आरोग्यसदनातील हालहवाल

Submitted by हेमंतकुमार on 31 December, 2025 - 21:26

आपणा सर्वांना २०२६ प्रारंभानिमित्ताने उत्तम आरोग्यासाठी हार्दिक शुभेच्छा !

गेली 18 वर्षे व 4 महिने मी आपल्यापुढे कुमार१ या नावाने लेखन केले. आजपासून हेमंतकुमार या नामांतरासह येत आहे. लोभ असू द्यावा ही विनंती.

आता हा धागा काढण्याचा उद्देश सांगतो.
जगभरातील नागरिकांना मिळणारी आरोग्य सेवा सुधारावी यासाठी अनेक देशांमध्ये नियमित प्रयत्न सातत्याने होत असतात. वैद्यकशास्त्रातील नवनव्या संशोधनाचा लाभ प्रत्यक्ष रुग्णांना मिळणे महत्त्वाचे असते. त्या दृष्टिकोनातून प्रत्येक देशाचे एक आरोग्यविषयक धोरण आखलेले असते. त्यात वेळोवेळी तज्ञांच्या सूचनांनुसार सुधारणाही केल्या जातात. भारतासारख्या देशांमध्ये सरकारी दवाखाने आणि रुग्णालयावर अवलंबून असलेल्या रुग्णांची संख्या खूप मोठी आहे. म्हणून तिथे मिळणारी आरोग्यसेवा हा अत्यंत महत्त्वाचा विषय आहे. रोगनिदानाच्या व उपचारांच्या अत्याधुनिक पद्धती अनेकदा महाग असतात. त्या सर्वांना परवडणाऱ्या नसतात. त्या सर्व सेवा सरकारी रुग्णालयांमध्ये उपलब्ध होण्यास देशानुसार फरक पडतो. अशावेळी अनेक सामाजिक संस्थांकडून विविध आरोग्य उपक्रम आणि केंद्रे देखील राबवली जातात. त्यामध्ये अशा सेवांच्या खाजगी क्षेत्रातील शुल्कापेक्षा बऱ्यापैकी कमी शुल्कात त्या उपलब्ध करून दिल्या जातात. अशी स्वयंसेवी सेवाकेंद्रे देखील आरोग्य सेवेला बळकट करीत राहतात.

आरोग्यसेवेसंबंधी देश-विदेशांमध्ये होणाऱ्या घडामोडी आणि विविध सुधारणांची संकीर्ण माहिती इथे इच्छुकांनी लिहावी अशी संकल्पना आहे. देश आणि राज्य पातळीवरील धोरणात्मक बदल हे वृत्तमाध्यमांमधून सर्वांना माहीत होतात. परंतु जिल्हा, शहर आणि गाव पातळीवर जर काही विशेष आरोग्यविषयक उपक्रम राबवले जात असतील तर त्यांची माहिती सामान्य नागरिकांकडून देखील इतरांना समजू शकते. आपल्या ऐकण्यात आलेली या प्रकारची कोणतीही उपयुक्त माहिती इथे आपण लिहूयात. रोगप्रतिबंध, रोगनिदान आणि उपचार या तिन्ही दृष्टिकोनातून उपलब्ध होणारी माहिती इथे जरूर नोंदवावी. आपल्या परिसरातील व्यायामशाळा, विशेष दिनानिमित्त योजलेली आरोग्य शिबिरे, रक्तदान मोहीम, इ. माहिती देखील जरूर लिहावी. सवलतीत मिळणारी आरोग्यसेवा आणि विशेष आरोग्य विम्यासंबंधी सुद्धा लिहीता येईल.

अजून एक मुद्दा.
काही महत्त्वाच्या प्रबळ आजारांवर आपल्या इथे स्वतंत्र धागे आहेत पण अन्य अनेक आजारांसाठी स्वतंत्र धागे निघालेले नाहीत आणि काढणेही अशक्य आहे. अशा आजारांमध्ये नेहमीच्या हायपरऍसिडिटी पासून गंभीर पार्किंसनपर्यंत अनेकांचा समावेश आहे. म्हणून आपल्या माहितीतील कोणत्याही आजारासंबंधी काही वैशिष्ट्यपूर्ण माहिती मिळाल्यास ती देखील इथे लिहिता येईल. दुर्मिळ आजारांबाबतही लिहायला हरकत नाही. याचबरोबर संबंधित व्यक्तिगत अनुभवांचेही स्वागत असेल.

सारांश : ‘आरोग्याविषयी काहीही’ असे प्रस्तुत धाग्याचे स्वरूप राहील.

