
तर आजचा विशेष दिन म्हणजे जागतिक हस्ताक्षर दिन. याची सुरुवात 1977मध्ये अमेरिकेत राष्ट्रीय हस्ताक्षर दिन म्हणून झाली. पुढे तो अनेक देशांनीही स्वीकारला. आजच्या घडीला तो भारतासहित युके, स्लोव्हेनिया, स्पेन, इटली आणि नेदरलँड्समध्येही साजरा होतो.
1977मध्ये प्रथम त्याची कल्पना अमेरिकेतील पेन व पेन्सिल उत्पादकांच्या संघटनेने मांडली. 23 जानेवारी हा दिवस निवडायचे कारण म्हणजे ती John Hancock यांची जयंती. आता हे जॉनबुवा कोण? तर ते म्हणजे अमेरिकी स्वातंत्र्याच्या जाहीरनाम्यावर सर्वात प्रथम सही करणारे गृहस्थ. त्यांची ती सही अतिशय सुंदर, ठळक व लफ्फेदार असल्याने आकर्षक व लक्षवेधी ठरली (चित्र पहा). पुढे अमेरिकी राज्यक्रांती झाल्यानंतर हे गृहस्थ Massachusetts राज्याचे राज्यपाल होते. त्यांच्या स्मरणार्थ या हस्ताक्षर दिनाची संकल्पना अस्तित्वात आली. अमेरिकी इंग्लिश भाषेत तर एखाद्याच्या सहीसाठी ‘John Hancock’ हा अनौपचारिक वाक्प्रचारच रूढ झालेला आहे(“Put your John Hancock at the bottom of the page”).

मानवी इतिहासात हस्ताक्षराची कला प्राचीन असून ती सुमारे 5500 वर्षांपूर्वी मेसोपोटेमियात अस्तित्वात आली असावी. सुरुवातीस हिशेब ठेवण्याच्या गरजेतून काही चिन्हांची/चित्रांची हस्तलिपी वापरली जायची. कालौघात जगातल्या अनेक प्राचीन संस्कृतींमध्ये विविध प्रकारचे हस्तलेखन सुरू झाले. तेव्हाची ‘लेखणी’ म्हणजे तर एक आश्चर्यकारक प्रकरण होते. रंगीबेरंगी जाड दोऱ्याच्या गाठी बांधून किपू नावाचे साधन तयार केले जाई आणि त्याच्या साहाय्याने तत्कालीन चिन्हलिपी लिहिली जाई. चिन्हलिपी नंतरचा पुढचा टप्पा म्हणजे अक्षरलिपीचा उगम व विकास. त्या पुढील टप्प्यावर माणूस भूर्जपत्रांवर हस्तलेखन करू लागला आणि नंतर कागदाच्या शोधानंतर कागदावर. शब्दलिपीच्या पुरेशा विकासानंतर हस्तलेखनाचा शालेय शिक्षणात समावेश करण्यात आला. साधारण 18व्या शतकापासून जगभरातील अनेक शाळांमध्ये हस्तलेखन रीतसर शिकवण्यात आल्याचे दिसते. आधी पाटी-पेन्सिल नंतर कागद-शिसपेन्सिल आणि पुढे पेन, बॉलपेन आणि इतर आधुनिक प्रकारची कलाकारांची खास पेन्स असा लेखणी माध्यमांचा विकास होत गेला.
पंधराव्या शतकातील छपाईच्या शोधानंतरही काही शतके समाजातील हस्तलेखन जोमाने होतच होते. 19व्या शतकाच्या उत्तरार्धात टंकलेखन यंत्राचा शोध लागला आणि त्यानंतर हस्ताक्षरातली बरीचशी व्यावसायिक कामे त्या यंत्रावर होऊ लागली. सुमारे एक शतकभर या यंत्राने लेखनविश्वात आपले महत्त्व टिकवले होते. पुढे अर्थातच संगणक अवतरल्यानंतर टंकलेखन यंत्र कालबाह्य झाले. गेल्या २५-३० वर्षात आपण आपली लिहायची बहुतेक कामे संगणकावरच करीत आहोत. गेल्या दशकात तर बोलून टंकनाची बहुभाषिक सोय सुद्धा चांगली विकसित झाल्याने लेखनासाठी आपल्या बोटांचा सर्वंकष वापर अजूनच कमी होत चाललेला आहे. सध्या समाजातील विद्यार्थीवर्ग वगळता फार थोड्या प्रौढ व्यक्ती हौसेने हस्तलेखन करीत असाव्यात. आज आपले अनेक आर्थिक व्यवहार घरबसल्या संगणकावरून होत असल्याने बँकेच्या कामांसाठी पण सही करणे हा प्रकारही खूपच कमी झालेला आहे. भारतात आता सटीसामाशी जेव्हा कोणीतरी धनादेशाचाच आग्रह धरतो तेव्हा त्यावर सही करण्यापूर्वी बोटे जरा अडखळतात आणि आपली सही ही पूर्वीसारखी राहिलेली नाही याची जाणीव आपल्याला होते; ज्येष्ठ नागरिकांच्या बाबतीत तर हे प्रकर्षाने जाणवते.
