माझा हरवलेला लाडका पाऊस
रवी उपाध्ये
माझ्या मनात आणि स्वप्नसृष्टीतही श्रावण, भाद्रपद आणि नंतरच्या मार्गशीर्ष अन पौष या महिन्यांना एक विशेष स्थान आहे ( अर्थात अनेक भारतीय प्रथांप्रमाणेच ही नावे अन महिन्यांची ओळख देखील अस्तंगत होत आहे हे सुध्दा तितकेच खरे). कारण त्यांचा उल्लेख होताच माझ्या डोळ्यापुढे एखाद्या स्लाईड शो सारखी खूप मनमोहक चित्रे आणि आठवणी सरकू लागतात.
लहानपणची शाळेतील पावसाची पहिली आठवण माझ्या आवडत्या बेळगावची. तेव्हा पाऊस आमचा की तुमचा असा कानडी मराठी वाद नव्हता.... किंबहुना आज ही कुठल्याही विषयावर तेथील स्थानिक जनतेत असा कोणताही वाद नाही, तो वाद असतो मुंबईत!!! बेळगावचा पाऊस तसा फार बदनाम. एकदा सुरू झाला की तो विजय मांजरेकरची बॅटिंग आणि बापू नाडकर्णीची बोलिंग या सारखा प्रचंड नीरस असायचा ( हे देखील दोन ऐतिहासिक मानव...एक संजय मांजरेकरचे बाबा दिवसेंदिवस बॅटींग करत टेस्ट मॅच अनिर्णित करायचे...आणि दुसरे गुड लेंग्थ बॉलिंग करताना त्याच नाण्यावर सर्व सहा बॉल्स टाकायचे.. त्यांचे बोलिंग अनॅलिसिस सुध्दा ३०-२९- २- १ असे असायचे.) कानडीत त्या पावसाला.... री..री..री..... री पाऊस लागलाय म्हणतात... काही शब्द श्राव्यातून दृक मध्ये सहज जातात. त्यातील हा एक. तर हा पाऊस कसलीही आतषबाजी, धुवांधार फटकेबाजी न करता सतत गळायचा आणि सातत्याने अक्षरश: आठवडे अन आठवडे चालायचा. मग आम्ही चिमुकली मुले ( सन १९५७) मिलिटरी रंगाचा रेनकोट घालून मला ठळकवाडीतील मॉन्टेसरी शाळे जायचो. ( फक्त तो एकच रंग तिथल्या कॅन्टोन्मेंटमधून बाबा आणत आणि आज मिळणारे फुलपाखरू रंग तेव्हा मिळतच नसत). ठळकवाडी कालांतराने टिळकवाडी झाली पण आजही ठळकवाडी असेच म्हटले जाते. लाल मातीतील चिखल, धुतली गेलेली कौलारू घरे, भिंतीवर बाहेर आलेले शेवाळे, पावसात भिजून त्या धूसर वातावरणात दिसणारी ती हिरवी झाडे आणि माश्यांची ( मासे नव्हेत—हाऊस फ्लाइज!!) रेलचेल असा हा पाऊस... पण खूप सुट्ट्या व सण असल्याने खूप आवडायचा आणि निसर्ग विहंगम वाटायचा. बालपणी शाळेतून घरी पोहोचताच मिळणारा गरम लाडू आणि त्याचा घरात दरवळणारा खरपूस सुगंध आजही मनात पिंगा घालतो. त्याने माझ्या बालपणीचे पावसाशी जन्मांतरीचे नाते जोडले आहे.
