नियती

Submitted by आर्त on 18 February, 2026 - 14:59

दुःख मी माझ्या मनाचे, हे तुला सांगू कसे?
एवढ्या गगनात इतके मेघ मी मांडू कसे?

घ्यायचे नव्हते मला अन् व्हायचे नव्हते ऋणी,
दैव स्वीकारून बसले, मी न स्वीकारू कसे?

तू दिली मज सूर्यकिरणे, ओढ त्यांची लागली,
मागते आकाश आता, या मना कोंडू कसे?

दगड त्यांनी फेकलेले, झेलले तू नेहमी,
राहिले दोन्ही तुझे पण, हात मायाळू कसे?

ताट भरलेले मिळाले, भाग्य हे मोठे खरे,
पण उपाशी सर्व असता, घास मी घेऊ कसे?

दूर तू गेलीस, गेले दूर लखलखते दिवे,
भर दिनी अंधार पसरे, त्यास मी पळवू कसे?

सर्व रमले रे कधीचे मोह मायेच्या जगी,
एकटे माझेच अजुनी चित्त वाटसरू कसे?

प्रेम हलके पाखरा परि, लाख मी पाळीन पण,
वैर जीवा चावते अति, त्यास मी पाळू कसे?

याच हातांनी लढ्याची खूण दारुण जाळली,
अन् करांनी याच वीरा, औक्ष ओवाळू कसे?

शेवटी अगदी मिळाले, मज अनंताचे क्षितिज,
पंख उडती बघ अनावर, सांग मी थांबू कसे?

Group content visibility: 
Use group defaults