मुळात सचिन भौमिक यांच्या कथेवर आधारित "अनुराधा" हृषिदाना बंगाली भाषेतच करायचा होता. पण बलराज सहानीने गळ घातली आणि हृषिदा चित्रपट हिंदीत करायला तयार झाले. हृषिदासारखा मनस्वी दिग्दर्शक, बलराज सहानी, लीला नायडू (लीलाबाईंचा हा पहिलाच चित्रपट) आणि अभिभट्टाचार्य असे उत्तुंग अभिनय आणि सौंदर्य यांचे समसमा मिश्रण असलेले कलाकार आणि पंडित रविशंकर यांचे दैवी संगीत या त्रिवेणी संगमाने सजलेला हा चित्रपट.
याच्या संगीताची सुद्धा एक कथाच आहे. हृषिदा उर्फ हृषिकेश मुखर्जी यांनी सुरुवातीला या चित्रपटासाठी लता मंगेशकर यांना संगीत दिग्दर्शन करण्यास तयार केले होते. मात्र नंतर लताबाईंनी माघार घेतली, कारण त्यांनी यापूर्वीच एका दुसऱ्या दिग्दर्शकाला असे आश्वासन दिले होते की कधी संगीत दिग्दर्शन करायचे झाले, तर ते फक्त त्याच्यासाठी करतील. त्यानंतर हृषिदानी उस्ताद बडे गुलाम अली खान यांच्याकडे मोर्चा वळवला. मात्र बडे गुलाम अली खानसाहेबांनी एक विचित्र अट घातली. संगीतकार शंकर-जयकिशन यांच्या त्या काळातील मानधनापेक्षा एक रुपया अधिक देण्याची मागणी खानसाहेबांनी केली आणि हृषिदा साशंक झाले. बड़े गुलाम अली खांसाहेब म्हणजे महान, पण मनस्वी कलावंत माणूस, त्यांच्या लहरी बदलत राहिल्या तर कसे व्हायचे? अखेरीस त्यांनी पंडित रवी शंकर यांना संगीत देण्याची विनंती केली आणि त्यांनी आनंदाने ही जबाबदारी स्वीकारली. हृषिदांच्या म्हणण्यानुसार, पंडित रवी शंकर यांनी संपूर्ण चित्रपटाचे संगीत केवळ दोन दिवसांत तयार केले. जवळपास दहा वर्षांहून अधिक काळानंतर पंडितजींचें हिंदी चित्रपटसंगीतात "अनुराधा" या चित्रपटातून पुनरागमन झाले. ख्यातनाम हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतकार आणि सतारवादक असलेल्या रवी शंकर यांनी यापूर्वी फक्त दोन हिंदी चित्रपटांसाठी संगीत दिले होते. धरती के लाल (१९४६) आणि नीचा नगर (१९४६). अर्थात १९५९ साली सत्यजित रें यांच्या सुप्रसिद्ध अपुर संसार या बंगाली चित्रपटाला रविशंकर यांनी संगीत दिले होते. पण त्यानंतर आलेला हिंदी चित्रपट अनुराधाच.
या चित्रपटातील प्रत्येक गाण्यात त्यांनी शास्त्रीय संगीताची अशी काही मोहक छटा पेरली आहे की प्रत्येक गीत लाजवाब, उत्कृष्ट झालेले आहे. राग जनसम्मोहिनीवर आधारित “हाय रे वो दिन क्यों ना आए” हे गीत यातलं एक गाजलेलं गीत. हे गाणं खरंतर हृषिदांना आवडलेलं नव्हतं, त्यांना हे गाणं नको होतं. पण लतादीदींनी हे गाणं चित्रपटात ठेवण्याचा हट्ट धरला आणि आपल्याला अजून एक अप्रतिम गाणं मिळालं. या चित्रपटात पंडितजीनी राग मांज खमाजचा आधार घेऊन दोन गाणी रचली आहेत. एक म्हणजे “जाने कैसे सपनों में खो गई अखियाँ” आणि दुसरे “कैसे दिन बीते कैसे बीती रतिया". आज आपण “कैसे दिन बिते कैसी बीती रतियाँ” या गाण्याबद्दल बोलणार आहोत.
