सात्विक पेच

Submitted by धनु२५२६ on 23 December, 2025 - 23:17

सात्विक पेच

एक व्यक्ती किंवा स्पर्धक दुसऱ्या व्यक्तीला किंवा प्रतिस्पर्ध्याला नमवण्यासाठी जी योजना आखतो तीला पेच म्हणतात. कुस्तीच्या मैदानात पैलवान असा पेच टाकतो की समोरचा मल्ल त्यातून सुटूच शकत नाही. राजकारणी तर असे डावपेच आखतात की विरुद्ध पक्षाला किंवा प्रसंगी स्वकीयांना नामोहरम करून टाकतात. अगदी घरातसुद्धा लहान मुले आई-वडिलांना किंवा पती-पत्नी एकमेकांना पेचात पकडायची संधी सोडत नाहीत.

असा हा पेच अनेक क्रियापदांना सोबत घेत आपल्या शक्तीचे वैभव दाखवतो. पैलवान पेच टाकतो तर पतंगाच्या लढाईत पेच लढवला जातो, राजकारणात पेचात पकडले जाते तर काही वेळा माणसाला परिस्थिती पेचात पकडते. थोडक्यात काय, हा पेच असा प्रसंग उभा करतो की, ज्याला पेचात पकडले जाते त्याला त्या परिस्थितीतून बाहेर पडण्याची संधीच शिल्लक ठेवली जात नाही पर्याय फक्त हार मानण्याचा. अशा पेचांच्या भाऊगर्दीत एका भक्ताने आपल्या स्वामीला टाकलेला सात्विक पेच मनाला हुरहूर लाऊन टाकतो.

राम चरित मानस या ग्रंथात अयोध्या कांडात गोस्वामी तुलसीदासांनी खालील प्रसंग शब्दबद्ध केला आहे.

जेंव्हा श्रीरामप्रभू गंगा ओलांडायला किनाऱ्यावर येतात तेंव्हा निषादराज, नावाडी केंवटाला घेऊन येतो व त्याला सांगतो की माझ्या स्वामींना पैलतीरी घेऊन चल. केवट नाव आणत नाही व म्हणतो “की मला तुमच्या स्वामींचे गुह्य समजले आहे. त्यांच्या पायाची धूळ चमत्कारी आहे. शिळेला पदस्पर्श होताच शिळेची ऋषीपत्नी होते माझी नाव तर लाकडाची आहे, मग तिची काय गत? ह्या नावेवरच तर माझा चरितार्थ चालतो आणि जर नाव नाही राहिली तर तुम्ही तरी पैलतीरी कसे पोहोचाल? जर तुम्हाला पैलतीरी पोहोचायचे असेल तर मला प्रथम तुमचे चरण नीट धुवायची परवानगी द्या तरच माझी खात्री होईल.”

प्रभू रामचंद्रांना भक्ताने, केवटने टाकलेला हा पेच समजतो. ते लक्ष्मण, सीतामाता व निशादराजाकडे पाहून हसतात व केवटाला म्हणतात, “बाबा, तुला हवे तेच तू कर., जा लवकर जा, पाणी घेऊन ये . माझे पाय धुवून खात्री कर व तुझी नाव वाचव आणि आम्हाला पैलतीरी पोहोचव.”

प्रभूंची आज्ञा शिरसावंद्य मानून केवट लगेचच गंगेचे पाणी आणतो, प्रभूंचे चरणकमल धुवून चरणतीर्थ स्वतः व परिवारातील सदस्यांना देऊन मग मोठ्या प्रसन्न अंतःकरणाने प्रभू रामचंद्र, सीतामाता,लक्ष्मण व निषादराज यांना कुठलेही मोल न घेता पैलतीरी पोहोचवतो.

देवादिकांनासुद्धा जे भाग्य दुर्लभ, ते भाग्य भक्त केवटाने आपल्या आराध्याला सात्विक पेचात टाकून मिळवले व कृपानिधान प्रभूंनीसुद्धा आपल्या भक्ताची ही प्रेमळ मागणी मोठ्या समजून उमजून पुरवली .

केवट नदी पार करून देणारा नावाडी, तर प्रभू रामचंद्र भवसागर पार करून देणारे, पण नावाडीच. अशा या दोन नावाड्यांचा हृदय हेलावून टाकणारा हा पेचप्रसंग गोस्वामींनी इतक्या भावोत्कटपणे रंगवला आहे की मी ही गोष्ट वहीत लिहून ठेवली होती. अलीकडे नुकतेच रामायण मालिकेचे प्रक्षेपण पहिले व नुकताच प्रभूंची लीला वर्णन करणारा हा प्रसंग झाला व पुनः तोच आनंद देऊन गेला.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अरे वा ! केवट संवाद.

