
काजव्या आणि समीर इकडेच येत होते. काजव्याच्या हॅन्डवेव्हला मी ग्लास उंचावून प्रतिसाद दिला. उमेच्या गर्ल्सग्रुपमधून वाट काढत मी त्यांच्या दिशेने निघाले. कुणी तरी हातात थोपवलेली मचूळ व्होडका शेजारच्या टेबलावर ठेवली एकदाची.. ओ गॉड, कसल्या त्या गॉडी बायका, ते चीप ड्रेसेस, ते बेगडी ज्वेल्स, ते लो क्वालिटी परफ्युम, ईय ई.. सच अ डिप्रेसिंग व्हाईब…
(भाग 2 - https://www.maayboli.com/node/87633)
काजव्यानं येताच डोक्यावरची टोपलीवजा हॅट काढून मला सलामी दिली! “मॅडम चेतना, वेलकम टू पुणे… बंदा आपकी खिदमतमें हाजिर है!”
“सुहास, काय अरे हे?”, खोटंखोटं हसत मी त्याच्यासमोर हात केला. त्यानं नाटकी पद्धतीत त्याचं चुंबन वगैरे घेतलं. ही आमची नेहमीची पद्धत होती.
“हर्षद कुठाय रे? आल्यापासून भेटला नाही बघ” मी विचारलं.
“हो नं यार, मी पण शोधतोय त्याला”, समीर म्हणाला
“मॅडम, आपकी आग्या सर आखोंपर! आत्ता शोधून आणतो हजेरीला”, असं म्हणत काजव्या गेला परेड करत…
मी आणि समीर जरा कडेला झालो. “माय गॉड समीर!! किती बोअर आहे ही पार्टी…ऍट्रोशिअस” चेहेऱ्यावर हसरे भाव ठेवण्याची पराकाष्ठा करत मी म्हटलं. समीरच्या चेहेऱ्यावर गोंधळलेले भाव उमटले. माझ्या लक्षात आलं. शिट, तो जुने मित्र, ओळखीचे लोकं, ती सगळी लो की व्हाईब्स यामुळे खूष झाला होता. यू कॅन टेक अ मॅन आउट ऑफ मध्यमवर्ग, पण जन्मजात चिकटलेली सदाशिव पेठ काढू शकणारेत का आउट ऑफ हिम… काय करणार?!
तेवढ्यात समीरला हर्षद येताना दिसला. काजव्या त्याची व्हीलचेअर ढकलत येत होता. समीरला विषय बदलायचा चान्स मिळाला. “चल, हर्षद येतोय”, त्याच्या आवाजात उत्साह होता, तो पुढे धावला, भरतभेटीसाठी…
सम्या, हर्षद आणि काजव्याचा कल्ला बघत मी जरा मागे थांबले. पण हर्षदनं त्यांना बाजूला करत माझ्यासमोर हात केला. हर्षदचा स्पेशल शेकहॅन्ड तसाच होता! ताकद कमी झाली होती, पण त्याची पकड ढिली पडली नव्हती. त्याच्या सुकलेल्या चेहेऱ्यावरचं हास्य तसंच मनलुभावन होतं. काही तरी बिघडलंय हे जाणवत होतं ते फक्त त्याच्या डोळ्यांत. त्यांत ती चमक नव्हती, ऊर्जा नव्हती. आवाजात कंप होता, पण मस्ती तिळभरही कमी नव्हती.
“डार्लिंग चेतना, कशी आहेस? यू आर लूकिंग.. ब्यूटिफुल!”
“द डेव्हिल यू आर! फ्लर्टेशस ऍज यूज्वल.. मी ठीक आहे रे, तू कसा आहेस ते सांग”
त्याच्या चेहेऱ्यावरचं हास्य डोळ्यांत येऊन मावळलं. “बघतेच आहेस.”
तेवढ्यात समीर त्याच्यासमोर गुढग्यांवर बसला, त्याचे दंड पकडले आणि फोर्सफुली म्हणाला, “यू आर ऑलराईट हर्षद, यू आर डूईंग ग्रेट! नेव्हर फरगेट दॅट. धिस इज जस्ट अ पासिंग फेज. आम्ही आहोत इथे सगळे तुझी काळजी घ्यायला..”
त्याच्या शब्दाशब्दांतून तीच दोस्ती झरत होती, ओसंडत होती. पण तो आतून हलला होता. जाणवत होते ते. काजव्यानं एक हात हर्षदच्या खांद्यावर ठेवला, दुसरा समीरच्या. तिघांचेही श्वास फुलले होते, डोळे भरलेले आणि शब्द गोठलेले. नियती - कधी तिनं आम्हाला सगळ्यांना एकत्र आणलं होतं, घडवलं होतं. आता तीच वाटेत एक मठ्ठ अडथळा बनून उभी होती.
