झाडामागचे प्रेमप्रकरण

Submitted by धनु२५२६ on 1 February, 2026 - 01:32

झाडामागचे प्रेमप्रकरण

कोणतीही सार्वजनिक बाग म्हटली की तीन वयोगटातील मंडळीआपला हक्क सांगतातच. लहान मुलं बागेतील झोपाळे, सी-साॅ, घसरगुंड्या यावर हक्क सांगतात. जिथून बागेतील घडामोडींवर अगदी बारीक लक्ष ठेवता येईल अशा बाकांवर वयस्कर मंडळी हक्क सांगतात तर प्रेमी युगुले बागेतील जरा निर्जन भागातील झाडे व झाडामागच्या कट्ट्यावर आपला हक्क सांगतात.
(अशाच एका बागेतील झाडामागचे प्रेमप्रकरण मुक्तक — पद्य लेखन रचून सागण्याचा प्रयत्न आज मी करणार आहे. मुक्तकाचे नाव आहे ...
झाडामागचे प्रेमप्रकरण.)

बागेतील प्रत्येक झाडामागे एकतरी प्रेमप्रकरण रंगतेच रंगते त्यात इतकं काय ते मोठसं...

आज संध्याकाळीही असाच एक तो आणि स्कार्फने चेहरा झाकलेली त्याची ती बागेत आले आणि झाडामागे एकांतात बसले ......
बागेतल्या अनेकांच्या भुवया झटकन वर गेल्या ...
भूतकाळातील आठवणींनी काहींना उगाचच गुदगुल्याही झाल्या ....
पण बोललं मात्र कुणीच नाही .....
बाकावर बसलेल्या एका आजोबांची मात्र फारच चलबिचल झाली ..

(झाडाकडे बोट दाखवून आजोबा म्हणाले) त्या झाडामागे कोणीतरी लपलंय ??? ......

अहो आजोबा, असेल लपलेलं ....

लपलयं तर लपू दे की ....

आजोबा, तुमच्यावर कोणी राज्य का दिलंय ? ...
१०, २०, ३०, ४०, ..... ९०, १०० ‌, आकडे मोजून झाले की, रेडी क्का ?? म्हणत निघाले लगेच शोधायला .....
उगाच आपलं ?? . .. कोणीतरी लपलयं म्हणे ..

अहो पण, (आजोबां अजूनही झाडाकडे काठी दाखवून काहीतरी सांगतच होते) ......
आजोबा, अजून काय आता? ....
त्या झाडामागे प्रेमप्रकरण शिजतयं बहुतेक ...
अहो आजोबा , शिजू देत की ...

तुम्हाला कोणी सांगितलयं का कूकरच्या शिट्ट्या मोजायला ?? ...
१ , २ , ३ . चार शिट्ट्या झाल्या की भात झाला .....
निघाले लगेच गॅस बंद करायला ....

त्या दोघांना लपू देत ... त्यांच्यात काही शिजत असेल तर शिजू देत ...
जरासं फुलूं देत, थोडंस खुलूं देत आणि जमलच त्यांच तर जमू देत की ....

आजोबा, शांत बसा आता, थोडा वेळ ...

आजोबा, तुम्हाला काय कल्पना असणार ?
झाडामागे जाण्याआधी त्याने किती पापड लाटले असतील? ....
किती कष्टाने तिचा मोबाईल नंबर मिळवला असेल .....
किती मिस्ड काॅल झाले असतील .......
किती मेसेजेस केले असतील ......
मग व्हिडीओ काॅल .......
आणि शेवटी भेटी गाठी .....

आजोबा, आणि या भेटी गाठी तरी इतक्या सहज थोडी होतात ?

बघा !! पहिले काही वेळा तो ,ती अन् तिची मैत्रिण ...
भेळ, पाणीपुरी , साॅफ्टी आणि बील फक्त ....
नंतर काही वेळा तो ,ती , अन् तिची लहान बहिण ....
खाऊ ,खेळणी आणि बहिणीचे कौतुक फक्त .....
पार वैतागून गेला की हो बिचारा,

आजोबा, आणि
मग कधीतरी एकदा, ती एकटीच, पण गर्दीच्या ठिकाणी त्याला भेटली ....
आणि त्यानंतर इतक्या दिवसांनी आज ......
पहिल्यांदाच असं झाडाच्या मागे ......
ती आणि तो .. तो आणि ती .. ..
फक्त दोघेच दोघं ...
सगळ्या जगापासून दूर ...
दोघांचाही एकांत आज संपू देत की .....
जवळ येण्यासाठी ते दोघं थोडंसं भांडले तर भांडू देत की ....
दोघांचा सूर जरा जुळू देत की .....
त्यांचे चेहरे थोडेसे फुललेच तर फुलूं देत की ..
अन तिची कळी खुललीच तर खुलू देत की ....
दोघंही बटमोगर्‍यासारखे थोडसं फुलले , तर फुलूं देत की ..
प्रेमप्रकरण रंगत गेलेच तर रंगूं देत की ....
अन् जमलंच त्यांचं, तर जमूं देत की ..

आजोबा,
अन हे सगळं घडायला ...
ते दोघं झाडामागे थोडावेळ लपले, तर लपू देत की ..
अन त्यांच्यात काही शिजलंच तर शिजू देत की ...

अहो आजोबा, बागेतील प्रत्येक झाडा मागे एकतरी प्रेमप्रकरण रंगतेच रंगते त्यात इतकं काय ते मोठसं !!! ...

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान !!!
पण आजोबांचं जरा ऐकून तर घ्या -

अरे, आमचे पण केस होते रे काळे, पिकण्यापूर्वी
अन् गळण्याआधी
हेच झाड लाजलंही होतं रे आमच्याही असल्याच चाळ्याना पूर्वी कधी
आम्हीही दिवटेच होतो ना रे , तसंच असायच्या आमच्या वयातही
पण बिबट्या परवाच दिसला होता तिथे, हे सांगा रे त्या दोघांना कुणी तरी !!!!! Wink

छान लिहिलंय .

भाऊ Lol तुम्ही अगदी वेलेन्टाइन मंथ च्या पोरांच्या प्लॅन्स वर बिबट्या फिरवला Lol

हे वाचून परवाच कुठेतरी वाचलेलं आठवलं...

लग्नाआधी

ती म्हणाली : ते झाड
अन् त्याच्या मनात अनेक रोमँटीक भावना दाटून आल्या

लग्नानंतर
ती म्हणाली: ते झाड
अन् त्याने हळुच झाडू उचलला, अन् झाडू लागला

* भाऊ...वेलेन्टाइन मंथ च्या पोरांच्या प्लॅन्स वर बिबट्या फिरवला * - पण, विनाकारण त्या आजोबाना ' कबाबमे हड्डी ' बनवलं, तर माझ्यातला आजोबा चूप कां बसेल ! Wink

मस्त लिहिले आहे धनु२५२६. सोसायटी गणेशोत्सवात सादर करायला एकदम धमाल मटेरियल आहे! मला तर साभिनय दिसले पण डोळ्यासमोर.. नायगावकर!

मस्त जमलंय.

ह्यावरून अजून एक आठवले :

बागेत पाटी लिहिली होती - झाडाखाली प्रेम करू नका, झाडावर प्रेम करा.

मुलाचा प्रॉब्लेम - पण हिला झाडावर चढता येत नाही ना!