हे गाणे नीट ऐकलं असेल तर ऐकताना तुम्हालाही असं वाटलं असेल की आपण निव्वळ गाणं ऐकत नसून जणू काही अनुराधाच्या मनात हळूच डोकावत आहोत. गाण्याचे शब्द, सूर आणि दोन शब्दांतील (शांततेच्या) जागांमधल्या (पॉजेस) अवकाशातून जे काही व्यक्त होतं, ते निव्वळ शब्दातून किंवा गाण्यातून सांगितलेले नाहीये, तर श्वासातून रुजत, झिरपत गेलेलं आहे. १९६० सालच्या "अनुराधा" या हृषिदांच्या चित्रपटात हे गाणे येते, ते केवळ कथानकाचा भाग म्हणून नाही. ते त्या कथेच्या आत्म्यात खोलवर रुजलेल्या भावनांचा एक मंद, सातत्यपूर्ण प्रवाह बनून आलेले आहे. हृषिदा एका मुलाखतीत म्हणाले होते की "मैं फिल्म में गाना तभी लेता हूँ , जब वो जरुरी होता है, जब गाने के लिए फिल्म में सिचुएशन होती है, वर्ना नहीं लेता!" आणि हे गाणं तर अनुराधा या चित्रपटाचा आत्मा आहे. गाणं बघितलं असेल तर तुम्ही पाहिलं असेल. अनुराधा अगदी व्याकुळ होऊन मनातली वेदना गाण्याच्या रूपात मांडतेय, दीपक (अभि भट्टाचार्य) , ज्याच्याशी तिचं आधी लग्न ठरलेलं असतं, तो व्याकुळ झालेला आहे ते ऐकताना. त्याला तिची घालमेल, तिचे दुःख जाणवतेय आणि त्याच वेळी ज्याच्यावर अनुराधाने जिवापाड प्रेम केलेलं आहे, वडिलांचा विरोध पत्करून ज्याच्याशी तिने लग्न केलेलं आहे तो डॉ. निर्मल, त्याचं मात्र तीच्या वेदनेकडे लक्षही नाहीये, तो कुठलातरी (कदाचित मेडिकल क्षेत्राशी कदाचित) लेख वाचण्यात तल्लीन झालेला आहे.
अनुराधाची गोष्ट ही अनुच्या आयुष्यात घडलेल्या घटनांची नाही, तर वेगवेगळ्या अवस्थांची आहे. आदर्शवाद आणि प्रेम यांच्यात उभ्या राहिलेल्या तणावाची ही कथा आहे. बलराज सहानी यांनी साकारलेला नायक समाजसेवेच्या ध्यासात स्वतःला पूर्णपणे विसरून जातो. त्याच्यासाठी जीवन म्हणजे एक तत्त्व, एक ध्येय, एक व्यापक जबाबदारी. त्या ध्यासात तो कुणालाही मुद्दाम दुखावत नाही, पण नकळत तो आपल्या जवळच्या माणसापासून दूर जातो. या दूर जाण्याच्या प्रक्रियेत अनुराधा मात्र मागे राहून जाते. लीला नायडूंचा हा पहिलाच चित्रपट होता. नुकताच मिस इंडिया खिताब मिळवलेल्या या सुंदर आणि बुद्धिमान अभिनेत्रीने आपल्या उत्कट अभिनयातून ही व्यक्तिरेखा अत्यंत शांत, संयतपणे आणि विलक्षण उत्कटतेने उभी केली आहे. हृषिदांची अनुराधा आयुष्याला कसलाही विरोध करत नाही, कुठलेही प्रश्न विचारत नाही, फक्त वाट पाहत राहते. पण हळूहळू हे वाट पाहणेच तिचे आयुष्य, तिचे प्राक्तन बनून जाते.
याच अस्वस्थ अवस्थेत “कैसे दिन बिते कैसी बीती रतियाँ” हे गाणे येते. हृषिदांच्या नेहमीचे सवयीप्रमाणेच हे गाणे जागा आहे म्हणून टाकलेले नाहीये. हे गाणे कुठल्याही नाट्यमय क्षणी न येता, दोन प्रेमिकामधल्या, नकळत लादल्या गेलेल्या मौनाच्या, न बोलल्या जाणाऱ्या अवकाशाच्या, न संपणाऱ्या प्रदीर्घ वाट पाहण्याच्या वेळेत येते. वरवर पाहता काहीच घडत नाही. दिवस येतात, जातात. रात्रीही सरतात. पण अनुराधाच्या मनात, आत काळ थांबलेला आहे. दिवस आणि रात्री या इथे घड्याळाच्या काट्यांपुरते उरत नाहीत. ते मनाच्या स्थितीचे प्रतीक बनतात. दिवस म्हणजे निभावलेली कर्तव्ये, समाजासमोर ठेवलेली शांत मुद्रा, आणि रात्री म्हणजे एकटेपणात उफाळून येणारे प्रश्न.
