अवकाळी

Submitted by अनन्त्_यात्री on 6 April, 2026 - 08:17

कंच हिरव्या, ओलेत्या
ओळी तुझ्या पावसाळी
गारपिटीचा आसूड
शिवारात अवकाळी

सांग कशी पावसाची
मला पडेल रे भूल
चंद्रमौळी घरातली
थंडावली माझी चूल

तुझ्यासाठी आभाळीचा
थेंब शिंपलीत मोती
माझ्या पापणीत पूर
बघून पिकाची माती

लेखणीला फुटो तुझ्या
इंद्रधनूचा पिसारा
झुंजण्यास अस्मानीशी
तेवढाच मला थारा

Group content visibility: 
Use group defaults

खूपच सुंदर, संवेदनशील आणि अंतर्मुख करणारी ही कविता आहे! एका बाजूला पावसाचं आणि निसर्गाचं रोमँटिक रूप आणि दुसऱ्या बाजूला त्याच निसर्गाच्या अवकाळी लहरीपणामुळे उद्ध्वस्त झालेला शेतकरी, यांच्यातील विरोधाभास तुम्ही अत्यंत प्रभावीपणे मांडला आहे.

खूपच सुंदर, संवेदनशील आणि अंतर्मुख करणारी ही कविता आहे! एका बाजूला पावसाचं आणि निसर्गाचं रोमँटिक रूप आणि दुसऱ्या बाजूला त्याच निसर्गाच्या अवकाळी लहरीपणामुळे उद्ध्वस्त झालेला शेतकरी, यांच्यातील विरोधाभास तुम्ही अत्यंत प्रभावीपणे मांडला आहे.+१