बेळगावच्या पावसाची आणखी एक आठवण म्हणजे मी केलेला वांडपणा. एकदा काय झाले, अशाच एका री री री पावसाच्या दिवशी शाळा सुटल्यावर सुध्दा शाळेसमोर पावसाने तयार झालेल्या डबक्यात कागदाच्या होड्या सोडण्यात आणि दगड फेकून त्यातला चिखल अंगावर उडवून घेण्यात मी रममाण झालो होतो. वरून पाऊस कोसळतच होता. या शाळेचे लोकेशन म्हणजे अल्याड शाळा, पल्याड कॅन्टोन्मेंट आणि मध्ये अगदी खोलातून जाणारी मीटर गेज रेल्वे लाईन असे होते. देहभान विसरून हा खेळ कुणास ठाऊक किती वेळ चालला होता कुणास ठाऊक. बरं त्या दिवसात शाळेची बस वगैरे भानगड नव्हती. कधी एकेका मुलामुलीची आई ५ -६ मुलांना सोडायला अन न्यायला पाळीपाळीने यायची. नेमेकी त्या दिवशी आमच्या गल्लीतल्या बाई आल्या होत्या आणि त्या मला न्यायला विसरल्या. शेवटी माझी तंद्री उघडली तेव्हा पलिकडे छत्री घेऊन उभी असलेली, आर्ततेने हाक मारत असलेली आई दिसली. मी एकटाच शाळेत उरलो होतो. मी इतर मुलांबरोबर घरी वेळेवर न पोहोचल्यामुळे ती बिचारी चिंताग्रस्त आणि कावरीबावरी झाली होती.धावत जाऊन मी तिला बिलगलो. काळजीचे रूपांतर त्रागा आणि कृतक कोप यात झाले आणि पाठीवर धम्मक लाडू आणि गालावर चापटी मिळाली. अस्मादिकांनी बालसुलभ भोकांड पसरले. घरी गेल्यावर आई सरळ आत गेली आणि दोन्ही हातावर तो अजून गरम असलेला बेसनाचा लाडू ठेवला आणि स्वत:च रडू लागली. आणि असा ते त्या लाडवाचे आणि पावसाचे माझ्याशी नाते!
तिथून मग स्थानांतर झाले कोकणात. आमची बदली महाडला झाली .वडिलांनी ग्रेटर बॉम्बे प्रांताचे विभाजन गुजरात, कर्नाटक व महाराष्ट्रात झाल्यानंतर महाराष्ट्र निवडला. माझी आई विजापूरची, कानडी होती आणि वडिल सातार्याचे.
कोकणातला पाऊस म्हणजे केवळ पाण्याचे थेंब नसून, ते एका जिवंत उत्सवाचे आगमन असायचे. आकाशात काळ्या ढगांची दाटी होताच, पावसाच्या पहिल्या सरी मातीचा तो मखमली गंध दरवळवून जायचा. रिमझिमत्या पावसाने इथला निसर्ग जणू चैतन्याने न्हाऊन निघायचा.
डोंगरकपारीतून कोसळणारे फेसाळते पांढरेशुभ्र धबधबे आणि चोहोबाजूंनी पसरलेली गडद हिरवीगार शाल, हे दृश्य डोळ्यांचे पारणे फेडणारे असायचे. नारळ-सुपारीच्या बागांतून पानांची होणारी सळसळ आणि कौलारू घरांच्या पन्हाळीतून पडणाऱ्या टप-टप थेंबांचा एक वेगळाच नाद घुमत राहतो. डोंगरमाथ्यावर स्थिरावलेले धुक्याचे पांढरे पडदे निसर्गाला एका गूढ सौंदर्याचे कोंदण द्यायचे. खळाळून वाहणारे ओहोळ आणि तृप्त झालेली शेते पाहताना मन प्रसन्न व्हायचे. पावसाच्या या खेळात नद्याही दुथडी भरून साथ द्यायच्या. या निसर्गाचे रूप न्याहाळणे म्हणजे स्वर्गीय सुखाचा अनुभवच! कोकणातला पाऊस म्हणजे सृष्टीने धरलेला तो एक नितांत सुंदर ताल आहे, जो मनाला थेट मातीशी जोडून ठेवतो.
कोकणातील पाऊस असा विहंगम. तसल्या पावसात वडिल पेण, पनवेल, नागोठणा, रोहा अशा गावाच्या जवळील वसलेल्या डोंगरकपार्यातील खेड्यात एक छत्री आणि पावसात टिकणार्या वहाणा घालून शाळांच्या तपासणीला, फिरतीवर जायचे. ते शाळा तपासनीस होते. पाऊस सतत पडायचा. तेव्हा घरी वीज नव्हती. संध्याकाळी आणि विशेषत: पावसाळ्यात गूढ अंधार पडायचा. चुलीवर मऊ भाताचे खदखदता टोप आणि त्या ऊन भातावर तूप, पापड, मेतकूट, लोणचे असे वाढूण घेऊन त्याच चुलीभोवताली बसून जेवण व्हायचे आणि आम्ही नऊच्या आत गुडूप झोपायचो. पावसाचा पत्र्याच्या छतावर पडणार्या थेंबांचा आवाज अजूनही कानात आहे. मग आठवड्यात कधीतरी उशीराने वडिल घरी यायचे. पावसात सतत चालल्याने त्यांच्या बोटांना चिखल्या व्हायच्या. ( एक फंगल इन्फेक्शन). आई ती बोटे गरम पाण्याने हळूवार स्वच्छ करायची. मऊ कापडाने पुसायची. डेटॉल आणि बोरिक पावडर लावायची. आणि रात्री कंदिलाच्या प्रकाशात आणि अजूनही सतत पडणार्या पावसाच्या आवाजात वडिल आपल्या शाळांच्या तपासणीत काय काय गंमती घडल्या हे आपल्या शैलीत आईला सांगायचे आणि आम्ही गोधड्यात गुरफटून हे ऐकत झोपी जायचो. त्यांच्या सांगण्यात कुठेही कुरकुर किंवा निराशेचा भाव नसायचा. सकारात्मकतेचे धडे कदाचित मला तेव्हापासूनच मिळाले असावेत.