या गाण्याला पंडितजींनी (रविशंकर) दिलेलं संगीत या गाण्याच्या भावविश्वाशी विलक्षण सुसंगत आहे. भारतीय शास्त्रीय संगीतातील त्यांची खोल रुजलेली जाण इथे कोणत्याही प्रदर्शनाविना प्रकट होते. शैलेन्द्र यांचे सोज्वळ, अर्थवाही आणि भावपूर्ण शब्द, लतादीदींचा शांत, मधुर, सुरेल स्वर आणि पंडितजींनी मांज खमाजच्या शांत, मंद धुनीमध्ये दिलेली चाल यांची सांगड या गाण्यात इतकी सुंदर बसली आहे की ते ऐकताना ऐकणाऱ्याचे चित्त नकळत अनुराधाच्या मनात शिरते, तिथेच थांबून जाते. अनुराधाच्या मनोवस्थेशी एकरूप होते.
लतादीदींच्या गायकीचे खरे सामर्थ्य या गाण्यातील थांबे, अल्पविराम आणि उच्चारही ना करता आपोआप ठळक होणारे भाव यात दडलेले आहे. सुरांचे उच्चार, मींड अत्यंत संयत आणि अर्थवाही आहेत. ज्या सहजतेने दीदी एका भावनेतून दुसऱ्या भावनेत शिरतात ते खरोखर नव्या गायकांनी लक्ष देऊन शिकण्यासारखे आहे. दीदींचे सूर गायकी दाखवण्यासाठी न येता, भाव अधिक खोलवर पोहोचवण्यासाठी येतात. त्यामुळेच हे गाणे ऐकताना अनुराधाची घुसमट, तिचे एकाकीपण आणि तिच्या मनातली अबोल हुरहूर अगदी स्पष्टपणे श्रोत्यांपर्यंत थेट पोहोचते. हे गाणे म्हणजे केवळ लतादीदींचा आवाज किंवा पंडितजींचे संगीत नाही, तर एका स्त्रीच्या आयुष्यातल्या न दिसणाऱ्या, पण सतत वाहणाऱ्या वेदनेचा सूर आहे. प्रेमासाठी तिने आयुष्यभर केलेल्या त्यागाचा तो अबोल स्वर आहे.
सूर मोजके आहेत, थांबे अर्थपूर्ण आहेत. संगीत जितके कानावर येते, तितकेच ते मौनातूनही बोलते. या गाण्याला चाल देताना पंडितजींनी अनेक रिकाम्या जागांचा वापर केलेला आहे. त्या रिकाम्या जागांमध्ये अनुराधाचे न बोललेले दुःख साठलेले आहे. या सुरांवर लतादीदीचा स्वर अलगद उतरतो. अनुराधा इथे दुःख व्यक्त करत नाही,तिने ते शांतपणे स्वीकारलेले आहे. आवाजात आक्रोश नाही, तक्रार नाही. उलट, थोडीशी थकलेली पण विलक्षण मृदुता आहे, दीर्घ प्रतीक्षेची सावली आहे. प्रत्येक ओळ जणू मनातच उमटते आणि मग हळूच विरते. शब्द संपल्यावर उरलेला शांत अवकाश अधिक बोलका वाटतो. जणू त्या शांततेतच गाण्याचा खरा अर्थ दडलेला आहे.
शैलेंद्रचे शब्द या गाण्यात अत्यंत संयत आणि प्रामाणिक रूप धारण करून येतात. शब्द साधे आहेत, कसली अलंकारिकता नाही, उगाच रुपकांची, प्रतिमांची भरमार नाही. “कैसे दिन बिते कैसी बीती रतियाँ” हा एक प्रश्न आहे, पण तो कुणाला विचारलेला नाही. तो स्वतःशीच चाललेला एक निरंतर संवाद आहे. या प्रश्नात उत्तराची अपेक्षा नाही. तो प्रश्न विचारण्यातच त्याचे उत्तर सामावलेले आहे. दिवस आणि रात्री कशा गेल्या हे कळले नाही, कारण त्या काळात जगणे थांबून फक्त प्रतीक्षा सुरू आहे.
