उदासी

Submitted by भरत. on 12 March, 2026 - 10:31

तळजाई गटगमध्ये गझल लेखनाचा विषय निघाला होता. त्यावरून आठवलं. कॉलेजात असताना लायब्ररीतून घेऊन रंग माझा वेगळा वाचलं होतं. त्यातल्या अनेक कविता वहीत उतरवून घेतल्या होत्या. प्रस्तावना वाचली असावी. पण शेवटी दिलेली गझलेची बाराखडी वाचली नसावी. कारण रदीफ , काफिया हे प्रकरण बरंच नंतर समजलं. तर तेव्हा गझल लिहून बघावी असं वाटलं होतं आणि एक लिहिली. काही शेरांत अलामत भंगली आहे. त्यावर माझी शाळाही घेतली गेली होती.
सहज वृत्तात लिहिणं हे मला कधी जमलेलं नाही. शब्द ठोकून बसवावे लागतात, बदलावे लागतात. भरीला अक्षरं घालावी लागतात. शब्द रचावे लागतात. ही गझल मी मायबोलीवर नवीन होतो तेव्हा , नेमकं सांगायचं तर आजपासून १६ वर्ष ३ दिवसांपूर्वी प्रकाशित केली होती. मला बर्‍या वाटलेल्या माझ्या इतरही कविता प्रकाशित केल्या. त्यातल्या बहुतेक कॉलेजात असतानाच लिहिल्या. पुढे कदाचित मायबोलीवरच्या कविता वाचल्यावर आपल्या कवितांना काही अर्थ नाही असं वाटल्याने असावे , पण बहुतेक कविता अप्रकाशित केल्या. तेव्हा मायबोलीवर ती सोय होती. टप्प्याटप्प्याने लेखन करून ते सेव्ह करत अप्रकाशित ठेवता यायचे. आणि पूर्ण झाले की प्रकाशित करायचे. अप्रकाशित केलेल्या कविता अर्थात मला(च) दिसतात. कॉलेजच्या दिवसांतली ती डायरीही अजून आहे.
तर ती ही गझल. उगाच त्या दिवसांच्या आठवणी म्हणून आता प्रकाशित करतो आहे.

एकांत पांघरोनी मीही कधी निजावे
अश्रूंत रंग सारे स्वप्नातले भिजावे

भावार्त गीत व्हावे अस्पृष्ट जाणिवांचे
अर्थास भेटु जाता ते शब्द का थिजावे?

अश्रूंत ओवुनिया धागे तुझ्या स्मृतींचे
साहीत वेदना मी नावां तुझ्या भजावे

हृदयात दाटलेले सांगू नयेच कोणा
गाऊ नयेच काही, ना मैफली सजावे

हो गंधही नकोसा श्वासास कोंडणारा
माहीत चंदनाच्या खोडा, कसे झिजावे

बोलावया धजावे, सामोरता बुजावे
अंतरीच्या स्वरांनी दृष्टीतुनी रुजावे

मी गात नाही काही, नाहीत हे तराणे
हृदयातल्या कळांनी ओठांत येत जावे

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

नवीन लेखनाच्या यादीत 'भरत+उदासी+गझल' हे दिसलं, दचकून डोळे चोळून पुन:पुन्हा खात्री केली तरी तसंच दिसत राहिलं!
मग काय, वाचली झालं! Proud

चांगला प्रयत्न आहे. गझल फॉर्ममधली कविता म्हणता येईल माझ्या मते. Happy

>>> अंतरीच्या स्वरांनी
इथे वृत्तभंग झाला आहे.
अलामतभंग टाळायची युक्ती हवी असेल तर कोपर्‍यात सांगेन. Proud

आता काव्यलेखन रीव्हिजिट केलंच आहेस तर पुन्हा लिहायला लाग. Happy

तेव्हा कवितासंग्रहच वाचायचो म्हणून सुचायच्या. त्यातून कॉलेजातले फुलपंखी दिवस. कविता सुचायच्या असं वाटायचं ते भास होते. शान्ताबाईंवरच्या लेखात लिहिलं आहे. कोणाच्या वाचलेल्या कवितांवरून काहीतरी नकळत सुचायचं. म्हणजे ती कविता समोर ठेवून प्रेरणा घेऊन असं नाही.

आता धीर चेपलाय तर त्या जुन्याच कविता पुन्हा प्रकाशित करेन.

तुझी गझल कार्यशाळा माहीत नव्हती. नंतर कधीतरी वाचली तेव्हा मजा आली.

त्या काळात इथे लिहिणार्‍या गझलकारांशी टोळीयुद्ध झालं होतं Lol माझ्या गझलेवरून नाही. कशावरून ते कोपर्‍यात सांगेन.

हे लोक गझल वाचताना लाल शाईचं पेन आणि कॅलि पर घेऊन बसतात असा मी टोमणा मी मारला होता, ते आठवलं.
कोणाकोणाच्या गझलेला वृत्तबद्ध गद्यही म्हटलं होतं.

अश्रूंत ओवुनिया धागे तुझ्या स्मृतींचे << अहाहा ! खयाल!!

मस्तच लिहिलीय. आवडली.

जुन्याच कविता पुन्हा प्रकाशित करेन. << येऊ द्यात.