उद्यानगाथा

Submitted by Adm on 23 October, 2025 - 12:14

वसंत ऋतू
ह्या शहरात घर शोधायला सुरुवात केली तेव्हा पहिली अट होती ती म्हणजे किंमत! बाकी ढिगभर चांगल्या गोष्टी असूनही ते परवडलच नाही तर काय करणार ?! त्यानंतर अजून एक महत्त्वाची अट होती ती म्हणजे पुढे मागे छोटसं का होईना पण अंगण हवं. आम्हांला दोघांनाही झाडं लावायची, बागकामाची आवड आहे आणि ती जोपासण्यासाठी जागा हवी. गेल्या दहा वर्षात कोव्हिडची वर्षं सोडता एका घरी सलग दोन वर्षांपेक्षा जास्त रहाणच झालं नाही. शिवाय फक्त घरं आणि शहरंच नाही तर देशही बदलले! त्यामुळे उपलब्ध असलेल्या जागेत लावलेली थोडी फार झाडं प्रत्येकवेळी सोडून यावी लागली. पेरेनियल झाडांचं पुढे काय झालं माहीतही नाही.
*
PXL_20240916_211942576.jpg
*
हे घर बघायला आलो, तेव्हा सगळ्यांत आवडलेली गोष्ट म्हणजे पुढचं मागचं अंगण! पुढच्या बाजूला मुख्य दार आणि त्याला लागून असलेल्या गॅरेजपासून पुढे रस्त्यापर्यंत उतार. ह्या उतारावर ड्राईव्ह-वे. ड्राईव्ह-वे च्या एका बाजूला चिंचोळा हिरवा पट्टा तर दुसर्‍या बाजूला मोठी हिरवळ.. दोन्ही बाजूंना अर्ध्यापर्यंत कुंपण. हिरवळीवर उतरंड छेदणारा एक मोठा चौथरा आणि त्यावर लावलेली विविधरंगी पानांची झुडपं. हिरवळीवर घराच्या बाजूला बॉक्सवूडच्या झुडपांची मोठी रांग. सगळं कसं नीटनेटकं. मागच्या बाजूला तर सलग मोठं अंगण, त्यात हॉट टब, ट्रँपोलिन, कोबा घालून टेबल खुर्च्या ठेवायची सोय. मागे कुंपणाच्या बाहेर मोठी मोठी पाईन आणि सेडारची झाडं. ती इतकी जुनी आणि उंच की सूर्य डोक्यावर आल्याखेरीज जमिनीपर्यंत ऊन पोहोचतही नाही! घराच्या डाव्या बाजूला शेजारच्यांचं कुंपण आणि उजव्या बाजूचा एक त्रिकोणी पट्टाही कुंपणाच्या हद्दीत. तिथली झाडांची सावली इतकी गडद की भर उन्हातही थंड वाटावं. एकूण बागकामाची हौस भागवायला एकदम योग्य. हौस भागवता भागवता दमायलाही होईल कदाचित, पण तेव्हाचं तेव्हा बघू!
*
PXL_20241011_200312636.PORTRAIT.ORIGINAL.jpg
*
उन्हाळ्याची सुरूवात
ह्या घरी रहायला यायचं ठरल्यावर आमच्या मनात बागेचे इमले सुरू झाले. ड्राईव्ह-वेच्या उतारावर डॅफोडील्स, ट्युलिप आणि हायासिंथचे बल्व लावू. पुढे हिरवळीच्या भोवती छान फुलझाडांचं कुंपण करू. एका बाजूला झेंडूची रोपं, दुसरीकडे गुलाबाची झाडं. चौथर्‍यावर जागा मिळेल तशी शेवंती, अ‍ॅस्टर शिवाय जर्बेराचे कंद. म्हणजे कशी जवळजवळ फेब्रुवारी ते ऑक्टोबर फुलं फुलतील. उताराच्या दुसर्‍या बाजून लालभडक पानांचं लेसलिफ मेपल आणि अजून एखादं शोभेचं झाड चांगलं वाटेल. तिथे फार लहान झाडं नको, मोठी, स्पष्ट दिसणारी हवी. ड्राईव्ह-वे वरून गाडी मागे घेताना कोणी डगमगलं तर बिचार्‍या झाडांचा जीव जायचा! मागच्या बाजूला फार काही नको करायला. मुलांना खेळायला मोकळी जागा हवी थोडी. डाव्या बाजूला स्वयंपाक घराच्या दारापाशी व्हेजी पॅच करू. मिरच्या, कोथिंबीर, भाज्या लावता येतील. म्हणजे अगदी फोडणीचं तेल तापायला ठेवलं की जाऊन मिरच्या तोडून आणायच्या! मागच्या कुंपणाच्या भोवती सावलीत फुलतील अशी फुलझाडं लावू. उजवीकडच्या त्रिकोणी तुकड्यावर सेडार, पाईनच्या फांद्यांची काटछाट करून फळबाग करावी. सफरचंद, अंजीर, द्राक्षांची वेल, इथल्या हवेत जगत असतील तर डाळींबाचं झाड, शिवाय पेअर. अजून थोडी जागा उरलीच तर एक गाय पण आणून ठेऊ म्हणजे तिचं दूध घालून फ्रुट सॅलडही करता येईल!
*
PXL_20241011_200416805.PORTRAIT.jpg
*
उन्हाळा
अखेर ह्या घरी रहायला आलो आणि आता मनात बांधलेले इमले प्रत्यक्ष उतरवायची वेळ आली आहे. सामान हलवण्यात आणि लावण्यात खूप वेळ गेला आणि दमायला झालं. बागेचे इमले हवेतच राहणार की काय असं वाटतय. सुरुवात करायची म्हणून दुकानातून मातीची दोन-तीन पोती आणली. ती आणली कुंड्यांच्या अंदाजाने. जमिनीवरच्या झाडांसाठी वापरली तर एका कोपर्‍यात घालून संपली पण. मग अजून फेर्‍या माराव्या लागल्या. इथल्या उन्हाळ्यात गवत इतकं भसाभसा वाढतं की ते वाढण्याचा वेग आणि कापण्याचा वेग ह्यात कधीच मेळ न बसल्याने ते कायम वाढलेलच दिसतं. अगदी लहान मुलांचे केस कापल्यावर कसे लगेचच दोन चार दिवसात पुन्हा वाढलेले दिसतात तसं.
