शेरू परत आलाय S1:E4

Submitted by एक लेखक on 29 November, 2025 - 04:01

शाळेच्या मित्रांचा निरोप आला म्हणून कुलदीपकने मित्राकडून सूट उधार आणला होता.

तो अनाथ होता. दिल्लीतल्या पॉष अशा संत धोंडीराम तारवटकर शाळेतून तो शिकला होता.
ही शाळा देशातील श्रीमंतांची म्हणून ओळखली जायची. देशातल्या टॉपच्या उद्योगपतींची मुलं तिथे शिकायला असत.
त्याच्या शाळेची फीस कुणीतरी एंजल भरत होतं.
नाहीतर आई वडीलांच्या माघारी त्याचं कुणीही नव्हतं.

पंढरीनाथ जुवेकर अनाथालयात त्याचं लहान पण गेलं होतं.
शाळेत तो बुद्धीमान म्हणून प्रसिद्ध होता. अतिशय देखणा असल्याने मुलींचा घोळका त्याच्या भोवती असायचा. त्यामुळं श्रीमंत मुलं त्याचा तिरस्कार करत.
त्याने तो अनाथालयात राहत असल्याचे लपवून ठेवले होते. त्याला वडलांच्या एका मित्राने अनाथालयात भरती करताना या सूचना दिल्या होत्या.
नंतर ते काका पण दिसले नाहीत. वडलांच्या आठवणी , आईची धूसर स्मृती च्या आश्रयाने त्याने शालेय शिक्षण पूर्ण केले.

स्वाभिमानी असल्याने कुणापुढेही हात न पसरता त्याने एका कुरीयर कंपनीत डिलीव्हरी बॉयची नोकरी पत्करली.
पदोपदी अपमान झेलला पण काम करत राहिला. डिलीवरी बॉय असल्याने त्याने नंतर शाळेतल्या मित्रांशी संपर्क ठेवला नाही.

एकाच मैत्रिणीला त्याच्या बद्दल माहिती होतं.
त्याची गर्लफ्रेंड सत्यभामा कुलकर्णी.

कुलदीपक वर शाळेतल्या मुली लाईन मारायच्या पण त्याने मुलींच्या बाबतीत आपले कान, नाक आणि डोळे बंद करून घेतलेले होते. त्याच्या पुढे एक ध्येय होतं. त्याच्या आड त्याला काहीही येऊ द्यायचं नव्हतं. पण सत्यभामा ने त्याच्या एकाकीपणाचा फायदा घेत त्याच्याशी जवळीक वाढवली. त्याच्याशी प्रेमाने बोलावून त्याच्या मनात तिच्या बद्दल आपुलकीची भावना निर्माण करण्यात ती यशस्वी झाली होती.
सत्यभामा विलक्षण सुंदर होती. शाळेतली मुलं तिच्यावर मरत.
पण ती कुलकर्णी असल्याने टंडन, खोसला, गुप्ता, सिप्पी, मेहरा, श्रीवास्तव अशा साधारण कुटुंबातली मुलं तिला टरकून असत. त्यांना अशी आडनावं ऐकूनच धडकी भरत असे. त्यात ती एव्हढी सुंदर.

कुलदीपकचं वाटलावे हे आडनाव ऐकून तो ही गडगंज श्रीमंत असावा असे सर्वांना वाटे. त्यामुळेच गंगू धिल्लन , रुक्मिणी खुराणा या मुलींना त्याच्याशी कसं बोलावं हा प्रश्न पडत असे. असं नाही कि त्या गरीब होत्या. सुखवस्तू होत्या पण त्यांच्या गावात. पाटील, वाटलावे, आगलावे, जोशी,कुलकर्णी आडनावे म्हणजे भारी असंच त्यांना वाटे.

त्यामुळे सत्यभामाने कुलदीपक माहा बॉयफ्रेंड आहे असं सांगायला सुरूवात केल्यानंतर काही काळ त्या मुली तिच्यावर जळत राहिल्या, पण चडफडण्यावाचून त्या काय करू शकत होत्या ? पंजाबी आणि उत्तर भारतीय मध्यम वर्गीयांना मराठी लोकांबद्द्दल आदरयुक्त ईर्ष्या वाटत असे.
जेव्हां कुलदीपकच्या कानावर सत्यभामाची बतावणी गेली तेव्हां त्याला पहिल्यांदा धक्का बसला. पण तो काहीच बोलला नाही.

हळूहळू त्यालाही सत्यभामा बद्दल प्रेम वाटू लागले. म्हणून तो तिच्याशी संपर्कात होता.
पण कधीच तिला हॉस्टेलवर किंवा त्याच्या कुरीयर कंपनीत दोघे भेटले नव्हते. त्याने त्याच्या आतल्या वर्तुळात कुणालाच प्रवेश दिला नव्हता.
तो आणि त्याच्या भूतकाळ असे दोघेच त्या वर्तुळात होते.

