Submitted by आर्त on 10 October, 2025 - 05:16
पहाटेस उघडता डोळा
अंगावर प्रेमाचा शेला
ओळखीच्या हलक्या हातानी
सखा माझा पांघरून गेला
पहिल्या उन्हाचा क्षण पवित्र
अंगावरती मखमली गारवा
मनात अपरिचित तरंगे
हा नव्या भावनेचा गोडवा
तू म्हणतोस दोघे प्रेमी आपण
पण पुस्तकी तुझी प्रेमाची व्याख्या
ते प्रेम नव्हे, सवय म्हणीन मी
ज्यास तू वर्णीतोस सख्या
पोटात जन्मली नवखी ऊब
अंगभर माझ्या गेली पसरून
वाटे, तू असावास येथे
घ्यावे तुला मी मिठीत भरून
हे कसले हास्य मुखावरती?
तू नसताना असल्याचा भास
स्वतंत्रप्रिय माझ्या मनास
का हवा वाटे तुझा सहवास?
हेच प्रेम का? माहित नाही
तुलना तरी मी करू कशाशी?
प्रत्येकाची अनुभूती वेगळी
बहुदा तुझीही व्याख्या खरी जराशी
१०.१०.२५
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा