आजचे न्यूज चॅनल्स

Submitted by रेव्यु on 10 April, 2026 - 00:03

आजचे न्यूज चॅनल्स
-रवी उपाध्ये
१० एप्रिल २०२६

इथे शोकांतिका बनतात एक प्रहसन
केवळ चुकीच्या भाषेचे प्रदर्शन,
माणसांच्या कठपुतळ्या
आणि त्यांचे विचारशून्य चारित्र्य हनन

मोठ्या एकाग्रतेने
हे विध्वंसावर पोसतात,
मृतदेहांना केवळ प्रेतांत बदलतात
आणि भावनांचा सवंग बाजार मांडतात.

पुन्हा पुन्हा,
वेगाने वाहत्या पाण्यात एक गाडी बुडते,
एक मुलगी रडत रडत थकून जाते,
ठार अंधार्‍या काळोखात
हरवलेले आई बाबा शोधते

अन यावर सुध्दा बातमीदाराचे
क्रूर, निर्लज्ज वर्णन कुरघोडी करते
टाळूवरचे लोणी खाते
आणि विकट ढेकर देते

कोसळणारी छपरे आणि जळणाऱ्या झोपड्या
बातम्यांचे प्रसारण सुरूच राहते.
जळणारी आग, रक्ताळलेले, वाहणारे पाणी
हे इथले सर्वोत्तम दृश्य असते,
या चॅनलच्या तुंबड्या भरते.

किंचाळणारी आकांताने किंचाळत राहते.
निवेदकाची बेफिकिरी-
"आम्ही ब्रेकनंतर अशी आणखी दृश्ये दाखवू."
थेट हत्या पाहा,
फक्त आमच्या चॅनलवर
अशा घोषणा करते.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

बीभत्स?
भयानक व करुण रस आहे ना?

थेट हत्या पाहा,
फक्त आमच्या चॅनलवर
अशा घोषणा करते.>> हो. एक कुठलेसे सदर होते 25-30 वर्षांपूर्वी
त्यात पोनी घातलेला एकजण मोठ्या आवाजात वर्णन करत गुन्ह्यांच्या घटना सांगायचा आणि या सदरची जाहिरात सुद्धा त्याच्या आवाजात व्हायची, आज रात को देखीये कैसे हुआ अत्याचार. रोंगटे खडे हो जाएंगे... कलेजा फट जाएगा... सिर्फ ×××× पे (शो आणि चॅनलचे नाव लक्षात नाही.) तेव्हा नुकतीच सुरवात असावी या प्रकाराची. या सदरात ताज्या बातम्या नसत.
२४ तास बातम्या सुरू झाल्या नव्हत्या तेव्हा. आता या प्रकाराने उच्चांक गाठलाय - की अद्याप उच्चांक बराच दूर आहे कोण जाणे.

आणि तो रस सर्वव्यापी नाही मानव. या कवितेत तो रस सर्वव्यापी नाहीये पण कविता ऑब्जेक्टिव्हली न पाहता माझ्या दृष्टीकोनातून पाहीली तर माझ्या मनात तोच रस फार हायलाईट झालेला आहे.
मुलीने पालकांना शोधणे आणि त्या तिच्या धडपडीची, तिच्यावर ओढवलेल्या प्रसंगाची एक बनाल न्युज मात्र बनवुन विकणे - हे मला कारुण्यापेक्षा बीभत्स वाटतं . फार घॄणास्पद आणि बलात्कारी वाटतं. तेव्हा माझ्यापुरता ते बीभत्सच आहे.

>>> अशा घोषणा करते.>> हो. एक कुठलेसे सदर होते 25-30 वर्षांपूर्वी >>>
बहुतेक सावधान इंडिया असे काहीतरी नाव होते