"देखिए, जाने अनजाने मुझसे एक बदतमीज़ी हो गई है। मैं कोई गीतकार तो नहीं हूं। लेकिन मैंने इस गाने का मुखड़ा लिख दिया है।"
विजय आनंद उर्फ गोल्डीचे ते विधान ऐकून गीतकार राजेंद्र कृष्णजी हळूच हसले आणि त्याच्याकडे एकटक बघत राहिले...
..............
१९७३ सालची गोष्ट. दिग्दर्शक विजय आनंद उर्फ गोल्डी यांनी संगीतकार जोडी कल्याणजी-आनंदजी यांना सांगितले होते, "हे गाणं मला असं असायला हवंय, की जे बघताना, ऐकताना असे वाटेल की जणु काही पत्रं (letters) बोलत आहेत."
कल्याणजी-आनंदजी थोडे शॉक झाले. पत्रं कशी बोलू शकतील हे त्यावेळी त्यांना समजले नाही. तेव्हा गोल्डीने आपला दृष्टिकोन, मानस त्यांना समजावून सांगितला. गोल्डी म्हणाला की, नायक नायिकेला काही पत्रं पाठवतो. त्या पत्रांमध्ये नायकाने नायिकेकडे जे काही व्यक्त केले आहे, त्याच गोष्टी हे गाणं चित्रित केल्यावर त्यात प्रेक्षकांना दिसतील. त्यानंतर गोल्डीने कल्याणजी-आनंदजी यांना गाण्याची पहिली ओळ सांगितली, जी त्यावेळी त्याच्या डोक्यात गुंजत होती. ती ओळ होती...
'पल पल दिल के पास, तुम रहती हो।'
ती ओळ ऐकून कल्याणजी-आनंदजी यांनी तिथल्या तिथे एक धून (चाल) तयार केली. आणि तिथेच गाण्याचा मुखडा तयार झाला. एका अश्या गाण्याचा जन्म झाला, जे येणाऱ्या कितीतरी वर्षांपर्यंत प्रेमी युगुले पुन्हा पुन्हा गुणगुणणार होती.
या चित्रपटाचे गीत लिहिण्याची जबाबदारी प्रसिद्ध गीतकार राजेंद्रकृष्णजी यांना मिळाली होती. म्हणून दुसऱ्या दिवशी गोल्डीने कल्याणजी -आनंदजी यांच्या सिटिंग रूममध्ये राजेंद्रजीना बोलावले. तेथेच गोल्डी राजेंद्रकृष्णजीना म्हणाला होता, "असं बघा, माझ्याकडून एक गैरवर्तन (बदतमीजी) झाले आहे. मी काही गीतकार नाहीये. पण मी या गाण्याचा मुखडा लिहिला आहे. तसं तर मी दिग्दर्शक आहे. माझी पात्रे, माझे कलाकार काय बोलू शकतील, बोलतील किंवा कोणता संवाद बोलतील हे तर मला माहीत आहे. पण गाणे, गीतलेखन हा माझा प्रांत नाही. तरीही मला सुचलं म्हणून तुम्हाला ऐकवतोय. अर्थात हा सर्वस्वी तुमचा अधिकार आहे की मी सांगितलेला मुखडा या गाण्यात ठेवायचा की नाही. तुम्ही घ्याल तो निर्णय मला मान्य असेल."
राजेंद्रजीना तो मुखडा ऐकवण्यात आला. तो मुखडा त्यांनाही खूप आवडला. मुखडा खूप छान आहे, असे त्यांनी गोल्डी यांना सांगितले. त्यानंतर राजेंद्रकृष्णजीनी गाण्याचे अंतरे लिहिले. त्या अंतऱ्यांना आपल्या चालीमध्ये गुंफून कल्याणजी-आनंदजी यांनी किशोरदाच्या साथीने एक अजरामर गीत तयार केले.
पल पल दिल के पास, तुम रहती हो
जीवन मीठी प्यास, ये कहती हो
पल पल दिल के पास ...
