जिंदगी कोई है पहेली

Submitted by अविनाश जोशी on 11 April, 2026 - 03:25

जिंदगी कोई है पहेली
चित्रपट लेखन, चित्रपट संवाद , खलनायक, विनोदी भूमिका अशा विविध पैलू दर्शविणारा कादर खानचे चरित्र सुद्धा एखाद्या चित्रपटात शोभावे असेच आहे.
कादर खानचा जन्म काबुल मध्ये झाला, त्यांचे दोन्ही मोठे भाऊ आजाराने दगावले होते. कादर खानही सतत आजारी राहू लागले. त्यामुळे लहान कादर खानला घेऊन त्याची आई मुंबईत मामाकडे आली. मामांनी जबरदस्तीने तिचे दुसरे लग्न लावून दिले. हा नवरा दारुड्या होता आणि तापट होता. कादर खानला आईने चांगल्या शाळेत घातले होते. मुलाने शिक्षण घेऊन ऑफिसर व्हावे असे तिचे स्वप्न होते. परंतु वडिलांच्या स्वभावामुळे घरात पैशाचे प्रॉब्लेम येऊ लागले. त्यांच्या आसपासची मुले काही कारखान्यात जाऊन रोज दीड दोन रुपये कमवत असत. इतर मुलांबरोबर तोही एक दिवस कामाला गेला आणि संध्याकाळी दोन रुपये आणून आईला दिले. आई म्हणाली, तू असे उद्योग करत जाऊ नकोस. शिक्षणाचे ध्येय डोळ्यासमोर ठेव. घरातली काळजी सोडून दे. कादर खान परत शाळेत जाऊ लागला. लहानपणापासूनच त्यांचे भाषेवर प्रेम होते. मात्र रिकाम्या वेळेत ते जवळच्या स्मशानात जात असे. स्मशानात बसून ते स्वतःच लिहलेले संवाद अभिनयासकट करत असे. बरेसे लोकं त्याला रोज पाहत असत.
एक दिवस एका नाटकात एक आठ नऊ वर्षाच्या मुलाचा रोल होता. त्याचा दिग्दर्शक शाळेत कोणी मिळतोय का बघायला आला. त्याला काही लोकांनी सांगितले की स्मशानात एक मुलगा काहीतरी हातवारे करून बडबडत असतो. तुम्ही एकदा त्याला पहा. तो दिग्दर्शक स्मशानात जाऊन कादर खानला भेटला. कादर खानचा संवाद आणि कौशल्य त्याला अतिशय आवडले. दिगदर्शकाने त्याला आपल्या नाटकात घेतले. पहिल्याच दिवशी कादर खान दिगदर्शकाला म्हणाला हे संवाद आणि गोष्टी चुकीच्या वाटतात मी दुरुस्त करू का? दिग्दर्शकालाही काहीतरी खटकत होतेच. दुसऱ्याच दिवशी कादर खान नवीन संवाद आणि गोष्ट घेऊन आला आणि ती हिट झाली.
दिवसामागून दिवस जातच होते आणि अखेर तो काही वर्षांनी सिव्हिल इंजिनियर झाला. कॉलेजात असताना त्याचे नाटकात भाग घेणे चालूच होते. पदवी मिळाल्यावर तो एका बांधकाम व्यावसायिकाकडे नोकरीला लागला. चार हजार रुपये पगार ठरला होता. एका महिन्यानंतर त्याने त्या व्यवसायिकाला सांगितले की व्यवसाय अतिशय मंदीत आहे त्याचा पगार देणे त्याला शक्य नाही त्यामुळे त्याने दुसरीकडे नोकरी बघावी. त्याच्या हातात आता पाचशे रुपये पडले आणि तो दुःखी होऊन ऑफिस बाहेर पडला. दुसऱ्या दिवशी तो त्याच्या महाविद्यालयाच्या प्राचार्यांना भेटला आणि झालेली सर्व हकीकत त्याने सांगितली. माझ्या नाटकाच्या छंदाकरिता मला काहीतरी उत्पन्न आवश्यक आहे. प्राचार्य त्याला म्हणाले तू काही वर्गांवर शिकवायला जा. तुला मी पाचशे रुपये निश्चितच देऊ शकेन बाकीचे तुझे तू बघून घे. त्यावेळी कादर खानने दिलेले एक उर्दू नाटक चांगलेच गाजत होते. दोन तीन महिन्यानंतर त्याला एक फोन आला.