सत्यभामाला त्याच्यामुळे त्याचा कधी कधी राग येई, पण त्याला काही बोलावे तर तो आपल्याला सोडून दुसरीच्या मागे जाईल ही भीती तिला वाटत होती.
पण जे व्हायचं ते झालंच.

तिने त्याला शाळेच्या माजी विद्यार्थ्यांच्या गेट टूगेदरचा एस एम एस पाठवला होता.

तो पाहून त्याला काहीच सुचेना. शाळेतली मुलं आता आपलं रंगीबेरंगी जीवन जगत होती. भरपूर पैसा हाताशी असल्याने दिल्लीच्या वेगवेगळ्या नाईतक्लब्स आणि फाईव्ह स्टार हॉटेलमधे पार्ट्या चालायच्या. त्याच्या पर्यंत कधी कधी बातम्या यायच्या. पण त्या जगाची त्याला काहीच पडलेली नव्हती. अशा वातावरणात त्यांच्याशी संबंध ठेवणे त्याला योग्य वाटत नव्हते. कारण आर्थिक स्थितीमधे प्रचंड तफावत होती. काहीही झाले तरी पैशाचे सोंग आणता येत नाही.

या वेळी सत्यभामाने त्याला एस एम एस पाठवताना लवकरच भेट घ्यायला सांगितले होते. तिने गुंडाप्पा शेट्टी शेव फरसाण हाऊस ला दोन दिवसांनी संध्याकाळी सहा वाजता भेटायला बोलावले होते. तिथेच ते शाळेत असताना पाणी पुरी खायला जात असत.
ती वेळ डिलीव्हरीची सर्वात बिझी वेळ होती. त्याचा मॅनेजर अपमान करण्यात कोणतीही कसूर करत नसे. त्यामुळे काय सांगून भेटायला जावं हा प्रश्न त्याला पडला होता.

म्हणून त्याने निर्णय घेतला होता कि सत्यभामाला सगळं सांगून टाकायचं. या आधीही त्याने सुचवून पाहिलं होतं. पण संत धोंडीराम तारवटकर शाळेत कुणी गरीब मुलगा कसा काय शिकेल या विचाराने त्याने चेष्टा केली असा समज तिने करून घेतला होता. या वेळी मात्र तिला सगळं सांगायचं आणि तरीही जर तिला संबंध कंटीन्यू करावेसे वाटले तरच तिच्याशी मैत्री ठेवावी असा निर्णय त्याने घेतला होता. लपवाछपवी तरी किती काळ करायची ?

पण,पण ,पण

एक दिवस मॅनेजरने तिला एक पार्सल देऊन तत्काळ डिलीवरीचा आदेश दिला होता.
पाठवणार्‍याचे नाव त्याला ओळखीचे वाटले होते. ज्या पत्त्यावर द्यायचे ते आडनाव सुद्धा ओळखीचे होते.
काळूराम कुलकर्णी हे णाव ऐकलेले नसल्याने तो बेसावध होता.

बेल वाजवली. आतून ओळखीचा आवाज आला.
" कौन है ?"
"डिलीवरी "
दार उघडलं जाताच दोघांनाही आश्चर्याचा धक्का बसला होता.

ती, ती, ती
सत्यभामा होती. आणि त्याला पाहून तिने तोंडाचा आ वासला होता.
तिला जो धक्का बसला होता त्याच्या कैक पटीने त्याला धक्का बसला होता.

कुलदीपक आणि डिलीवरी बॉय ?
तिच्या नजरेतले हे भाव त्याने स्पष्टपणे वाचले होते.

क्रमशः

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वाचकांचे आभार.
एपिसोडसचा स्पीड ठीक आहे ना ? जास्त वेळ वाट बघायला लागत नाही ना ?

अरे वाह छान आहे..
क्रमशः कथा वाचत नाही मी सहसा. पण हा भाग वाचला सहज आणि इंटरेस्टिंग वाटला..
हलकेफुलके लिहिले आहे.

ऋन्मेष, आपल्या प्रतिसादामुळे भरून पावलो. डोळ्यांवर विश्वासच बसला नाही चक्क ऋन्मेषचा प्रतिसाद या कथेवर.
आपले प्रतिसाद खूप रसरशीत असतात. खूप हुरूप आला. सर्वच मायबोलीकरांचे, सर्व प्रतिसादकांचे मनापासून आभार.
हा सीझन देवाशपथ लवकर पूर्ण करू शकेन आता.