पंडितजींनी राग मांज खमाजचा आधार घेत त्याच्या सुरांवर या गाण्याच्या संगीताची रचना केलेली आहे. राग मांज खमाज पंडितजींचे गुरू आणि महान सरोदवादक उस्ताद बाबा अलाउद्दीन खान यांनी विकसित व लोकप्रिय केला असल्याचे मानले जाते. हा राग साधारणपणे संध्याकाळपासून मध्यरात्रीपर्यंत गायला जातो आणि तो स्वतंत्र स्वरांपेक्षा स्वरसमूहातून तयार होणाऱ्या वाक्यांशांवर (नोटेशन) अधिक आधारलेला असतो, त्यामुळे सादरीकरणात अचूकता अत्यंत महत्त्वाची ठरते. मांज खमाज हा मांज रागाचाच एक प्रकार असून त्यात शुद्ध ‘म’ हा वैशिष्ट्यपूर्ण स्वर आहे, तर ‘सा’ स्थिर राहतो. या रागात तानपुरा अनेकदा ‘सा,पा’ ऐवजी ‘सा,शुद्ध म’ या स्वरांवर लावला जातो. कोमल, मधुर आणि रोमँटिक स्वभावाचा हा राग सामान्य श्रोत्यांनाही सहज भावतो आणि ठुमरी, धनश्री ठुमरी, दादरा, कजरी, चैती अशा अर्धशास्त्रीय गायनप्रकारांमध्ये त्याचा मोठ्या प्रमाणावर वापर आढळतो.
काव्यशास्त्रीय दृष्टिकोनातून पाहिले तर या गाण्यात करुण रस प्रधान आहे. पण हा करुण रस अश्रूंनी ओथंबलेला नाही. तो संयत आहे, अंतर्मुख आहे. विरह हा त्याचा स्थायीभाव आहे, पण त्यात राग नाही, निषेध नाही, दोषारोप नाही. फक्त स्वीकार आहे. आणि हा स्वीकारच वेदनेला अधिक खोल बनवतो. कारण न बोललेले दुःख, व्यक्त न झालेली हुरहूर नेहमीच अधिक तीव्र असते.
या गाण्याचा अर्थ शेवटी एका साध्या, पण खोल अनुभूतीवर येऊन थांबतो. प्रेमात बुडालेल्या अवस्थेत वेळ कसा अगदी अलगद निघून जातो आणि एकटेपणात तीच वेळ कशी लांबत जाते, संपता संपत नाही, जड होऊन जाते, याची एकप्रकारे ही कबुली आहे. दिवस गेले, रात्रीही गेल्या, पण त्या ओघात तेव्हा प्रेमात बुडालेले मन कुठेतरी मागेच राहून गेलेले आहे. आता फक्त त्याची म्हणजे प्रियाची वाट पाहात राहणे हेच प्राक्तन बनून गेलेले आहे. ते सुद्धा ज्याची वाट पाहायची ते अगदी समोर असताना, त्याच्याच समवेत सगळा दिवस जात असताना देखील वाट पाहावी लागणे यासारखी वेदना नाही. म्हणूनच “कैसे दिन बिते कैसी बीती रतियाँ” हे गाणे फक्त अनुराधाचे राहत नाही. ते प्रत्येक अशा माणसाचे होते, ज्याने आयुष्यात कधी तरी शांतपणे विरह अनुभवला आहे. आजही हे गाणे ऐकताना, पाहताना, आपण केवळ एक जुना चित्रपट पाहत नसतो, निव्वळ एक गाणे ऐकत नसतो, तर स्वतःच्या आयुष्यातील एखाद्या न बोललेल्या, विसरायला न जमलेल्या काळाशी हळूवारपणे पुन्हा गळाभेट घेत असतो.
या लेखात शेवटी मी आंतरजालावर उपलब्ध असलेले तीन दुवे देतोय. पहिला दुवा अर्थातच गाण्याचा आहे. गाणे या आधी पाहिले नसेल नक्की पाहा कारण त्या शिवाय त्या शब्दातली वेदना जाणवणार नाही. पुढचा दुवा आहे पंडितजींनी जागवलेल्या राग मांज खमाजचा. आणि तिसरा दुवा आहे एका मुलाखतीचा. यात हृषिदा त्यांच्या चित्रपट, गाणी याबद्दलच्या आपल्या भूमिकेबद्दल बोलताहेत.
गाणे
https://youtu.be/yPMF_vNlnVw?si=4qfMyATF6iV_QnS8
राग मांज खमाज
https://youtu.be/aER1V1bbo-I?si=mken5p09GTK15sc1
ऋषीदांची मुलाखत
https://youtu.be/qrrDMYMTJuM?si=5nu_iyDD9h7znk0-
धन्यवाद.
©विशाल कुलकर्णी
मस्त लिहिलय. रोचक माहिती दिली
मस्त लिहिलय. रोचक माहिती दिली आहे.
छान लिहिलंय गाणं आधीच
छान लिहिलंय ,गाणं आधीच डोळ्यासमोर आलं .गाणं पण पाहिलं गाण्याची प्रिंट चांगली आहे आणि लतादीदींचा आवाज वा!
अरे वा विशाल! छान लेख! मी
अरे वा विशाल! छान लेख! मी अनुराधा पाहिलेला नाही पण त्यातली सर्व गाणी आवडीची आहेत. पंडित रविशंकर यांनी अजून एका हिंदी चित्रपटाला संगीत दिलं होतं. तो चित्रपट मीराबाईच्या जीवनावर आधारित होता, नक्की नाव माहिती नाही. त्यातली गाणी लताला न देता दुसर्या एका गायिकेला दिल्यामुळे लता नाराज होती हे कुठेतरी वाचलेलं आठवतंय! बाकी तुला शास्त्रिय संगीतात चांगली गति आहे हे नव्याने समजलं.
सुंदर, सखोल आणि संवेदनशील
सुंदर, सखोल आणि संवेदनशील लिहिलंयस दाद्या .
अनुराधा हा चित्रपट, कैसे दिन बिते कैसी बीती रतियाँ हे गाणं आणि त्यामागचं भावविश्व तु इतक्या सूक्ष्मतेने उलगडलं आहेस की वाचताना आपण फक्त लेख वाचत नाही, तर त्या शांत विरहाच्या अवकाशात अलगद शिरतो. शब्द, संगीत, मौन आणि प्रतीक्षा यांचं नातं तु ज्या पद्धतीने जोडून दाखवलंयस , ते विलक्षण आहे.
@चिमण - पेहेचाना क्या ?
@चिमण - पेहेचाना क्या ?
गोदान, नीचा नगर आणि धरती के लाल असे तीन सिनेमे दिसतायत नेट वर . नेमका कोणता ?
खूप आवडला लेख. गाणं ऐकलेलं
खूप आवडला लेख. गाणं ऐकलेलं आहे, पण आता नीट ऐकायला हवं. चित्रपटही बघायला पाहिजे खरं म्हणजे.
@चिमण धन्यवाद. बर्याच
@चिमण धन्यवाद. बर्याच दिवसानंतर माबोवर काही तरी लिहीले आहे.
बाकी तो चित्रपट म्हणशील तर हो, गुलजार साहेबांचा मीरा. (विनोद खन्ना आणि हेमा मालिनी अभिनीत). यात पंडीतजींनी मीराबाईची भजने वाणी जयराम यांच्याकडून गाऊन घेतली होती. त्यामुळे लताबाई नाराज होत्या असे ऐकिवात आहे.
फार छान रंगवलीत अनुराधाची
फार छान रंगवलीत अनुराधाची व्यथा.
आणि हे गाणं तर अनुराधा या चित्रपटाचा आत्मा आहे.>> अगदीच. चित्रपट पाहताना हे गाणं आलं की जे घडलं आहे घडत ते शब्दांत, आवाजात आणि अभिनयात किती चपखल उतरवलं आहे हे जाणवते.
ही शांतपणे विरह सहन करणाऱ्या सगळ्यांची व्यथा हे तुम्ही म्हटलंय तेही पटलं.
बाकी संगीताबद्दल राग कोणता इत्यादि काहीच माहीत नव्हते. मुलाखत बघतो आता.
सुरेख लेख. दूरदर्शनवर
सुरेख लेख. दूरदर्शनवर पाहिलाय हा चित्रपट कित्येक वर्षांपूर्वी. यातलं जाने कैसे सपनों में खो गयी आँखियां हे सगळ्यांत जास्त आवडतं. हा लेख वाच ताना कैसे दिन बीते.. ऐकलं आणि तेसुद्धा तितकंच आवडू लागलं.
गुलजारच्या मीरासाठी प्लेबॅक द्यायला लतानेच नकार दिला होता. कारण तिने हृदयनाथसाठी मीरेच्या रचना गायल्या होत्या. हे याआधी वाचलं होतं. आता शोधताना गुगल ग्रुपवर गुलजारच्या याबद्दलच्या आठवणी मिळाल्या.
त्यांनी लक्ष्मीकांत प्यारेलाल संगीत दिग्दर्शक ठरवले होते. पण लताने नकार दिल्यावर तेही बाहेर पडले. त्यानंतर गुलजार पंडित रविशंकर यांच्याकडे गेले. - शब्दशः अमेरिकेला.
https://groups.google.com/g/rec.music.indian.misc/c/aYXGTKIdMUs/m/3L5nY4...