तेवढ्यात दरवाज्यातून गोंधळ ऐकू आला. आमची कॉलेजची गॅन्ग आली होती…
गॅन्ग बघून काजव्या धावलाच तिकडे. त्याला राहावतंय का?! उमा त्यांना दरवाज्यातच भेटली. मग काय? पुढचे काही मिंटं फक्त कल्ला चालला होता. सगळी ओळखीची टाळकी बघून मी पण तिकडे खेचलेच गेले जणू. किती तरी जणी मोठ्या गॅपनंतर भेटत होत्या. हाय-हॅलो, हशा, टाळ्या, कौतुक, विनोद, चेष्टा-मस्करी… काय विचारू नका! आवाज, आरडाओरडा, गदारोळ… आपलं वय काय हे विसरून नुस्ता कल्ला… आज सगळ्यांनीच वयाचं लोढणं झुगारून द्यायचं ठरवलं होतं जणू… पन्नाशीचा उंबरठा पार करताना मनात जाणवणारी एक भिती… भिती म्हणावी का त्याला? जाण म्हणू या, जाण! आता आपणा आकड्यांच्या हिशोबात सुरवातीपेक्षा शेवटाच्या जास्त जवळ आहोत ही जाणीव विचारांना निमिषमात्र का होई ना, एक वेगळं वळण देते. मी सुद्धा त्या उत्साहाच्या उधाणात वाहून गेले, मिसळून गेले…
सगळा घोळका हळूहळू इकडे हर्षदच्या दिशेने सरकत होता. हर्षद पुढे वाकून उत्सुकतेनं त्यांची वाट बघत होता.
पण जेव्हा व्हीलचेअरमधे बसलेला हर्षद दिसला तेंव्हा त्या हर्षावेगाला अचानक खीळ बसली. म्हणजे, हर्षद आजारी असल्याची वार्ता सगळ्यांना असेलच. पण प्रत्यक्षात किती जणांना त्याची खरी परिस्थिती माहीती होती कुणास ठाऊक. हा हर्षद असा? कुणाच्या चेहेऱ्यावर प्रश्नार्थक तर कुठे आश्चर्याचे भाव उमटले तर काहींचे चेहेरे पडलेच.खरं तर बहुतेकांनी क्षणार्धात स्वतःला सावरलं. पण, नकळतच ती उत्साहाची लाट भंगली, विरली, ओसरली. एक गंभीरता आली. एकेक जण हर्षदशी बोलू लागला. हास्यविनोद चालू होते, पण त्यात जान उरली नव्हती. बोलण्यात काळजी होती. का बोलताना शब्द अधिक जपून वापरले जात होते? उन्हाळ्याला परका गारवा तिथे उतरला होता. कदाचित मृत्यूची चाहूल तिथे जाणवत होती का? अंगावर सर्रकन काटा आला त्या विचारानं…
त्या गल्बल्यात पडलेला खंड काजव्याला भिडला. तो तडक डीजे कडे धावला. रोमॅन्टिक गाणी बंद झाली, आणि धडकती, फडकती, रॉकिंग डान्ससॉन्ग्ज लागली. अनेक वर्षांनी फन्की टाऊन लागलं. आमच्या कॉलेज दिवसांतलं फेव्हरिट! लोकं धावली. अंगात आल्यासारखी नाचायला लागली. कुणी तरी समीरलाही हात धरून खेचून नेलं. मी हळूच दोन पावलं मागे सरकले. बघ्यांची गर्दी समोर ठेवून एका खुर्चीत बसले. माझंही फेव्हरिट होतंच हे गाणं, पण तेंव्हा,आज काय? आता खूप गाणी ऐकलीत, कॉन्सर्ट्स अटेंडले. आता मला काय याचं नवल? पण यांना तशी संधी मिळाली नसणार. बरोबर आहे.
