अम्मा की कसम

Submitted by अविनाश जोशी on 16 April, 2026 - 06:10

अम्मा की कसम
मोहम्मद रफी हा जितका उत्तम गायक होता त्याहून तो अतिशय सज्जन आणि देवमाणूस होता. मोहम्मद रफीने दुखावले आहे असा माणूस शोधून सापडणे विरळच. त्याचा आवाज ही तो ईश्वरदत्त देणगी म्हणत असे. हा त्याचा आवाज दिलीपकुमार पासून ते युथ आयकॉन शम्मी कपूर पर्यंत सगळ्यांनाच सूट होत असे.
पन्नास-साठ च्या दशकात मोहम्मद रफींचे महिन्याचे इनकम सहज सव्वा दीड लाख रुपये जात असे. एवढा पैसा मिळवूनही तो अतिशय साधेपणाने राहत असे. साधं घर, एक अतिशय जुनाट फियाट अशी त्याची राहायची पद्धत होती. त्याची गायकी तर सर्वानाच माहित आहे.
त्याची आई टीबी ने वारली. मरताना तिने रफीला सांगितले होते की तुझी कमाई अल्ला मुळे होते त्यामुळे त्या सगळ्याचा वापर न करता तू गरजवंतांना मदत कर. मेल्यानंतर त्याच्या बँकेच्या लॉकर मध्ये फक्त पावत्यांचा ढीग होता. पाचशे ते दोन हजारापासून ते पन्नास हजारापर्यंत त्या पावत्या होत्या. घरात पैशाला त्याने कधी कमी पडू दिले नाही सर्व आवश्यक खर्च तो निश्चितच करत असे. त्यांची बायको बिलकीस बानू ती त्याच्या काटकसरीवर वैतागायची. पैसे हातात आले की रफी साहेब संध्याकाळी आपली जुनी फियाट घेऊन धारावी भांडुप या झोपडपट्ट्यातून हिंडायचे आणि गरजवंतांना मदत करायचे. एखाद्याचे आजारपण, ऑपेरेशन किंवा आकस्मिक कोसळलेले संकट या सगळ्यांकरिता हा देव माणूस मदत करायला उभा असायचा. कित्येक मदत करणाऱ्या लोकांना बहुतेकवेळा त्याचे नावही माहित नसायचे. मी तुमचा भाऊ आहे किंवा तुमचा मुलगा आहे असेच ते सांगायचे. अशाच मदतीतून काही कुटूंबाना ते मासिक रक्कम द्यायचे. आपल्या बँकेतील मॅनेजरला अशा गरजवंत लोकांची यादी दिली होती आणि त्यातील ठराविक पैसे पाठवण्याची जबाबदारी त्याच्यावर टाकली होती. त्याशिवाय ते पैसे कोण देतय हे त्या बँक मॅनेजरला सांगायची परवानगी नव्हती.
रफीने एक डायरी ठेवली होती. डायरीच्या पहिल्या पानावर लिहलं होत 'अम्मा की कसम'. दिल्लीच्या एका कॉन्सर्ट मध्ये रफीला पन्नास हजार रुपये मिळाले होते. तो तसाच चेक घेऊन एका अनाथालयात गेला आणि त्यांना तो देऊन टाकला. त्याकाळी ही रक्कम फार मोठी होती. पण देताना त्याने स्वतःचे नाव सुद्धा सांगितले नाही. संस्थेने चेक बँकेत भरल्यावर त्याला कळले की तो मोहम्मद रफी होता. मदत देताना त्याच्या डोळ्या पुढे समोरच्याची गरज एवढीच दृष्टिकोन असायचा. एक वेश्या व्यवसाय करणाऱ्या बाईचा मुलगा अतिशय आजारी होता आणि ऑपेरेशनची जरूर होती. रफीने त्याचे ऑपरेशन तर केलेच पण नंतर त्याला छोटे दुकान काढण्यासाठी भांडवल पण दिले. वेश्येला मदत केल्यामुळे त्याच्यावर बणारीच टीकाही झाली पण रफीने मनाला लावून घेतले नाही.
ही त्याची समाजसेवा खरं तर फारच चांगली होती. पण कित्येक समाजकंटक त्यामुळे रफीचे शत्रू बनले. हेच समाज कंटक लोकांच्याकरिता पैसे गोळा करत असत आणि दहा टक्के गरिबांना वाटून नव्वद टक्के उडवत असत. यामध्ये जातीय संघटना आणि राजकीय नेते सुद्धा होते. मुस्लिम लीगचा एक मोठा नेताही त्यात होता. रफी सारखे जर सगळेच जर गरिबांना द्यायला लागले तर त्यांचा धंदा ही जायचा, नाव ही जायचे आणि समाजातील पत ही जायची. बरेच लोकांनी त्याला समजावून सांगितले. या सगळ्या लोकांना त्याचे एकच उत्तर असायचे की माझ्या आईला वचन दिले आहे आणि ते मी पाळतो आहे. शेवटी त्याला धमक्या येऊ लागल्या. बिलकीस बानूच्या कानावरही अफवा जातच होत्या. या सगळ्यात त्याचे अफाट श्रम आणि मदतकार्य चालूच राहिले. हळू हळू रफीची तब्येत बिघडू लागली. डॉक्टरांनी त्यांना विश्रांतीची सल्ला दिला. रफीने सल्ला मानला नाही आणि तो काम आणि मदत करतच राहिला. हळू हळू त्याची तब्येत जास्तच बिघडू लागली. डॉक्टरांनी त्याचे हृदय वीक होत आहे असे सांगून पूर्ण विश्रांती घ्यायला सांगितली.