३० नोव्हेंबर १९७३ रोजी म्हणजेच जवळजवळ ५२ वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या ब्लॅकमेल या चित्रपटातले, धर्मेंद्र आणि राखीवर चित्रित झालेले हे गाणे. विनोद दोषी हे निर्माते तर गोल्डी उर्फ विजय आनंद हे दिग्दर्शक. कल्याणजी आनंदजी यांचे संगीत, किशोरदांचा अप्रतिम आवाज, राजेंद्र कृष्णजी यांचे कमालीचे शब्द आणि पडद्यावर धर्मेंद्र-राखी यांची शानदार केमिस्ट्री!
राखी इतकी सुंदर यापूर्वी फक्त शर्मिली मध्येच दिसली असावी.
‘पल पल दिल के पास’ हे गाणे म्हणजे प्रेमाच्या अत्यंत कोवळ्या, नाजूक आणि अंतर्मुख प्रदेशातली सफर. हे गाणे ऐकताना जणू हृदयाच्या शांत गाभाऱ्यात अवचित प्रियाची, प्रिय व्यक्तीची चाहूल जाणवावी, स्पर्श न करतादेखील स्पर्शाचा आभास व्हावा अशी तरलता या गाण्यात ओतप्रोत भरून राहिलेली आहे. राजेंद्र कृष्णजींचे शब्द या भावना इतक्या सहजपणे उलगडत जातात की गाणे संपल्यानंतरही त्याची हळूवार लय मनात बराच वेळ हलकेच तरंगत राहते.
किशोरदा म्हणजे अक्षरशः सुरांचा जादुगार. आपण एखाद्याच्या प्रभावी गायकीबद्दल बोलताना म्हणतो की सात सूर त्याचे गुलाम आहेत. पण किशोरदाच्या बाबतीत सूर त्याचे जिवलग सवंगडी होते. त्याच्या जिभेवरच नव्हे तर अंगाखांद्यावर देखील आनंदाने बागडत असावेत सूर. भाव कुठलाही असो पण गाण्याचे सोने करण्याचे सामर्थ्य किशोरदाच्या आवाजात होते. किशोरदासाठी सूर म्हणजे निव्वळ पॅशन नव्हते तर ती त्याची वृत्ती होती. या गाण्यात किशोरदाच्या या वृत्तीचे पडसाद उमटले नसते तरच नवल.
गाण्याच्या सुरुवातीच्या काही ओळीच नायकाची अवस्था स्पष्ट करतात...
“पल पल दिल के पास, तुम रहती हो…”
ही कबुली जणू त्याचे नायिकेच्या प्रेमात पूर्णपणे बुडून जाणे स्पष्ट करते. प्रिय व्यक्ती दूर जरी असली तरी तिची प्रत्येक श्वासात मिसळून गेलेली आठवण हृदयाच्या धडधडीत, श्वासांच्या स्पंदनातून जाणवत राहते.
राजेंद्रकृष्ण यांचे शब्द साधे आहेत, पण साधेपणातच ती विलक्षण ओढ सजलेली आहे. विशेष म्हणजे कवीने या गाण्यात कुठलीही भव्य रूपके वापरलेली नाहीयेत की उगाच काव्यात्मक शब्दांचे अवडंबर माजवलेले नाहीये. दैनंदिन अनुभवांच्या नाजूक स्पर्शातून व्यक्त होणारे ही गाणे म्हणूनच कृत्रिम होत नाही, उलट थेट मनाला भिडते.
किशोरदाच्या आवाजाची हळूवार, मृदू मिठी या शब्दांभोवती इतकी अलगद लपेटली जाते की पूछो मत. त्यांनी हे गाणे अत्यंत सौम्यपणे अश्या काही पद्धतीने गायले आहे की ते नकळत आपल्या श्वासांमध्ये मिसळून जाते, भिनत जाते. त्यांच्या आवाजातील हलकी मींड, स्वरांमधील ठहेराव, आणि शब्दाबरहुकुम केलेली सुरांची सूक्ष्म झोकदार पखरण या सगळ्यामुळे गाण्यातील भावनांना एक शांत स्वरूप लाभलेले आहे. कल्याणजी–आनंदजींची धुंद करणारी संगीतरचना हा या गाण्याचा मूळ स्वभाव आहे, ज्याला किशोरदा वेगवेगळे कंगोरे देत जातात. पियानो, स्ट्रिंग्स आणि गिटारचे नाजूक इंटरल्यूड्स गाण्यातील दृश्यातल्या हळव्या, विरही प्रणयाला एका वेगळ्याच स्तरावर नेऊन ठेवतात. संपूर्ण रचना धीम्या लयीतील असल्यामुळे एक शांत, खोल पण अतिशय भावपूर्ण प्रवाह अनुभवाला येतो.
