१. 'मोहब्बतें'
इष्क आणि दहशत ह्यात अंतिम विजय कशाचा ?
प्रश्न गंभीर आहे. डेंजरस क्वेश्चन टू आस्क.
गुरूकुल नामक देशातली एक टॉपची शिक्षणसंस्था. एखाद्याला तिथून काढून टाकले की नंतर कुठेच प्रवेश मिळणार नाही. शाखा तीन-चार सर्वश्रेष्ठ विद्यापीठांच्या ऑफर्स धुडकावत गुरूकुलात येतो. ॲजे म्युझिक टीचर. किंवा इष्काचा संदेश घेऊन आलेला प्रेषित. शिकवण त्याची साधी सरळ आणिक सोपी. आपापल्या दिलाचं ऐका. जा, प्रपोज करा, इष्क करा, मझा करा. ढिले पडू नका. पार पिच्छा पुरवा तिचा. शाखाच्या गाठीशी 'डर'चा अनुभव आहे.
प्रेषित शाखा तीन वासरांच्या कानात वारं फुंकतो. वासरे उधळतात. इष्कासाठी मौके मुबलख. होळी, शाखाच्या बड्डेची पार्टी, डॅन्स कॉम्पिटिशन, विद्यार्थ्यांसाठी कमवा-शिका योजना. शोधणाऱ्याला हजार वाटा.!
बच्चनचे म्हणणे, होळी, पार्टी, कमवा-शिका काय काशी करायची ती बाहेर करा. पण रात्री दहाच्या आत माघारी या. नाहीतर मग इथली परंपरा प्रतिष्ठा अनुशासन असे सगळे खांब कोलॅप्स होतात.
प्रिती झिंगानियाचा नवरा हवाई दलात पायलट. तो युध्दात बेपत्ता. रिटायर्ड मेजर जनरल अमरीश पुरी प्रीतीचे सासरे. सख्त बंदा. सात वर्षं आस लावून बसलेत की पोरगा माझा जिवंत परत येईल. तोपर्यंत सुनेने सवाष्णीसारखंच राहावं, जास्त टामटिम करू नये, अशी अपेक्षा. प्रीतीला करवा-चौथला प्रॉपर लाल साडी कुंकू मंगळसूत्र आदि कॉस्च्युमसह रेल्वे स्टेशनवर नवऱ्याची वाट बघावी लागते. एवढी टोकाची भूमिका कॅप्टन बाजीराव रणगाडेंनी पण घेतली नव्हती. 'सौदामिनी, आधी कुंकू लाssव' एवढी क्षुल्लक मागणी होती त्यांची. तीपण फुलफिल करता करता फेस आलेला. बिच्चारे अशोक रणगाडे.
बच्चन-कन्येचे शाखासोबत प्रकरण. आपल्या कन्येस नादाला लावणारा पोरगा प्रत्येक बापाला छपरी वाटतो. हे स्वाभाविक आहे. जावई आणि सासरा हे नातेच वाकडे, त्याला बच्चन काय करणार? समाज-संस्कृतीत सगळेच इरावती कर्व्यांनी म्हटल्याप्रमाणं, 'गौराई आमची बाळाई अन् सकरूबा आमचा जावाई' या लेव्हलला जाऊन बघू शकत नाहीत. असो.
शाल पांघरलेले आणि कपाळावर नामाटी ओढलेले बच्चन एकदम भारी, धीरगंभीर दिसतात. ऋन्मेषशेठ काहीही म्हटले तरी ॲक्टिंगमध्ये डायलॉगबाजीमध्ये बच्चन शाखाला कसेच आटपत नाईत. कच्चं खाऊन टाकतात. ही फॅक्ट आहे. कबूल करा आणि विषय संपवा. प्लीज.!
अर्थात, शाखाची बाजू इष्काची असल्याने आणि इष्क ही एक शाश्वत भावना असल्याने ती जिंकते. इष्काचे जे सोसाट्याचे वारे वाहायला लागतात त्यात गुरूकुलाच्या पायाचे दगड हलायला लागतात. समूळ निखंदून पडतात. दहशतीचा पाडाव होतो. असं सगळं.
२. 'जोगवा'मधली मुक्ता बर्वे. अल्लड, पोरगेली.
तुम्हीपण तेव्हा मासूम असता. 'लल्लाटी भंडार' गाण्यामध्ये पारिजातकाच्या झाडाखाली ओलसर फुलांचा सडा पडलेला, आणि त्यावर स्वतःच्या तालावर एकटीच डोलत असलेली वेल्हाळ वेल्हाळ मुक्ता आवडते. पुढे मग तिचे एकेक एक्सप्रेशन्स, एकेक विभ्रम रिवाईंड करून करून बघता अधूनमधून. हिच्यामध्ये एक शांत गुरूर आहे आणि स्वतःवर पूर्ण विश्वास असल्याशिवाय असा तोरा शक्य नाही, याचा शोध लागतो. तुम्हाला क्रश वगैरे होतो गुप्त. इंटर्नल अफेअर. अंतर्गत कारभारात कुणाचा हस्तक्षेप मान्य करता येण्यासारखा नसतो. (आभार : युएन चार्टर)
ओल्ड स्कूलवाल्यांप्रमाणे पासवर्डमध्ये तिचे इनिशियल्स गुंफण्याएवढी मजल जात नाही समजा. पण लॅपटॉपच्या वॉलपेपरवर तिच्या अदा ठेवण्याची सूट तर स्वतःला दिलीच जाऊ शकते. काही नाही. बरं वाटतं. मस्त वाटतं बघितल्यावर.
