आंधळेकाका

Submitted by शर्मिला. on 31 December, 2025 - 01:15

आंधळेकाका

आंधळेकाका हे आईचे काका. म्हणजे खरं तर आमचे ते काका आजोबा. पण त्यांचे सगळे पुतणे-पुतण्या त्यांना आंधळेकाकाच म्हणायचे. मग आमच्या कडूनही त्यांना तेच नाव पडलं.

त्या काळात सगळ्यांकडे असायचे, तसेच आईला पण खूप काका-आत्या होते. आणी त्या काळाप्रमाणेच, काका म्हणजे, अण्णाकाका, अप्पाकाका, भाऊकाका.. वैगेरे होते. पुढे त्यांची संख्या वाढत गेली तशी ही सर्वनाम संपली असावीत. कारण एक काका तर गोठाणा वरचे काका होते.., ते गोठाणा वर रहायचे म्हणून. ह्या सगळ्यांची खरी नावं त्यांच्या पुतण्यांना तरी माहीत होती की नाही कुणास ठाऊक!

आंधळेकाकांचं पण काहीतरी खरं नाव असणारच. पण ते विचारावं असं कधी लक्षातच नाही आलं, आणी तशी गरजही नाही वाटली. तीस-चाळीस वर्षांपूर्वीचा तो काळ. तेव्हा मानसशास्त्र वगैरे कुणाला माहिती नसावं. त्यामुळे शरीर वैशिष्टया मुळे अथवा वैगुण्याने कुणी ओळखल्या गेलं, तर त्याच्या किंवा तिच्या मनावर परिणाम वैगेरे होत नसावा. पायाने अधू असलेला लंगडा.., ऐकू नं येणारा बहिरा.., चश्मा लावलेला ढापण्या.. असं सर्रास चालायचं. बोलणाऱ्याला काही वाटायचं नाही आणी ऐकणाराही सवयीनं ऐकत असावा.

आंधळेकाकांना त्यांच्या वयाच्या नऊ दहा वर्षेपर्यंत दृष्टी होती म्हणे. मग पुढे ती अंधुक होत गेली आणी नंतर तर मग त्यांना दिसायचं पूर्णच बंद झालं. त्यामुळे त्यांचं शिक्षणही बंद झालं. बहुतेक ते चौथी पर्यंत शिकले असावेत.

तसंही, तेव्हा त्या गावात शाळा तरी कुठे होती? चौथी पर्यंतचे वर्ग कसे-बसे भरायचे. तेही चौथीची परीक्षा तालुक्याच्या गावी. त्यानंतर फारसं कुणी शिकायच्या भानगडीत पडायचच नाही. गावातच शेती, नाही तर चालत आलेला काहीतरी पारंपरिक व्यवसाय करायचा. नाही तर मग मजूर म्हणून दुसऱ्याच्या शेतात सालावर राबायचं. अगदी कुणाला पुढे शिकायचच असलं, तर रोज तालुक्याच्या गावी पायी नाही तर बैलगाडीनं जाणं येणं करायचं. त्यातही पाऊस पडला, ओढ्याला पुर आला, की मग बैलगाडीही बंद. एस. टी. तर गावात पोहोचलेलीच नव्हती तेव्हा.

ह्या अशा परिस्थितीत आंधळ्याकाकांच शिक्षण थांबण स्वाभाविकच होतं. डोळ्यांवरचे उपचार सुद्धा जवळपास उपलब्ध नसणारच तेव्हा. आणी धबगड्याच्या घरात एकाच माणसाचा फारसा विचारही होत नसावा.

त्या छोट्याश्या गावातल्या घराचं चित्र डोळ्यासमोर येतं, तेव्हा दिसते ती खालच्या ओसरीतील उजव्या हाताची काकांची खाट.., ज्यावर ते दुपारी जेमतेम दहा पंधरा मिनिटे पडायचे.., वरच्या पडवितले चार खांब, अन् त्यातल्या दुसऱ्या खांबाला टेकून बसलेले आंधळे काका. ती त्यांची ठरलेली जागा होती बसण्याची. ओसरीत बाकी कुणी असलं नसलं, तरी काका मात्र कायम तिथेच असायचे. तिथे बसून ते आजूबाजूला चाललेल्या सगळ्या गोष्टींचा कानोसा घेत असायचे. आणी दृष्टी नसली, तरी सगळीकडे ‘लक्ष’ मात्र असायचच.