या गाण्यात वापरलेले स्वर खमाज थाटाच्या जवळपास जाणारे आहेत. (मी काही शास्त्रीय संगीताचा तज्ञ नाही. मी चुकत असेन तर तज्ञ मंडळींच्या तज्ञ मताचे मनापासून स्वागत आहे.) खमाज थाट हा हलकाफुलका आणि चंचल मानला जातो, ज्यात 'नी' (Nishad) स्वराला कोमल (flat) वापरले जाते. त्यामुळे गाण्याला एक प्रकारची खास लवचिकता आणि गोडवा येतो. काहीवेळा त्यात बिलावल (जो शुद्ध स्वरांवर आधारित आहे) थाटाचे स्वर देखील मिसळल्याचा आभास होतो, पण मुख्य भावना खमाजचीच असावी.
या गाण्याचा मुख्य स्वर जणू श्रृंगाररसाचा सर्वात कोमल, अंतर्मुख असा झरा आहे. प्रत्यक्ष नसूनही जाणवणारी प्रिय व्यक्तीची उपस्थिती त्याच्या आत्म्यात, गात्रा गात्रांत खोलवर सामावलेली आहे, रुजलेली आहे.
हे गाणं ऐकताना त्याच्या मनात प्रियेच्या स्मृतींचा, तिच्या अस्तित्वाचा दरवळायला लागतो. ती दूर आहे, पण तिच्या आठवणींचे अणू रेणू जणू त्याच्या प्रत्येक श्वासात विरघळलेले आहेत.
हा भाव जणू काही,
एखाद्या हिवाळ्याच्या सकाळी कायम सोबत असणाऱ्या धुक्यासारखा,
तारकांच्या शांत प्रहरी वाऱ्यासोबत येणाऱ्या गंधासारखा,
आणि ओलसर पानावर पसरलेल्या दंवयुक्त प्रकाशासारखा, अंगावर न जाणवणारा पण तरीही सतत आपले अस्तित्व जाणवून देणारा असा आहे.
"हर शाम आँखों पर, तेरा आँचल लहराए..."
दूरवरून वाहणाऱ्या त्या वाऱ्याबरोबर तिचा सुगंध अदृश्यपणे मिसळून येतो आहे. ही ओळ जणू कुजबुजत सांगते की...
संध्याकाळ तिचीच आहे. क्षितिजावर साचलेली लालसर, कोमल आभा म्हणजे जणू काही तिच्या ओढणीची हळवी किनारच....
रात्री दृश्य जग शांत होते, पण आठवणींचे विश्व मात्र जागते. अंधार काळा राहत नाही; त्यावर तिच्या स्मृतींचा रुपेरी प्रकाश पसरतो.
जणू चांदण्यांची स्निग्ध, शांत चादर मनावर पांघरली जाते. यात एक विलक्षण शांत, कोमल असा शृंगार आहे. हा निव्वळ प्रेमाचा तीव्र स्पर्श नाही, तर नाद न करता स्पंदणाऱ्या वीणेचे मंद कंपन आहे.
"कल तुझको देखा था, मैने अपने आंगन में..."
येथे राजेंद्रजी नकळत अद्भुतरस ओततात. जीवनाच्या रस्त्यांवर भटकताना आपण अनेक वेळा स्वतःलाच हरवून बसतो, किंवा किमान तसे वाटत राहते.
प्रत्येक पाऊल अनिश्चित, प्रत्येक वळण एक नवीन प्रश्न घेऊन येते...
पण मग अचानक कोणीतरी भेटते… आणि सगळं कसं स्पष्ट व्हायला लागतं.
ती व्यक्ति, प्रिया येते आणि प्रवासाचा प्रत्येक टप्पा स्पष्ट होतो.
जणू अंतरीच्या यात्रेकरूला आपले गंतव्य सापडून गेलेले असते....