हां . . . पण एक एक मात्र आहे. भारतात अजूनही काही कायदेशीर कामांसाठी आपल्या कागदावरील हस्त-स्वाक्षरीला पर्याय नाही. मालमत्तेची दस्तनोंदणी करताना तर आपल्याला हाताने सह्यांवर सह्या कराव्या लागतातच, पण त्याचबरोबर आपले निशाणी अंगठे सुद्धा उठवावे लागतात. आपण सुशिक्षित असो वा अशिक्षित, त्या सरकार दरबारात त्या क्षणी आपणा सर्वांनाच अंगठेबहाद्दर व्हावे लागते !
हस्ताक्षर ही तर खरंतर प्रत्येक व्यक्तीची निजखूण आहे. त्यातून स्वतःचे वेगळेपण सिद्ध होते. कागदावर पेनने लिहिताना बोटांची जी हालचाल होते ती ज्ञानवृद्धी, भाषाप्रभुत्व आणि मेंदूतील संदेशवहनाच्या दृष्टीने महत्त्वाची असते हे अनेक संशोधनांतून सिद्ध झालेले आहे. म्हणूनच वाढीच्या वयात तरी हस्तलेखन घडले पाहिजे या दृष्टिकोनातून अजूनही भारतासह बऱ्याच देशांतील शाळांमध्ये विद्यार्थ्यांकडून हस्तलेखन करून घेतले जाते. तसेच कॉलेजच्या पदवीपूर्व लेखी परीक्षा सुद्धा हस्तलिखित स्वरूपात घेतल्या जातात. “लिहा म्हणजे लक्षात ठेवा” हा एक शैक्षणिक मूलमंत्र आहे.
कुठलेही नवे तंत्रज्ञान समाजात अवतरले की ते जुन्या तंत्रज्ञानाला आवश्यकता आणि सोय या मुद्द्यांवरून मोडीत काढते. हातात लेखणी धरून लिहिणे हे जर अगदी प्राथमिक स्वरूपाचे ‘तंत्र’ मानले तर सध्याच्या स्पीच टायपिंगच्या युगात व्यावसायिक व व्यावहारिक कामांसाठी ते जुने लेखनतंत्र हळूहळू अस्तंगत होणे अटळ दिसते. मात्र प्राथमिक शिक्षणात आणि पुढे एक कलाप्रकार म्हणून ते काहीसे टिकून राहील. जगातील प्रगत देशांमध्ये दैनंदिन जीवनात संगणकलेखनाचा प्रवेश अप्रगत देशांच्या तुलनेत बराच लवकर झाला. त्यामुळे त्यांच्याकडे तर हस्तलेखनाला लवकरच ओहोटी लागली. सुलभ यंत्रलेखनामुळे मानवी कष्ट कमी झाल्याने आता सार्वत्रिक हस्तलेखनाची दैनंदिन गरज उरली नाही. जगभरातील शिक्षणतज्ञांनी या मुद्द्यावर बराच विचार केलेला असून हस्तलेखनाची कला पूर्णपणे संपुष्टात येईल की काय याची चिंता त्यांना भेडसावते आहे. त्यांच्या विविध भावनांना व्यक्त करणारे ‘द मिसिंग इंक’ हे विचारप्रवर्तक पुस्तक Philip Hensher या ब्रिटिश प्राध्यापकांनी सन 2012मध्ये लिहिलेले आहे.
