नाव सुचवा
चित्रपटामध्ये बऱ्याच गंमती जमती चालू असतात. फिल्म इन्स्टिट्युट सुरु झाल्यावर प्रत्येकास एक शॉर्ट फिल्म करावी लागते. त्या त्या कोर्सेचे विद्यार्थी तेथे जॉब्स करतात. जया भहादूरीची 'सुमन' नावाची एक शॉर्ट फिल्म होती. कथानक साधे होते. ती एक पौगोंडा अवस्थेतील मुलगी असते. सूर पारंब्या खेळणे , झाडावर चढणे अशा गोष्टीत रममाण होत असते. एकदा तिला अचानक आपल्यातल्या स्त्री ची जाणीव होते आणि तिची वृत्तीच बदलते. उत्कट अभिनयामुळे ती एक चांगली फिल्म होती. परंतु त्यातील काही दृशांमुळे तिचे प्रदर्शन थांबवले गेले.
दुसरी वादग्रस्त फिल्म होती रेहाना सुलतानाची . त्या फिल्मची सुरवात होते रेहाना कमोडवर बसलेली असताना आणि बसल्या बसल्या बराच वेळ लागत असल्याने तिच्या मनात देवाचे, धर्माचे , समजुतीचे असे बऱ्याच प्रकारचे विचार येऊन जातात, आपण असे दुःखी कष्टी किती वेळ राहणार , यातून सुटका नाही का ? असे ती अतिशय दुःखाने म्हणत असते. शेवटी अचानक तिचे डोळे विस्फारतात 'आह !! ' इट इज कमिंग ! फिल्म संपते.
फिल्म इन्स्टिट्यूटच्या पूर्वी तिथे एक प्रभात स्टुडिओ होता बरेच प्रख्यात चित्रपट तिथे शूटिंग व्हायचे. एका रात्री नऊ वाजता एक फिल्म शूट करायचे ठरले. शॉट बहुतेक रात्रीच्या वेळचा फक्त हिरोईन वर होता. सेट लावून झाल्यावर हिरोइनला साडेदहा वाजता बोलावणे गेले. मॅडम म्हणाल्या त्यांना खूप भूख लागली आहे त्यामुळे त्यांना सहज सुंदर अभिनय करत येणार नाही. टीमने चौकीदारच्या झोपडीतून त्यांच्याकरिता डाळ खिचडी करून त्यांना देण्यात आली. डाळ-खिचडी समोर आल्यावर हिरोईन नाक मुरडून म्हणाली, माझ्यासारख्या बाईला तुम्ही असे जेवण कसे देता. मला ब्रेड ऑम्लेट हवे आहे. तेव्हा रात्रीचे साडेअकरा वाजत आले होते. त्या काळी रात्री पुण्यात ऑम्लेट मिळणे शक्य नव्हते. परंतु हिरोइन अडूनच बसली आहे म्हंटल्यावर युनिटची लोकं इकडे तिकडे पांगली. रात्री दोन वाजता कुठूनतरी अंडी आणल्यावर, युनिट मधल्या एकाने कसे बसे ऑम्लेट बनवले आणि ब्रेड बरोबर हिरोइनला दिले. तोपर्यंत आता रात्रीचे अडीच वाजले होते. बाई ढेकर देत म्हणाल्या, चला आता सेट लावला असेल तर मी येते. शेवटी एकदाचा लवाजमा सेटवर पोहचला . सेटवरचे बहुसंख्य लोक झोपेत होते, कारण सेट लावून चार तास झाले होते. शूटिंग सुरु झाल्यावर फाटक्या आणि मळक्या कपड्यात बाई अडखळत सेटवरच्या रस्त्यावर आल्या. त्यांची पाऊले अडखळत पडत होती आणि त्यांना केवळ दोनच वाक्य बोलायचे होते ' देवा गरिबांवर दया कर, तीन दिवस झाले पोटात अन्नाचा कणही गेला नाही' या दोन वाक्यांसाठी आणि तीन चार मिनिटाच्या शॉट साठी, बाईनी टीम चे तब्बल चार तास खाल्ले होते.
दुसऱ्या एका लढाईच्या प्रसंगात एका सरदाराला धावत येऊन घोड्यावर बसायचे होते त्या नटाने आपल्याला उत्तम घोडेस्वारी येते असे मोठ्या गर्वाने सांगितले होते. ऍक्शन मध्ये सरदार धावत येऊन घोड्यावर बसतो असे चित्र होते परंतु सात-आठ रिटेक करूनही त्या सरदाराला घोड्यावर बसने जमले नाही. कुणाच्यातरी डोक्यातून अफलातून आयडिया निघाली कि आपण सरदाराला घोड्यावर बसवू आणि त्याने घोड्यावरून खाली उडी मारून उलटे पळत जावे. शूटिंग करता वेळेस कॅमेरा त्याच्या पायाकडे जाणार नाही याची दक्षता घ्यावी आणि शूटिंग झाल्यावर फिल्म रिव्हर्स करावी म्हणजे सरदार पळत येऊन घोड्यावर उडी मारून बसलेला दिसेल. कल्पना चांगली होती आणि तसे शूटिंग करण्यात आले. दुसऱ्या शॉट मध्ये चित्रीकरण ओके झाले. यानंतर फिल्म रिव्हर्स करून कॉपी केली गेली. संघ्याकाळी सर्वानी आनंदाने शूटिंगची रशेस पाहायला सुरवात केली. हा प्रसंग पाहिल्यावर सर्वानी डोक्यावर हात मारून घेतला कारण सरदारांचे पळत घोड्यावर जाऊन बसने हे कॅमेरा अँगल आणि रिव्हर्स केल्यामुळे छान जमले होते. पण शूटिंगला सरदार खाली उडी टाकत असताना घोड्यानेपण लीड खाली टाकली होती याकडे कोणाचेच लक्ष नव्हते . रिवर्स मुळे तेही उलटे झाले आणि सरदार उडी मारून घोड्यावर बसताना खालील पडलेली लीड ही वर जाऊन घोड्याच्या शरिरात गेली.