मस्त लिहिलेय
मस्त लिहिलेय
गाणे ऐकलेय. सिनेमा बघितलाय का आठवत नाही
धन्यवाद भरतजी. वेगवेगळ्या
धन्यवाद भरतजी. वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या गोष्टी ऐकायला, वाचायला मिळतात याबद्दल. खखोदेजा. तेव्हा अश्या वेळी मी त्याकडे दुर्लक्ष करतो आणि गाण्यावर लक्ष केन्द्रीत करतो. लक्ष्मी-प्यारे आणि लताबाई असत्या तर मीरा चित्रपटाची गाणी अजुन वेगळी झाली असती कदाचित. पण त्यांच्या नसण्याने काही बिघडले नाही हे ही खरेच. वाणी जयराम यांनी अक्षरशः सोने केले आहे गाण्यांचे.
मी पहिल्यांदा हे गाणं ऐकलं ते
मी पहिल्यांदा हे गाणं ऐकलं ते रेडियोवर. खरं तर कैकदा ऐकलं. अतिशय भावलं. विविधभारतीवर बहुतांश वेळा गाणं वाजायच्या आधी संगीतकार, गीतकार, चित्रपट हे सांगायचे. अभ्यास करता करता, ते निसटून जायचं. आणि मग गाणं लागलं की हे कोण, ते कोण असं व्हायचं! या बाबतीत तसंच घडलं. लताबाईंचा आवाज होता हे निर्विवाद. पण त्या चालीचा डौल असा होता, की सलिलदांचा भास झाला. तशी सुषिर वाद्यं कमी होती, पण होती. थोडी वेगळी चाल. मला त्यातलं कळत नाही खरं, पण उडता म्हणावं असा ठेका. थोडा कमी मात्रांचा ठेका, म्हणजे जास्त रिपिटिशन्स आहेत म्हणून वाटलं असावं. आणि मुख्य म्हणजे बाईंचा सलिलदा, मदनमोहन यांच्याकडे लागणारा विशेष आवाज असतो ना तो होता! शब्दांचा नूरही असा होता की नायिकेची मोहक, खट्याळ तक्रार आहे. सख्यांचा उल्लेख होता, मतवाली रुत होती...
कधी तरी मग पं. रविशंकर संगीतकार हे कळलं. नवल वाटलं, आणि गाण्याचं वेगळेपण का जाणवतंय हे पटलं.
मग बराच उशीरा कधी तरी अनुराधा चित्रपट बघितला. त्या पार्श्वभूमीवर मग गाणं वेगळं भावलं. त्यातला अभिनय भावला. वेदनेची जाणीव झाली.
कुठे तरी तो विरोधाभास जाणवतो. कदाचित नायिकेला पाहुण्यांसमोर (तेही विशेष) नायकाचा मुखभंग करायचा नाहीये. म्हणून चाल अशी जराशी खेळकर, शब्द खोट्या रुसव्याचे, पण परिस्थिती मात्र गंभीर...
आता यूट्यूब वर पारायणं होतात. पण ती पहिली कानांना झालेली ओळख पुसली गेली नाहीये.
आज या उत्तम लेखानं परत त्या आनंदाची जाणीव करून दिली!
कुठे तरी तो विरोधाभास जाणवतो.
कुठे तरी तो विरोधाभास जाणवतो. कदाचित नायिकेला पाहुण्यांसमोर (तेही विशेष) नायकाचा मुखभंग करायचा नाहीये. म्हणून चाल अशी जराशी खेळकर, शब्द खोट्या रुसव्याचे, पण परिस्थिती मात्र गंभीर... >>>>
अगदी अगदी ! आभार .
दक्षिणा, मै तेरेको कैसे
दक्षिणा, मै तेरेको कैसे भूलुंगा?
विशाल, बरोबर तोच सिनेमा आणि वाणी जयराम गायिका!
छान लिहिलंय.
छान लिहिलंय.
अभुवांनी म्हटल्याप्रमाणे अंतरे वरकरणी खेळकर तालावर चालतात, पण मुखड्याकडे जाताना ती लय मोडते - जी लपवण्याची तिची आटोकाट धडपड सुरू आहे, ती उदासी त्यातून एकदम दृश्यमान होते! ते ब्रिलियन्ट आहे!!
हे डिझाईन संगीतकाराचं असलं तरी त्याला असा न्याय फक्त आणि फक्त लताच देऊ शकते हे माझं ठाम मतही नोंदवायला हरकत नसावी.