स्कँडिनॅविय देशांमध्ये शालेय पातळीवरील ‘संपूर्ण संगणकीय’ धोरणाचा केलेला फेरविचार पाहण्यासारखा आहे. स्वीडन व डेन्मार्कमध्ये गेल्या दशकात शालेय शिक्षणात अगदी बालवाडीपासूनच हस्तलेखनाऐवजी संगणकलेखनाचा समावेश केलेला होता. परंतु कालांतराने त्यांना त्याचे तोटे दिसून आल्याने गेल्या वर्षीपासून त्यांनी या धोरणाचा फेरविचार करून पुन्हा एकदा प्राथमिक शाळांमध्ये विद्यार्थ्यांना हस्तलेखन आणि छापील पुस्तकांचा वापर अनिवार्य केलेला आहे. तंत्रज्ञानाचा मेरुमणी असलेल्या जपानमध्ये सुद्धा शालेय शिक्षणात हस्तलेखन ठेवलेले असून अक्षर सुलेखन हा देखील त्यांच्या अभ्यासक्रमातला महत्त्वाचा विषय असून त्याकडे मुलांचा कलाकौशल्य विकास या दृष्टीने पाहिले जाते.
मानवी इतिहासात अनेक कलाप्रकारांमध्ये देखील मोठी उत्क्रांती झालेली आहे. तरीही काही जुने कलाप्रकार काही अंशी तरी टिकून राहावेत असे आपल्याला वाटतेच ना? करमणूकीसाठी आज इलेक्ट्रॉनिक-दृश्यमाध्यमांचा जरी सुळसुळाट झालेला असला तरीसुद्धा आपल्या मनातील एक कोपरा कधीतरी जिवंत नाटक बघण्यासाठी आसुसलेला असतो. तद्वत, संगणकलेखनाचे आपल्या जीवनातले महत्त्व मान्य करतानाच हस्तलेखन ही एक कला म्हणून काही प्रमाणात तरी जतन व्हावी असे काही समाजधुरिणांना वाटते. त्याच अनुषंगाने आजचा हस्ताक्षर दिन साजरा केला जातो. त्या निमित्ताने विद्यार्थी आणि प्रौढांसाठी सुद्धा विविध हस्ताक्षर उपक्रम व स्पर्धा घेतल्या जातात.
आपले संस्थळ हे सुद्धा या दृष्टिकोनाला अपवाद नाही. मूलतः आपला दैनंदिन कारभार संगणकलेखनावरच चालतो. तरीसुद्धा कुठेतरी आपल्या मनात हस्तलेखनाबद्दल काहीशी आपुलकी आहे. म्हणूनच काही उत्सवांच्या निमित्ताने आपण इथे हस्तलेखनाचे उपक्रम राबवित असतो आणि त्याला उत्स्फूर्त असा प्रतिसादही सभासदांकडून मिळतो ही नक्कीच आनंदाची गोष्ट आहे. याचबरोबर सुंदर कलात्मक हस्तलेखन करणारे काही कलाकारही आपल्याकडे आहेत. त्यांनी अक्षर सुलेखनाचे एकदोन धागे चालू केलेले आहेत. असे धागे हे सुद्धा आपल्या संस्थळाचे एक भूषण आहे. अक्षरसुलेखनाची ही कला अशीच बहरत राहो ही सदिच्छा या निमित्ताने व्यक्त करतो. मुळात परदेशातून आलेल्या सुलेखनाच्या कलेचा भारतात बऱ्यापैकी प्रसार झालेला असून अच्युत पालव यांच्यासारखे पद्मश्री सन्मानित कलाकार राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर नावाजले गेले आहेत. पालव यांचे गुरु असलेले र कृ जोशी हे मागच्या पिढीत ‘अक्षर-जोशी’ म्हणूनच ओळखले जात.
वर म्हटल्याप्रमाणे आपले हस्ताक्षर ही आपली ओळख असते. आपण प्रत्यक्ष न पाहिलेल्या एखाद्या व्यक्तीचे हस्ताक्षर हे त्याच्या व्यक्तिमत्वात डोकावून पाहण्याचे एक छोटेसे दालन देखील ठरते. सुरेख हस्ताक्षर असलेल्या कितीतरी लोकांची स्वाक्षरी सुद्धा अगदी डोळ्यात भरणारी, मोहक आणि तडफदार असते. अशा काही वलयांकित व्यक्तींच्या सह्या आपल्या संग्रही मिळवण्यासाठी कित्येक शौकीन उत्सुक असतात. कधीतरी जर ध्यानीमनी नसतानाही आपल्याला एखाद्या नामांकिताच्या सहीसकट एखादी भेटवस्तू घरबसल्या अचानक मिळाली तर ? असा प्रसंग आपल्यासाठी कल्पनातीत आनंददायी ठरतो आणि तो हस्ताक्षरयुक्त सुरेख ठेवा आपण आयुष्यभर जपतो हे काय सांगायला पाहिजे? माझ्या संग्रहातील अशाच एका सुंदर व वळणदार सहीचा हा नमुना :
(व पु काळे यांनी त्यांच्या ‘चिअर्स’ या पुस्तकावर स्वतःची सही करून त्यांच्या मित्रामार्फत मला ते घरपोच भेट कसे व का पाठवले याचा किस्सा पूर्वी इथे लिहिलेला आहे).