त्यानंतर आमची बदली वर्हाडात वाशिमला झाली. वर्हाडात पाऊस नाममात्रच पडायचा. आणि पडला तरी बेळगावसारखा आल्हाददायक आणि कविमनाचा नसायचा. मे मधील बेफाम उकाड्यावर तो रामबाण उपाय असायचा. पंचेचाळीस, सेहेचाळीस अंशावरून तापमान जूनमध्ये पावसानंतर सरळ तीसवर यायचे. मला तो ऍन्टिबायॉटिक्स सारखा वाटायचा. इफेक्टिव पण बिझनेसलाइक. वर्हाडाचा मूळ स्वभाव उकाडा आणि त्या मुळे तो आजच्या डॉक्टरांसारखा फारसा बोलायचा नाही. पेशंटला, “मुलीची ऍडमिशन झाली का?, घराची स्लॅब पडली का? लेकीचं कुठं जमलं का?” अशा शिळोप्याच्या फुरसतीच्या गप्पा तो कधीच करायचा नाही. विशिष्ट काळात, विशिष्ट मात्रेत तो पडायचा आणि निघून जायचा. बेळगाव आणि कोकणातल्या पावसासारखा नसायचा. बेळगाव अन कोकणातला तो बाळगोपाळांशी खेळकर, तरुणांशी रोमॅंटिक बनायचा, आणि कविमनात, “न भुलेगी वो बरसात की रात”, “श्रावणात घन निळा”, “भरलं आभाळ पावसाळी पाव्हणा गं” अशा रचनांचे सृजन करायचा तर “ ती गेली तेव्हा पाऊस निनादत होता” अशा भावनाविव्हल गीतांनी मनाचा ठाव घ्यायचा. तो नुसता पीकपाण्याला मदत न करता उत्तम साहित्य आणि काव्याच्या सृजनात मदत करायचा.
पण या पेक्षाही सर्वात अधिक बेभान करणारा पाऊस म्हणजे हिमाचल आणि उत्तरांचलात मी १०-१२ वर्षांच्या वास्तव्यात अनुभवलेला.
परवानू हे १९८५ साली हिमाचल प्र्देशात शिवालिक पर्वतश्रेणीच्या पायथ्याशी किंवा पायथ्याहून सुमारे १००० फूट उंचीवर वसलेले चिमुकले औद्योगिक खेडे होते, तिथला पाऊस आणि पावसाळा म्हणजे निसर्गाचे मुक्त नर्तनच. इतका मनमोहक नजारा मी कुठेच पाहिला नाही. नभ मेघांनी इतके आक्रमायचे की सकाळी ८ वाजता गुडुप्प अंधार झालेला मी पाहिला आहे. संपूर्ण ऑर्केस्ट्रा घेऊन वरुणराज इथे आगमन करायचे. आधी निरव शांतता, मग हूंम, हुंम करत ढुशी देणारा वारा- ही झाली नांदी. मग कडाडणार्या वीजा. आकाशाच्या पटलावर प्रयोगा आधीची ढगांची लगबग – धावपळ. जमीनीवरचा वारा आता सुसाटायचा. डोंगरावरचे वृक्ष लवलवायचे आणि काही कोलमडायचे. आणि ही नांदी झाल्याबरोबर बाहेर असणार्या सर्वांची धावपळ, जीव मुठीत घेऊन घरी पोहोचण्याची ओढ. आणि मग पर्फॉर्मन्स सुरू. मोत्यासारखे थेंब काही वेळातच हत्तीच्या पायाएवढ्य मुसळधारात बदलून जायचे. पंधरावीस मिनिटातच छोटे छोटे झरे डोंगरात, कडीकापार्यात वाहू लागायचे. आता वारा निवळलेला असायचा आणि वृक्ष आनंदाने डोलू लागायचे. हिरव्या रंगाच्या किती छटा दिसाव्यात! अंधार्या रात्री भिती देखील वाटायची, आजसारखे तेव्हाही वीजेचे दिवे जायचे. पावसात, वीजेच्या शुभ्र प्रकाशात पहाड, डोंगरमाथे आणि सरी चमकायच्या. अचानक ते ओढे, पहाडी भाषेतील सोत ( स्त्रोत ) बलाढ्य प्रवाहात बदलून जायचे.
