तू लिही

Submitted by Meghvalli on 24 February, 2026 - 23:27

घे हे पान कोरे, काहीतरी लिही,
गद्य असो किंवा पद्य, तू लिही।

शब्दांना जागे कर, उठव आणि लिही,
स्रोतांना वाहू दे कागदावर… लिही।

मनात दडलेले धूसर शब्द बाहेर येऊ दे, लिही,
एखादा थेंब होऊन ओळींतून टपू दे, लिही।

जखमा असतील तर त्यांची खपली काढ, लिही,
आठवणींना जरा मोकळं कर, लिही।

रितेपणाच्या या शांत प्रहरी, लिही,
स्वतःशीच साध संवाद, लिही।

जागव प्रतिभा, कर साकार शब्दप्रतिमा, लिही,
‘मेघ’ समजतोस कवी स्वतःला ना, मग लिही।

कर कविता, कर गझल, एखादा लेख लिही,
किंवा तापल्या शब्दांचे आक्रंदन लिही, पण लिही।

शब्दांशी साध संधान, तोड बंधन, लिही,
मनाचा लगाम सोड, स्वैर हो, लिही।

मंगळवार, २४/२/२६ , ४:२५ PM
अजय सरदेसाई -मेघ

Group content visibility: 
Public - accessible to all site users

धन्यवाद @धनश्री जी , तुम्ही सांगीतल्या प्रमाणे संपादीत केले आहे. तुम्हाला कविता आवडली हे वाचून आनंद झाला _/\_

_/\_