नमुन्यादाखल गेल्या काही महिन्यात माझ्या वाचनात आलेल्या देश-विदेशातील काही घडामोडी / योजना खाली लिहून श्रीगणेशा करतो.
धन्यवाद !
. .
१.
न्यायवैद्यकीय प्रकरणांमध्ये मृत्यूनंतर शवविच्छेदनाची अनेकदा गरज पडते. सध्याच्या पद्धतीत प्रेताची प्रत्यक्ष छेद घेऊन चिरफाड व तपासणी होते आणि या प्रक्रियेला बराच वेळ लागतो. त्या दृष्टिकोनातून आता CT तंत्रज्ञानाचा वापर करून डिजिटल शवपरीक्षण करता येते (विच्छेदन नव्हे !). या पद्धतीत मृताच्या शरीरावर प्रत्यक्ष छेद न घेतल्यामुळे त्याच्या नातेवाईकांनाही हायसे वाटेल.

digital PM exam.png
( चित्रसौजन्य : Frontiers)

या परीक्षणातून शरीराच्या अंतर्गत झालेले बदल समजून येतात तसेच या अहवालाचे कायमस्वरूपी डिजिटल जतन देखील करता येते. महाराष्ट्रात हा उपक्रम सुरू करण्यासाठी मुंबईतील केईएम तसेच जे जे रुग्णालयांची निवड करण्यात आलेली आहे. यासाठी पहिल्या टप्प्यात शासन 25 कोटींचा खर्च करणार आहे.
. .
२.

भारतातील भटक्या कुत्र्यांचा प्रश्न गेले काही महिने सर्वोच्च न्यायालयात पोचलाय. न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार त्या कुत्र्यांसाठी देशभर निवारागृहे उभारायची ठरलेली आहेत. त्या दृष्टिकोनातून काही कार्यवाही चालू असावी. निदान माझ्या भागापुरते मी सांगू शकतो. पूर्वी आमच्या इथे दररोज रात्री दहा वाजता दहा बारा कुत्री एकत्र जमून जोरदार (कोल्हेकुई) कुत्रेकुई करीत असत. गेल्या महिन्यापासून ती ऐकू आलेली नाही तसेच येताजाता भटक्या कुत्र्यांचे प्रमाणही बऱ्यापैकी कमी झाल्याचे जाणवते.

रेबीज या प्राणघातक आजार प्रतिबंधासंबंधीच्या या गंभीर विषयाबाबत देशभरातून लवकरात लवकर ही कार्यवाही व्हावी ही अपेक्षा.
. .
३.
गेल्या दहा वर्षांत भारतात क्षयरोग व मलेरिया यांचे प्रमाण लक्षणीयरित्या कमी झालेले आहे असे केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी एका आरोग्य परिसंवादात सांगितले. तसेच बाळंतपणादरम्यानच्या माता व बालक मृत्यूच्या प्रमाणातही बरीच घट झालेली आहे. सार्वजनिक आरोग्यसेवेच्या बळकटीमुळे हे सर्व शक्य झालेले आहे असेही ते म्हणाले.
https://timesofindia.indiatimes.com/india/result-of-institutional-streng...
. .
४.
कृत्रिम गर्भधारणेच्या प्रांतातील ही युरोपमध्ये घडलेली दुर्घटना. या प्रक्रियेसाठी निरोगी पुरुषांकडून त्यांचे वीर्य स्वीकारून त्यातील शुक्राणू बँकेत ठेवण्याची पद्धत आहे. बँकेकडे आलेल्या अशा वीर्यावर विविध जनुकीय व अन्य चाचण्या करून संबंधित शुक्राणूंमध्ये काही दोष नाही ना हे पाहिले जाते. परंतु अशा चाचण्यांना काही अंगभूत मर्यादा आहेत. काही वेळेस निरोगी दात्यामध्ये सुद्धा काही स्वरूपाचे जनुकीय बिघाड अस्तित्वात असतात आणि चाळणी चाचण्यांनी ते लक्षात येत नाहीत.

डेन्मार्कमधील एका वीर्यबँकेने एका तरुण विद्यार्थ्याकडून वीर्य स्वीकारले होते आणि त्यावरील नेहमीच्या चाचण्यातून त्यात काहीही अपायकारक आढळले नव्हते. पुढे या वीर्यातले शुक्राणू युरोपातील पाच देशांमधील अनेक स्त्रियांसाठी वापरले गेले. कालांतराने असे लक्षात आले की त्या गर्भधारणेतून सुमारे 200 मुले जन्मली आहेत. त्यातील 23 मुलांमध्ये विशिष्ट जनुकबिघाड (TP53 gene mutation) दिसून आला आणि त्यापैकी दहा जणांना लहान वयातच कर्करोग झालेला आहे. दुर्दैवाने त्यापैकी काहींचा मृत्यू देखील झाला आहे. असा बिघाड शरीरात असलेल्या बालकाच्या बाबतीत भविष्यात कर्करोग होण्याची शक्यता 90% असते.

