भारतीय हवाईदल

Submitted by अविनाश जोशी on 25 October, 2025 - 06:26

भारतीय हवाईदल
दिवाळीच्या दिवशी नरेंद्र मोदी नेहमीच सैनिकांबरोबर दिवाळी साजरा करतात. या वर्षी ते नौदलाबरोबर विक्रांत नावाच्या विमानवाहू जहाजावर होते. या जहाजाचे वैशिष्टय म्हणजे ही अवाढव्य विमानवाहू नौका पूर्णतः भारतीय बनावटीची आहे. पाचशेहून जास्त भारतीय उद्योजक या शस्त्रास्त्र निर्मितीसाठी आपले योगदान देत आहेत. या नौकेवर तीस पेक्षा जास्त मिग-29 फायटर जेट्स आहेत. त्याच बरोबर हेलिकॉप्टर्स, अँटी ऐरकराफ्ट गन्स आणि इतरही युद्ध साधनं आहेत. ऑपेरेशन सिंदूर अजून एक दोन दिवस वाढले असते तर विक्रांतने कराची बंदर आणि पाकिस्तान नौदलाचे बरेच नुकसान केले असते. मुंबईच्या थोडं बाहेर उभे राहून ही बोट काराचीवर सहज हल्ला करू शकली असती.
दिवाळीच्या दिवशीच अजून एक घोषणा झाली, तेजस मार्क 1 अल्फा या पूर्णतः भारतीय बनावटीच्या विमानाने आकाशात झेप घेतली. भारतीय हवाईदलातून मिग-21 निवृत्त होत आहेत आणि त्याची जागा तेजस मार्क 1 घेईल. मिग-21, सेकंड जनरेशन विमान आहेत तर तेजस 4.5 जनरेशन एवढी ऍडव्हान्स आहेत. सुमारे सव्वादोनशे तेजस ,हवाईदलात सामील होती. Made in India उपक्रमामुळे आणि खाजगी उद्योगाच्या प्रयत्नाने आपले संरक्षण उत्पादन बरेच वाढले आहे. तेजस मध्ये इंटिग्रेटेड इलेक्ट्रॉनिक वॉरफेयर , अत्यंत प्रगत असे रडार तसेच हवेतच इंधन भरण्याची सोय आहे.
भारतीय हवाई दलात आज सर्व मिळून अडीच हजाराहून जास्त विमानं आहेत आणि त्यांचे ट्रेनिंग जगात उत्कृष्ट मानले जाते. आपल्याला आठवतच असेल पासष्टच्या युद्धात भारतीय बनावटीच्या GNAT विमानाने अमेरिकन बनावटीच्या F-16 विमानांना नेस्तनाबूत केले होते. ऑपरेशन सिंदूर मध्येही शत्रूच्या तीनशे किलोमीटर आत असलेले विमान आपल्या शस्त्र दलाने अचूक टिपले आहे. ऑपरेशन सिंदूर मध्ये पाकिस्तानला गुढघे टेकायला लावणारे शस्त्र म्हणजे ब्राम्होस 1. पाकिस्तानी सेना अधिकाऱ्यांना ब्राम्होस अस्त्रे कशी अडवायची हेच कळत नव्हते. त्याच्यामुळेच संख्येने जगात चौथे असलेले भारतीय हवाई दल आज जगातील तिसरे शक्तिशाली हवाईदल समजले जाते. चीन कडेही पारंगत तंत्रज्ञान असले तरी कुठल्याही युद्धात त्याचा वापर अद्याप झालेला नाही.
जगातील सर्वात लढाऊ विमानामध्ये पाच विमाने अग्रगण्य आहेत. गुणवत्ता क्रमांकानुसार यादी नाही. अमेरिकेची F-35 लायटनिंग आणि F-22 रॅप्टर ही विमाने रशियाचे, सुखोई Su-57, चीन चे, J-20 आणि फ्रान्सच्या रॅफल्स यांचा समावेश आहे. लवकरच भारतात Su -57 निर्मितीचा प्रकल्प हाती घेण्यात येईल. वरील पाच विमाने ध्वनातीत वेगाने जाणारी असून इतरही अनेक उच्च तांत्रिक बाबी त्यांच्यात आहेत. यातील रॅफल्स आणि F -35 यांचा युद्धात उपयोग झाला आहे.
ब्राम्होस 1 चा पल्ला साडेचारशे किलोमीटर असून ब्राम्होस 2 चा पल्ला साडेआठशे किलोमीटरचा आहे. ब्राम्होसची मागणी वाढल्याने उत्पादन वाढीसाठी भारताने नुकताच दुसरा कारखाना लखनऊ जवळ उभारला आहे .

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users