गाणं सुरू होतानाच्या त्या 'हाये'वर तर जीव ओवाळून टाकावा! या बाईला गाण्यातला भाव पोचवण्यासाठी कधीही काहीही नाट्यमय करावं लागलं नाही याचं मला अतिमहाभयंकर अप्रूप वाटत आलेलं आहे! सलामीलाच गारद करते ती 'हाये'वरची हरकत!!
(असे सलामीलाच जिंकणारे पटकन आठवलेले आणखी दोन 'हाये' आशाचे - 'बुगडी माझी सांडली गं' आणि 'इशारों इशारों में')
अवांतर :
)
सिनेमा पाहिल्याला बरीच वर्षं झाली, पण अशा एका व्यक्तीसाठी झुरत वगैरे बसलेल्या व्यक्तिरेखा माझ्या प्रकृतीला मानवत नाहीत. (माझ्या मनात 'ग्रो अप, ग्रो अप!' असा गजर सुरू होतो.
अवांतरासाठी अगदीच बाडिस,
अवांतरासाठी अगदीच बाडिस, स्वातीताई .
धन्यवाद.
सुरेख लिहिलं आहे. अनुराधा
सुरेख लिहिलं आहे. अनुराधा पाहिला आहे बहुतेक. आठवत नाहीये. मलाही वाणी जयरामचे मीरा मधले "जो तुम तोडो पिया" आवडत नाही, बाईंचेच आवडते. 'मीरा' ऐवजी 'सिलसिला'तलेच ऐकलेय नेहमी. हृषिकेश मुखर्जी गाणं सिच्युएशन असली तरच घ्यायचे असे असेलही पण मला भरमसाठ गाणी आठवत आहेत अचानक. खूबसुरत, चुपके चुपके, किसीसे ना कहेना - गाणी छानच होती अर्थात.
सुरेख, तरल लेख.
सुरेख, तरल लेख.
अनुराधा सिनेमा फार सुरेख होता. दूरदर्शनवर पाहिला होता. त्यातली सगळीच गाणी सुरेख आहेत. जाने कैसी सपनोमें खो गयी ही गाणे जास्त आवडते. कैसे दिन बिते pan surekha आहे. या गाण्यात लीला नायडूचा अभिनय अप्रतिम आहे.
वावे, चित्रपट जरूर पहा. नक्की आवडेल.
लेख आवडला.
लेख आवडला.
अशा नाजूक, तरल, शब्दात मांडायला कठीण भावना असणारे चित्रपट / कथा बंगाली मंडळींनीच करावे. चारूलता किंवा अपू ट्रायलॉजी अशी बरीच उदाहरण आहेत.
सुरेख लेख.
सुरेख लेख.
नुराधा पाहिला आहे बहुतेक. आठवत नाहीये. मलाही वाणी जयरामचे मीरा मधले "जो तुम तोडो पिया" आवडत नाही, बाईंचेच आवडते. 'मीरा' ऐवजी 'सिलसिला'तलेच ऐकलेय नेहमी.>>
सिलसिलापेक्षा 'झनक झनक पायल बाजे' मधलं लताच्या आवाजातील 'जो तुम तोडो पिया' ऐका. सिलसिलातील गाण्यापेक्षा हजारपटीने सरस आणि मधुर आहे
नक्की ऐकेन, चीकू. माझं फार
नक्की ऐकेन, चीकू.
माझं फार आवडतं भजन आहे.
कित्ती दिवसांनी आलास विशाल,
कित्ती दिवसांनी आलास विशाल, छान वाटलं बघून.
काय लिहिलंस, आत खोलवर भिडलं एकदम. हे गाणं पूर्वी छायागीतमध्ये बरेचदा बघितलं आहे, आज या लेखामुळे परत एकदा न बघता दिसलं ते, तू लिहिलेल्या बारकाव्यासकट, जियो. लीला नायडू जाम आवडलेली, फार गोड.
किती सुरेख लिहिलेय!!
किती सुरेख लिहिलेय!!
अनुराधा चित्रपट खुप आवडीचा.. त्यातली गाणीही अप्रतिम आहेत. रवीशंकर यांनी अजुन चित्रपट् करायला हवे होते असे ही गाणी ऐकताना वाटत राहते.
अनुराधामधली गाणी खुप हळुवार आहेत. लिहिली पण तशीच आणि गायली पण. नायिकेच्या मनातली वेदना लताच्या आवाजात ओतप्रोत भरुन येते. आणि सुर लतासाठी इतके सहज होते की ते बरोबर लागताहेत की नाही याची चिंता न करता गाण्यातल्या भावावर लक्ष केंद्रित करुन तो अचुक उतरवणे तिला सहज जमायचे.
