एक ॐ कार

Submitted by धनश्री- on 31 December, 2025 - 03:00


.
कालच एक ॐ कार सतनाम हा मूलमंत्र, जपजी साहिब, आनंद साहिब वाचत बसले होते. आणि ते झाल्यानंतर मानसिक स्थिती मेडिटेटिव्ह होते, चिंतनात्मक. त्या स्थितीत पुढील विचार सुचले. माहीत नाही हे विचार कसे उगम पावतात. ज्या दिवशी विचार कुठुन आणि कसे येतात कळेल त्या दिवशी विश्वाच्या उत्पत्तीचा शोध लागावा.
.
ॐ - काय गोंडस, बाळसेदार, वळसेदार, गालावरती तीट असलेले अक्षर आहे नाही?
उगीच नाही गणपतीला ॐ कार प्रधान म्हणत. जसे कार्तिकस्वामी नित्य कुमार-रुपी आहे, अ कॉस्मिक युथ, तसा अपला गणपती आहे कॉस्मिक शीशु. उगीच नाही मूर्तिकार त्याला पार्वतीच्या मांडीवर बसलेल्या रुपात, कधी पार्वती आंघोळ घालते आहे अश्या मूर्तिच्या रुपात दाखवत.
.
ॐ - प्रत्येक मंत्राच्या सुरुवातीला हा प्रणव असतो. म्हणजे हा तान्हुलाच आहे, आदि आहे, आरंभ आहे.
नंतर मग ॐ नमः शिवाय, ॐ दुं दुर्गायै नमः, ॐ नमो भगवते वासुदेवाय वगैरे संस्करण होउन, हा तान्हुला प्रगल्भ बनतो.
.
शक्तीचे बाळ, गणपती जसा निराकार आणी साकार यांच्या सीमारेषेवरती आहे तसाच हा ॐ नाद, काहीही नाही (शून्य) आणि विश्वोत्पत्ती यांच्या सीमेवरती आहे. म्हणजे विश्वाची सुरुवातच जर ॐकारातून झालेली आहे तर मग तो कोवळा, अनाघ्रात असणारच.
.
खूप वेळ ओंजळीत निळ्या पाण्यावरती हा ॐकार सुर्यबिंबासारखा, काल तरंगत, हेलकावत राहीला. क्वचित ओंजळीत मोरपिसावरती पहुडला. फार निरागस, तान्ह्या बाळासारखा.
.
खूपदा मी जगदंबा (जगत + अंबा), अदिती, पार्वती, अनसूया या मूर्तींचे नाव घेते. माझे माझे मंत्र. आपणच रचलेले. मनात म्हणते. हे जे कॉस्मिक मदर (मातृरुप) आहे ते विलोभनिय जितके आहे तितकेच शक्तीशाली आहे. आणि सर्व देवीरुपात हे रुपच माझे सर्वाधिक आवडते आहे. कुठेतरी माझ्यातला हा अंश - याचे आकर्षण मला सर्वाधिक वाटते. आणि हे रुप गणेशाशिवाय किती अपूर्ण आहे. पार्वतीला जेव्हा तिला बाळ असावे असे स्फुरण झाले तेव्हा तिने गणपतीची निर्मिती केली. हाच तो ॐ ............ कोणतेही संस्करण न झालेला, कॉस्मिक मातृरुपास पूर्णत्व देणारा, आनंद देणारा तान्हुला.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान लिहिले आहे. "एक ओमकार सतनाम" मंत्र मलाही फार आवडतो खास करून त्यातले कर्तापुरख, निर्भौव (निर्भय), निर्वैर हे शब्द फार बळ देतात.

धन्यवाद अस्मिता. होय निर्भय आणि निर्वैर.
खरे तर प्रणवोपासना अवघड असते म्हणतात. एकदम निराकाराची उपासना पचनी पडत नाही. सगुणा कडुन निर्गुणाकडे जाणे सोपे असावे. सगुणातच अडकुन पडते व्यक्ती.
शीख संगीतात - शिवप्रीत सिंग यांची गाणी ऐक
तू सुन हरणा कालया
रंग रता

थॅंक्यू Happy ऐकते. गुर्बाणी(गुरूवाणी) ऐकतच लहानाची मोठी झाले आहे. 'निर्वैर' चुकून चुकले होते, दुरुस्त केले. हा मंत्र पाठ होता एकेकाळी.

वॉव Happy
नांदेडला फार महत्वाचे गुरुद्वारा आहे असे वाचलेले.

ॐ - काय गोंडस, बाळसेदार, वळसेदार, गालावरती तीट असलेले अक्षर आहे नाही?.... हे असं काही कसं सुचते तुला?
छान लिहिलंय.

>>>>>हे असं काही कसं सुचते तुला?
एवढं काही विलक्षण नाही सुचलेलं गं Happy
हो, मला ॐ हे अक्षर दिसायला भयंकर आवडतं.

----- अन्यत्र पूर्वप्रकाशित---------------------

ॐ मणी पद्मे हुं - हा अतिशय मधुर असा तिबेटीयन मंत्र असून, हा अवलोकीतेश्वर या करुणामूर्ती बुद्धाचा मंत्र आहे. तिबेट, जपान, कोरीया, व्हिएतनाम,थायलंड आदि विविध देशातील बुद्धधर्मीय लोक या मंत्राचे उच्चारण करतात. वर म्हटल्याप्रमाणे, अवलोकीतेश्वर ही करुणेची देवता असून निर्वाणपद त्यागून ही देवता हालकष्टात पिचत असलेल्या प्राणीमात्रांचा उद्धार करण्यासाठी झटते अशी कथा/प्रवाद रूढ आहे.

ॐ मणी पद्मे हुं हे संस्कृत रूप झाले तर याच मंत्राचे तिबेटी रूप ॐ मणी पेमे हुं असे आहे. अर्थात मंत्राच्या उच्चारणापेक्षा त्यामागील भाव हा महत्त्वाचा.
______________
याबाबात एक कथा वाचनात आली ती पुढीलप्रमाणे - एका साधूने खूप मंत्रसाधना करून नावलौकीक कमावला आणि बरेच शिष्यदेखील गोळा केले. एकदा त्याच्या कानावर आले की नदीपलीकडे एक प्रसिद्ध वयोवृद्ध सन्याशी आले आहेत. तेव्हा साधू त्या सन्याशास भेटायला गेला. साधूने त्या सन्याशाला विचारले की कोणती मंत्रसाधना आपण केली तेव्हा तो वृद्ध सन्याशी म्हणाला की अमुक अमुक मंत्र मी क्वचित म्हणतो. यावर साधू चमकून म्हाणाला - "अरेरे तू इतकी वर्षे चूकीचे उच्चारण करीत आहेस. मी सांगतो तसा मंत्र म्हण. आणि उर्वरीत आयुष्य तरी कारणी लाव." इतके बोलून साधू होडीत बसून नदीच्या पार जाऊ लागला. थोडा पुढे गेल्यावर मागून हाक आली पाहतो तो काय वृद्ध सन्यासी पाण्यावर चालत येऊन साधूस विचारत होता "मला परत सांगाल काय तो मंत्र?" यावर अतिशय खजील होऊन तो साधू म्हणाला "मला माफ करा आपल्याला मंत्राची गरज नाही" पण तरीही सन्याशाने मंत्र परत ऐकला आणि परत पाण्यावर चालत तो माघारी फिरला.
_________________

ॐ मणी पद्मे/पेमे हुं या मंत्राचा शब्दशः अर्थ आहे - कमळामधील मणी (रत्न). या षडाक्षरी मंत्राचे प्रत्येक अक्षर हे विश्वातील एकेका प्रतलाशी (Realm) निगडीत आहे असे मानले जाते.

ॐ ----> सत्चित आनंद ----> देव लोक
म ----> मत्सर/हाव ----> असुर लोक
णी ----> वासना/इच्छा ----> मानव लोक
पे ----> मूढता/किल्मिष ----> वन्यजीव/प्राणी लोक
मे ----> दारीद्र्य/असुरक्षितता ----> पिशच्च लोक
हुं ----> हिंसा/द्वेष ----> नरक लोक

या मंत्राच्या अनेक मधुर फीती यु-ट्युब वर आहेत.पैकी एक पुढे देत आहे फीत जितकी श्रवणीय आहे तितकीच दर्शनीय आहे. अत्यंत सुरेख चित्रकारी असलेला गौतम बुद्धांचा संपूर्ण जीवनपट (मुख्य घटना) या फीतीमध्ये दाखविल्या आहेत. मी सहसा झोपण्यापूर्वी ही फीत ऐकते. कारण अतिशय मंद सांद्र असे संगीत. आशा करते आपल्याला आवडेल.
https://www.youtube.com/watch?v=1qFaeZ8LLmI&list=RD1qFaeZ8LLmI&start_rad...