खरं तर त्या घरात असंख्य माणसं होती. आजी-आजोबा, मामा-मामी, मामेबहि‍णी, मावश्या, आमच्या सारखे सुट्ट्यांना म्हणून आलेली मुलं नातवंड, घरात दिवसभर काम करणारा गडी.. वीसेक माणसं तरी सहजच असायची एकावेळी घरात. इतरही भरपूर राबता असायचा. पण इतर कुणी जात-येत असलं तरी.. दिंडी दरवाजातून आत शिरल्या शिरल्या खांबाशी टेकून बसलेले, सावळेसे.. ओणवून बसल्यामुळे आणखीनच बुटके वाटणारे, आंधळे काका मात्र त्या खांबाचाच भाग असल्यासारखे तिथेच स्थिर असायचे.

एवढा जुना तो काळ.. गावात जेमतेम शे-दोनशे घरं असतील. गावात सोई तर कुठल्याच नव्हत्या. प्रातर्विधी साठी लोकं तेव्हा तांब्या घेऊन बाहेरच जायची. कोंबड्याची बांग यायच्या आधी घरातली मोठी माणसं उठलेली असायची. बाकीचे जागे व्हायच्या आधीच प्रातर्विधी उरकून मागच्या लांबलचक स्वयंपाक घरात, चुली जवळ हळू आवाजात पहाटेच्या निवांत गप्पा मारत चहा घेत असायची. तिथेही काकांची ठरलेली जागा असायची, भिंतीशी टेकून ते त्यांच्या मोठ्या पितळी भांड्याने चहा घेत असायचे.

आंधळेकाकांना कधीच कशाला कुणाचीच मदत लागलेली पहिली नाही. सकाळी बाहेर जातांनाही वाड्याच्या भिंतीचा आधार घेत ते वाड्याबाहेर पडायचे. त्यांच्या हातात कधी काठीही आली नाही. एका हातात तांब्या अन् दुसऱ्या हाताने पुरेल तितका भिंतीचा आधार घेत ते बाहेर पडायचे.
त्यांना त्यांच्या कामात कुणाची मदत तर लागायची नाहीच, उलट घरात एवढी माणसं आणी घरकामाला गडी असतांनाही घरातली काही काम ते स्वत:च करायचे.

मागच्या अंगणातल्या विहिरीवरून पाणी ओढणं हे त्यातलंच त्यांच एक काम. खरं तर त्या विहिरीला काठ पण नव्हते. विहीरीच्या भोवती फक्त मोठे दगड रचलेले होते. तिथेच खिराडी जवळ एका दगडावर दोर बादली असायची. उजव्या हाताला एक मोठ्ठा डोण होता. सकाळचा चहा झाला की काका चाचपडत विहिरीवर जाऊन तो डोण भरून ठेवायचे. तेच पाणी मग दिवसभर सगळ्यांना वापरायला व्हायचं. दिवसभरात जमेल तेव्हा गडी त्यात भर घालायचा, पण तो डोण काठोकाठ भरून दिवसाची सुरवात मात्र काकांनीच केलेली असायची..

त्यानंतर आंघोळीची वेळ होई पर्यंत ते त्यांच्या ठरलेल्या जागी ओसरीवर खांबाशी टेकून बसलेले असायचे. त्यांनी कधीही ‘किती वाजले..?’ असं कुणाला विचारलं नाही. ते फक्त कानोसा घेत असायचे. घरातल्या सगळ्या मुलांच्या आंघोळी झाल्या, की काका खाटे जवळच्या खुंटीवरच व्यवस्थित निऱ्या करून ठेवलेलं धोतर घेऊन विहिरीवर आंघोळीला जायचे. स्वत:च्या आंघोळीआधी ते विहिरीवरच सगळ्या मुलांचे कपडे धुवायचे. कपडे वाळत घालायची त्यांची जागा पण ठरलेली असायची. त्यांच्या ठरलेल्या जागेवर इतर कुणी वाळत घालत नव्हतं.