असो.
आजच्या या विशेष दिनानिमित्ताने हस्तलेखन या कलेची आठवण काढताना काही विचार आपल्यापुढे व्यक्त केले आणि तुमच्यापुढे हस्तलेखनाचा किंचितसा प्रयत्नही करून ठेवला. एव्हाना या लेखाच्या शीर्षकातील ‘ती’ कोण हे आता सर्वांना उकलले असेलच ! ज्या वाचकांकडे पुरेसा वेळ आणि इच्छा असेल त्यांनी प्रतिसादातून थोडेफार तरी हस्तलेखनातून (किंवा सुलेखनातून) व्यक्त व्हावे अशी विनंती. तसेच, असा काही उपद्वयाप करायचा नसल्यास नेहमीप्रमाणेच टंकून केलेल्या आपल्या प्रतिसादांचेही स्वागत आहेच आहे ! 

*********************************************************************************************************************************
*ग्राइप वॉटरच्या झाकणासारखे
*ग्राइप वॉटरच्या झाकणासारखे टेक्निक व Chelpark Ink (सचित्र)
>>> वा वा ! यामुळे मलाही अगदी अगदी झाले.
माझ्या आजीला तिच्या प्रबंध लेखनासाठी अनेकदा कित्येक पानांचे पुनर्लेखन हाताने करावे लागलेले होते. त्या काळी आमच्या घरातल्या या शाईच्या बाटल्या - छोट्या नव्हे - अगदी ‘खंब्याच्या’ आकाराच्या असायच्या !!
कुमार सर मी विष्णू सहस्रनाम व
कुमार सर मी विष्णू सहस्रनाम व काही स्तोत्रे लिहीलीयेत पण त्या इमेजेस (फोटो) २ मेगॅबाईटसहून जास्त होतायत व अपलोड करता येत नाहीयेत.
६ ने घोळ केलाच...
६ ने घोळ केलाच...
* ६ ने घोळ केलाच... >>>>> असू
* ६ ने घोळ केलाच... >>>>> असू दे
हाताने लिहिलं हे महत्त्वाचं. छान वाटले बघून.
धन्यवाद !
. . .
अवांतर :
खरंतर 1, 2, 3 ...... या अंकलेखनाचा उगम भारतातच झालेला आहे आणि मग ते अन्यत्र वापरले गेले :
(https://en.wikipedia.org/wiki/Hindu%E2%80%93Arabic_numeral_system#:~:tex...).
सुंदर लेख.
सुंदर लेख.
ऋतुराज, अश्विनी११ आणि अस्मिता काय सुंदर वळण आहे तुमच्या अक्षरांना!!! अप्रतिम. शिवाय अजून असं मोत्यासारखं अक्षर टिकवून आहात.
(No subject)
यात लिहायचे राहिले, पण सतीश तुमचे अक्षर पण छान आहे.
सर्वांना धन्यवाद !
सर्वांना धन्यवाद !
मानव, अक्षर पाहून छान वाटले; काही लिहिले हे आवडले. कालच्या पुणे गटग निमित्ताने देखील अनेकांनी तिथल्या अभिप्राय वहीमध्ये सुरेख हस्ताक्षरांचे नमुने चितारलेले आहेत. म्हणजे एका परीने जानेवारी महिना हा आपला हस्तलेखन महिना होऊन गेला !
मी रोज अंदाजे आठ दहा वाक्ये तरी हाताने लिहीत असतो. मजा वाटते.
. . .
बाकी डॉक्टरांचे औषधांच्या चिठ्ठीवरील हस्ताक्षर हा शतकानुशतके जागतिक विनोदाचा विषय होऊन राहिलेला आहे. या संदर्भात एक मजेशीर अर्थपूर्ण इंग्रजी वाक्य आणि भाषेचा प्रयोग झालेला आहे. तो खाली लिहितो :
"I do not know where family
"I do not know where family doctors acquired illegibly perplexing handwriting."
- Dmitri Borgmann
वरील वाक्यातील एक वैशिष्ट्य लक्षात येतेय का ?
जरा विचार करून बघा . . .