एकदा जिम कॉर्बेटला गेलो असताना तिथे पोचता क्षणी पाऊस सुरू झाला.पर्जन्यराजाचे इतके रौद्र रूप मी आजपर्यंत पाहिलेले नाही. हे सोत डोंगरावरचे कातळ आणि दगड अशा वेगाने ढकलायचे की खालचा रस्ता आपला रस्तेपण विसरायचा आणि त्यांना निमूटपणे हार मानण्यापलिकडे गत्यंतर नसायचे. त्या दिवशी परत निघाल्यावर वाटेतल्या दाबक्यास ( हा देखील पावसाने निर्माण झालेल्या मोठ्या प्रवाहासाठी पहाडी शब्द) पाहून आमची बिचारी मारुती ८०० बिथरली, तिचा जीव तरी केवढा! आणि आमची गाळण उडाली. मुकाट गाडी तिथेच जवळपास एका ओसाड वर्कशॉप मध्ये सोडली. तिथल्या दरबानाला आम्हाला मुलाबाळांसह पाहून दया आली, त्याने चहा पाजला आणि हिमाचल रोडवेजच्या, ग्राऊंड क्लियरन्स जास्त असल्याने, दाबका क्रॉस करू शकणार्या बसमध्ये बसवून आमची रवानगी केली. “सखी काळ नागिणी, वैरिण झाली नदी” ची प्रचिती आली.
आयुष्याच्या निवृत्तीपूर्व टप्प्यात नाशिकला आलो आणि स्थाईक झालो. नाशिकला चहू बाजूंनी सह्याद्री आणि अंजनेरीच्या पर्वतशृंखलांनी वेढले आहे. गावाबाहेर त्रिंबकेश्वरच्या दिशेने बाहेर पडल्यावर दहा मिनिटातच या बेफाम निसर्गसौंदर्याचा अनुभव होतो. तसे महानगर असूनही इथे अजून बकालपणा नाही. गाव वृक्ष वनराईंनी अजूनही समृध्द आहे आणि म्हणूनच येथील लोक देखील निसर्गासारखेच सहृदय आहेत. हरसूलच्या आदिवासी भागात जाताना तर गर्द वनराई पाहून आपण हरखून जातो. पावसानंतर अचानक निर्माण होणारे धबधबे आणि त्या रस्त्यावर उंचावरून दिसणारी नयनरम्य जलसरोवरे, वाटेत मिळणारी गरम कणसे—पावसाचा हा नजारा अविस्मरणीय असतो.
नाशिकच्या पश्चिमेला पसरलेल्या अंजनेरी, त्र्यंबकेश्वर आणि हरसूलच्या डोंगररांगांमध्ये पावसाळा म्हणजे निसर्गाचे एक जिवंत काव्यच असते. आषाढ-श्रावणात जेव्हा नभ दाटून येतात, तेव्हा इथल्या सह्याद्रीच्या कडांवर जणू ढग विसाव्याला येतात.
अंजनेरीच्या रांगड्या सुळक्यांवर पावसाच्या सरी कोसळू लागल्या की, डोंगर काळपट पाषाणाचे कवच सोडून हिरवा शालू पांघरतात. हनुमानाचे जन्मस्थान असलेल्या या डोंगरावरून वाहणारे पांढरे शुभ्र धबधबे म्हणजे जणू जटांतून सुटलेली गंगाच भासते. वाऱ्याच्या वेगाने हे धबधबे कधी कधी उलट दिशेला उडतात, तेव्हा तो नयनरम्य सोहळा काळजाचा ठाव घेतो.
