उन्मनी

Submitted by क्रांति on 21 June, 2009 - 22:08

तुझ्या आठवात मन चैत्रपालवी
धुंद मोग-याचा गंध लपेटून प्रीत जागवी

तुझ्या विरहात मन वैशाखवणवा
जळे तनमन, आसुसला प्राण शोधतो गारवा

तुझ्या चिंतनात मन आषाढमाया
शामरंगी घन आभाळी रेखिती काजळछाया

तुझ्या संगतीत मन श्रावणहिंदोळे
भिजल्या मातीत हिरवा अंकुर उघडतो डोळे

तुझ्या सावलीत मन शरदचांदणे
सावळ्या रात्रीच्या अंगांगी फुलली लक्ष गोंदणे

तुझ्या प्रणयात मन रंग फाल्गुनी
घननीळा, तुझ्या रूपात विरली राधा उन्मनी

गुलमोहर: 

उत्तम आहे. मला एकूणच बाज आवडला या कवीतेचा.
तुमची ती सिग्नेचर कोट पण फार आवडली - "मुक्त तरीही बंधनात मी.....फुलाफुलाच्या स्पंदनात मी " - एकदम मस्त एक्स्प्रेशन आहे ...ब्राव्हो !!!!!
गिरीश !!!!

Pages