Submitted by हर्षल वैद्य on 3 March, 2026 - 00:50
कधी, ते नेमकं कळलं नाही
पण तिनं छोटंसं घर केलं माझ्या हृदयाच्या एका कोपऱ्यात
आणि एक छोटंसं दारही बसवून घेतलं
आतबाहेर करण्यासाठी
स्वतःला हवं तेव्हा
भटकायला जायची ती अनेकदा
दार सताड उघडंच टाकून
तसं बऱ्याच ठिकाणी मैत्र होतं तिचं
आणि विषयही वर्ज्य नव्हते कोणतेच
पण माझं हृदय भळभळत वहात रहायचं
कधी तिच्या नसण्याने
कधी तिच्या गोतावळ्याच्या असण्याने
मग मीच समजुतीने दार लावून घ्यायचो
भळभळती जखम लिंपून घ्यायचो
चर्चा करायचो तत्त्वज्ञानाच्या
पण त्यातही दिसायचे तिचेच प्रतिबिंब
आताशा मी तिची वाट पहात नाही
पण दार लावूनही घेत नाही पूर्णपणे
कारण जेव्हा कधी ती येते
तेव्हा
माझ्या हृदयाचा अजूनही जपून ठेवलेला किंचित ओलावा
जाणवायला हवा तिला.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
निरंजन नावाचा अरुणा ढेरे
निरंजन नावाचा अरुणा ढेरे ह्यांचा कविता संग्रह आहे. त्यातील कविता वाचल्यावर मनात उठलेले शब्द.