर देवेंद्र फडणवीस माझ्या पातळीच्या नेत्याशी चर्चा करतो, असं फडणवीस म्हणालेत का? त्यावरच्या बर्याच प्रतिक्रिया दिसल्या.
सुषमा अंधारे यांची प्रतिक्रिया
देवेंद्रजी तुमचा स्तर नेमका कोणता ?
चातुर्वर्ण व्यवस्थेतून तुमचा स्तर श्रेष्ठ आहे हे सांगू इच्छित आहात की, तुम्ही पदाने मोठे आहात म्हणून आम्हाला तुच्छ लेखत आहात...
पण लक्षात ठेवा, पदाने आणि वयाने मोठ्या असणाऱ्या चांगदेवांना सुद्धा असाच अहंकार झाला होता आणि त्यांनी मुक्ताईला तुच्छ लेखलं होतं... मी मुक्ताईची पायधूळ ही नाही पण चांगदेवाचा अहंकार मात्र आपल्या ठायी आटोकाट भरलेला आहे.
छान लेख. हळूहळू समजुन घेत
छान लेख. हळूहळू समजुन घेत वाचतो आहे.
एक शंका, कदाचित पुढे उत्तर असेल पण तरी विचारुन ठेवतो.
पूर्वी कल्याण-डोंबिवली हे भाग ठाणे मतदारसंघात होते. तेव्हा आधी राम कापसे मग प्रकाश परांजपे निवडुन येत असत. त्यावेळी ठाणे भारतातील सर्वात मोठा मतदारसंघ होता. नंतर २००९ च्या सुमारास ठाण्याचे दोन भाग करुन कल्याण हा वेगळा मतदारसंघ झाला. तर तेव्हा महाराष्ट्राच्या वाटणीच्या (रादर एकुणच देशातील) एकुण मतदारसंघांचा आकडा तेवढेच ठेवून विभाजन झालेलं का?
लोकसंख्या बदलत राहते. दर १०
लोकसंख्या बदलत राहते. दर १० वर्षांनी साधारण प्रत्येक खासदाराने किंवा आमदाराने समान लोकांचे प्रतिनिधित्व करावे म्हणून मतदारसंघ पुनर्रचना केली जाते. त्यात राज्याची लोकसंख्या राज्याच्या कोट्याने ४८ ने भागून जी येईल तितकी लोकसंख्या होतील इतकी गावे एका मतदारसंघात टाकतात. यात जास्त लोकसंख्या असलेल्या शहरी भागात क्षेत्र कमी तर ग्रामीण मध्ये जास्त असा होता. आणि हे तत्व पंचायत समिती व जिल्हा परिषद गण, महानगरपालिका प्रभाग या सगळ्यांना लागू आहे.
महाराष्ट्रात साधारण एक खासदार १८ ते १९ लाख लोकांचे प्रतिनिधित्व करतो. तेच उत्तर प्रदेशात २० लाखावर तर केरळ मध्ये १३ लाख बाकी दक्षिण भारतात त्याच्या जवळपास आहे. म्हणजे लोकसंखेचा निकष निघाला तर उत्तरप्रदेशला केरळ च्या तुलनेत ४०% जागा जास्त मिळतील.
पुनर्रचना करताना भौगोलिक रचना उदा एका नदीचे खोरे एका मतदारसंघात जेणेकरून रस्ते सिंचन वगैरे करणे सोपे जावे, जात, धर्म, मागासलेले, बोलीभाषा, यांना प्रत्येक मतदारसंघात समान प्रतिनिधित्व मिळावे प्रशासकीय सोय उदा एक जिल्हा असेल तर खासदाराला काम करणे सोपे जाते. अशी रचना करावी असे मार्गदर्शक तत्व आहे. याला सत्ताधारी थोडेफार सोयीनुसार वाकवतात. त्यातून मावळमध्ये पनवेल पर्यंतचा काही भाग वगैरे प्रकार होतात. या प्रक्रियेत जनतेचा सहभाग असतो जनता यात सूचना करू शकते पण त्या घ्याव्या हा पूर्ण प्रशासनाचा निर्णय असतो आणि त्याविरोधात न्यायालयात जाता येत नाही. बहुसंख्य जनतेला इतका वेळ किंवा ज्ञान नसल्याने त्यांनी जर अन्याय झाला तर मतपेटीतून उत्तर द्यावे हेच हातात राहते. बऱ्याचदा अन्याय झाला हे कळत पण नाही.
जाताजाता जुन्या काळात साधारण एका देशमुखाला एकाच नदीच्या खोऱ्यात देशमुखी असायची. शिवाजी महाराजांचे बारा मावळचे देशमुख त्यातूनच आले. तेच अजून चालू आहे.
मतदारसंघ पुनर्रचना म्हणजे
मतदारसंघ पुनर्रचना म्हणजे आपल्याला सोयीचे मतदारसंघ बनवायचे. जिथे आपल्याला मतं मिळत नाही त्या भागाचे तुकडे करून दोन ते तीन मतदारसंघाला जोडायचे.
