"अगं अगं सूनबाई? काय म्हणता सासूबाई?", असे मराठी चित्रपट अजूनही म्हणजे 2026 साल उजाडले तरी येतच आहेत. मराठी मालिका आणि चित्रपट सासुबाई सुनबाई नणंदबाई जाऊबाई आत्याबाई जात्याबाई या मानसिकतेतून कधी बाहेर येणार?
'अगं अगं सूनबाई, काय म्हणतात सासूबाई?' हा प्रश्न आता प्रश्न राहिलेला नाही, तर ते एक महाराष्ट्राचे 'राष्ट्रीय' दुःख झाले आहे. काळ बदलला, तंत्रज्ञान बदलले, मंगळावर याने पोहोचली, पण आपल्या मालिकांमधली सासू अजूनही सुनेने चहात साखर कमी घातली यावरून घर डोक्यावर घेत आहे.
कारण, परिस्थिती अशी झाली आहे की, संध्याकाळी सातनंतर चुकून टीव्हीचा रिमोट दाबला, तर त्यातून सासूच्या रागीट नजरेचे किरण आणि सुनेच्या डोळ्यातील अश्रूंचे फवारे थेट आपल्या अंगावर उडतात. सिरीयलमधल्या स्त्रीपात्रांचे विविध नातेवाईक असलेली आजूबाजूची हताश पुरुष मंडळी फक्त तोंडाला फेविकॉल पट्टी बांधून घरातील स्त्रियांच्या तोंडाची चालणारी पट्टी ऐकत असतात.
मराठी चित्रपट आणि सिरीयलच्या लेखकांनी या 'मानसिकतेतून' बाहेर पडणे म्हणजे हिमालयात जाऊन तपश्चर्या करण्याइतके कठीण काम आहे. लेखकांना वाटते की, जर सासू-सुनेचे भांडण दाखवले नाही, तर टीव्हीचा स्क्रीन काळा पडेल आणि पृथ्वी फिरायची थांबेल! नणंदबाईंचे कारस्थान आणि जाऊबाईंचा जळफळाट याशिवाय मालिकांचा टीआरपी वाढणार तरी कसा?
यामुळे आता मराठी मालिका आणि चित्रपट लेखकांना सांगावेसे वाटते की: अहो अहो लेखक भाऊ, नका आमचा अंत पाहू!
त्यापेक्षा तुमच्या स्क्रिप्ट मध्ये थोडा बदल करा पाहू!
"अहो अहो जावईबुवा? काय म्हणतात सासरेबुवा?" अशा पद्धतीचे चित्रपट कधी लिहिणार? किमान ते विनोदी तरी असतील.
विचार करा, जर अशी मालिका किंवा चित्रपट आला तर किती धमाल येईल! आतापर्यंत आपण स्वयंपाकघरातली 'किचन पॉलिटिक्स' पाहिली. आता वेळ आली आहे ती हॉलमधल्या 'सोफा पॉलिटिक्स'ची!
कल्पना करा एका दृश्याची:
सासरेबुवा (जावयाकडे रागाने बघत): "जावईबुवा, आज पुन्हा ऑफिसमधून यायला उशीर? आणि हे काय, शर्टाची इस्त्री मोडलेली? आमच्या मुलीने काय यासाठी तुमच्याशी लग्न केले होते?"
जावईबुवा (घाबरत, मान खाली घालून): "अहो बुवा, ते बॉसने जास्त काम दिले होते..."
सासरेबुवा: "बहाणे नका सांगू! आणि ऐका, आज रात्रीच्या जेवणात मला वांग्याचे भरीतच हवे आहे. मागच्या वेळेसारखे त्यात मीठ कमी पडता कामा नये. आणि हो, माझे औषध वेळेवर देत जा"
...आणि बॅकग्राउंडला एक जोरदार म्युझिक आणि जावईबुवांचा क्लोज-अप!
दुसऱ्या एका सीनमध्ये, दोन जावई (साडू-साडू) बाल्कनीत उभे राहून सासऱ्यांची चुगली करत आहेत: "अरे, आपले सासरेबुवा ना, टीव्हीचा रिमोटच सोडत नाहीत. मला मॅच बघायची असते आणि यांना 'सासू-सुनेची' मालिका बघायची असते. काय करणार यार!"
खरंच, जर अशी 'जावई-सासरे' स्पेशल मालिका आली, तर ती नक्कीच विनोदी होईल.
आत हेच बघा ना. नवीन मराठी चित्रपट आला आहे: साडूभाईंचे 'शीतयुद्ध' (The Cold Sadu War)
जसं मालिकांमध्ये दोन जावांमध्ये कुरघोडी चालते, तसंच इथे दोन 'साडूं'मध्ये शीतयुद्ध आहे.
समजा, थोरले जावई (आपले हिरो) आणि धाकटे जावई (जे नेहमीच सासऱ्यांचे लाडके असतात) एकाच वेळी सासुरवाडीला आलेत.
धाकटे जावई: (सासऱ्यांच्या पाया पडत) "बाबा, तुमच्यासाठी ही खास इम्पोर्टेड जॉगिंग शूज आणलेत. आता तुमचा मॉर्निंग वॉक एकदम स्टाईलमध्ये होणार!"
सासरेबुवा: (खुश होऊन) "अरे वा! माझा लाडका जावई! याला म्हणतात संस्कार. नाहीतर काही लोक असतात..." (थोरल्या जावयाकडे तिरका कटाक्ष).
थोरले जावई: (हातात साधी मिठाईची पिशवी लपवत) "बाबा, मी... मी पेढे आणले होते."
सासरेबुवा: "पेढे? अरे, माझे शुगरचे रिपोर्ट बघितलेत का तुम्ही? तुम्हाला काय मला लवकर वर पाठवायचं आहे का? ठेवा ते तिकडे फ्रिजमध्ये."
(कॅमेरा थोरल्या जावयाच्या दुःखी चेहऱ्यावर झूम होतो. डोळ्याच्या कडेला एक अश्रूचा थेंब! आणि जाहिरात.)
आता काही नवीन मराठी चित्रपट येऊ घातलेत.
जावई 'सरकारी', आणि वागणं 'दरबारी
जावई 'ऑनलाइन', सासरे 'ऑफलाइन',
जावई माझा गोजिरवाणा, सासरे माझे केविलवाणे.
आम्ही तिघे 'बिघडलो', सासुरवाडीत 'सापडलो'
आधी 'लगीन घाई', आणि नंतर नुसती 'धुलाई'
निमिष सोनार, पुणे
(No subject)
ओके
ओके