त्र्यंबकेश्वराच्या ब्रह्मगिरीवरून उगम पावणारी गोदावरी छोट्या ओढ्यांच्या रूपाने खळाळत खाली येते. कातळातून मार्ग काढणाऱ्या या ओढ्यांचा मंजूळ नाद आणि चहुबाजूला पसरलेली धुक्याची चादर एक अनामिक शांतता देऊन जाते. हरसूलच्या घनदाट जंगलात तर पाऊस अधिकच गूढ वाटतो. नागमोडी वळणांच्या रस्त्यांवरून वाहणारे पाणी आणि वनराईतून डोकावणारे छोटे-मोठे प्रपात मनाला मोहवून टाकतात. मातीचा तो ओला सुगंध, झाडांच्या पानांवरून ओघळणारे थेंब आणि डोंगरमाथ्याला स्पर्श करणारे ढग... हे सारे वर्णन करायला शब्द अपुरे पडतात. हा केवळ पाऊस नसून निसर्गाने रेखाटलेले एक अद्भूत चित्र आहे, जे दरवर्षी नाशिककरांच्या मनाला नवसंजीवनी देते.





हा पाऊस म्हणजे झाडांच्या पानातील ती टिपटिप. उन्हाळ्यात रणरणत्या ऊनात धरतीला त्या पावसाचा स्पर्श होतो तेव्हा ती आपली कृतज्ञता एखाद्या मीलनोत्सुक युवतीच्या मीलनपूर्तीनंतरच्या अविर्भावाप्रमाणे अनेक प्रकारे व्यक्त करते- गंधातून, रूपातून, स्पर्शातून. उंच पर्वतावरून लवलवत येणारे झरे, पर्वतराजीत वाहणारे सोत आणि दाबके, ते नुकतेच न्हालेले वृक्ष त्यावर विहंग करणारे द्विज – सगळंच प्रसन्न करणारं. अन अशा प्रसन्न वातावरणात आगमन करणारे आपले सण. निसर्गाच्या या मीलनपूर्तीस साजरा करणारे साथ देणारे आपले परंपरागत तीज, मंगळागौरी, सावन के झुले आणि त्याच्याशी जुळलेली विरहगीते, अबके सावन घर आ जा!!अनेक लोकगीते, माहेराला न जाऊ शकणार्या अजूनही पोरसवदा नवरीची विराणी.
आज मात्र जेव्हा पाऊस अनुभवायला या अशी सवंग जाहिरात मला दिसते तेव्हा मला वाटतं की माझा सावन, बरखा, आणि पावसाळा देखील पेटंटेड आणि ग्यारंटीड एक्स्पिरियन्स म्हणून बाजारात विकायला ठेवला आहे.
माझ्या पहाडातील, कोकणातील, बेळगावच्या काळात माझ्या मुलींबरोबर, माझ्या अंगणात येऊन विसावणार्या सलगी करणार्या मेघराजांना इथून निघून जाऊन अकाळी, अवकाळी आगमन करावेसे तर वाटत नाही ना? आणि होय तसेच झाले आहे! ते दूर देशी डोंगरामागे लपतात आणि आपल्या शतकानुशतकांच्या देहधर्माला विसरून वेळी अवेळी अवतीर्ण होतात आणि आपण त्याला “अवकाळी अवदसा” म्हणतो. निसर्गावर केलेल्या अत्याचाराची परिणती एका काव्यमय आणि हळुवार अनुभवास मुकण्यात झाली आहे.
कालाय तस्मै नम:!
पावसाचं वर्णन फार सुंदर केलं
पावसाचं वर्णन फार सुंदर केलं आहे तुम्ही.
मी लहानपणी अनुभवलाय तो कोकणातला पाऊस. जुलै-ऑगस्टमधे अक्षरशः कोसळायचा. कधीकधी सकाळपासूनच. कधीतरी संध्याकाळी दमल्यासारखा थांबायचा आणि वातावरणात एक निळाई पसरायची. हे दिवस भाताच्या लावणीचे. सगळे गावकरी दिवसभर शेतात प्रचंड कष्ट करून दमून घरी आलेले असायचे. चुली पेटलेल्या असायच्या. त्या धुराचा वास आणि ही निळाई. आहा!