. .
. .
. .
वाक्य जसे पुढे सरकते तसे त्यातला प्रत्येक शब्द मागच्या शब्दापेक्षा एक अक्षरानेच अधिक लांब असतो.
याला इंग्रजीत rhopalic sentence असे म्हटले जाते.
वा! छान प्रकार वाटतोय
वा! छान प्रकार वाटतोय अक्षरवृद्धी वाक्यरचनेचा.
छान अक्षर मानव आणि सतीश .
छान अक्षर मानव आणि सतीश .
धनश्री पूर्ण स्त्रोत्र पेक्षा तुझा आवडता छोटासा मंत्र किंवा लेखाला उद्देशून प्रतिसाद लिही की पेनाने आणि फोटो टाक,तुझं अक्षर पाहायची उत्सुकता आहे.
एक सखी दुसरीला म्हणत आहे (असं
एक सखी दुसरीला म्हणत आहे (असं समजा इंजिनिअरची बायडी डॉक्टरणीला सांगत आहे, दिवे घ्यालच :P)
चतुर: सखि मे भर्ता यल्लिखितम् तत् परो न वाचयति |
तस्मादप्यधिकोsमे स्वयमपि लिखितं स्वयं न वाचयति ll
लंपन, टू गुड !
लंपन, टू गुड ! 😂
* लंपन >> भारी !
* लंपन >> भारी !
* स्वयमपि लिखितं स्वयं न वाचयति
>>>> शाळेत असताना एक गुरुजी बऱ्याच मुलांना या सुभाषितानेच टोमणा मारत असत.
याचीच अतिशयोक्ती म्हणजे खालील हास्य रेखाचित्रे :

Paracetamol Amoxicillin
Paracetamol
Amoxicillin
😁
“डॉक्टर लोकांचे अगम्य हस्ताक्षर” याबद्दल भरपूर जोक होतात पण संपर्क आलेल्या किमान ६ डॉक्टरांचे माणिकमोत्यांवत सुंदर हस्ताक्षर # मी प्रत्यक्ष बघितले आहे.
# पुण्यवंत माणसाची शतलक्षणे या माझ्या निबंधातून 😜
BTW, आता बहुसंख्य डॉक्टर्स औषधांची छापिल यादी देतात, हाताने लिहित नाहीत.
आणि म्हणूनच . . .
आणि म्हणूनच . . .
भारतात 2016 मध्ये डॉक्टरांच्या व्यावसायिक तत्त्वांच्या नियमावलीत सुधारणा करून,
"डॉक्टरांनी औषधांच्या चिठ्ठ्या सुवाच्य अक्षरात आणि शक्यतो कॅपिटल लेटर्समध्ये लिहाव्यात" असा आदेश काढलेला आहे :
https://www.dailyrounds.org/blog/write-prescriptions-legibly-preferably-...
आता बऱ्याच डॉक्टरांकडे अशा चिठ्ठ्या संगणकमुद्रित करून मिळतात. त्यामुळे परिस्थिती बदलत आहे. अजून एक-दोन दशकांत यावरील विनोद संपुष्टात यावेत
अगदी, अगदी.
अगदी, अगदी.
आजकाल डॉ. मंडळी कॉम्प्युटर वर प्रिस्क्रिप्शन लिहितात, त्यावर डिजिटल सही असते आणि ते डायरेक्ट फार्मसी मध्ये जाते त्यामुळे प्रिस्क्रिप्शन डिकोड करायचा छंद आता जोपासता येत नाही.
ते डायरेक्ट फार्मसी मध्ये
ते डायरेक्ट फार्मसी मध्ये जाते >>
पेपर कॉपी मागितली तर मिळते. मी नेहमी तशीच घेतो आणि औषधे भारतातून आणतो माझे auto-immune disease साठीचे औषध $१२६ ऐवजी ₹ ३५० मध्ये मिळते.
आजच्या मटा विशेषमध्ये अक्षर
आजच्या मटा विशेषमध्ये अक्षर रोमान्स हा चंद्रमोहन कुलकर्णींचा रोचक लेख आहे.
त्यातील हे निवडक :
“. . . हल्ली तर शाईच्या उडालेल्या शिंतोड्यांना आणि उडालेल्या चिळकांड्यांना, बरबटलेल्या अक्षरांना कॅलिग्राफी म्हणायची पद्धत सुरू झाली आहे . . .”