*
PXL_20250609_145216260.jpg
*
शरद ऋतू
कंद, नवीन रोपं लावेपर्यंत उन्हाळा संपून थंडी, पाऊसच सुरू झाला आणि मग पानगळ, पाईन निडल्स ह्यांचा खच पडून बाग झाडायचं काम तेवढं वाढलं. झाडांचं काम नाही तर निदान कुंपणाची डागडुजी करून घेऊ असा विचार करून सरत्या उन्हाळ्यात कुंपणाचं काम करून घेतलं . देश कुठलाही असो, काम करायला येणारी माणसं वेळेवर येतील तर शपथ. दसर्‍याला छान तयार होईल असं वाटलेलं कुंपण कसंबसं थँक्सगिव्हिंगपर्यंत तयार झालं. स्वयंपाकघराच्या दाराजवळ सफरचंदाचं झाड आहे ह्याचा नुकताच शोध लागलाय. त्याला लगडलेली सफरचंद चांगली मोठी होऊन पानांमधून डोकी बाहेर काढायला लागली आहेत. पण ते झाड घराच्या फारच जवळ आहे. फळांचा बहर संपल्यावर कुंपणाचं काम करणारा माणूस म्हणे की ते थोडं दूर लावूया. त्याला विचारलं जगेल ना ते? तर म्हणे देवाची कृपा असेल तर जगेल. म्हंटल झाड उपटणार तू, मग ते जगवायची जबाबदारी देवावर का टाकतोस? तर तो नुसताच हसला. पण मग खरंच देवाचं नाव घेऊन ते अख्खं झाड काढून मागे लावलं. तिथेच दोन र्‍हॉडोडेंड्रॉनची (rhododendron)झाडं होती. ती मागच्या दारी कशाला? पुढे छान दिसतील म्हणून ती काढून पुढे लावली. एका कोपर्‍यात वेल चढवायला लाकडी जाळीही करून घेतली. आता थंडीत कसली वेल लावणार असा विचार करत असतानाच 'विंटर जॅस्मिन' ह्या वेलीची माहिती समजली आणि जवळच्या नर्सरीत ती मिळालीही! आणून ती जाळीजवळ लावून टाकली. कॉस्टकोतून (Costco) आणलेले ट्युलिप आणि डॅफोडिल्सचे बल्ब थंडीत कुडकुडत एकदाचे लावले. नर्सरीत भेटलेल्या आज्जींची आज्ञा शिरसावंद्य मानून पिवळी शेवंती जमिनीत लावली. जगेल म्हणे नक्की! लाल आणि गुलबट रंगाची मात्र कुंड्यांमध्येच ठेवली आहे.
*
PXL_20241011_201108874.jpg
*
हिवाळा
हिवाळ्यात परिसरातली फुलझाडं आणि फळझाडं निष्पर्ण झाली पण पाईन, सेडारनी हिरवा रंग मात्र टिकवून ठेवला आहे. अमेरिकेतल्या इतर भागांमध्ये जसे खराटे दिसतात, ततेवढे खराटे काही ह्या भागात होत नाहीत आणि त्यामुळे भर थंडीतही निसर्गाच्या जिवंतपणाची लक्षणं दिसत रहातात. नवीन वर्षाचं स्वागत नुकत्यात लावलेल्या विंटर जॅस्मिनच्या कळ्यांनी केलं. पाना गणीक एक कळी. पुढे पानं झडून गेली आणि सुंदर नाजूक पिवळ्या फुलांनी वेल बहरली! अश्यातच हिमवृष्टी झाली. गोठवणारी थंडी, साठलेला पांढरा शुभ्र बर्फ आणि त्या पार्श्वभुमीवर ती पिवळ्या फुलांची वेल! नेहमीच्या हिवाळ्यापेक्षा हे एकदम वेगळच दृष्य आहे!. ट्युलिप आणि डॅफोडील्सना सिझन बदलायची कॉस्टकोपेक्षाही जास्त घाई असते. त्यामुळे बर्फ सरता सरता ट्युलिप आणि डॅफोडील्सच्या कोंबांनी डोकं वर काढायला सुरूवात केली आहे. हायासिंथ त्यामानाने निवांत! तश्यातच दोन-तीन दिवस पावसाने उघडीप घेतली. बाहेर बघितलं तर शेजारच्या घरातले आज्जी-आजोबा पूर्णवेळ बाहेर! वाफ्यांची डागडूजी करणं, वाळक्या काटक्या काढून टाकणं, वाफ्यांंमध्ये मल्च टाकणं, मोठ्या झाडांची छाटणी करणं, हिरवळीवर खत फवारणं, थोड्या बिया टाकणं वगैरे बरीच कामं करत आहेत. थंडी होती पण पूर्ण जामानीमा करून काम करत आहेत. त्यांना विचारलं की हे एवढया लवकर करायचं का? तर म्हणे हो, नंतर वेळ कसा जातो कळत नाही.
*
PXL_20250422_162544794.jpg
*
वसंत ऋतू