कपडे धुवून झाले की, ते तिथे विहिरीवरच स्वत: पाणी काढून गार पाण्याने आंघोळ करायचे. आणी मग आपलं धोतर स्वच्छ धुवून एकही चुणी नं पडता वाळत घालून परत पडवीत यायचे.

उन्हाळ्याचे दिवस असतील, तर त्यांच आणखींन एक ठरलेलं काम होतं.. ते म्हणजे आंब्याचा रस काढणं. शंभर-एक रायवळ आंबे धुवून मोठ्या परातीत ठेवलेले असायचे. मग आंघोळ झाली, की ते रस काढायला बसायचे. आधी सगळे आंबे व्यवस्थित माचून परातीत परत ठेवायचे. सगळं काम चाचपडत चाललेलं असायचं, पण रसाचा एकही थेंब कधी खाली सांडायचा नाही की भांड्यावर रसाचे ओघळ यायचे नाहीत.

त्यांचं काम झालं की परत बाहेर येऊन ते खांबाशी टेकून बसणार. घरात एवढी मुलं होती. त्यांच्या सतत काहीतरी गप्पा.. त्यात भांडणही असायची. काका बसल्या-बसल्या ते सोडवायचे.. कुणाला जरा रागवायचे.. कुणाला प्रेमाने जवळ घ्यायचे..

दुपारी जेवणानंतर ते जेमतेम दहा-पंधरा मिनिटे आडवे व्हायचे. दुपारचा चहा झाला की परत मागच्या अंगणात जाऊन वाळलेले कपडे काढून त्यांच्या इस्तरी केल्यासारख्या छान घड्या घालून ठेवायचे. तेव्हाच त्यांच्या वाळलेल्या धोतराच्या निर्या घालून ते खुंटीला लावून ठेवायचे.

कुठलाही ऋतु असला तरी त्यांचा पोशाख म्हणजे फक्त ते स्वत: धुतलेलं पांढरशुभ्र धोतर. बाकी वरती उघडेच. दुपारी पडतांना त्याच धोतराच्या सोग्याचं पांघरूण व्हायचं, उन्हाळ्यात त्याच सोग्याने वारा घ्यायचा आणी हिवाळ्यात तोच सोगा अंगाभोवती लपेटायचा.

संध्याकाळी दिवेलागणीला प्रार्थना झाल्यानंतर मुलांनी पाढे म्हणणं हा प्रार्थनेचाच भाग होता. अगदी शाळेला सुट्ट्या असल्या तरीही. काकांना सगळे पाढे.. पावकी निमकी पाठ होती. त्यामुळे कुठलीही चूक त्यांच्याकडून लगेच पकडल्या जायची.

एरवीही मुलं अभ्यासाला त्यांच्या आसपास बसायची. मुलांच्या अभ्यासावर ‘लक्ष’ ठेवणं हेही त्यांचं एक काम. सगळ्यांच्या पाठांतराकडे.. वाचण्याकडे त्यांचे कान असायचे. तोंडी गणित सोडवायला तर ते मदत करायचेच पण गरज पडली तर पाटीवर पण सोडवून द्यायचे. पाटीवर लिहितांना अक्षरं एकात एक व्हायची, पण गणित कळायचं. शिकवतांना काय किंवा एरवीही काय.. त्यांचा आवाज कधीच चढायचा नाही. पण मुलांवर काकांचा चांगलाच वचक होता.

भावाचा संसार हाच त्यांचा संसार होता. भावाशी त्यांच बोलणं जेमतेम होतं. पण भावजईशी, म्हणजे आमच्या आजीशी मात्र त्यांच्या छान गप्पा रंगायच्या. सासरी गेलेल्या पुतण्यांच्या संसाराचीही त्यांना अगदी इत्यंभूत माहिती असायची.. अगदी सगळ्या नातवंडांच्या आवडी निवडी सकट.

आंधळे काका ते घर सोडून कधीच कुठेच गेले नाहीत. त्या घरातले ते एक अभेद्य अंग होते. त्यांच्याशिवाय त्या घराची कल्पनाच कधी करता येत नाही.