गर्दीपलिकडे एका कोपऱ्यातून मला हर्षद दिसत होता. कसनुसं हसू त्याच्या तोंडावर होतं. त्याचा स्वभाव बघता त्या नाचणाऱ्या गर्दीत सामील व्हायला तो तळमळत असावा. खरं तर या सगळ्या दोस्तांत मला ओळखणारा, मला हमनवां वाटलेला एक हर्षदच होता. आता तीस-पस्तीस वर्षं आम्ही एकमेकांना ओळखतोय, भेटतोय, बोलतोय, सुखदुःख शेअर करतोय. विचार करता वाटतं, त्यानं मला बेस्ट ओळखलंय. वाटतं… वाटतं की मी असते तर कदाचित त्याची जर्नी वेगळी झाली असती. म्हणजे, तसं सगळ्याच बाबीत म्हणू शकतो आपण, पण तरीही… येतंय नं काय म्हणायचंय मला ते लक्षात? ते कनेक्शन असं शब्दांत पकडणं कठीण आहे. म्हणजे नं, ती एक नॉव्हेल्टीची, वेगळेपणाची, युनिकनेसची अर्ज आहे ना ती त्याच्या माझ्यात सारखी आहे. उमेनं त्याला लाईफमध्ये मदत केली, पण ओन्ली व्हेन इट बिकेम इनएव्हिटेबल, अनअव्हॉयडेबल. म्हंजे आय नो, शी हॅज ऑल्सो सफर्रड अ लॉट. ऍन्ड त्याला नं माझ्या फॅमिली कनेक्शन्सची मदत झाली असती! माझ्यामुळे सम्याचं लाइफ बदललं तर हर्षदचं तर.. जावान्दो…
तिकडे एक दो तीन, चार पाच छे… लागलं, आणि उमेत माधुरी संचारली! अन् तिकडे पब्लिक चेकाळलं! संचारली असेल माधुरी, पण त्या स्टेप्स काय खायची गोष्ट आहे का? विशीतली माधुरी अन् पन्नाशीतली उमा, कसा मेळ जमायचा? काही तरी ओंगळ बघावं लागणार असं वाटलं. मी तर डोळे मिटून घेतले. पण अचानक परत शिट्ट्या अन् शोर झाल्यावर बघितलं तर उमेच्या सलॉनमधली कुणी एक चवळीची शेंग लवलवत होती. प्रोफेशनल असावी. वाचवलं बाई तिनं…
या भन्नाट पर्फॉर्मन्स नंतर त्या डिजेला काय वाटलं कोण जाणे, त्यानं एकदम चिकनी चमेली लावलं. निम्मं पब्लिक त्याच्या नावानं बोंबलायला अन् उरलेलं घुमायला लागलं. शुं बकवास…
मग काजव्या अवतरला. त्यानं डिजेला घोळात घेतलं. दोघं काही तरी माना हलवत बोलले. काजव्यानं हर्षदकडे बोट दाखवलं.
मुंगळा!
मुंगळा? मला अचानक आठवलं - एका पिकनिकला उमा आणि हर्षद या गाण्यावर तुफान नाचले होते. अरे पण…
वेडा झालाय का हा काजव्या?
काजव्या तर वेडा झालाच होता. पण तोच किडा हर्षदलाही चावला होता. उमा हेलनचे ठुमके लगावत होती आणि काजव्याच्या आधारानं उभा राहिलेला हर्षद टपोरी डान्स करत होता. त्या नवलाईनं मीही उठून उभी राहिले, वाट काढत पुढे सरकले... पब्लिक स्टन्ड होतं. हर्षदनं काजव्याला बाजूला ढकललं, आणि नेट गणपतीत नाचावं तसा उमेसमोर नाचला. त्याच्या चेहेऱ्यावर उन्मनी भाव होते. पाच सेकंद, दहा सेकंद, धुंद, बेधुंद, बेभान, बेहोष… ठुमकत, लचकत उमा त्याच्याकडे धावली. मग एक हात तिच्या गळ्यात आणि दुसऱ्यानं काजव्याचा आधार घेऊन ते तिघं डोलत होते.
एका क्षणी काजव्या बाजूला झाला. गाणं बदललं. म्युझिक शांतावलं. लाईट मंद झाले.
पेहला नशा, पहला खुमार, नया प्यार है…
उमेला कवेत घेऊन, तिच्याच आधारानं हर्षद नाजूक डान्सच्या स्टेप्स घेऊ लागला. डोळ्यांत डोळे विरघळवून एकमेकांच्या भोवती हळूहळू गिरक्या घेत होते. जणू जीवन आणि मृत्यू एकमेकांना मिठीत घेऊन विधात्यानं मांडलेला खेळ खेळत होते… थकलेल्या, दमलेल्या हर्षदची मान उमेच्या खांद्यावर विसावली, पावलं थांबली.. न बोलता समीर आणि काजव्या पुढे झाले. हर्षदला त्यांनी अल्लाद व्हीलचेअरमध्ये बसवला. एक टाळी वाजली, मग दुसरी, मग मात्र कडकडाट झाला…
भोवती जमलेलं पब्लिक भावविभोर झालं होतं. शिट्ट्या, टाळ्या, आरोळ्यांचा गजर थांबला होता. निःशब्द नसली तरी, भावगर्भ शांतता पसरली होती. एका प्रदीर्घ, चढउतारांच्या सहजीवनातला अत्यंत आर्त, उत्कट क्षण त्यांच्यासमोर साकारला होता. कोणीही आयुष्यात कधीही विसरू शकणार नाही असा तो क्षण. तिथे मित्र होते, नातेवाईक होते, आप्तस्वकीय होते. निरनिराळ्या वयाची, विचारांची,भाषा बोलणारी माणसं होती. पण… पण एकही कोरडा डोळा नव्हता. त्या गारूडातून कोणीही वाचला नव्हता. त्या क्षणाचा अर्थ प्रत्येकाच्या उरात एक व्रण उमटवून गेला होता.
आणि ती चिरपरिचित धून वाजू लागली… हॅप्पी बर्थ डे टू यू…
खूप फास्ट येत आहेत भाग..
खूप फास्ट येत आहेत भाग..
नेहमीप्रमाणे वेगवान कथानक.
अप्रतिम
अप्रतिम
नेहमीप्रमाणे वेगवान कथानक.>>>
नेहमीप्रमाणे वेगवान कथानक.>>>>> +१