आज्जी आजोबांकडून धडे घेऊनही आम्हांला हलायला जरा वेळच लागला. पण दरम्यान बागेत काही सुखद धक्के बसायला लागले आहेत. आम्ही लावलेले ट्युलिप आणि डॅफोडील्स फुललेच होते पण अजूनही काही ठिकाणी एक एक ट्युलिपची फुलं दिसायला लागली. पुढच्या दारी असलेल्या चौथर्‍यावर अगदी जमिनीलगत फुलाच्या आकारात मस्त पोपटी-हिरवी पानं फुटलेली दिसतायत. इंटरनेटवर शोधलं तर समजलं की ते 'होस्टा'. त्यांना मध्यभागी तुरा येतो. आधी इथे रहाणार्‍यांनी कंद लावले असावे. र्‍हॉडोडेंड्रॉनची पानं थंडीत गळलीच नव्हती आणि त्याच्या पानांच्या बेचक्यात छोट्या छोट्या कळ्या दिसायला लागल्या आहेत. र्‍हॉडोडेंड्रॉन आधी एवढी दिसली नव्हती पण आता मात्र बाहेर सगळीकडे तिच दिसत आहेत! पांढरी, गुलाबी, केशरी आणि लाल भडक. आमच्या बागेतला रंग कुठला येतोय बघूया. ह्यांचा फुलोरा सुंदर दिसतो. गेल्यावर्षी आणलेल्या स्ट्रॉबेरीची रोपटी वाढायला लागली आहेत. आणली तेव्हा अगदीच लहान होती. जीव आहे की नाही असं वाटलं तेव्हा! त्यांना नखाएवढी लहान पांढरी फुलं दिसत आहेत. सगळ्यात भारी म्हणजे सफरचंदालाही फुलं आली आहेत. सफरचंदाची फुलं आधी कधी पाहिलीच नव्हती! सुरेख पांढरी, गुलाबी फुलं आहेत. म्हणजे इकडून तिकडे हलवलेली सगळी झाडं रुजली तर! गेल्यावर्षी जमिनीत लावलेले एशियन लिलीजचे कंदही फुलायला लागलेले दिसत आहेत. बागेत अजून झाडं लावायला हवी. मागे ठरवलं होतं तशी झेंडूची रोप बॉर्डर म्हणून लावायची आहेत. फॉलमध्ये जमिनीत लावलेल्या पिवळ्या मम्सचं काय झालं काय माहित? अजून तरी फुट दिसत नाहीये. मागच्या उन्हाळ्यात जे हरीण दिसायचं ते परवा खूप दिवसांनी दिसलं. खूप जाड वाटलं. नंतर समजलं की तिला लवकरच पाडस होणार आहे तर! आजूबाजूला डॉगवुडची झाडं छान फुलायला लागली आहेत. आपल्याहीकडे एक असावं म्हणून गुलाबी रंगाचं डॉगवुड आणून पुढच्या आंगणात उतारावर लावलं. ह्या परिसरात अतिशय उत्तम दर्जाच्या रेनियर चेरी मिळतात. म्हणून ते ही लावलं. नंतर समजलं की त्याला 'सोबत' लागते. ते एकटं फुलत, फळत नाही. म्हणजे आता अजून एक चेरीचं झाड आणावं लागणार!
*
PXL_20250927_191553551.jpg
*
उन्हाळ्याची सुरूवात
बागेतले धक्के अजूनही सुरूच आहेत पण ते तेवढेसे सुखद राहिलेले नाहीत आता. र्‍हॉडोडेंड्रॉनच्या पानांमधल्या बेचक्यांमध्ये जे काही होतं त्या कळ्या नव्हत्याच! ते कोंब उमलले आणि त्यातून नवीन पानच फुटली आणखी. ड्राईव्ह-वेच्या शेजारच्या हिरवळीवर अचानक मातीची ढेकळं दिसायला लागली. जरा इंटरनेटवर शोधाशोध केली तर.. हे देवा! ते तर मोल नाहीतर गोफर (Gopher) असतील असं समजलं. आता ह्यांचा बंदोबस्त करायचा ह्याची शोधाशोधी करा. इंटरनेटवर बघितलं तर नानाविध उपाय दिसले. त्यांच्या बिळांवर कुत्र्याला शी करायला लावा इथपासून ते अ‍ॅमेझॉनवर मिळणारं कोल्हामूत्र त्यावर शिंपडा इथपर्यंत! ह्या असल्या वासाळ उपायांनी त्या मोल-गोफरांपेक्षा आपल्यालाच त्रास व्हायचा. मग जरा शेजारीपाजारी विचारलं की अजून शी-सू नसलेले काही साधे उपाय नाहीत का? एकानी औषध सुचवलं. त्याच्या कांड्या मिळतात. त्या त्यांच्या बिळाच्या तोंडाशी खुपसून ठेवायच्या मग ते मरतात. दुसर्‍यांनी सांगितलं की गोफरांचा बंदोबस्त करणार्‍या कंपनीला बोलवा त्या शिवाय गोफर जात नाहीत. गोफरांची अख्खी नगरी असते जमिनीखाली. मला रात्री स्वप्नातही ते न बघितलेले गोफर यायला लागले! दुसर्‍या एक काकू म्हणाल्या, चांगलं आहे की ते मोल्स आले ते, त्यावरून हे सिद्ध होतं की तुमची जमीन छान सुपिक आहे. म्हंटलं उपयोग काय, ती जाणार त्या मोल आणि गोफरांच्या बोडख्यावर (शब्दश:). आता होमडेपोमधून त्या कांड्या आणणं आलं. सकाळी सकाळी हरिण आणि त्याचं नुकतच जन्मलेलं गोजिरवाणं पाडस दिसलं. अगदी रामायणात वर्णन असतं सोनेरी ठिपके असलेलं आहे. हे असं हरिण पाहून सीतेने "मज आणून द्या हो हरिण आयोध्यानाथा!" असं आर्जव केलं नसतं तरच नवल. आई-बापाच्या मागे मागे टणाटणा उड्या मारत फिरत असतं. आमच्या ज्योईला मात्र ते अजिबात आवडत नाही. आवाज बसेपर्यंत भुंकतो त्याच्यावर. स्ट्रॉबेर्‍या, सफरचंद ह्यांना छान फळं धरली आहेत. काकडीचा वेल, टोमॅटो, मिरच्यांची झाडं छान वाढत आहेत. होस्टाची पानंही छान मोठी झालीयेत , कधीही तुरा येईल आता. डॉगवूडची पानंही मस्त रंगली! पण माझी आवडती पिवळ्या रंगाची मम्स नाहीच उगवली. कुंडीतली दोन्ही छान फुटली आहेत.