सिनेमा पाहिल्याला बरीच वर्षं झाली, पण अशा एका व्यक्तीसाठी झुरत वगैरे बसलेल्या व्यक्तिरेखा माझ्या प्रकृतीला मानवत नाहीत. (माझ्या मनात 'ग्रो अप, ग्रो अप!' असा गजर सुरू होतो.>>>>>
मलाही या चित्रपटातल्या नायिकेने ग्रो अप करावे असे खुप वर्षे वाटत होते. पण आता कळतेय की ती खोल प्रेमात आहे त्या माणसाच्या. त्याला ती आवडत असली तरी त्याचे आयुष्यातील उद्दिष्ट्य काय आहे आणि त्यात घर्,संसार कसे बसत नाहीत हे तिला लग्नाच्या आधीपासुन माहित आहे. तरीही ती हट्टाने त्याला भरीस घालुन लग्न करते कारण तिचे त्याच्यावर अतोनात प्रेम आहे. कधीतरी आपल्यासाठी त्याने थोडा वेळ द्यावा ही एवढीच अपेक्षा आहे आणि तीही पुरी होत नाही हे दु:ख तिला आहे. ती ग्रो अप होऊन जाणार कुठे? तोच तिचे फायनल डेस्टिनेशन आहे.
मीरा चित्रपट यायच्या अगोदर लता-हृदयनाथांचा चला वाही देस अल्बम आला होता आणि खुप गाजला होता. मीरेची भजने आपण आधीच गायली असल्याने रवीशंकरांच्या चालींना न्याय देऊ शकणार नाही म्हणुन नकार दिला असे तिने मुलाखतीत सांगितलेय. मला तरी वाटते की तुलना टाळण्यासाठी तिने नकार दिला असावा. तिने चित्रपटातली भजने गायली असती तर ती खुपच सुंदर झाली असती हेमावैम. रवीशंकरांच्या संगीतात ती जादु होती. वाणी जयरामनेही मीरेची भजने सुंदर गायलीत पण तिच्या आवाजात एक काठिण्य मला जाणवते. तिचे गाणे सांगितीकदृष्ट्या अचुक असते पण चित्रपट संगीतात गाण्यात भाव उतरणेही आवश्यक असते ते तिच्या गाण्यात नाही असे वाटते. अर्थात हेमावैम आहे.
गाण्यात भाव कसा उतरतो त्याचे कैसे दिन बिते… हे एक उत्तम उदाहरण आहे.
अशा नाजूक, तरल, शब्दात
अशा नाजूक, तरल, शब्दात मांडायला कठीण भावना असणारे चित्रपट / कथा बंगाली मंडळींनीच करावे. चारूलता किंवा अपू ट्रायलॉजी अशी बरीच उदाहरण आहेत.>>>>
अगदी मनापासून सहमत .
@साधना
@साधना
खरे आहे. लताबाईंनी जर गायली असती तर कदाचित अजुनही सुंदर उतरली असती. कारण लताबाई अशी गाणी गाताना लताबाई राहत नाहीत.
@अंजुताई
@अंजुताई
धन्स तायडे. याचं क्रेडिट ऋतुराजचं. त्याने विचारलं होतं. माबोवर परत लिहायला कधी सुरुवात करणार? म्हणून हा लेख पोस्ट केला.
याचं क्रेडिट ऋतुराजचं. त्याने
याचं क्रेडिट ऋतुराजचं. त्याने विचारलं होतं. माबोवर परत लिहायला कधी सुरुवात करणार? म्हणून हा लेख पोस्ट केला. >> व्वा, छानच.
खूप छान लिहिलं आहे. आज मुद्दाम ही दोन गाणी पाहिली पुन्हा.
अनुराधा अनेक वर्षापूर्वी जेव्हा जुने छोटे टीव्ही होते तेव्हा पाहिला होता आणि खूप आवडला होता. आता पाहिला तर आवडेल का हा डाऊट आहे मात्र.
सुंदर गाण्यावरचा तेवढाच
सुंदर गाण्यावरचा तेवढाच अप्रतिम लेख
काहीश्या लादलेल्या एकाकीपणाचा शांत स्वीकार शब्दांतून आणि सुरांतून उलगडतो.
सलामीलाच गारद करते ती 'हाये'वरची हरकत!!
>>> १००+
सुंदर रसग्रहण !!!!
सुंदर रसग्रहण !!!!
हा चित्रपट हाच एक अविस्मरणीय अनुभव !
सुरेख लेख. आवडला हेवेसांनल
सुरेख लेख. आवडला हेवेसांनल
Pages