तुलसी रामायणातला रसाळ अंक ❤

एही प्रतिपालऊं सब परिवारू
नहीं जानऊं कछु अवन कबारू

होडी वल्हवणे सोडून दुसरे काहीच कमाईचे साधन नसलेला केवट आणि त्याला गंगा पार करवण्याचा मेहनताना देण्यासाठी काहीच नसलेले कफल्लक श्रीराम ! मग “पिय-हिय की सुध जानन हारी” सीता बोटातली अंगठी/ मणि-मुंदरी “मन मुदित” होउन देते… अतिसुन्दर, रसपूर्ण, मनोरम. ❤

ऐकला नसेल तर बनारसच्या पंडित छुन्नुलाल मिश्रांनी गायलेला “केवट संवाद” जरूर ऐका; सुंदर गातात. गातांना मधे-मधे अर्थ- भावार्थ सांगतात- निरूपण करतात.

तुलसी रामायणातला दुसरा असाच सुंदर प्रसंग म्हणजे शिव विवाह.

****अवांतर****
डाव + पेच हे इंग्रजी मधील Strategy + Trick असेच आहे ना ?

फार मस्त लिहीलय धनु.
.
मी ऐकलेले की त्या नावाड्याने हे मागीतले की मी तुम्हाला नदी पार करवतो पण तुम्ही मला भवसागर तरुन न्या.
.
कदाचित मला नीट आठवत नसेल मग.

मी हल्लीच काही दोहे ऐकलेले त्यात नावाडी म्हणतो की समव्यवसायिक लोक एकमेकांकडून पैसे घेत नाहीत. ( एक न्हावी दुसर्‍या न्हाव्याकडून पैसे घेत नसतो ). तर तो नावाडी सांगतो की मी लोकांना नदी पार करवतो आणि प्रभु रामचंद्र लोकांना भवसागर पार करवतात. मी त्यांच्याकडून पैसे कसे घेणार ?

वाह मस्त लेख !!

अनिंद्य, आपल्या पोस्टमधील पूरक माहिती सुद्धा छान

मला अनुप जलोटांनी गायलेलं भजन आठवलं.
कभी कभी भगवान को भी भक्तोसें काम पडे .
जाना था गंगा पार प्रभू केवठकी नाव चढे

मलाही तेच आठवले. छान लिहिलेय.

कभी कभी भगवान को भी
भक्तों से काम पड़े
जाना था गंगा पार प्रभु
केवट की नाव चढ़े
कभी कभी भगवान को भी
भक्तों से काम पड़े
जाना था गंगा पार प्रभु
केवट की नाव चढ़े
जाना था गंगा पार प्रभु
केवट की नाव चढ़े

अवध छोड़ प्रभु वन को धाये
सिया राम लखन गंगा तट आये
केवट मन ही मन हर्षाये
घर बैठे प्रभु दर्शन पाए
हाथ जोड़ कर प्रभु के आगे
केवट मगन खड़े
जाना था गंगा पार प्रभु
केवट की नाव चढ़े
जाना था गंगा पार प्रभु
केवट की नाव चढ़े

प्रभु बोले तुम नाव चलाओ
पार हमे केवट पहुचाओ
केवट कहता सुनो हमारी
चरण धुल की माया भारी
मैं गरीब नैया है मेरी
नारी ना होए पड़े
जाना था गंगा पार प्रभु
केवट की नाव चढ़े
जाना था गंगा पार प्रभु
केवट की नाव चढ़े

केवट दौड़ के जल भर ले आया
चरण धोय चरणामृत पाया
वेद ग्रन्थ जिनके गुण गाये
केवट उनको नाव चढ़ाए
बरसे फूल गगन से ऐसे
भक्त के भाग्य जगे
जाना था गंगा पार प्रभु
केवट की नाव चढ़े
जाना था गंगा पार प्रभु
केवट की नाव चढ़े

चली नाव गंगा की धारा
सिया राम लखन को पार उतारा
प्रभु देने लगे नाव चढाई
केवट कहे नहीं रघुराई
पार किया मैंने प्रभु तुमको
अब मोहे पार करो,
जाना था गंगा पार प्रभु
केवट की नाव चढ़े
कभी कभी भगवान को भी
भक्तों से काम पड़े
जाना था गंगा पार प्रभु
केवट की नाव चढ़े
जाना था गंगा पार प्रभु
केवट की नाव चढ़े
जाना था गंगा पार प्रभु
केवट की नाव चढ़े

प्रत्यक्षाहून प्रतिमा सुंदर ........
तसे काहीसे वाटते आहे.... मी जे काही लीहिले त्यापेक्षा त्यावरील प्रतिसाद खूपच छान !!!!

छान लिहिलेय. प्रतिसादातातली माहिती मस्त.>>+१
साधना, हे भजन मी शाळेत असताना दुपारी बरेचदा विविधभारतीवर लागत असे. एकीकडे गणिताचा गृहपाठ आणि एकीकडे भक्तीसंगीत कार्यक्रम म्हणजे सगळा गृहपाठ वेळेत संपणार असे माझे एक वेळेचे गणित बसले होते. Happy

छान लिहिलेय. प्रतिसादातातली माहिती मस्त.>>+१
साधना, हे भजन मी शाळेत असताना दुपारी बरेचदा विविधभारतीवर लागत असे. एकीकडे गणिताचा गृहपाठ आणि एकीकडे भक्तीसंगीत कार्यक्रम म्हणजे सगळा गृहपाठ वेळेत संपणार असे माझे एक वेळेचे गणित बसले होते. Happy