उन्हाळा
औषधाच्या कांड्यांचा उपयोग झालेला दिसतो आहे. मोल, गोफरांची बिळं आणि त्यांनी उकरलेली माती इतक्यात दिसली नाही! गोजिरवाणं पाडस आता थोडं मोठं झालय. पण वाढत्या वयाबरोबर भयंकर खादाड झालय! सारखी येऊन बागेतली पानं फस्त करतं. होस्टाचं एकही पान शिल्लक ठेवलं नाही. इतकं सफाचट केलं की तिथे पूर्वी पानं होती हे ही कळू नये. चेरी, डॉगवूड, चौथर्‍यावरची शोभेची झाडं सगळ्यांची पानं खाऊन खराटे केले. भर उन्हाळ्यात फॉल आल्यासारखं वाटायला लागलं. गुलाबाची पानं आणि सूर्यफुलं पण खाल्ली. गुलाबाची पानं, फुलं खाताना त्याच्या तोंडाला काटे टोचून चांगली अद्दल घडायला हवी होती असा दुष्ट विचारही माझ्या मनात येऊन गेला. पुढे पाडसाचे उद्योग तर मागे खारी आणि गोगलगाई टपलेल्या. डांबरट खारींनी एकही स्ट्रॉबेरी आमच्या तोंडी लागू दिली नाही. अगदी आमच्या समोर स्ट्रॉबेर्‍या पळवून कुंपणावर बसून वाकुल्या दाखवत त्या खातात. गोगलगायी दिसतात गरीब बिचार्‍या पण एकदा टोमॅटो त्यांच्या तावडीत सापडला की काही खैर नाही. कुरतडून कुरतडून भोकं पाडतात त्याला. सफरचंद नक्की कोणी पळवली ते कळायलाही मार्ग नाही. पक्ष्यांनी खाल्ली तर तुकडे खाली पडलेले असतात पण इथे अख्खीच्या अख्खी सफरचंदं गायब झाली आणि आम्हांला त्याचा अंशही दिसला नाही! एकतर ते खादाड पाडस परसदारीही येऊन गेलं असावं किंवा मग एक-दोनदा अचानक उगवलेल्या ढोल्या रॅकुन (raccoon) परिवाराची वक्रदृष्टी आमच्या सफरचंदांवर पडली असावी! इथे पडलेल्या कडक उन्हाळ्याने हिरवळंही होरपळली आहे आणि काही काही ठिकाणी वाळलेल्या गवताचे पट्टेही दिसायला लागले आहेत.