तिचं प्रेम, एक अखंड, स्थिर, अढळ प्रकाशस्थान!
प्रेम म्हणजे निव्वळ उपस्थिती नव्हे, तर ती नसतानाही तिच्या असण्याचा अनुभव, ती सुखद जाणीव...
प्रेम म्हणजे केवळ शरीर नव्हे, तर श्वासात एकरूप झालेल्या स्मृती,
प्रेम ही पाहण्याची नव्हे, तर अनुभवण्याची, जाणिवेची खूण आहे. इथे प्रिय व्यक्ती म्हणजे जणू मनाच्या तळ्यातील सतत प्रतिबिंबित होत राहणारे एक मंद पण सर्वव्यापी वर्तुळ आहे, ज्याचा उगम कधी कळत नाही, पण ज्याचे थांबणे मनाला रुचत नाही. हे गाणे म्हणजे स्मृतीचा सुवास, अंतरीची मधुर वेदना,
आत्म्यातून उमलणाऱ्या प्रेमाचे शुभ्र चांदणे,
आणि प्रेमाने आयुष्याला दिलेला शांत, स्थिर अर्थ, चिरंतन अर्थ आहे.
या गाण्याशी जोडलेली आणखी एक मोठी रंजक कथा आहे. झाले असे की, हे गाणं अजून रेकॉर्डही झाले नव्हते, पण गोल्डी धर्मेंद्र-राखी आणि इतर क्रू मेंबर्सना घेऊन हे गाणं चित्रित करण्यासाठी ऊटीला जाऊन पोहोचला. गाणं रेकॉर्ड व्हायच्या आधीच गोल्डी ते शूट करायला निघाल्याचं बघून चित्रपटाशी संबंधित इतर लोकांना आश्चर्य वाटलं होतं. हे गाणं शूट कसं होणार?
पण प्रयोगशील गोल्डीला असले धक्के द्यायला आवडायचे. त्यांने चक्क धरमपाजींना हे गाणं पाठ करायला लावलं. तुम्ही स्वतः गाणं गात अभिनय करा, आम्ही ते असेच चित्रित करू, असे निर्देश त्यांने धरमजीना दिले. धरमजी आणि राखी यांनी तो म्हणेल त्या पद्धतीने अभिनय केला आणि गोल्डीने गाण्याचे शूटिंग केले. त्यानंतर जेव्हा किशोरदाने स्टुडिओमध्ये गाणं रेकॉर्ड केले, तेव्हा एडिटिंग टेबलवर धरमजी यांच्या आवाजाला किशोरदाने गायलेल्या या मूळ गाण्याने रिप्लेस केले गेले आणि बस...!
त्यातून जे काही जन्माला आलं, त्याने इतिहास घडवला. गंमत म्हणजे या अप्रतिम गाण्याला साधे नॉमिनेशनही मिळाले नाही कुठल्याच अवार्ड्सचे. पण तुमच्या माझ्यासारख्या लाखो करोडो रसिकांनी या गाण्याची अरबोखरबो पारायणे करत इतक्या उंचीवर नेऊन ठेवलं आहे की त्याला कुठल्या अवार्डची आवश्यकताच राहिली नाही.
https://youtu.be/AMuRRXCuy-4?si=rja0pt4htnTrqVgL
चित्रपट: ब्लॅकमेल (1973)
गायक: किशोर कुमार
संगीतकार: कल्याणजी–आनंदजी
गीतकार: राजेंद्र कृष्ण
© विशाल कुलकर्णी
फार आवडीचे गाणं ,
फार आवडीचे गाणं ,
सुंदर रसग्रहण.
सुंदर लिहिलेत @ विशाल
सुंदर लिहिलेत @ विशाल कुलकर्णी
…फार आवडीचे गाणे ..
+ १
“मैं साँस लेता हूँ, तेरी ख़ुशबू आती है” ही ओळ म्हणतांना हूँ नंतर एक सूक्ष्म sound आहे त्यात “हूँ” दोन दा म्हटल्यासारखे ऐकू येते, love it ❤️
बेसिकली प्रिय व्यक्तीचा “सुगंध” येतो आणि ती समोर नसतांना फक्त आठवण आली तर ती आठवण त्या विशिष्ट सुगंधासकट येते हे पूर्णत: मान्य असलेले आपल्यासारखे होपलेस आणखी लोक आहेत ही भावना फार सुखावणारी आहे.
>> प्रेम म्हणजे निव्वळ
>> प्रेम म्हणजे निव्वळ उपस्थिती नव्हे, तर ती नसतानाही तिच्या असण्याचा अनुभव, ती सुखद जाणीव...
प्रेम म्हणजे केवळ शरीर नव्हे, तर श्वासात एकरूप झालेल्या स्मृती
बहोत खुब!
सुंदर रसग्रहण.
- (हे गाणं अत्यंत आवडीचे असणारा ) सोकाजी
सुंरेख लिहिलंय
सुंरेख लिहिलंय
गोड आहे ते गाणं
एवढं गोड की रमाबाईंना सुद्धा आवडतं
@किल्ली रमाला माझ्यावतीने एक
@किल्ली रमाला माझ्यावतीने एक छ्हान झप्पी दे
@अनिंद्य “मैं साँस लेता हूँ,
@अनिंद्य “मैं साँस लेता हूँ, तेरी ख़ुशबू आती है” ही ओळ म्हणतांना हूँ नंतर एक सूक्ष्म sound आहे त्यात “हूँ” दोन दा म्हटल्यासारखे ऐकू येते, love it ❤️>>>> म्हणुनच विश्वास बसतो की किशोरदा सुरांचा बादशहा नव्हे, तर सखा होता. _/|\_
धन्यवाद सिमरन आणि सोत्रि
धन्यवाद सिमरन आणि सोत्रि
खूप छान लिहिले आहेस, या
खूप छान लिहिले आहेस, या गाण्याइतके छान...
व्वा विशालदादा...
व्वा दादा व्वा...
फारच सुंदर रसग्रहण...
असेच लिहित रहा..
मस्त रे! ऑटाफे गाणे. त्यातली
मस्त रे! ऑटाफे गाणे. त्यातली ही पार्श्वभूमी माहीत नव्हती. "मै साँस लेता हूँ, तेरी खुशबू आती है" ही ओळ कायमच काहीतरी भारी वाटलेली आहे. लेखात गाण्यातील "ठहराव" बद्दल लिहीले आहे तो चित्रीकरणात व तेव्हाच्या एकूण वातावरणातही असावा. शांत संध्याकाळी ती आरामात बसलेली आहे एक पत्र घेऊन. आजूबाजूला दुसरे काहीही नाही. ७०ज मधल्या गाण्यांमधे ते वातावरण जाणवते.
राखी यात सुंदर दिसली आहे का ते सब्जेक्टिव्ह आहे
(मला राखी फक्त जीवन मृत्यू मधल्या झिलमिल सितारोंका आँगन होगा गाण्यात सुंदर वाटली आहे - त्यात सुरूवातीला मान डोलावत येते तेव्हा नाही. थोडी नंतर) पण धरम मात्र हॅण्डसम दिसला आहे. त्याच्या हालचालींत नैसर्गिकता किती व विजय आनंदच्या दिग्दर्शनाचा भाग किती ते माहीत नाही. एकेकाळी गाण्यातील प्रत्येक ओळ हालचालींतून ठसठशीतपणे व्यक्त झाली पाहिजे असा हट्टाहास असल्यासारखे लोक सादर करत. इथे विजय आनंदच्या नायकांची "ग्रेस" सहज जाणवते. "तुम सोचोगी क्यों इतना, मै तुमसे प्यार करू, तुम समझोगी दीवाना, मै भी इकरार करू" मधे मै भी इकरार करू म्हणताना इतक्या कमीत कमी अॅक्शन मधून त्याने ते दाखवले आहे तो कदाचित गोल्डी टचच असावा.
वरती उल्लेख केलेल्या "बदतमीजी" चा वापर गाण्यातील एका पत्रातही दिसतो. गाण्याचा हा जो संदर्भ आहे तोच लक्षात ठेवूनही तो वापरला असू शकतो. मात्र त्यांच्यातील ओळखीचा व "हौसले" वाढण्याचा प्रवास त्या पत्रांमधे सुरूवातीला राखीला "अॅड्रेस" करताना जे म्हणतो त्यावरून मस्त दाखवले आहे - "प्रिय मिस मेहता" पासून ते "प्रिय आशा", "आशा" आणि नंतर "मेरी आशा" वगैरे.