खूप छान वर्णन आणि आठवणी
खूप छान वर्णन आणि आठवणी पावसाच्या.
पाऊस मला ही कोणत्या ही गावातला आवडतोच पण सर्वात जास्त आवडतो कोकणातला.
वावे छान प्रतिसाद.
अख्खा लेख अतिशय सुंदर झाला
अख्खा लेख अतिशय सुंदर झाला आहे. तुमच्या लेखनातला मला सर्वाधिक आवडलेला लेख.
पावसाच्या वर्णनांचा प्रत्येक परिच्छेद दोनदा वाचला. आवडलेली वाक्ये सांगायची तर अर्धा लेख लिहावा लागेल. म्हणून एकच लिहितो - कोकणातला पाऊस म्हणजे केवळ पाण्याचे थेंब नसून, ते एका जिवंत उत्सवाचे आगमन असायचे
बेळगाव म्हटल्यावर मला आपले गुरुनाथ आबाजी कुलकर्णीच आठवतात.
त्यातलं क्रिकेटप टूंचं वर्णन वाचताना नकळत एक स्मित उमटलं. बापू नाडकर्णींबद्दल वाचलं आहे. पण विजय मांजरेकरांच्या फलंदाजीबद्दल नाही. मुलाने तोच वारसा फलंदाजी आणि समालोचन दोन्हीत उचललेला दिसतो.
आधी धपाटे आणि मग लाडू हे त्या काळातल्या आयांचं अगदी व्यवच्छेदक लक्षण म्हणायला हवं.
श्रावणात घन निळा तुम्ही वर्हाडात नेऊन ठेवलंत. पण ते लिहिणारे पाडगावकर वेंगुर्ल्याचे आणि मुंबईत लोकलने प्रवास करणारे. या गीताचा काहीतरी संबंध मुंबई लोकलशी आहे असं आठवतंय.
अस्मादिक हा शब्द उगाच घुसडलेला वाटतो. विहंग , विहंगम म्हणजे सुद्धा पक्षीच. आणि माशीचे अनेकवचनी सामान्यरूप माश्यां - जसे राणीचे राण्यां
खुप सुंदर लिहिलंय! टिपीकल
खुप सुंदर लिहिलंय! टिपीकल पाऊस म्हणजे भजी चहा न लिहिता काहीतरी छान वेगळं वाचायला मिळालं.
खूप छान लिहिलंय !!
खूप छान लिहिलंय !!
भरत जी
भरत जी
मन:पूर्वक आभार
< विहंग , विहंगम म्हणजे<<
विहंग म्हणजे पक्षी
विहंगम म्हणजे सुंदर
काय सुंदर लिहीले आहे! सगळे
काय सुंदर लिहीले आहे! सगळे वर्णन आणि त्यातले वैविध्य एकदम चित्रमय झाले आहे!
सुंदर लेख! चार पाच वर्ष नासिक
सुंदर लेख! चार पाच वर्ष नासिक त्र्यंबकेश्वर पावसाळ्यात प्रवास केलाय… फोटो व वर्णन वाचून आठवणी ताज्या झाल्या. धन्यवाद!
चित्रदर्शी वर्णन असलेला
चित्रदर्शी वर्णन असलेला पावसाळी लेख
आवडला
मी कोल्हापूरचा पाउस अनुभवलाय लहाणपणापासून.
बेळगाव सोबत त्याचे साधर्म्य असणार कारण तेच घाटमाथ्यावरील प्रदेश.
नंतर नोकरीनिमित्त पुणे जिल्हा. इथेही पाउस छानच.
हल्ली मात्र भिती घालतोय पाउस.
कमी वेळात जास्त पडतो आणि महापूर आणतो.
सगळ्यांचे मनापासून आभार
सगळ्यांचे मनापासून आभार
वा! काय सुन्दर वर्णन
वा! काय सुन्दर वर्णन ठिकठिकाणच्या पावसांचे. किती सुंदर रूपक.
दोनदा वाचला लेख, सलग.
काय सुंदर लिहिलंय!
काय सुंदर लिहिलंय! आधीच पाऊस म्हंटलं कि मनाचा हळवा कोपरा.