कादर खान ?
“हाँ, मैं कादर खान बोल रहा हूँ।
आप कौन बोल रहे हैं?
मैं यूसुफ़ ख़ान।
सर, मैंने आपको पहचाना नहीं।
लोग मुझे दिलीप कुमार के नाम से जानते हैं।”
कादर खान म्हणतो हे नाव ऐकल्यावर माझे हात पाय थरथरायलाच लागले. दिलीप कुमार त्याला म्हणाला,
“मैंने आपके नाटक के बारे में बहुत सुना है। मैं उसे देखना चाहता हूँ।”
दोन तीन दिवसांनी दिलीप कुमारने येऊन नाटक पाहिले. तो कादर खानच्या अभिनय कौशल्यामुळे आणि संवाद फेकीवर प्रभावित झाला. तो कादर खानला भेटला आणि म्हणाला, माझा आता 'सगीना महतो' हा सिनेमा येत आहे. सगीना महतो आणि दुसऱ्या सिनेमात मी तुला भूमिका देतो आणि कादर खानचा चित्रपटसृष्टीत प्रवेश झाला. त्यानंतर त्यांचे लेखनाचे कौशल्यही हळू हळू पसरत जात होते.
मनमोहन देसाईंना 'रोटी' हा अमिताभवर सिनेमा करायचा होता, कादर खानला त्यांनी एकेदिवशी संध्याकाळी बोलावून आणि चित्रपटाचे रूपरेषा सांगितली आणि त्यांना लवकरच पटकथा आणि संवाद हवे असल्याचे सांगितले. कादर खान निघून गेला आणि रात्रभर जागून त्याने आपले काम पूर्ण केले. दुसऱ्या दिवशी सकाळी दहा वाजताच तो मनमोहन देसाईंकडे गेला. मनमोहन देसाईला वाटले त्याना काही खुलासे किंवा डिटेल्स हवे असतील. कादर खानाने काहीही न बोलता आपले झालेले काम त्याच्या पुढे ठेवले. रोटीची कथा वाचल्यावर मनमोहन देसाई नाचायला लागले. त्यानंतर त्यांचे बरेच चित्रपट कादर खान यांनी लिहिले.
लेखक म्हणून त्यांनी २५० पेक्षा जास्त चित्रपटांसाठी संवाद व पटकथा लिहिली. त्यांनी लिहलेले रोटी, अमर अकबर अँथनी, कुली, मुक्कदर का सिंकदर हे चित्रपट प्रसिद्ध झाले. त्याच्या संवादलेखनाची वैशिष्ट्ये म्हणजे प्रभावी संवाद, भावनिक मांडणी आणि प्रेक्षकांशी थेट काळजाला भिडणारे लेखन.
अभिनेता म्हणून त्यांनी ३०० हून अधिक चित्रपटांमध्ये अभिनय केला तसेच कॉमेडी, खलनायक आणि कॅरेक्टर रोलमध्ये विशेष प्रावीण्य मिळवलं. त्यांचे प्रसिद्ध झालेले चित्रपट राजा बाबू, हिरो नंबर वन, दुल्हा राजा होते. अमिताभ बच्चन, गोविंदा, जितेंद्र या प्रमुख कलाकारांसोबतही त्यांनी काम केले. Filmfare Award (Best Dialogue) अनेक वेळा जिंकला आणि हिंदी चित्रपटसृष्टीत लेखक व अभिनेता म्हणून मोठा सन्मान मिळवला होता.
आयुष्याच्या उत्तरार्धात ते आपल्या इरफान या मुलाकडे कॅनडात राहावयास गेले तेथेच 2018 मध्ये त्यांचे दीर्घ आजारामुळे निधन झाले. त्यांच्या जीवनावरील एखादा सिनेमा निघायला हरकत नाही. पण त्याची कथा ही कादर खानानेच लिहायला पाहिजे.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान ओळख.

दुरदर्शनवर पाहिलेल्या कित्येक चित्रपटात् संवाद कादर खान असे लिहुन येई.. स्टंट शेट्टी असेही असे.. सगळेजण मग सरसावुन बसत.. स्टॉरी काहीही असो, पाहायला मज्जा येणार याची खात्री. Happy

खरेच ग्रे ट माणुस. चित्रपटसृष्टीतल्या किती प्रांतात त्याने भटकंती केली!!