रफीने आपल्या शाहिद या मुलाला बोलावून घेतले आणि सांगितले की मी माझ्या आईला वचन दिले होते मी माझ्या उत्पन्नाचा बारसा वाटा गरजवंतांना येईन आणि ते वचन मी जन्मभर पाळले आहे. या बँकेत माझे खाते आहे आणि त्या बँक मॅनेजरला ठराविक लोकांना दार महिना ठराविक रक्कम द्यायची माहिती आहे. माझ्यानंतर तू सुद्धा हे काम पुढे चालू ठेवावेस. शाहिद ने वाचन दिले पण म्हणाला, तुम्ही एवढे कार्य करता,पण माझे उत्पन्न कमी असणार मग कसे जमवायचे ? रफी त्याला म्हणाला, त्याची काळजी तू करू नकोस. एकदा तू ठरवलेस की देवच तुला मदत करेल. यानंतर अगदी थोड्याच दिवसात रफी घरी आला आणि त्याला धड उभेही राहता येत नव्हते तो पलंगावर पडलाच. तातडीने त्याला हॉस्पिटल मध्ये ऍडमिट केले. डॉक्टर नेहमीचेच होते पण काही तासातच सुरांच्या या बादशहाने शेवटचा श्वास घेतला.
तो गेल्यावर चित्रपट सृष्टीतले दिग्गज लोकं हजर होतीच पण धारावी, भांडुप, मुलूंड मधील लोकांनी इतकी गर्दी का करावी हे कोणालाही कळत नव्हते. रफी गेल्यानंतर तीन चार दिवसातच त्याच्या घरचे कपाट फोडले गेले आणि त्याची डायरी चोरीला गेली. दहा बारा दिवसांनी शाहिद बँकेत गेला तर त्याला असे कळले की एका जेष्ठ मुस्लिम नेत्याच्या आग्रहावरून मॅनेजरला काढून टाकले आहे. बँकेत कोणीही मॅनेजरचा पत्ता सांगायला तयार नव्हते. बँकेच्या बाहेर पडताना एका चपराश्याने त्याच्या खिश्यात एक कागद टाकला आणि म्हणाला, कुछ भी मत बोलना यहां पर सब लोग डरे हुए हैं. नंतर शाहिद ने पहिले त्या चिट्ठीवर मॅनेजरचा नाव आणि पत्ता होता. शाहिद नंतर त्या मॅनेजरला भेटला, मॅनेजर त्याला म्हणाला, त्यालाही धमक्या येत होत्या आणि शेवटी तो ऐकत नाही असे दिसल्यावर पैसे खाल्याच्या आरोपावरून त्याला बँकेतून काढून टाकले आणि त्याच्यावर केस केली गेली. पण मॅनेजरने हाताने त्या यादीची कॉपी करून घरी नेली होती. शाहिदने एका खाजगी गुप्तहेरा मार्फत वडिलांच्या मृत्यूची चौकशी केली. गुप्तहेराने वडिलांना विषप्रयोग झाल्याचे सांगितले पण तो कोणाचाही नाव सांगू शकला नाही. थोड्याच दिवसात त्याला नवशादचे बोलावणे आले. नवशादने त्याला घरी बोलावले आणि सांगितले की रफीने जायच्या दोनच दिवस अगोदर त्याच्या डायरीची फोटो कॉपी करून त्याला दिली होती आणि ती तुला देण्याबद्दल बजावले होते. आपण आता फार दिवस जगणार नाही असे त्याने नवशादला सांगितले होते. नवशाद हा रफीचा लाडका आणि जवळचा मित्र होता. शाहिद डॉक्टरांना जाऊन भेटला. डॉक्टरनी सांगितले की त्यांना सुद्धा विषप्रयोगाचा संशय आला होता आणि त्याने घरच्यांना पोस्टमार्टम करावे असे सुचवले होते पण सर्व नातेवाईकांनी त्याचे म्हणणे उडवून लावले. डायरी चाळत असताना त्याला एका पानावर नोंद दिसली आज मी एका मित्राकडे चहा घेतला. चहा फारच विचित्र होता. शाहिद ने परत गुप्तहेर नेमला आणि त्याला डायरीतील काही नोंदी दाखवल्या. गुप्तहेराने थोड्याच दिवसात विषप्रयोग करणाऱ्या माणसाचे नाव सांगितले आणि शाहिद हादरला. कारण ते रफीचे जवळचे मित्र होते.
स्वार्थापोटी रफीसारखा सज्जन आणि दानशूर माणूस हकनाक मारला गेला. पण त्याने आपल्या आईचे वचन कधीही मोडले नाही.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users