
सेकंड शिफ्ट संपवून घरी पोहोचलो तर दोन वाजत आले होते. पाऊस आणि रस्त्यावरचे अपघात. तासभर वाया गेला. आमच्या मुंबैला शांततेचं वावडं आहे. इतक्या रात्रीही वाहनं धावतायत. आत्ता मुंबैबाहेर मालट्रक चाललेत. थोड्यावेळात भाजीपाला अन् दुधाचं ट्रॅफिक सुरू होईल. छत्री मिटवून झटकली. दरवाजा वाजवला. दारातच बूट उतरवायला लागलो. बायको दोन दिवस तापली होती. काल उतार पडला होता. पण ताकद जाते हो एवढ्याश्या तापानं. पण उठली. दरवाजा उघडला. खायला हवं नको विचारलं, सवयीनं. तशीच पोराला सरकवून कलंडली. खुंटीवरचे कपडे उचलले. उंबरठा ओलांडून स्वैपाकघरात गेलो. दिवा लावला, पडदा सरकवला. पिशवीतून डबा काढून घासायला टाकला. पिशवी दाराआड खुंटीला. युनिफॉर्म ओला झाला होताच. पावसाळी ओलावा घरातल्या कपड्यांत शिरला होता. झटकून चढवले. उद्यापर्यंत वाळावा म्हणून युनिफॉर्म हॅंगरला लटकवला. भिंतीला न टेकेल असा काठीवर हॅंगर टांगला.
पण लक्ष कुठाय त्यात, नुसती हाताची रोजची सवय. मघाचा ॲक्सिडेंट पाहिला अन् चित्त बिथरलं होतं. ऑटो, मोटारसायकल आणि एस्टीची बस. वाहाणाऱ्या पाण्याबरोबर आलेल्या मातीचा चिखल चेंबूर नाक्यावर असतो. काय झालं नक्की ठाऊक नाही. पण ती फटफटी घसरली असावी. आणि मागची बाई एस्टीच्या मागच्या चाकाखाली आली असावी. मग ऑटो? काय की बा. बिचारी, तरुण वाटत होती. बाईकवाल्याला ॲम्ब्युलन्स घेऊन गेली होती. पाऊस ओतत होता. पासिंजर रस्त्याकडेला उभे होते. पोलिस, बघे, आमच्यासारखे शिफ्टहून परतनारे, बाहेरगावचे ट्रक ड्रायव्हर, क्लीनर. पावसातही गर्दी होती. मागे वाहनांची लायन लागली होती. ओल्या रस्त्यावर दिवे परावर्तित होत होते. पोलिसांच्या गाड्यांचे लाल-निळे दिवे भिरभिरत होते. बंद सिग्नलचे पिवळे दिवे उघडमीट करत होते...
दांडीवरचा पंचा घेऊन डोकं पुसलं. फुलपात्रात पाणी घेऊन तिथेच स्टुलावर बसलो. पागोळ्यांचा आवाज वाहतुकीच्या आवाजात मिसळला होता. मगाधरनं डाचत होती ती आठवण दिव्याच्या पिवळ्या प्रकाशात आकारली. अशीच एक रात्र, अंधारी. पावसाची. चिखलाची. ॲक्सिडेंटची.
---
महेशची माझी भेट झाली खोपोलीच्या पॉलिटेक्निकला. आम्ही एकाच वर्गात होतो. हुशार होता. एकपाठी म्हणा ना. पण घरच्या परिस्थितीमुळे अकरावी-बारावी टाळून इकडे आला. डिप्लोमा म्हणजे त्या काळी नोकरीची हमी! पण एवढा हुशार मुलगा गवर्नमेंटला न जाता इथे का? कारण लवकरच लक्षात आलं. बरं, आमची आडनावं अशी की वर्गात एका पाठोपाठ. एकाच होस्टेलला. त्यामुळे ओळख वाढली. मी हुशार नाही, पण कॉलेजच्या भाषेत घासू. त्यामुळे सबमिशन कायम वेळेवर तयार. तर महेश फुलपाखरू. अनेक अर्थानं, फक्त रूप सोडून! त्यामुळे माझ्या डिफिकल्टी तो सोडवायचा आणि त्याचं सबमिशन मी करायचो. दोघांच्याही पथ्यावर पडलं. मुलगा हरहुन्नरी. एक मुलींचा विषय सोडला तर.. पण सगळे विषय घुमून फिरून तिथेच यायचे. त्या वयात तरी. आता डिप्लोमाला मुली त्या किती? मोजून सात, वर्गात. फायनलला पोचलो तेंव्हा पाचच उरल्या होत्या. पण हा कायम त्यांच्याभोवती गोंडा घोळवत असायचा. त्याला मागच्या वर्गातल्या, पुढच्या वर्गातल्या, शेजारच्या कॉलेजातल्या कुणीही चालायच्या. जरा बरी पोरगी दिसली की हा भाळायचा, लाळ गाळायचा.
एकदा कसलासा फॉर्म भरायला लाईन लावली होती. मुलांची वेगळी, मुलींची वेगळी. दुसऱ्या माळ्यावर. मुली कठड्याच्या बाजूला. आलं लक्षात? हा खालून चार वेळा विनाकारण(?) चकरा मारून आला, वर बघत बघत...
पोरी पण बाराच्या असतात, नाय म्हणलं तर होणार कसं? पोरी त्याला बरोबर घोळात घ्यायच्या. जरा पुढे झुकायचा अवकाश की हा पाघळायचा. अक्षरशः नागवायच्या त्याला. दोसा काय, वडापाव काय, आईसक्रीम, विचारू नका. त्यामुळे हा सदैव उधारीत. परिक्षेच्या वेळी हा स्वतःचा अभ्यास सोडून मुलींची शिकवणी घेण्यात गुंग. दहावीत कमी मार्क पडण्याचं कारण हेच होतं.
आता हे बाकी मुलांना कसं रुचणार? त्यात याच्या बढाईखोर स्वभावामुळे सगळेच नाराज असायचे. जमेल तेंव्हा वचपा काढायचे. तरीही, एकंदर लोकप्रिय व्यक्तिमत्व होतं. कारण मुलींच्या कथा कहाण्या त्याच्या इतक्या कोणाला माहिती?! हे ठीक होतं, पण याची नजर वाईट आणि तोंड खराब. इतकं अचकट-विचकट बोलायचा की नकोसं व्हायचं. मास्तरणींना सोडायचा नाय मंजे बघा.
एकदाच त्याचं आणि माझं भांडण हाणामारीपर्यंत गेलवतं. तसा मी शिक्षकांसून दोन हात दूर. पण मॅथ्सच्या कासार मॅडम एकच आपल्या फेवरिट. आमची डिप्लोमावाल्यांची साली गणितात बोंब. पण त्या मन लावून शिकवायच्या. मला त्यांनी खूपच मदत केली होती. महेश तर त्यांचा फेवरीट. पण ते त्याच्या हुशारीमुळे. आता मास्तर बाई विषयी आपण काय बोलणार? तशा यंग होत्या. पण बाई स्लीव्हलेस घालून कॉलेजला यायच्या. त्या काळात हे डेरिंग होतं. त्यावरून महेशनं तारे तोडले होते. मी त्यांच्या जरा जवळचा. त्यामुळे आमच्याविषयी दोसदारांत बोलताना त्यानं विनाकारण लाईन ओलांडली. एकदा, दोनदा. मग मात्र मी सटकलो. त्याला दाखवला गिरणगावी हिसका. मग रात्री येऊन त्यानं माफी मागितली होती. तसा चांगला होता.
त्याची आणि माझी जोडी विसंगत होती. आमचं दोन बाबतीत पटायचं. ट्रेक आणि पैसे. माझी काही पैशांची खाण नव्हती. पण माझा कल खर्च न करण्याकडे असायचा. त्यामुळे त्याचा सावकार मी. हे एक अन् त्या तीन वर्षांत आम्ही हरिश्चंद्रगड ते पन्हाळा कित्येक गड मारले होते. एखादा शनिवार-रविवार गडावर स्वारी नसेल तरच तो पुण्याला आणि मी घरी, मुंबैला. कधीकधी मी त्याच्याकडे, नै तर तो माझ्या हिकडे.
पण गंमत सांगतो, कधीही त्यानं माझ्या बहिणीकडे वाईट नजरेनं पाहिलं नाही! आपल्याला कळत होती नं त्याची नजर. बहिणीला पण सेफ वाटलं.
पण प्रत्येक नातं तसं नसतं ना...
----
शेजारच्या इंजिनिरींग कॉलेजला माथरकर प्रोफेसर ड्रॉईंग शिकवायचे. शेवटच्या वर्षाला आमच्या प्रोजेक्टला ते गाइड भेटले. त्यांची मुलगी तिथेच शिकायची. आम्ही जे काय चारसहा वेळा मास्तरांना भेटायला गेलो होतो, तेव्हढ्यात महेशनं तिच्याशी प्रज्ञाशी जवळीक वाढवली. हे त्याला बराबर जमायचं. आम्ही गेलो की ती मुद्दाम तिथे येऊन बसायची. मास्तरच्याही ते लक्षात आलं होतं. ती होती हिरॉईन. साली तीन चार पोरांना एकावेळी खेळवत होती. महेशनं त्याची हुशारी डायरेक्ट तिच्या बापालाच दाखवल्यानं त्याचा घोडा विनात होता. पण हिथेपण त्याची नेहमीची सवय नडली. फुकाच्या फुशारक्या. बोलणं जसं काही तिला चार वेळा झोपवलंय असं. महेशची लाईन क्लीअर झाल्यानं तिच्या एका बॅचमेटची तुंबलीवती. तो आडव्यात गेला. त्यानं खेळ केला.
तेव्हां हे रोझ डे वगैरे प्रकार नुकतेच सुरू झाले होते. डिप्लोमा संपत आला होता. महेशला वाटलं चला मामला पुढे न्यावा. गेला त्या कॉलेजला रोझ घेऊन. त्या पोरानं पाहिलं. संधी सापडतेय म्हटल्यावर आधी फिल्डींग लावली. प्रज्ञा होती त्या लॅबच्या बाहेर महेशला घेऊन गेला. त्यानं महेशला चेकाळवला. हा काय, उठवळ लंडाचाच, बहकला. नेहमीच्या सवयीनं तिच्याविषयी काहीबाही बरळला. बाकी पब्लिक त्याला किल्ल्या मारत होते, आणि हा नाही नाही ते भकत होता. ती जी भडकून आतनं आली, तिनं महेशच्या कानाखालीच मारली. सगळं कॉलेज बघत होतं. तिनं हात उचलला म्हटल्यावर बाकी पोरं सोडतायत का? बाहेरच्या कॉलेजातला मुलगा येऊन आपल्या कॉलेजातल्या मुलीला रोझ देतो? मनसोक्त धुतला त्याला. डावा हात फ्रॅक्चर, आठदहा टाके, काही विचारू नका.
---
पण जित्याची खोड...
दोघंही एकाच ठिकाणी नोकरीला लागलो. इंजिनिरींग कंपनी, प्रॉडक्शनला होतो. शिफ्ट ड्यूटी. हा पुणेकर तिकडे दादरला कुणा नातेवाईकाच्या ओळखीनं पेईंग गेस्ट म्हणून रहायला लागला. परवडत नव्हतं तरी. का? त्याच्याच भाषेत सांगायचं तर गोऱ्या गरगरीत आंट्या बघायला मिळतात म्हणून.
ह्याला रोज थर्ड शिफ्ट हवी. का? अजूनही माझ्याकडून पैसे घ्यायचा. कशाला असं विचारलं तर येणारी उत्तर... जावं द्या. लक्षणं ठीक नव्हती.
मी गिरणगावात जन्मलो, वाढलो. नाक्यावरचा चहाटळपणा अंगात भिनलेला. पण गरतीला आडवे जाणारे आपण नाय. कुणी चवचाल असेल तर लायन चालवायला ना नाय. बाईची चाल कळते नाक्याला, काय? पण महेशला तो पोच नव्हता. पुण्यातून मुंबैला आला तर त्याची नजर फाटलीवती. हिथलं बोलणं वेगळं, चालणं वेगळं. टापटीप राहणं, केसांची वळणं..
आपण म्हंजे कोण हा त्याचा भ्रम वाढायला लागला. दिवसभराच्या वेळात गुटरगूं करू लागला. घरी असणाऱ्या बायका मुलींशी घसट वाढवू लागला. कशा पटायच्या याला पोरी नवलंच आहे. याची नजर वाईट हे तर मैलावरून ओळखू यायचं. पण असतं एकेकाचं आवाहन, वा आव्हान.
शेवटी एक दिवस आलीच वेळ. शेजारच्यानं धमकी दिली तसं याच्या नातेवाईकानं घराबाहेर काढला त्याला. हाकून घालण्याइतपत यानं काय केलं असंल, तुम्हीच ठरवा.
मग आमच्या जवळच त्याला रूम घेऊन दिली, वरती चौथ्या मजल्यावर. पागडी मी, म्हणजे बापानं भरली. मी कंपनीत मॅनेजरला सांगून त्याची नाईट सोडवली.
पण कामात त्यानं झपाट्यानं प्रगती केली होती. हिथल्या जगण्यावागण्याला स्पर्धेचं अंग. ह्या स्पर्धेनं महेशला खुलवलं, भुलवलं. त्या काळी कॅड नवं होते. त्यात घुसला. डायरेक्ट जनरल मॅनेजरच्या केबिनमधला कॉम्प्युटर वापरायला मिळत होता. मी प्रॉडक्शनलाच राहिलो, पण हा आता परचेसला गेला. त्याचा प्रगतीचा मार्ग आता वेगळा होता.
(क्रमशः)
छान आहे सुरवात!
छान आहे सुरवात!
छान आहे सुरवात!
छान आहे सुरवात!