नसतेपण - प्रकरण एक

Submitted by संप्रति१ on 3 March, 2026 - 16:18

माझं जीवन म्हणजे एक खुला ग्रंथ आहे, असं गांधी म्हणाले होते. माझं जीवन हा एक मोठा जोक आहे, असं मी मानतो.
साधारण पस्तीस वर्षांपासून सुरू असलेला हा लांबलचक जोक सहन करण्याबद्दल एखादा ॲवॉर्ड असेल तर माझ्या नावाची घोषणा करायला हरकत नाही. म्हणजे मला तो पटकन नाकारता येईल.

आपण खरंतर फार पूर्वीच टोकाचं पाऊल उचलायला हवं होतं, अशा निष्कर्षाप्रत पोहचूनही आता जमाना झालेला आहे. पण ही चूक काय नंतर कधीही दुरूस्त करता येण्याजोगी आहे. एकतर आत्ता सकाळ होते आहे आणि सकाळी सकाळी कुणी टोकाचं पाऊल उचलत नाही. माझ्या तरी ऐकण्यात नाही. पण हेही खरंय की खिडकीबाहेर ज्या चिमण्या चिवचिवत आहेत, त्यांच्या गाण्यांनी माझ्या आत काहीही नाचत नाही. ती क्षमता बहुदा मी हरवत चाललो आहे.

बाकी मग यूट्यूब, इन्स्टा किंवा सोशल मीडियावर जाणंही बंदच झालंय. तिथे सतत कसली ना कसली धुमश्चक्री चाललेली असते. लिबरल इनफ्लूएन्सर्स रोज रात्री भाजपची सत्ता घालवूनच झोपायला जातात. आणि संघदक्ष इनफ्लूएन्सर्स हिंदुराष्ट्राचा नवा डंका वाजल्याची खुशखबर सांगून भक्तांची डोपामाईनची पातळी घसरणार नाही, याची सतत काळजी घेतात. योगक्षेमं वहाम्यहम्.! लढा बिनधास्त. बुद्धीची वगैरे काळजी करू नका. ती आमच्या चरणी वहा.
दोघांच्याही आरोळ्या आपापल्या इकोचेंबर्समध्ये एकशे वीस डेसीबलच्या तीव्रतेनं घुमत राहतात. आणि हे बघत बसणारे करोडो महान लोक आपल्याकडे आहेत. काय पाच किलो आटा सरकारी आहेच, डाटाचा महिन्याचा रिचार्ज मारला की बाकी मग दारूबिरूची सोय आमची आम्ही करतो म्हणत असणार. आपापल्या डिजिटल विश्वात भांग मारून मस्त मज्जानु लाईफ चाललेली आहे.

आणि दुसरं कारण म्हणजे ही गोष्ट अनायसे लिहायला सुरुवात केलेलीच आहे तर आधी ती पूर्ण करावी म्हणतो. नाहीतर पोलिस लिपिक नंतर पंचनाम्यात ठोकून देतात की गोष्ट पूर्ण न करता आल्याच्या नैराश्यातून मयत इसमाने टोकाचे पाऊल उचलल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. पोलिसांचं काय सांगता येतंय का या देशात?

नक्की आठवत नाही, पण बहुतेक तुर्गनेव्हनं त्याच्या एका कादंबरीच्या सुरुवातीला अशाच प्रकारे मृत्यूघोषणा केली होती. परंतु त्यात प्रेमभंग वगैरे भावनिक गुंताडा होता. कादंबरी लिहिता यावी म्हणून त्यानं जोरदार ब्रेकअप केला असण्याचीही शक्यता आहे. आपलं तसलं काही नाही. मला काही त्या एका कवितेत म्हटल्याप्रमाणे आयुष्यानं छळलेलं नाहीये. किंवा कुठला असाध्य आजार झालेला नाहीये किंवा एपस्टीन फाईल्समध्ये माझं नाव झळकल्यामुळे मी हबकलोय, असंही नाहीये. आर्थिक आघाडीही मिडलक्लास स्टॅंडर्सप्रमाणे बरीच बरी आहे. यासंबंधी तुमचं खास भारतीय कुतुहल जागं होण्याचा आणि वेळीच शमन न केल्यास स्वैर स्वरूप धारण करण्याचा धोका मला दिसतो आहे. तर असं बघा की दोन्ही हातांनी पैसा उधळला तरी संपत नाही, अजून दहा हात पाहिजे होते, अशी काही परिस्थिती नाही. परंतु दारिद्र्यरेषेला बांधलेल्या एका नाजूक सुतळीला जिवाच्या आकांतानं घट्ट पकडून लोंबकळतोय, असंही नाही. चाललंय आपलं टिकीटिकी. चलती का नाम गाडी वगैरे. ओके ? डू यू गेट इट? पण जगणं चालू रहावं असं वाटण्याची ही काही कारणं नाहीत.