ivf Ca.png
(चित्रसौजन्य : BBC)

या प्रकरणात अद्यापही संपूर्ण विदा उपलब्ध झालेला नाही. या दुर्घटना घडल्यानंतर संबंधित वीर्याची अनेकदा अधिक बारकाईने तपासणी केली तेव्हा त्या पुरुषाच्या एक पंचमाश शुक्राणूंमध्ये तो जनुकीय बिघाड सापडला. या प्रकरणात त्या दात्याच्या शरीरातील अन्य कोणत्याही पेशींमध्ये हा बिघाड सापडलेला नव्हता. ही अत्यंत दुर्मिळ गोष्ट आहे. म्हणून त्या दात्याला जरी कुठलाही आजार झालेला नसला तरी त्याच्या बिघडलेल्या शुक्राणूपासून जन्मलेल्या मुलांच्या प्रत्येक पेशींमध्ये तो बिघाड गेलेला आहे.

एका वीर्यदात्याचे वीर्य किती स्त्रियांसाठी वापरले जावे या संबंधात अद्यापही समान असा आंतरराष्ट्रीय कायदा नाही. काही देशांनी आपापली मर्यादा ठरवून घेतली आहे. परंतु त्याचे पालन होते का नाही याबाबत साशंकता आहे. म्हणून या संदर्भात तातडीने एका आंतरराष्ट्रीय नियमन कायद्याची आवश्यकता असल्याचे डॉक्टरांनी म्हटले आहे.

https://www.bbc.com/news/articles/ckgmy90z991o

. .
५.
ताप, रक्तदाब आणि अन्य काही दैनंदिन तपासण्यांसाठी कित्येक वर्षांपासून पारायुक्त ( mercury) उपकरणांचा वापर होत आहे. परंतु अशी उपकरणे तुटल्यास त्यातून बाहेर पडलेला पारा जर आपल्या संपर्कात आला तर ते तब्येतीला घातक असते. तसेच पारा हा पर्यावरणासाठी देखील हानिकारक आहे. गेल्या काही वर्षांपासून या प्रकारची पारामुक्त उपकरणे देखील बाजारात आलेली आहेत.
mercury bp.png

नुकताच महाराष्ट्र शासनाने या संदर्भात एक आदेश काढलेला आहे. इथून पुढे सर्व सरकारी रुग्णालयांना पारामुक्त वैद्यकीय उपकरणे वापरण्याच्या आणि जुन्या पारायुक्त उपकरणांची पर्यावरणपूरक पद्धतीने विल्हेवाट लावण्याच्या सूचना देखील देण्यात आलेल्या आहेत.

*******************************************************************************************************

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

दूषित अन्न व पाण्यामधून पसरणाऱ्या एका जंतुमुळे ( Cyclosporiasis ) ‘स्फोटक जुलाबाचा’ आजार होतो. सध्या अमेरिकेतील निम्म्याहून अधिक राज्यांमध्ये या जुलाबाचे रुग्ण आहेत. हिरव्या पालेभाज्या न धुता खाण्यात येणे हे त्याचे एक कारण आहे.

https://timesofindia.indiatimes.com/world/us/explosive-diarrhoea-parasit...

मशरूमचा खाद्यपदार्थ म्हणून उपयोग बऱ्यापैकी होतो. अनेक मशरूमच्या जातींमध्ये β-glucans, micronutrients, glycoproteins, triterpenoids, flavonoids, and ergosterols असे शरीरोपयोगी घटक आहेत. अलीकडे या विषयावरील वैद्यकीय संशोधन जोमाने होत आहे.

मशरूमच्या काही जातींमध्ये सुमारे 130 औषधी गुणधर्म असल्याचे आढळले आहे. त्यामध्ये प्रतिकारशक्ती बळकट करण्यापासून ते हृदयसंरक्षक आणि कर्करोगप्रतिबंधक गुणांचा समावेश आहे. अशा प्रजातींचा औषध म्हणून कितपत वापर करता येईल यासंबंधीचे संशोधन प्रगतीपथावर आहे : https://www.frontiersin.org/journals/pharmacology/articles/10.3389/fphar...

पुण्यातील मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्राला आज 40 वर्षे पूर्ण झाली. तेव्हा पु ल देशपांडे यांनी दिलेल्या एक लाख रुपयांच्या देणगीतून हे केंद्र सुरू झाले होते.
चार दशकांच्या प्रशंसनीय कार्याबद्दल अभिनंदन !

_/\_

Pages