एकदा मला आठवतं.. खूप लहान होते मी तेव्हा.. आम्ही सगळे गावी निघालो होतो. बरोबर मावशीही होती. आमच्याकडेच रहायची ती नेहमी. दोन बस बदलून जायला लगायचं गावी. रात्र होत आली होती... अंधारातून खडबडत बस निघाली होती. मध्ये एस. टी. स्टँड वर खूप ताटकळायला लागलं होतं. मला अगदी रडू-रडू झालं होतं. ‘केव्हा घरी पोहोचणार..?’ चा माझा धोशा चालू होता. मावशी मला जवळ घेऊन खिडकीपाशी बसली होती.
‘ते.. आलं बघ आपलं घर. तो.. लांब.. दिवा दिसतोय नं.. तिथपर्यंतच जायचंय.. ’ तिने अंधाराकडे बोट दाखवत मला सांगितलं. मी डोळे फाडफाडून तो नसलेला दिवा पहायला लागले..
‘दिसला दिवा..? तो.. बघ दिंडी दरवाजा दिसतोय.. आणखी बघ बरं, काय दिसतय तुला..?’ मावशी दाखवत होती.
त्या काळोखात मला तो भला मोठा दरवाजा.. ओसरीवरचा मिणमिणता कंदील अन् त्या अंधुक पिवळ्या प्रकाशात बसलेले.. खांबाला टेकलेले आंधळे काका दिसायला लागले..

घरातली इतर लोक, बाकी कुठेही असली नसली, तरीही आंधळे काका कायम तिथेच असणार होते. पुढे वयापरत्वे ते गेले, तेव्हा ती ओसरी पोरकी झाली.. जणू ओसरीवरचा एक खांबच निखळला.

*******

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

शर्मिला, एका दमात वाचले हे ललित. किती चित्रदर्शी लिहीले आहेस. खरच ग दृष्टीहीन असणे हे केवढे मोठे आव्हान असेल. कशी मात करतात लोकं? काका स्वावलंबी होते. काका, गाव, विहीर, लहान मुलं सर्व काही डोळ्यासमोर उभे राहीले.
शेवटच्या हळव्या वाक्याने लेख एकदम वेगळ्या उंचीवरती गेला.

सुंदर लिहिले आहे.
म्हणजे, काल्पनिक नसून खरेच आहे जाणवते आहे.
अशा निरपेक्ष, सेवाभावी वृत्तीच्या, अनाग्रही लोकांमुळे पूर्वीचे एकत्र जीवन ही सुसह्य असायचे.

अर्धे वाचली. किती सुरेख लिखाण आहे हे.
निरीक्षणशक्ती अफाट. व्यक्तीचित्रण विलक्षण. हे खर्‍या अनुभवावर आहे असे वाटतेय. ललित असावे.
आज लगबग आहे म्हणून वाचायचे राहीले.
खूप म्हणजे खूप खूप सुंदर शैली.

सुरेख व्यक्तिचित्रण!
अशा साध्या पद्धतीचं आयुष्य जगणारी माणसं खरं तर किती श्रीमंत असतात!

छान लिहिले आहे. आवडले.

पूर्वीच्या काळी व्यंगावरून संबोधणे सुद्धा बरेच ठिकाणी नॉर्मल होते हे ही खरेच. ज्यांनी हे अनुभव घेतले नाही त्यांना आजचे निकष लावता ते असंवेदनशील वाटेल.

खूप छान लिहिले आहे. माझ्या अंध मामाची आठवण आली. म्हणजे ती नेहमी असतेच खरं तर. त्याला ऐन तारुण्यात अंधत्व आलं अपघातामुळे.पण फार फार डोळस होता तो.

उत्तम व्यक्तीचित्रण आणि उत्कृष्ठ वातावरणनिर्मीती...
वाचताना काका, ते घर, ती ओसरी, मागच्या अंगणातली बिनकाठाची विहीर, तिच्या जवळचा डोण अशा सर्व गोष्टी मनःचक्षूंनी पहाता आल्या!
खुप छान लिहिलंय 👍

एकदम आवडलं हे! अशी माणसं असायची आजूबाजूला पूर्वी. आपल्या व्यंगासहित सामावून जायची मोठ्या कुटुंबात.

खूपच सुंदर लेखन. त्यांच्या स्मृतींना वंदन. अंध लोक खूप सक्षम असू शकतात. आणि त्यांना दर वेळेस मदत लागतेच, असं नसतं. उलट त्यांना नॉर्मल सारखं वागवावं असंही वाटत असतं.