शरद ऋतू
आता पुन्हा फॉल आला, एक चक्र पूर्ण झालं. मागे लावलेले कंद आता थंडीत बेगमी करून पुन्हा फुलायला तयार होतील. बाकीची झाडं आधी फॉलचे रंग दाखवून मग विरक्ती आल्यासारखी फुलोरा, पानं झटकून टाकतील. उन्हाळ्यात आम्हांला त्रास दिलेले प्राणी आता थंडीची चाहूल लागून आपापल्या बिळा-गुहांमध्ये गुडूप होतील. हिरवळीची वाढ होणं बंद होईल. सप्टेंबर अखेरी एकदा वर्षातलं शेवटचं गवत कापून झालं की ते ही गप पडून राहील. वर्षभरात बागेने भरपूर गंमती जमती दाखवल्या. हल्लीच्या तीस सेकंदाचा 'रिल'च्या जमान्यात बागकाम खूप संयम शिकवतं. सुरूवातीला दर दोन तासांनी बागेत काही फुललं आहे का? हे जाऊन बघणार्‍या मला, सूर्यफुलाचं रोप थेट मोठं झाल्यावरच दिसलं!
स्वत: लावलेली, पाणी, खत घालून वाढवलेली झाडं वाढताना फुलताना फळताना बघण्यासारखं समधान नाही. मग भले फळं प्राणी पक्ष्यांनी खाऊन का टाकेना! शिवाय स्वत:चं अन्न स्वतः शोधणारी आणि तयार करणारी, स्वत:च्या प्रजननासाठी दुसर्‍यांना म्हणजे प्राणी, किटक, पक्षी एवढंच काय पण माणसांनाही कामाला लावणारी, आहेत त्या परिस्थितीत मार्ग काढणारी झाडं हीच सजीव सृष्टीतला सगळ्यात बलवान जीव आहे हा माझा जरा विचित्र विचार आता अधिकाधिक दृढ होत चालला आहे. एका नर्सरीमधली कर्मचारी आम्हांला म्हणाली होती "Don’t worry, they know what to do. They will take care of themselves” आणि हे आता अगदी १००% पटलं आहे. ही सगळी झाडं पुढच्यावर्षी आणखी मोठी होतील. नवीन झाडंही लावली जातील. यंदा आलेल्या झेंडू, झिनियाच्या फुलांच्या पाकळ्या वाळवून पुढच्यावर्षीचं बियाण तयार करायचं आहे. पुढच्या वर्षी सुवासिक फुलांची झाडं लावायची आहेत. थंडी संपता संपता भाज्यांच्या बीया कुंड्यांमध्ये पेरून त्यांची रोपं तयार करून ठेवायची आहेत. येणारी फळं खादाड प्राण्यांपासून वाचवायची आहेत! पुढच्या वर्षी बाग आपल्या पोतडीतून काय काढते आणि कुठले नवे अनुभव, धडे देते हे बघायची आता उत्सुकता आहे.