उत्तर अमेरिकेतील मराठी जनांनी
उत्तर अमेरिकेतील मराठी जनांनी एकता नावाचे त्रैमासिक अनेक दशके चालवले. त्याचे सुरुवातीचे अंक हस्तलिखीत असत. त्याचा हा एक नमुना.
या त्रैमासिकाचे सत्तरच्या दशकापासूनचे अंक माझ्याकडे आले. इथे ६० साली आलेल्या एका दांपत्याच्या मुलाने ते मला आणून दिले. मी इथे मराठी लायब्ररी चालवतो. त्याची माहिती त्यांना कुठूनतरी मिळाली आणि आपल्या आई वडिलांची काही पुस्तके व ही मासिके त्यांनी मला आणून दिली.
८८/८९ पासून हे त्रैमासिक छापले जाउ लागले असे दिसते. त्यापुर्वीचे अंक हे हस्तलिखित (व त्याची सायक्लोस्टाइल / फोटोकॉपी) करून प्रिन्ट केलेले दिसतात.
अजून एका ज्येष्ठांकडून समजले की २०२० पासून आता हे त्रैमासिक प्रकाशित होत नाही - ते अजून कुठल्यातरी उत्तर अमेरिकेतल्या मासिकाबरोबर समाविष्ट झाले आहे.
हे त्रैमासिक, त्याचे प्रकाशन, त्यात लिखाण - वगैरेंशी माझा काहिही संबंध नाही. केवळ हे अंक माझ्याकडे आल्याने मी हे उदाहरण दिले.
ट स , चांगला उपक्रम. आवडला.
ट स ,
चांगला उपक्रम. आवडला.
अजूनही हाताने लिहून प्रसिद्ध
अजूनही हाताने लिहून प्रसिद्ध करतात का?
तसे असेल तर कौतुकास्पद आहे.
हो, डॉक्टरांच्या हस्ताक्षरावर
हो, डॉक्टरांच्या हस्ताक्षरावर भरपूर विनोद होतात. माझे सासरे सुद्धा सर्जन आहेत, उत्तम अक्षर आहे त्यांचे.
माझ्याकडेही शाळेत असताना त्या पसरट निपा होत्या, आम्ही निपा बदलून सुलेखनाचा सराव करायचो. शाईच्या पेनला समोर असतात त्या.
नवीन प्रतिसाद आवडले.
थॅंक्यू हर्पा, मानवदादा, कुमारसर.
छान उपक्रम, अक्षरही सुरेख आहे. लहानपणी आम्ही भित्तीपत्रके करायचो/ लिहायचो. ती अशी लिहूनच असायची व लूक वर्तमानपत्रासारखा असायचा - त्याची आठवण झाली. आमच्या शाळेतल्या बातम्या लिहायचो.
शाळेत असताना विविध
शाळेत असताना विविध कार्यक्रमांच्या वेळी फळ्यावर रंगीबेरंगी सुलेखन करणाऱ्या आमच्या चित्रकलेच्या मास्तरांचे फार कौतुक वाटे. आमच्या भूमिती शिकवणाऱ्या बाई तर वर्तुळ, पंचकोन, षटकोन इतका परफेक्ट काढत की बासच.
आमच्या शाळेत प्रत्येक वर्गात दररोज त्या वर्गातील एका मुलाने फळ्यावर सुविचार, उपस्थिती पट आणि त्या दिवसाचे वेळापत्रक लिहायचे असा दंडक होता.
छान प्रतिसाद सर्वांचे !
छान प्रतिसाद सर्वांचे !
. .
* अजूनही हाताने लिहून प्रसिद्ध
>>>> या संदर्भात दुसरी काही उदाहरणे माहित आहेत. आजही सत्तरीच्यावर असलेले काही लेखक त्यांच्या पुस्तकाचे मुद्रणपूर्व संपूर्ण हस्तलेखन करत असतात. त्यातले एक ठळक उदाहरण म्हणजे अमोल पालेकर यांचे गतवर्षी प्रकाशित झालेले ऐवज एक स्मृतिबंध हे पुस्तक. त्या ३०४ पानी पुस्तकाचे संपूर्ण हस्तलेखन त्यांनी सहा महिन्यांच्या कालावधीत केले होते.
छान लेख . प्रतिसादकर्त्यांचे
छान लेख . प्रतिसादकर्त्यांचे अक्षरेही छान आहेत.
माझ मराठी हस्ताक्षर तित्केसे नीट नाही. पण इन्ग्रजी सुरेख आहे अश्या कॉम्प्लिमेंट्स मिळाल्या आहेत .
Pages