कल तुझको देखा था मैने अपने आँगन मे - याचा संदर्भ "डोली" अंगणात येण्याबद्दल असावा का? ये कैसे सपने है मुळे तसे वाटते. तत्कालीन गाण्यांत प्रेमाचा इजहार करताना सुद्धा थेट लग्नाचे संदर्भ असतात. त्यामुळे शक्य आहे.
सुंदर रसग्रहण आणि फा चा
सुंदर रसग्रहण आणि फा चा प्रतिसादही छान !

तत्कालीन गाण्यांत प्रेमाचा इजहार करताना सुद्धा थेट लग्नाचे संदर्भ असतात...
यावरून आठवले, की माझी मुलगी नेहमी तिच्या कोणा कोणा मित्र मैत्रिणींचे डेटिंग / रिलेशनशिप मधे आहेत, तिला बॉयफ्रेंड आहे असे सांगत असे. त्यावर मी , मग ते लग्न कधी करणार असे विचारले की ती हमखास, आई, प्रेमाचा आणि लग्नाचा काही संबंध नाही...हे वाक्य म्हणत असे.
सुंदर रसग्रहण विशाल.
सुंदर रसग्रहण विशाल.
अनिंद्य तुमची प्रतिक्रिया वाचून मुद्दाम ती जागा ऐकली. पूर्वी कधी नोटीस नव्हती केली. माबोची हीच मज्जा आहे की चोखंदळ श्रोत्यांमुळे एखाद नवीन सूर, जागा, म्युझिक पीस समजून जातो.
फा प्रतिक्रिया आवडली. पूर्वीच्या गाण्यांत प्रेमाच्या संदर्भात लग्नाचे उल्लेख नाहीतर सनईचे सूर यायचेच.
आणि स्वानंदीचं निरीक्षणही भारी.
फारेंडा
फारेंडा
बाकी धरमपाजीबद्दल बोलायचे झाले तर धर्मेंद्र आणि हँडसम हे दोन समानार्थी शब्द आहेत असे माझे ठाम मत आहे.
“कल तुझको देखा था मैने अपने
“कल तुझको देखा था मैने अपने आँगन मे - याचा संदर्भ "डोली" अंगणात येण्याबद्दल असावा का?” - तो संदर्भ पुढच्या ओळीत आहे… “जैसे कह रहीं थी तुम, मुझे़ बांध लो बन्धन में“. त्यावरून ती फक्त आर्जवी जवळीक असावी असं वाटतं.
function at() {
[native code]
}इशय सुंदर गाण्यात एक लहानसा आय-सोअर म्हणजे धर्मेंद्रचे ‘मारवाडी लग्नातले’ वाटावे असे शर्ट्स (आणि एकदा पँटपण). पण ते त्याने मस्त कॅरी केले आहेत.
< सुंदर गाण्यात एक लहानसा आय
< सुंदर गाण्यात एक लहानसा आय-सोअर म्हणजे धर्मेंद्रचे ‘मारवाडी लग्नातले’ वाटावे असे शर्ट्स>>>
अगदीच सहमत ! पण अर्थातच धरमपाजी असल्यामुळे तिकडे सोयीस्कर दुर्लक्ष केले
मला हे गाणंच आवडत नाही. लय
मला हे गाणंच आवडत नाही. लय cliche. ऐकून पार गुळगुळीत.
मी काय लेख वाचला नाही भावा.
छान लिहिले आहेस विशाल. माझे
छान लिहिले आहेस विशाल. माझे आवडते गाणे .
खालचे कडवे खास आवडते ........
तुम सोचोगी क्यों इतना, मैं तुमसे प्यार करूँ
तुम समझोगी दीवाना मैं भी इकरार करूँ
दीवानों की ये बातें दीवाने जानते हैं
जलने में क्या मज़ा है परवाने जानते हैं
तुम यूँ ही जलाते रहना, आ-आ कर ख़्वाबों
धर्मेंद्र आणि हँडसम हे दोन समानार्थी शब्द आहेत असे माझे ठाम मत आहे.> खरंय