---
मागे मायबोलीच्या दिवाळी अंकात राजसगौरी नावाच्या लेखिकेने बागेची रोजनिशी लिहिली होती. त्या धरतीवर ही बागेची ऋतूमानानुसार डायरी.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

किती सुंदर लिहिलंयस! फोटोही सगळे एक से एक मस्त! Happy

>>> झाडं हीच सजीव सृष्टीतला सगळ्यात बलवान जीव आहे हा माझा जरा विचित्र विचार आता अधिकाधिक दृढ होत चालला आहे
Happy

>>> बागकाम खूप संयम शिकवतं. सुरूवातीला दर दोन तासांनी बागेत काही फुललं आहे का? हे जाऊन बघणार्‍या मला, सूर्यफुलाचं रोप थेट मोठं झाल्यावरच दिसलं!
हे वाचून तो कबीराचा दोहा आठवला :
'धीरे धीरे रे मना, धीरे से सब होय
माली सींचे सौ घडा, ऋत आये फल होय'

गाय पाळलीत की सांगा, मग तिकडे चक्कर मारू. Proud

मस्त लिहिलंयस. बागेत दर वर्षी काय लावलं , कुठली झाडं /कंद चांगली रुजली , कुठली टिकली नाहीत याची दर वर्षी नोंद ठेवत जा.