सुंदर लेख.. कोकणातला पाऊस
सुंदर लेख.. कोकणातला पाऊस वर्णन अगदी बदाम बदाम.. आणि मुंबई मरीन ड्राईव्ह येथील पाऊस सुद्धा बदाम बदाम.. बाकी मी काही फार जग फिरलो नाही. पण नाशिक सोबत सुद्धा रिलेट करता आले. योगायोग म्हणजे हा लेख वाचायच्या आधीच नाशिक मधील झाडे तोडली म्हणून दोन बायकांचा रडतानाचा व्हिडिओ बघून आलो. येत्या काळात पाऊस कुठे कसा राहील याची खात्री नाही. आहे तोपर्यंत उपभोगून घ्या
ज्या प्रकारे वृक्षतोड होत आहे
ज्या प्रकारे वृक्षतोड होत आहे, या पुढे केवळ लेखच लिहावे लागणार आहेत.... गतकालविव्हल होऊन
फार मस्त झालाय लेख.
फार मस्त झालाय लेख.
>>>>कोकणातला पाऊस म्हणजे केवळ पाण्याचे थेंब नसून, ते एका जिवंत उत्सवाचे आगमन असायचे. आकाशात काळ्या ढगांची दाटी होताच, पावसाच्या पहिल्या सरी मातीचा तो मखमली गंध दरवळवून जायचा. रिमझिमत्या पावसाने इथला निसर्ग जणू चैतन्याने न्हाऊन निघायचा.
बालपण उत्सवीच असतं.
पहीले अनुभव. मला गवताच्या पात्यावरचे चमचमणारे थेंब पहायला फार आवडे. आपण उंचीने ही लहान असतो तेव्हा त्यामुळे आपला पॉ इन्ट ऑफ व्ह्यु वेगळा असतो. आपल्याला जमिनीवरचे गवत, पाती, फुलपाखरे सहज दिसतात.
पिसे साफ करणारे गुबगुबीत पक्षी. पावसाळ्यात उडणार्या त्या माश्या. आणि त्यांना खाणारे पक्षी. अर्थातच मातीचा गंध, डबक्यातले टॅडपोल याईक्स!!! मुलं धरायची बाई त्यांना दूधाच्या प्लास्टिक पिशवीत. तसलं काही मी केले नाही.
सुंदर लेख!
सुंदर लेख!
अप्रतिम झालाय लेख!
अप्रतिम झालाय लेख!
कोकणातला पाऊस दोनदा अनुभवलाय.
कोकणातला पाऊस दोनदा अनुभवलाय.
एकदा रात्री मी आणि माझा एक भाऊ रत्नागिरीला रात्री बाहेर पडली होतो काही आणायला.. आणि हत्तीच्या पावलांचा पाऊस म्हणजे काय ह्याची प्रचिती आली. मी खूप भरले होते...
असच रौद्र रूप सिमल्याला बघायला मिळालं होतं. उन्हाळा होता, आम्ही बसने हॉटेलवर पोहोचत होतो,. आणि अचानक सगळीकडे अंधार झाला.. आणि धुवांधार पाऊस सुरू झाला, मोठ्या गडगडाटासह..
नरिमन पॉईंट चा वर उल्लेख आलाय..
एकदा वरळी सी फेस ल आला उतरले ,सात साडेसातची वेळ असावी. बहुदा चुकीच्या स्टॉपवर उतरले होते... रस्त्याच्या पलीकडे काळा कभिन्न समुद्र, आणि वळसा घालून गेलं की नेहरू सेंटर चे प्रवेशद्वार.. आणि तेवढ्यात पाऊस सुरू झाला असाच खूप मोठा... वाऱ्यात छत्रीचा तसही फारसा उपयोग नव्हता... बहुतेक दहाच मिनिटे चालावं लागलं असेल.. पण इतके भीती वाटलेली.. अनोळखी जागा, रात्र, वर - पाऊस याचा एकत्रित परिणाम असावा.
***
दुसऱ्यांदा जेव्हा पावसाळ्यात कोकणात गेलेले तेव्हा सगळ इतकं सुंदर होतं, एखाद्या चित्रासारख..
लाल मातीमुळे सगळीकडे दिसणार लालसर/ चॉकलेटी पाणी, पाचूसारखी हिरवीगार झाडी, शुद्ध हवा, प्रसन्न वातावरण! तेही कायमच लक्षात राहिलं.
तुमच्या या लेखानिमित्तान मी अनुभवलेल्या पावसाच्याकही आठवणी जागृत झाल्या.
सुंदर लेख.. मन चिंब झालं.
सुंदर लेख..
मन चिंब झालं.