'अब अदम का ये हाल है हर वक़्त,
मस्त रहता है, चूर रहता है'
वगैरे.
पुढेही अधूनमधून तुम्ही तिचे सिनेमे पाहत असता, नाही असं नाही. पण मधल्या काळात तुमचं वय अचानक दहा-पंधरा वर्षांनी वाढून बसलेलं असतं. ते ठीकच. परंतु आपल्यासोबत मुक्ता बर्वेचं पण वय पुढं सरकत चाललंय, हे काही बरोबर नाही, असं तुम्हाला वाटतं. पारिजातकाच्या झाडाखालच्या त्या नाचऱ्या डोळ्यांच्या मुलीचं रूपांतर हळूहळू धारोष्ण उमललेल्या स्त्रीमध्ये होण्याच्या प्रक्रियेच्या दरम्यान जुन्या अत्तरासारखं जे काहीतरी हरवून गेलं आहे, त्याबद्दल तुम्हाला पर्सनल नाराजगी वाटते. तिचं असणं निरंतर तसंच रहायला पाहिजे, असंही वाटतं. दिलकश, सहज, खुशमिजाज, अवखळ, तल्लख, डेंजरस, फेमिनाईनली मिस्टेरियस असं सगळं संमिश्रण वगैरे.
३. 'गार डोंगराची हवा न् बाईला सोसंना गारवा..'
कसं कुणास ठाऊक अल्गोरिदम्सनी बऱ्याच वर्षांनी छगन चौगुलेंचं लोकगीत समोर आणलं. तर्जनी टेकवून चालू केलं तर कानांवाटे पहिल्यांदा आत उतरत गेला तो आवाजातला रॉ नेस. स्वच्छ साधा सरळ आरपार कापत जाणारा रॉ नेस. कसलीही कसर नसलेला आणि कुठलाही बडेजाव नसलेला. प्युअर.
साथीला पारंपरिक वाद्यांचा पुढं पुढं खेचत नेणारा, संमोहित करणारा रिदम; आणि गायकानं वाद्यांशी संलीनता साधत शब्दांवर केलेला हुकुमी आघात.
साद घालताना जवळ फक्त सच्चेपणा असला तरी पुरेसा आहे. बाकी सरंजाम असला काय नसला काय.
४. बाबा बुल्लेशाह यांचं 'मेरा पिया घर आया ओ लाल नी'
आणि गाणारे नुसरत फतेह अली खान नावाचे जिनियस.
प्रभुमिलनाच्या भावविभोर स्थितीचं निरूपण करत आहेत.
कधी नव्हे तो हा चमत्कार घडला आहे. जीवीचा जीवलग माझ्या घरी आला आहे. मी याच क्षणाची न जाणो किती अनंत काळ प्रतीक्षा करत होतो, न जाणो कधीपासून विरह वेदना सहन करत होतो. तेव्हा कुठे आता कृपा झाली आहे.
मेरा पिया घर आया ओ लाल नी..
आणि आता त्याचं आगमन झालंच आहे, तर पुन्हा कधीच वियोग होऊ नये, हे क्षण निसटून चालल्याची आठवणही होऊ नये, अशी इच्छा आहे. म्हणून सगळी घड्याळं काढून फेकून द्यायला सांगताहेत.
रैण वसल दी पिआ घटावे, घड़िआली दिओ निकाल नी..
कुणी जर मला विचारेल की आत्ता माझ्या मनात काय भावना आहे? काय पाहिजे आहे मला आत्ता?
मेरे मन दी बात जो पावे, हत्थों चा सुट्टो घड़िआल नी..
तर मला आता हे क्षण-क्षण काळाचं बंधन नको आहे. माझी काळाची जाणीवच मिटून जायला हवी आहे.
रैण वड्डी क्या करे पसारा, दिल अग्गे पारो दीवाल नी.
बुल्लेशाह धमकी देतायत सूर्याला की तू जर माझं ऐकलं नाहीस आणि या रात्रीनंतर उद्या पुन्हा उगवलास तर मी भिंत उभी करेन तुझ्यापुढे.!
(सदर मैफिलीची यू ट्यूब लिंक ) :
https://m.youtube.com/watch?v=qoqlJGOQtuQ&list=RDqoqlJGOQtuQ&start_radio...
कातील
कातील
वाचलं.
वाचलं.
छान.
छान.
या भागातल्या नोंदी जरा
या भागातल्या नोंदी जरा सुसूत्र आहेत. कमी आवडल्या.
आवडल्या ह्या ही
आवडल्या ह्या ही
बाजीराव रणगाडे
मुक्ताचे त्या चित्रपटात असलेले हावभाव
सगळंच पटलं आवडलं
छान.
छान.
हे ही चांगल लिहील आहे.
हे ही चांगल लिहील आहे.
ऋणमेश भाऊंनी वाचल की धागा १०० क्रॉस करणांर हे निश्चित
चांगले लिहिले आहे.
चांगले लिहिले आहे.
मुक्ताबद्दलचे लिहिलेले छान, आवडले.
नेहेमीप्रमाणे या नोंदीही
नेहेमीप्रमाणे या नोंदीही आवडल्या.
मुक्ताविषयीच लेखन जास्त आवडलं!
छान !
छान !