असाच एक गमतीदार प्रसंग आनंद च्या कास्टिंगच्या वेळेला घडला. रमेश देव मराठीतला प्रख्यात नट असला तरी त्याला हिंदी चित्रपटात नाव नव्हते. त्यामुळे तो वारंवार स्टुडिओत जाऊन दिग्दर्शक निर्मात्यांना भेटायचा. तो ऋषिकेश मुखर्जीनाही भेटून गेला होता. एकदा तो असाच एकदा स्टुडिओत गेले असताना ऋषींदानी त्याला पहिले परंतु त्यांना त्याचे नाव आठवत नव्हते त्यांनी त्याला बोलावले ' मी एक चित्रपट निर्माण करत आहे आणि त्यात एका मराठी डॉक्टरची भूमिका आहे तुम्ही ती कराल का ? रमेश देवने त्यांनां लगेच हो म्हणून टाकले. त्या नंतर डॉक्टरच्या बायकोचे पण कास्टिंग झाले नव्हते ऋषींदाच्या डोळासोमर निम्मी योग्य होती . शांत आणि सोज्वळ भूमिका करणारी काहीशी दुर्लक्षित निम्मी त्यांना आठवत होती. ते निम्मीला भेटायला गेले. कथा ऐकल्यावर निम्मीने होकार भरला पण ती म्हणाली, माझ्या बरोबर काम करायला हा कोण मराठी नट तुम्ही आणला आहे. तिला बरेच समजावून सांगितलं गेले की, तो मराठीतील प्रथितयश नट आहे. परंतु निम्मीची त्याच्याबरोबर काम तयारी नव्हती. तिचा एकच हेका होता. त्याच्या ऐवजी तुम्ही राजकुमाराला साइन करा . ता मला बहीण मानतो आणि त्यामुळे तो निश्चितच नकार देणार नाही. ऋषींदाना थोडे अवघडच वाटत होते. पण निम्मीच्या हट्ट मुळे ते राजकुमारकडे गेले. पटकथा ऐकताना राजकुमारने बरेच बदल करायला लागतील असे सांगितले. चित्रपटात डॉक्टरच्या घरी लग्नाच्या वाढदिवसाचा कार्यक्रम दाखवला आहे आणि त्याकरिता राजेश खन्ना आणि अमिताभ याना बोलावले आहे असे दाखवले आहे. राजकुमार म्हणाला माझ्या लग्नाचा वाढदिवस म्हणजे माझ्या घरी मोठी पार्टी आणि माझ्या तोंडी गाणे असायलाच हवे. राजकुमार निम्मीला म्हणाला तू आत जाऊन तुझी भाभी कशी आहे पाहून ये. निम्मी आत जातातच राजकुमार, मुखर्जींना म्हणाला. या कोणत्या म्हातारीला तुम्ही माझ्याबरोबर कास्ट केलं आहे. हे सर्व ऐकून ऋषींदानी तेथून काढता पाय घेतला आणि परत येताना ते रमेश देवाच्या फ्लॅटवर पोहचले. फ्लॅट अतिशय छोटा असून अस्ताव्यस्त पसरलेला होता. लक्तर लोंबणारा एक कोच. एक बऱ्यापैकी खुर्ची असे फर्निचर होते. त्यातच छोट्या अजिंक्यची दुपटी असे सर्व पसरले होते. रमेश देव डगमगत्या खुर्चीवर बसले आणि बाकीच्या दोघांनी बऱ्यापैकी जागा निवडल्या. रमेश देवांना कल्पनाही नव्हती आपले काम जाता जाता थोडक्यात वाचले आहे. थोड्याच वेळात सीमाने चटकन बाहेरची खोली आवरली आणि तीन चहाचे कप घेऊन ती बाहेर आली. तिने ऋषीदाना वाकून नमस्कार केला आणि ती परत आत गेली. आपल्या घरात कान असलेले तीन काप आहेत हे बघून रमेश देवांना बरे वाटले. तेवढ्यात ऋषिकेश मुखर्जी म्हणाले तुझी बायको चित्रपटात काम करते असे ऐकले आहे , तर तिचेच नाव चित्रपटामधील तुझ्या बायकोच्या भूमिकेकरिता का सुचविले नाही?. रमेश देव म्हणाला तुम्ही निम्मीच्या मागे होतात आणि मी माझ्याच बायकोची केलेली सूचना म्हणजे भोचकपणा झाला असता. ऋषिकेश मुखर्जींनी तिथल्या तिथेच सीमाची चित्रपटाकरिता निवड केली.