जसे पुण्यात पर्वती आणि बोपोडी मतदारसंघातून मतं मिळत नाहीत म्हणून बोपोडी तोडून तो शिवाजीनगर आणि वडगावशेरी मतदारसंघाला जोडला, तर पर्वतीचे गैर्सोयीचे पॉकेटस कॅण्टोन्मेण्ट आणि अन्य मतदारसंघाला जोडले. पण कमी मतदारसंख्येचा आणि आकाराचा कसबा तसाच ठेवला. हे उदाहरण आहे. असे अनेक ठिकाणी झाले. त्या वेळी शरद पवारांनी राज्य मतदारसंघ फेररचना आफेररच्या माध्यमातून केले आता भाजपला करायचे आहे.
दक्षिणेच्या राज्यांवर अन्याय करण्याचे कारण आता उलगडून सांगायची सूज्ञांना गरज नसेल. बाकी टीसीएस प्रकरणाप्रमाणे इथेही घोडं दामटवणं होऊ शकते.
{मतदारसंघ पुनर्रचना म्हणजे
{मतदारसंघ पुनर्रचना म्हणजे आपल्याला सोयीचे मतदारसंघ बनवायचे. जिथे आपल्याला मतं मिळत नाही त्या भागाचे तुकडे करून दोन ते तीन मतदारसंघाला जोडायचे.}
हे आसाममध्ये झालं आहे.
परिसीमन आयोगावर निवडणूक आयुक्त असतात. सद्य स्थितीत ते किती नि:पक्ष असतील, ते सांगायला नकोच.
कोणत्या जागा महिलांसाठी आरक्षित ठेवायच्या हेही परिसीमन आयोग ठरवणार.
या धाग्यावर आधीच्या
या धाग्यावर आधीच्या प्रतिसादात फेररचना आयोगाचे स्वरूप काय असणार आहे हे मी लिहीलेले आहे असा माझा समज आहे. नसेल लिहीले तर माझी चूक
आक्षेप का आहे त्याचे हे कारण आहे. अर्थात इथे वाद घालणारे अनभिज्ञ असावेत असे मला इतर धाग्यांवरून वाटत नाही. सगळं काही माहिती असताना ते आपल्याला हवी तीच बाजू लावून धरतात असा माझा समज झालेला आहे. चुकीचा आहे हे जर पटले तर माघार घेईन.
जर अन्याय झाला तर मतपेटीतून
जर अन्याय झाला तर मतपेटीतून उत्तर द्यावे हेच हातात राहते.>>> पुर्वी अन्याय झाला असता मतपेटीतून उत्तर देणे शक्यही होते, आता ईव्हीएम आणि निष्पक्ष निवडणूक आयोगामुळे ती शक्यताही मोडीत निघली आहे.
रॉय यांनी प्रतिसादात म्हटलं
रॉय यांनी प्रतिसादात म्हटलं आहे -विधेयकाने सगळ्या राज्यांच्या जागा दीडपट होणार होत्या. एका राज्याला कमी एकाला जास्त नाहीत. आणि लोकसंख्येच्या प्रमाणात देखील नाहीत. मग काय प्रॉब्लम आहे?
ही माहिती चुकीची आहे. मी वर लिहिलं आहेच. पण राज्यांच्या जागा २०११ च्या जनगणनेनुसार बदलणार होत्या. दक्षिणेकडच्या राज्यांच्या जागांचं प्रमाण घटणार होतं.
भाजप नेते आणि समर्थक खोटी माहिती पसरवतात आणि त्याला रॉय यांच्यासारखे लोक बळी पडतात.
हिंदी पट्ट्यातील लोकांनी मोठ्या संख्येने इतर राज्यांत स्थलांतर करूनही त्यांचा लोकसं ख्या वृद्धीचा दर अधिक असल्याने त्यांच्या जागा वाढणार होत्या.
अशा वेळी २००२ च्या परिसीमन कायद्याने जे केलं तेच करायला हवं. राज्यांच्या जागा कायम ठेवाव्या. राज्यांतील मतदारसंघां च्या सीमा तेवढ्या पुन्हा ठरवाव्यात.
माझ्या Submitted by भरत. on 24 April, 2026 - 13:01 या प्रतिसादात विचारले ल्या प्रश्नांची उत्तरे कोणाकडे आहेत का पाहू.
परिसीमनात सगळ्या राज्यांच्या
परिसीमनात सगळ्या राज्यांच्या ५०% जागा वाढण्यात दक्षिणी राज्यांचं कसं नुकसान आहे - शशी थरूर
Naidu ji, let’s try a thought experiment. Say your salary is 2 lakhs and your driver’s is 20,000. You announce a 50% increase for everybody. Your salary is now 3 lakhs and your driver’s is 30,000. The percentage or proportional increase is the same — but aren’t you much better off than your driver, than you used to be?
That’s what your fellow Southern CMs are concerned about. You don’t think there’s any difference between UP’s 80 MPs today versus Kerala’s 20 MPs, if it tomorrow becomes 120 vs 30? Some proportionate difference, huge difference in political weight — with 90 more UP MPs against 10 more Kerala MPs. Is that of no concern to you at all?
शशी थरूर यांचे स्पष्टीकरण
शशी थरूर यांचे स्पष्टीकरण आवडले. @भरत इथे दिल्याबद्दल धन्यवाद.
शशी थरूर यांचे स्पष्टीकरण
शशी थरूर यांचे स्पष्टीकरण आवडले. @भरत इथे दिल्याबद्दल धन्यवाद.
राष्ट्रवादी शरद पवार आता
राष्ट्रवादी शरद पवार आता परिसीमन - डिलिमिटेशन विधेयकाला पाठिंबा देईल.