आता हा असा बिंदू आहे, जिथं, ही काहीतरी अस्तित्ववादी बकचोदी चाललेली दिसते आहे; याला भकासीच्या तत्वज्ञानाचा प्रवक्ता काम्यू कडकडून चावलेला असावा, असं वाटून बॅक क्लिक करू शकता. इट्स युअर कॉल. हे वाचाच, अशी काही बळजोरी नाही. जगण्यातच रस नाही अशी नुकतीच घोषणा केलेला मनुष्य शक्यतो बळजोरी करत नाही. नाही का?

उरलेल्यांसाठी एक डिस्क्लेमर असा आहे की हा जो 'लिहिणारा मी' आहे, तो कोण आहे हे मलाही माहित नाही. तो सतत बदलत असतो, त्याचा काही भरोसा नाही, मी काही त्याचा मक्ता घेणार नाही. ह्या डिस्क्लेमरमुळे आता मला निःसंकोचपणे अस्ताव्यस्त रितीने कुठेही कसाही या गोष्टीचा गाडा हाकत नेता येईल. आणि काही अंगलट आल्यास त्याचा दोष 'लिहिणाऱ्या मी' वर ढकलून काखा वर करायला मला मोकळं राहता येईल. विश्वगुरूंसारखं.

बाकी, भरोसा ठेवा, मी काही माझ्या आजवरच्या सगळ्या श्वासांचे हिशोब मांडून तुम्हाला बोअर करून मारणार नाही. मेन मेनच सांगेन. आठवेल तसं. जमेल तसं.

फार वर्षांपूर्वी शाळेत असताना एके दिवशी सकाळी 'जय हे जय हे जय हे' म्हणून संपल्यानंतर ओळीने वर्गाच्या दिशेने चाललो असताना पहिल्यांदा निरर्थकतेची जाणीव चमकून गेलेली. आपण नुकतंच जे काही केलं किंवा खरंतर आपण रोज हे जे काही करतोय त्याचा काही अर्थ लागत नाहीये, याची पहिली झलक. भूतकाळ आणि भविष्यकाळ एकाच वेळी कॅन्सल होऊन जाण्याचा क्षण. सगळा इंटरेस्ट एकाच झटक्यात खतम.‌ हे काहीतरी ॲबनॉर्मल घडलंय, पुन्हा सगळं पूर्ववत नॉर्मलला यायला पाहिजे, असं वाटतंय. त्यासाठी आपण पुन्हा नॉर्मल वागण्याबोलण्याची धडपडही करतोय पण आतून कसलातरी सांधा तुटलेला आहे‌. आणि आपण ॲटॅच च करू शकत नाहीये. आपलं इंटरेस्टचं इंद्रिय बंद तरी पडलेलं आहे. किंवा कोमात तरी गेलेलं आहे.

आता आपण कधीच पुन्हा पहिल्यासारखे नॉर्मल होऊ शकणार नाही, कारण हे जे आहे तेच नॉर्मल आहे, हेच सत्य आहे, आणि ह्या भकास सत्याची जाणीव आपल्याला सततच टोकरत राहतेय, त्यापासून पळण्याचा उपाय सापडत नाही, असं सगळं.

अर्थात, हे सगळं तेव्हा डिटेलमध्ये समजलं किंवा कुणी समजावून सांगितलं, असं नाही. त्याबद्दल माझी काही तक्रार नाही. शाळकरी मुलांना, 'बाळांनो, पुढं पुढं तुमचं आयुष्य म्हणजे एकप्रकारचा च्युतिया कारभार होत जाणार आहे', असं सांगायचं नसतं.