सुरूवातीला दर दोन तासांनी बागेत काही फुललं आहे का? हे जाऊन बघणार्‍या मला, सूर्यफुलाचं रोप थेट मोठं झाल्यावरच दिसलं! > मला फ्रॉग अ‍ॅंड टोड पुस्तक आठवलं . त्यात पण एकटा दर पाच मिनिटांनी बिया रुजल्या की नाही ते पाहत असतो.

एकानी औषध सुचवलं. त्याच्या कांड्या मिळतात. त्या त्यांच्या बिळाच्या तोंडाशी खुपसून ठेवायच्या मग ते मरतात. >> रॅट पॉयझन किंवा गोफर इत्यादी करता काही औषध वापरलं तर अशा क्रिटर्सचे मृत देह खाणार्‍या इतर प्राणी / पक्षी यांना पण विषबाधा होऊ शकते .

छान लिहिलेय.

इतक्या भराभर ऋतुबदल झाले. मला तर नुसते वाचुनच हेवा वाटला Happy

आजी आजोबांचे बरोबर आहे. अजुन वेळ आहे म्हणत् जरा रेंगाळले की झालेच. वेळ हातातुन निघुन जातो. Happy

काय सुंदर बाग आणि त्या पाडसाचा मला फार हेवा वाटला. पुष्पौषधी खाते. सफरचंद कुणी नेली. मजाच आहे बागेची. तुमच्या घराच्या शोध सत्कारणी लागला.
Adm नाव वाचून वाटले की Adminलाही बागेची लागण झाली काय?

मस्त लिहिलं आहे! छान, निवांत वाटलं वाचून.
तुम्ही The yearling (किंवा त्याचं भाषांतर 'पाडस') वाचली आहे का? त्यातलं खादाड पाडस आठवलं मला Happy

छान लेख ..!
फोटो एकदम नजर सुखावणारे..!

खूप छान लिहिले आहेस.
परत परत वाचावं असा लेख झालाय..
तुझ्या बागेत चक्कर टाकून आल्यासारखे वाटले लेख वाचून..
बागेची पुढची प्रगती पण इथे लिहित रहा.

सगळ्यांना प्रतिसादासाठी धन्यवाद Happy

गाय पाळलीत की सांगा, मग तिकडे चक्कर मारू. >>>> हो नक्की Proud मस्त दोहा!

याची दर वर्षी नोंद ठेवत जा. >>>> चांगलं सुचवलस. नक्की करू हे.

इतक्या भराभर ऋतुबदल झाले >>>> इथे अमेरिकेत ऋतुबदल खूप स्पष्टपणे दिसतात. म्हणजे फक्त तापमान, पाऊस ह्यांच्यावरून नाही तर दृष्य गोष्टीही अगदी बदलतात. तरी आमच्या भागापेक्षा इस्ट आणि नॉर्थ इस्टला अजून जास्त आहे. पण मग हवामानही टोकांचं असतं.

वेळ हातातुन निघुन जातो. >>>> खरं आहे. ह्यावर्षी आम्ही स्प्रिंगची तयारी फेब्रुवारीतच करणार आहे.

तुमच्या घराच्या शोध सत्कारणी लागला. >>>> अगदी Happy

Adm नाव वाचून वाटले की Adminलाही बागेची लागण झाली काय? >>>> तुम्ही पहिले नाही आहात. Wink

तुम्ही The yearling (किंवा त्याचं भाषांतर 'पाडस') वाचली आहे का? त्यातलं खादाड पाडस आठवलं मला >>>> हो वाचलं आहे ना. आता ते पाडस अगदी 'रिलेट' झालं! Happy

बागेची पुढची प्रगती पण इथे लिहित रहा. >>> नक्की प्रयत्न करेन.

