सकाळ गारठलेली

Submitted by किरण कुमार on 18 December, 2025 - 02:13

गारठली ती सकाळ जेव्हा
श्वानपिलांच्या फराभोवती
हुडहुडली अन् घट्ट बिलगली
एकदुज्याला करत सोबती

गोंडस डोळे डबडबलेले
जणू मखमली देह सशाचे
नाजुक कर्णे हलवत घेती
जागेवरुनी ठाव कशाचे

गारठलेल्या त्याच सकाळी
हळहळलेली होती वसुधा
निपचित पडली रस्त्यावरती
त्या पिल्लांची माता बहुधा

गारठलेल्या त्याच सकाळी
सळसळ पाने पडून गेली
अनाथ झाली पिले बिचारी
सृष्टीसुद्धा रडून गेली

अनेक गेले चाकरमानी
तिथून पुढती पोट भराया
भूतदयेचे धडे कदाचित
गिरवुन गेले होते वाया

कचरावेचक एक माउली
सहज तेथवर धावत गेली
मायेने मग तिने उचलुनी
पिले आपुल्या घरात नेली

पिले गोजिरी वाढत गेली
त्या मातेच्या सान्निध्याने
कृतीत असते दया खरी ती
कुणी न जगतो प्रारब्धाने

ह्या जगताच्या उगाच नाही
ईश्वर वसतो ठाई ठाई
क्षणात करुणा मनात भरता
प्रकटत जाते पिलांस आई

- किरण कुमार

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सुंदर...

वा ! खूप सूंदर आणि चित्रदर्शी .

अनेक गेले चाकरमानी
तिथून पुढती पोट भराया
भूतदयेचे धडे कदाचित
गिरवुन गेले होते वाया

अप्रतिम गेयता. बोरकरांच्या कवितेची "चित्रवीणा" कवितेची आठवण झाली
कोठे तुटल्या लाल कड्यावर
चपळ धीट बकरीची पोरे
एक त्यातले लुचे आईला
सटीन कांती गोरे गोरे.