दुर्दैवानं ती भावना तेव्हा नीट स्टॅबिलाईझ होऊ शकली नाही. कसा कुणास ठाऊक पण इंटरेस्टही हळूहळू चोरपावलांनी परत यायला लागतो. यात वर्गबंधूंचाही हात असावा.

'खरं खरं सांग, तुला तिचे मोदक आवडले की नाय?'
अशा प्रश्नाला, 'त्यांच्या घरी मोदक करत नाहीत', असं निरागस उत्तर द्यायचं वय मागं पडतं.

आणि 'काय रे, तुला खरा लॉलीपॉप पायजे का?' असा समोरच्याला डिवचणारा खवट प्रश्न टाकण्याइतपत आपण मोठे होत जातो.

हे असं होतंच. यात माझा काही हात नव्हता. असलाच तर मराठीत प्रेमानं जिला पौगंडावस्था म्हणतात, त्या अवस्थेचा हात असावा. पौगंडावस्था म्हणजे सोप्या भाषेत एखाद्या व्यक्तीच्या नुसत्या विचारानंही तुमचं क्षेपणास्त्र आपोआप उभारी घेऊ लागण्याची संवेदनशील अवस्था.

परंतु तुम्हाला माहितीच असेल की इतर कुठल्याही अवस्थेप्रमाणेच ही अवस्थाही टिकत नाही. चाळीशीचं पठार पार करता करता लक्षात येतं की जीवनरूपी ब्रिगेडियर सूर्यदेवसिंगनं तुमच्या मिसाईल मधले फ्युज कंडक्टर काढून टाकले आहेत. आता तुमचं मिसाईल कधीच लॉन्च होऊ शकत नाही. जीवनानं तुमच्यासोबत हा जो अत्यंत वाईट जोक केलेला असतो, त्याबद्दल सहानुभूती व्यक्त करण्याखेरीज मी दुसरं काहीही करू शकत नाही. तुमचा आजवरचा जो एकमेव आवडता व्यायामप्रकार होता, त्यावर आता अचानक मर्यादा आलेल्या असतात. कधीकधी जबरदस्तीने व्यायाम करायला गेलात तर नंतर बराच वेळ यंत्र हुळहुळत राहतं. यंत्राला कायमचं कुलूप लागण्याची वेळही येते. पण तुम्ही अर्थातच हे कबूल करत नाही. या वयात सगळ्यांचं जे होतं तेच आपल्याही बाबतीत होतं आहे, हे कटू सत्य तुम्ही स्वीकारू इच्छित नाही. तुम्ही विद्रोह करता. किल्ली शोधण्याची धडपड करता. परंतु कशाचाही काहीही उपयोग होत नाही. शहाजहानला उपाय सापडला नाही, तुम्हाला काय सापडणार! मग हळूहळू कुरबुरत का होईना तुम्ही वस्तुस्थिती स्वीकारता. या स्टेजला पोचला की मग तुम्ही जिंकलेले असता. कारण आता सार्वजनिक वॉशरूम्स मध्ये चिटकवलेल्या जाहिराती तुम्ही निरीच्छ मनानं बघू शकता. ( उदाहरणार्थ, मर्दाना जोश, रुकावट तथा घोडे जैसी फुर्ती दोबारा प्राप्त करें.! संपर्क करें : बाबा रहिम खान बंगाली. तिसरी मंझिल, बिमल कॉम्प्लेक्स, समा टाकीज के पिछली वाली गली में.‌‌)

(टू बी कंटीन्यूड..)

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पहाटे साडेचार ला असं काही वाचू नये उगा डोक्याची मंडई Proud पण तुमची लिखाणाची स्टाईल भन्नाट आहे
पुढच्या प्रकरणाच्या प्रतीक्षेत....

अरे व्वा, Lol मस्त. अर्ध्याच्या वर रिलेटेबल आहे. नॉर्मल असण्याची ॲक्टिंग करत राहा आता, मला तर ऑस्कर मिळायला हवा, काय सांगू ! Wink

भारीच.
(टू बी कंटीन्यूड..)
हे सर्वात महत्वाचं>>>>>+१