पुन्हा एकदा सगळ्यांना धन्यवाद!

लेख , बाग, वर्षभरातील बदल सगळेच आवडले.

"Don’t worry, they know what to do. They will take care of themselves” हे वाक्य असच माझी मैत्रीण ( मला ) मराठीत म्हणाली होती... संत्र्याच झाड जेव्हा जाते का म्हणून मला खूप टेन्शन. आलेलं तेव्हा..
ते झालंही नंतर नीट Happy

अंजिराच्या झाडाचा एकही अंजीर आम्हाला मिळालेला नाही, तो अधिकार खारींचा.

गोफर हा ( नत्दृष्ट) प्रकार मला अलीकडेच कळला.
आमच्या घरमालकाने त्या बिळावर मोठे दगड ठेवून दिले.
पण home Depot मध्ये काही औषध मिळत असेल तर सांगाल का नाव?
सुरुवातीला २-३ वर्षे हौसेने काही प्रयोग केले.. पण गेल्या २ वर्षांपासून सगळं बंद झालंय. तुमची बागेची गोष्ट वाचताना मला ते दिवस आठवले.

कडीपत्ता, मोगरा, गुलाब काही लक्ष न देताही (स्वतःच) वाढतात, फुलतात, हा अनुभव. घेतलाय Happy

झाडं सगळ्यात बलवान जीव ह्यालाही अनुमोदन.

गेल्या

मस्त लिहिलयस पग्या ! हे खासच आवडल "स्वत: लावलेली, पाणी, खत घालून वाढवलेली झाडं वाढताना फुलताना फळताना बघण्यासारखं समधान नाही. मग भले फळं प्राणी पक्ष्यांनी खाऊन का टाकेना"

मम्स बद्दल - फ्लोरिस्ट मम्स असतील तर ती पेरीनियल नसतात बाकीची सगळी असतात. शक्य असेल तर अस्टर अ‍ॅड कर त्या लिस्ट मधे. तो कॉम्बो (नि त्याचा वास) जबरदस्त असतो.

धन्यवाद छन्दिफन्दि , असामी आणि ऋतुराज Happy

शक्य असेल तर अस्टर अ‍ॅड कर त्या लिस्ट मधे. >>>> हो! अ‍ॅस्टर लावायचं आहे. शिवाय वासाची फुलझाडं लावायची आहेत. डॅफने आणलेलं आहे ते स्प्रिंगमध्ये जमिनीत लावू.

किती दिवसांपासून वाचेन म्हणत आज वेळ झाला. मस्त नोंदी सगळ्या. आपली दोस्ती होत जाते आपल्या बागेशी. एकेक किस्से, गोष्टी जमा होतात बागेच्या संदर्भानं.

सुगंधी झाडांमध्ये लायलॅक लावा. निशिगंधाचे पेरेनियल कंद मिळतात, ते पण लावू शकता. ट्युबरोजमध्ये इथे सुंदर पेस्टल रंग मिळतात. तुमच्याकडे चालत असेल तर हनीसकल. हौस असेल तर हार्डी केळ. केळीची जरा बडदास्त ठेवावी लागते पण बागेत केळ हे फार भारी फीलिंग आहे. भाज्यांमध्ये अ‍ॅस्परेगस, हे एकदा लावलं की पहिल्या २ वर्षांनी दर वर्षी मार्च ते जून घरचे अ‍ॅस्परेगस. मागे जागा असेल तर पम्पकिन लावु शकता. फार लाड न करता घरचे २-३ तरी भोपळे हाती पडतात. हा एक अजून फॅसिनेटिन्ग प्रकार आहे. माझ्याकडे तर खारींनी टाकून दिलेल्या बियांतून रोप उतरून भोपळे मिळाले आहेत. वेल पण अगदी जागा बघून भर पुढच्या दारी उगवले दोन्ही वेळी.