Submitted by आर्त on 16 February, 2026 - 08:35
तेच गोकुळ, तोच नंदबा,
तीच यशोदा माता,
पण मी ना राहिलो गोपसखा
कान्हा बाळ आता.
सोडुनिया तट यमुनेचा
धरला मी तीर समुद्राचा,
चौरंग सेनेचा अधिपती
मी स्वामी सुदर्शनाचा,
काही म्हणती कपटी मजला
काही विश्वाचा निर्माता…
नाही गाफिल मौज,
आज ना बेफिकीर खेळ,
निमिषात एका तुटला
बालपणाशी मेळ,
प्रौढपणाने येऊन धरले
अकस्मात माझ्या हाता…
धैर्याने लढलो पुनःपुन्हा
अनेक झंझावाती,
शेल्याशी बांधल्या मी
नव्या अनुभवाच्या गाठी,
माझेच प्रतिबिंब मजला
आज येती ना ओळखता…
प्रेम मिळाले, वैर मिळाले,
जुळली असंख्य नाती,
पण मायेने कुणी गोंजारावे
या इच्छा अपूर्ण राहती,
द्रौपदी लाभली अमोल सखी
पण दुसरी ना होणे राधा…
गोकुळास कान्हाची आस,
मी का गोकुळी जावे?
का कृष्णाने मनातल्या
त्या कान्हास तुडवावे?
आठवणींच्या कोशात राहू दे
निखळ त्याची गाथा…
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा